लिंगनाथ योगी
महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.
हे नाथ सांप्रदायी सत्पुरुष सुमारे १७५ वर्षांपूर्वी कर्नाटकांत चंदी चंदावरच्या बाजूस होऊन गेले. यांचा ’अमृतसार’ नामक १५न अध्यायांचा एक योगशास्त्रविषयक ग्रंथ उपलब्ध झाला आहे तो त्यांनी शके १६४६ (इ.स. १७२४) या वर्षी कावेरीतीरी चंद्रावर येथे लिहिला. त्या वेळी तेथे ’शरभ’ नामक राजा राज्य करीत होता असे वाटते. या राजासंबंधाने लिंगनाथ ह्मणतात -
तया नगरी शरभ भूपती । राज्य करीत ग सुमती ।
तो साक्षात शिवमूर्ति । त्याची किर्ति अगाध ॥५५॥
तो भक्तवत्सल करुणाकर । ब्रह्मज्ञानाचा सागर ।
कैवल्यपदींचा दातार । तोप परात्पर शिवावतारु ॥५६॥
शिव तोचि गा शरभ । शरभ तोचि शिव स्वयंभ ।
सर्वसाक्षी जैसे नभ । तैसाचि सांब शरभमूर्ति ॥५७॥
त्याची वानितां ख्याति । मौनावती वेदश्रुति ।
ऐसा तो शरभ चक्रवर्ती । राज्यधिपति राज्य करित ॥५८॥
तो राज्य करितां जाण । क्रोधसंवत्सरी उत्तरायण ।
मास शुध्द फ़ाल्गुन । पौर्णिमा पूर्ण गुरुवार ॥५९॥
तद्दिनी हा ग्रंथ । समाप्त केला लिंगनाथे ।
संती मानुनी यथार्थ । मनासी ग्रंथ आणावा ॥६०॥
वरील ओव्यांत ज्याचे कवीने वर्णन केले आहे, तो चक्रवर्ती शरभ राजा इतिहासांत फ़ारसा कोठे प्रसिध्द नाही. ’साक्षात शिवमूर्ति’, भक्तवत्सल, करुणाकर, ब्रह्मज्ञानाचा सागर, परात्पर शिवावतार, कैवल्यपदींचा दातार इत्यादी विशेषणे कवीने या शरभ राजास लावली आहेत, इतकी अतिशयोक्तिपूर्ण दिसतात की, कोणत्याही मानवप्राण्यास ती यथार्थत्वाने लावितां येतील असे वाटत नाही. विशेषत: ह्या राजाची कीर्ति गातांना "मौनावती वेदश्रुति" असे जे विलक्षण उद्गार कवीने काढले आहेत ते अगदीच हास्यास्पद दिसतात व यावरुन हा लिंगनाथ योगी ह्या शरभ राजाचा एखादा आश्रित असावा असे वाटते. नागेश कविनेही आपल्या चंद्रावळवर्णन काव्यांत आपल्या आश्रयदात्या सरदाराचा " कोकट्या यशवंतराव जगती विख्यात राजा असे" अशा गौरवपर शब्दांनी उल्लेख केला आहे; पण "जगती विख्यात असणारा हा यशवंतराव कोकाट्या" कोण याचा जसा इतिहासांत शोध लागत नाही, तसाच या "साक्षात शिवमूर्ती" शरभ राजाचाही प्रकार असेल तर कोण जाणे ! आश्रितांनी आपल्या उदार आश्रयदात्यांचा आपल्या ग्रंथातून कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा यात काही वावगे आहे असे नाही, पण वरच्या सारख्या ’अशक्य’ विशेषणांनी एखाद्या सामान्य राजपुरुषाचा गौरव करणे म्हणजे अतिशयोक्तिची आणि स्तुतिपाठकत्वाची अगदी कमाल झाली असे म्हटले पाहिजे. परंतु एक गोष्ट ही की हा शरभ म्हणजे जर त्या प्रांतांतील एखादा देव असेल व कवीने त्यालाच ’चक्रवर्ती राजा’ म्ह्टले असेल तर वरील टीका कविकृत वर्णनास लागू पडणार नाही हे उघड आहे. असो.
