ह्या कवीसंबंधानें इतिहाससंग्रह मासिक पुस्तकाच्या पांचव्या व सरस्वतीमंदिराच्या शेवटच्या अंकांत थोडीशी माहिती देण्यांत आली आहे, तिच्या आधारानें प्रस्तुत लेख लिहिला आहे. याशिवाय, भारत इतिहास-संशोधक-मंडळाच्या एका सभेंत या कवीची कांहीं नवीन माहिती एका सभासदानें सांगितली होती, परंतु ती अद्याप अप्रसिद्ध असल्यामुळें तिचा संग्रह प्रस्तुत निबंधांत करितां येत नाहीं, याबद्दल वाईट वाटतें. हा कवि सातारचे थोरले शाहूमहाराज छत्रपति यांच्या कारकीर्दीत होऊन गेला. कचेश्वरांची बरीच कविता हल्लीं काव्यसंग्रहांतून प्रसिद्ध झाली आहे. कचेश्वर हे पुणें जिल्ह्यापैकीं खेड तालुक्यांतील चाकण गांवी एका वैदिक ब्राह्मणाच्या घराण्यांत जन्मले. हे जातीनें ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण, उपनांव ब्रम्हे, गोत्र काश्यप. कचेश्वर हे चाकणच्या रानांत आश्रम बांधून, मुलांबाळांसह अयाचित वृत्तीनें राहत असत. हे मोठे तपस्वी व सत्यसंपन्न असल्यामुळें, त्यांचा योगक्षेम चालविण्याच्या कामीं लोकही यथाशक्ति साहाय्य करीत असत. कचेश्वर चाकण येथें असतां, छत्रपति शाहू महाराज हे दिल्लीश्वराच्या कैदेंतून सुटून दक्षिणेंत आले व ताराबाईकडून आपलें राज्य मिळविण्याचा त्यांनीं प्रयत्न चालविला. एके दिवशीं ते चाकण गांवांतून जात असतां, जवळच रानांत कचेश्वराचा आश्रम असल्याचें त्यांनीं ऐकिलें; तेव्हां अशा सत्पुरुषाचें अवश्य दर्शन घ्यावें या हेतूनें ते कचेश्वरांच्या आश्रमीं गेले. कचेश्वरांनीं महाराजांचा यथोचित आदर-सत्कार करुन त्यांस भोजनाकरितां ठेवून घेतलें. भोजनोत्तर महाराजांनीं कचेश्वर व त्यांची पत्नी यांस वंदन करुन आशीर्वाद घेतला. पुढें सातार्यास जाऊन व ताराबाईचा पराभव करुन आपलें राज्य त्यांनीं मिळविलें. नंतर, कचेश्वरांस सातार्यास आणून, महाराजांनीं त्यांचा उपदेश घेतला. त्यांनीं कचेश्वरांस पुष्कळ द्रव्य देऊं केलें, पण त्या निरपेक्ष पुरुषानें त्याचा स्वीकार केला नाहीं. कचेश्वर हे पुढें सातारा येथेंच अयाचित वृत्तीनें राहिले. महाराजांकडून त्यांस नित्य शिधा येत असे, पण त्यापैकी निर्वाहापुरतें घेऊन, बाकीचा शिधा ते परत करीत असत. महाराजांनीं कचेश्वरांचा उपदेश घेतल्यापासून लोक त्यांस ‘राजगुरु’ म्हणूं लागले. पुढें त्यांच्या वंशासहे ‘राजगुरु’ हें उपनांव पडलें व तें हल्लींही चालू आहे. पुढें त्यांच्या वंशासही ‘राजगुरु’ हें उपनांव पडलें व तें हल्लीहीं चालू आहे. कचेश्वरांच्या एका शिष्यानें ‘आदि’ या नांवाचा हा ग्रंथ लिहिला आहे, त्यांत त्यानें शहर सोडून कचेश्वर हे कृष्णातीरीं उंब्रज येऊन राहिले. आपण देऊं केलेलें वैभव कचेश्वरांनीं घेतलें नाहीं