लिंगनाथानी आपली जी गुरुपरंपरा दिली आहे ती येणेप्रमाणे :-
१. आदिनाथ २.मत्स्येंद्रनाथ ३.गोरक्षनाथ ४.गैनीनाथ ५.निवृत्तिनाथ ६.ज्ञानदेव ७.सोपान ८.मुकुंदनाथ ९.अलक्ष योगी १०.अचिंत्यनाथ ११.अव्यक्त १२.जनार्दन १३.त्र्यंबक १४.कोनेरीनाथ १५.लिंगनाथ. लिंगनाथांच्या पश्चात ही परंपरा कोठपर्यत चालू होती किंवा आहे, एतव्दिषयक माहिती मिळाली नाही. कानेरीनाथांनी आपले नांव ’लिंगनाथ’ ठेवले असे कवि ह्मणतो, यवरुन त्याचे मूळचे नांव निराळे असून , लिंगनाथ हे संप्रदायातले नांव आहे हे उघड दिसते.
अमृतसार या ग्रंथाची ओवीसंख्या १४०० आहे. हा ग्रंथ अद्याप अप्रकाशित असून , त्याची हस्तलिखित प्रत रा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या संग्रही आहे. ग्रंथाची भाषा प्राय: शुध्द व साधी आहे. ग्रंथाचा मुख्य विषय योगशास्त्र व परमार्थोपदेश हा आहे. अर्थात यांत काव्य मुळीच नाही हे सांगावयास नकोच. हाती घेतलेल्या विषयाचे विवेचन कवीने चांगले केले आहे. ह्या ग्रंथाशिवाय लिंगनाथाचे आणखी कांही ग्रंथ किंवा फ़ुटकळ कविता आहे की काय याविषयी शोध केला पाहिजे. अमृतसार ग्रंथारंभीच लिंगनाथ अभाविक लोकांसंबंधाने ह्मणतात :-
ऐक त्या अभाविकांचे गुण । संसारी आसक्त होऊन ।
स्त्रीपुत्रादिकी गोवूनी मन । थोर आपण ह्मणविती ॥
मनी धरुनि अभिमान । संतांसी न करिती नमन ।
ऐसे जे दुर्जन जन । तयांसी श्रीकृष्ण नुध्दरी ॥
अंतरी नाही विश्वास । उदास होती परमार्थास ।
उडी घालिती प्रपंचास । ऐसियां मूढांस कोण तारी ॥
शरीरी असतां अभाव । लटिकाचि दाखविती भाव ।
कित्येक ऐसेही मानव । केवळ गाढव पै असती ॥
गुरुसि शरण जावे ह्मणती । ह्मणौनी मग माघारे येती ॥
ऐसी अभक्तांची स्थिति । सांगतां चित्ती विकल्प वाटे ॥
वरी वरी बोलती गोड । जीवी नाही अनुग्रहाची चाड ।
गुरुमर्यादेची भीड । न धरिती लंड खळपणे ॥
अखंड सत्पुरुषांची निंदा । करणे हाच त्यांचा धंदा ।
नाठविती हरि गोविंदा । ह्र्दयी कदा मूढ ते ॥
ऐसा ज्यांचा स्वभाव । तैशांस कैसा भेटे देव ।
आणि स्वरुपाचा अनुभव । कैसेनी गुरुराव सांगेल ॥
ते वंचले मूर्खपणे । त्यांसी गुरुची खूण न बाणे ।
ऐसे जाणोनि जे शाहणे । ते गुरुसी शरण रिघती ॥
आतां भाविक लोकासंबंधाचे कवीचे उद्गार पहा -
आतां तयांची लक्षणे । सांगिजेल, श्रवणी चित्त देणे ।
जे गुरुसी अंत:करणे । जीवे प्राणे नित्य भजती ॥