किंवा आपल्या पुत्रासही घेऊं दिलें नाहीं, हें पाहून महाराजांनी, रामचंद्र खटाटोपे म्हणून कचेश्वरांचा एक शिष्य होता, त्याच्या हातावर गुरुदक्षिणोद्देशानें सहा गांवांचें दानोदक सोडिलें. पुढें खटाटोपे यांनीं ते सहा गांव कचेश्वरांच्या पुत्रांच्या नांवें करुन दिले. ते सहा गांव येणेंप्रमाणें:- सातारा जिल्ह्यांत १ सासवडें व २ अतीत; आणि पुणें जिल्ह्यांत ३ वाकी बुद्रूक ४ चांडोली ५ धावडी व ६ पांगरी. कचेश्वरांस दोन पुत्र होते, त्यांपैकीं एकाच्या वंशजांकडे अतीत, वाकी बुद्रूक व चांडोली हीं तीन गावें चालतात; व बाकीचीं तीन गांवें दुसर्या मुलाच्या वंशजांकडे आहेत. हे वंशज हल्लीं अतीत व सासवडें ह्या गांवीं राहतात. ह्या सहा गांवांचें एकंदर उत्पन्न सुमारें पंधरा-वीस हजारांचें आहे; पण दु:खाची गोष्ट ही कीं, ह्या इनामाचा बहुतेक भाग हल्लीं ऋणग्रस्त आहे. रा०रा० विश्वनाथ काशीनाथ राजवाडे ह्या शोधक गृहस्थांनीं सरस्वतीमंदिर मासिकपुस्तकांत ह्या कवीसंबंधानें जी माहिती दिली आहे, तिचा सारांश येणेंप्रमाणें:- कचेश्वरांचे वंशज हल्लीं पुणें जिल्ह्यांत खेड येथें राहतात, ते आपणांला ‘राजगुरु’ म्हणवितात. जुन्या कागदपत्रांत कचेश्वरांचा उल्लेख ‘कचेश्वरभट’ या नांवानें केलेला आढळतो. शाहुमहाराज शके १६०३ मध्यें सातार्यास जात असतां, खेड येथें कचेश्वरांनीं त्यांस ‘तुला राज्य मिळेल’ असा आशीर्वाद दिला. एकदां अवर्षण पडलें असतां, चाकणच्या मुसलमान किल्लेदारानें कित्येक ब्राह्मणांस कोंडून ठेविलें व ‘तुमच्या देवास पाऊस पाडण्यास सांगा’ असें म्हणून त्यांस चिडविलें. ब्राह्मणांनी कचेश्वराकडे बोट दाखवून, हा पाऊस आणील, असें सांगितलें. किल्लेदारानें कचेश्वरांस धमकी दिली. कचेश्वरांनीं भर दोन प्रहरीं भजनास प्रारंभ केला; तों एकावर एक मेघ येऊन दोन घटकांत सर्वत्र पाणीच पाणी झालें, आणि सर्व ब्राह्मणांची बंदींतून सुटका झाली. ‘राजगुरु’ च्या दप्तरांत कचेश्वरासंबंधानें खालील कविता आढळली:-
आला असे वीरवतंस राजा । मागें तुम्ही मोगल हो जरा जा ॥
मी सांगतों हें जरि आइकाना । तुम्ही गमावालाहि नाककाना ॥१॥
पृथ्वीवरी पाप बहूत केलें । तें तों तुम्हा सर्व फळास आलें ॥
गाई द्विजांला बहु पीडिलेंसे । शापें तयांच्या तप वेंचलेंसे ॥२॥
ह्या श्लोकांतील ‘वीरवतंस’ हा शब्द कवीनें शिवाजीस अनुलक्षून योजिला आहे, अर्थात् या कविता शिवाजीसंबंधाच्याच आहेत, असें रा० राजवाडे म्हणतात. हे श्लोक कचेश्वरांनी शके १५९६ च्या सुमारास लिहिले, अशी माहिती मिळाल्याचा उल्लेखही रा० राजवाडे यांनी केला आहे; यावरुन, शके १५९५ त निगमसार ग्रंथ लिहिणार्या वामनाशीं, शके १६०१ त रसमंजरी काव्याची रचना करणार्या विठ्ठल कवीशीं, शके १६०३ मध्यें समाधिस्थ झालेल्या समर्थांशीं व शके १६४३ त सुलोचनागहिंवर काव्य रचणार्या अनंतकवीशीं कचेश्वर समकालीन होते, हें उघड होत आहे. शिवाजी, संभाजी, राजाराम, दुसरा शिवाजी व शाहू या पांच राजांच्या कारकीर्दी कचेश्वरांनीं पाहिल्या होत्या असें दिसतें. शिवाजीमहाराजांच्या उदयकालीं सगळ्या महाराष्ट्रांत जी एक प्रकारची स्फूर्ति व चेतना उत्पन्न झाली होती, तिनें आमच्या परमार्थमार्गानुयायी संतांसही सोडिलें नाहीं, हें कचेश्वर व देवदास यांच्या उदाहरणांवरुन स्पष्ट होत आहे. असो. खेड येथील राजगुरुंच्या दफ्तरांतील कांहीं पत्रें रा० राजवाडे यांनीं प्रसिद्ध केली आहेत, त्यापैकीं एका पत्रांत कचेश्वरांनी बाळाजी विश्वनाथ यांस ‘श्रीमत् भगद्वजनपरायण सद्गुणाधिष्ठान विवेकसागर राजमानविराजित नाना स्वामी गोसावी यांसी’ असा मायना लिहून ‘अपत्यें कचेश्वरें नमस्कार विशेष’ असें म्हटलें आहे, ह्यावरुन बाळाजी विश्वनाथांपेक्षां कचेश्वर हे वयानें लहान होते, असें दिसतें. कचेश्वर स्वामी शके १६५३ त वारले, त्या नंतर त्यांचे चिरंजीव देवराव कचेश्वर व जयकृष्ण कचेश्वर यांस राव रंभाजी निंबाळकर यांनीं लिहिलेलें पत्र प्रसिद्ध झालें आहे, त्यांत पुढील वाक्यें आहेत:- मौजे वांकी बुद्रुक प॥ चाकण हा गांव सरकारतर्फेने जागीर, फौजदारी व जिल्हेदारी कुलबाब कुलकानू वेदमूर्ति महाराज राजश्री कचेश्वरबाबा कैलासवासी यांस दिल्हा असे. त्यास, ईश्वर इच्छेनें कैलासवास जाला. म्हणोन सरकारच्या अमिलांनीं तो गांव जप्त केला होता, म्हणोन तुम्ही लिहिलें. त्याजवरुन बदस्तू रसाबिला जागीर फौजदारी व जिल्हेदारी कुलबाब कुलकान् दरोबस्त तनखा तुम्हां उभयतांस दिल्हा असे. तरी जोंवर जागीर सरकारांत बहाल, तोंवर सुखरुप गांव खाऊन स्नानसंध्या करुन आम्हास आशीर्वाद देऊन राहणें. ये बाबे सकारच्या अमिलांस व जमीनदारांस ताकीद परवानें सादर केले असत, तरी याउपरी कोणी मुजाहीम होणार नाहीं. कचेश्वरांनीं बाळाजी विश्वनाथांस पाठविलेल्या पत्राचा मागें उल्लेख केला आहे, त्यांत चर्होली गांवचे उत्पन्न व खर्च यांचा हिशोब देऊन, शेवटीं ‘आमच्या ऋणाची चिंता स्वामीस आहे’ असे उद्गार कचेश्वरांनीं काढले आहेत, यावरुन, इतिहाससंग्रहांत म्हटल्याप्रमाणें कचेश्वरस्वामी अगदींच प्रपंचपराड्मुख होते, असें दिसत नाहीं. कचेश्वरांनीं आत्मचरित्र लिहिलें होतें, त्याचे पहिले ९७ अभंग गहाळ झाले असून, पुढचे ५४ अभंग मात्र रा० राजवाडे यांस सांपडले, ते येणेंप्रमाणें:-
ठेवियेला माझ्या माथ्यावरी हात । स्वयें जाला गुप्त स्वप्नामाजी ॥
तेथूनियां स्फूर्ति तुकोबानें दिल्ही । येर दिवशीं केली कथा दीनें ॥