धन पुत्र दारादि संपत्ती । जे श्रीगुरुसी भावे अर्पिती ।
शेखी आपणातेंही न वंचिती । अनन्य प्रीती गुरुभजनी ॥
सदा करितां श्रवण कीर्तन । स्मरण आणि पादसेवन ।
अर्चन वंदन दास्यपण । सख्य आत्मनिवेदनही ॥
ऐसी भजनाची परवडी । करुनि सेविता स्वरुपगोडी ।
त्यांची बोलवेना आवडी । मन घे मरकुंडी गुरुचरणी ॥
ऐसे जे गुरुभक्त । तेचि होती जीवन्मुक्त ।
ऐसेंचि भागवतीं शास्त्रोक्त । स्वये भगवंतु बोलतु ॥
तेचि विरक्त तेचि ज्ञानी । त्यांचा महिमा कोण वानी ।
जे समरसले निर्गुणस्थानी । आत्मानुसंधानी ते जाले ॥
त्यांसी जन्मरणाची वार्ता । कल्पातीही नाही पाहतां ।
परब्रह्मी पावोनि तद्रुपता । तेथेचि तत्वता राहिले ॥
धन्य धन्य ते भक्तराज । जन्मा आलियाचे काज ।
तयांसीच फ़ळले वोज । जेही निजगुज ओळखले ॥
योगशास्त्रोक्त मुद्रामार्गाने योगसाधन करणार्या लोकांविषयी कवि ह्मणतात :-
कोण्ही चारी मुद्रेच्या साधनी । अर्धोन्मिलित दृष्टि करुनी ।
लक्ष लाविती गगनी । नानारुप अवलोकिती ॥
सूर्य चंद्र उगवले जैसे । तैसे गगनगभी तेज भासे ।
किंवा तारांगणे उदेलीसे दिसे । साधक उल्हासे पाहती ॥
मुक्तफ़ळांचिया पंगती । लखलखीत भासो लागती ।
सोनियाचे चूर दिसती । तार उठती प्रकाशाचे ॥
कां उजळले रत्नदीपक । झळझळीत जैसा मयंक ।
तैसे तेज निष्कळंक । भक्त भाविक अनुभविती ॥
जैसा चांदण्याचा गोंधळ । उगवला दिसे सोज्वळ ।
तैसा प्रकाश भासे निर्मळ । नाही मळ प्रपंचाचा ॥
थळथळीत ज्योतिप्रभा । दीप्ति फ़ांके तया निभा ।
जैसा विद्युल्लतेची सभा । तैसी शोभा दृष्टी दिसे ॥
दंडाकारे नभोदरी । अर्धचंद्राचिये परी ।
ज्योति झळके अखंडकारी । नाना प्रकारी दिसती चिन्हे ॥
ते दिसोनि न दिसती । न दिसोनिया दिसती ।
पुनरपि पालटती । ऐसे देखती सद्भक्त ॥
रक्त श्वेत कृष्ण नीळ पीत । डोळा पांचही वर्ण भासत ।
तयांत व्यापूनि सदोदित । दिसे झमकत ब्रह्मतेज ॥
तया ब्रह्मतेजामाझारी । कळा दिसती परोपरी ।
पाह्तांची सामोरी । देहाची उरी न उरेची ॥
जिकडे तिकडे ब्रह्मरुप । दिसतसे आपेंआप ।
हा चांचरी मुद्रेचा प्रताप । न्याहाळिती अमूप तेज कोण्ही ॥
हे सगळे योगशास्त्राचे विवेचन आहे आणि इतके सुरस विवेचन प्रत्यक्षानुभवाशिवाय करितां येणे शक्य नाही. अर्थात योगशास्त्राभ्यांसात कवीने पुष्कळच प्रगती केली असली पाहिजे, हे उघड दिसते.
N/A
References : N/A
Last Updated : January 28, 2019
TOP