स्वरताळ ज्ञान नव्हतें ठाऊकें । कथा कवतिकें करविली ॥
व्यथा जे जे होती ते ते सर्व गेली । प्रचित घडली माझी मज ॥
मग म्यां सोडिली लौकिकाची लाज । इतरांसी काज काय माझें ॥
ब्राह्मण म्हणती यास काय झालें । कांहीं संचरलें महद्भूत ॥
बापापाशी द्वेषें सांगती गार्हाणें । तूमच्या पुत्रानें बूडवीलें ॥
लाज येते आम्हां वैदिक आमचा । पुत्र हा तुमचा म्हणोनियां ॥
नाचतो बाजारी यासि शिक्षा करा । येऊं नका घरा देऊं तुम्ही ॥
भलत्यासी हा हो करितो नमन । देतो आलिंगन लघू वर्णा ॥
ऐसें आईकिलें ब्राह्मणाच्या मुखें । अत्यंत त्या दु:खे कष्टी जालों ॥
बोलती कष्टोनी क्रोधें तीर्थरुप । कैसा पापरुप पोटा आला ॥
यासी पढविलें सर्व शिकविलें । वृथा वायां गेलें काय करुं ॥
कष्टाचें सार्थक माझें जालें नाहीं । म्हणवूनी देहीं कष्टी जाले ॥
सांडी करुनियां वेगळें घातलें । अन्नवस्त्र दिल्हें थोडें बहू ॥
संतांसी करीती गाळीप्रदानातें । अर्भक आमुचें वेडें केलें ॥
वाळीत घालावें कोणी बोलियलें । मजपाशी आलें कैसें आतां ॥
अवश्य म्हणोनी आशा (ज्ञा?) म्यां दीधली । उक्ति तों खुंटली ब्राह्मणांची ॥
सांभाळाया आले हरिभक्त कोणी । देखिले दूरोनि दीनवाणें ॥
चिंता नको करुं आशीर्वाद देती । धनधान्य येती आपेंआप ॥
आशीर्वाद त्यांचा मानिला विश्वासें । जीव श्वासोच्छवासें दाटलासे ॥
ईश्वराची माया कोणाही कळेना । प्रेषिलें सदना पत्र पंतीं ॥
नारायणें दिल्हा चर्होली मोकासा । जालासे भर्वंसा आहे देव ॥
इच्छा जाली चित्तीं निस्पृही असावें । स्थळ दिल्हें देवें तळयापाशीं ।
काष्ठें तोडावीं ना संकल्प म्यां केला । देवें सिद्धी नेला पण माझा ॥
विहीर खणावी ऐसी जाली वांच्छा । देवें तीही इच्छा पुरवीली ॥
पूजावीसी वाटे महाविष्णुमूर्ति । देवें अवचितीं तेही दिल्ही ॥
विस्तीर्ण असावें स्थळ कथेसाठीं । देवानें शेवटीं पूर्ण दिल्हें ॥
अग्निहोत्र घ्यावें स्मार्ताग्नीसहित । देवें तें साहित्य घडविलें ॥
करावीसी वाटे स्वयें देवस्तुती । देवें दिल्ही स्फूर्ति कवित्वाची ॥
जो जो हेत माझ्या मनामध्यें येतो । तो तो पुरवितो स्वामी माझा ॥
कोठेंही अंतर पडों नेदी कांही । संसाराची नाही मज चिंता ॥
माझा अंगिकार पूर्ण देवें केला । अनुभव आला अंतरासी ॥
मागें पुढें देव मज संभाळितो । बाळातें पाळितो माय-बाप ॥
आतां वणवण करुं कशासाठीं । हृदयसंपुष्टी आला देव ॥
माझा योगक्षेम चालवितो देव । त्यासी अहंभाव पूर्ण माझा ॥
त्याणें उणें कांहीं केलें नाहीं मज । इच्छिलें सहज पावतों मी ॥
स्नान संध्या माझी नित्य चालवितो । कथा करवितो अहोरात्रीं ॥
जाऊं नेदी कोठें आपुल्या वेगळें । न धरी निराळें बाळकासी ॥
संकटाचा कांहीं येवों नेदी वारा । वारितो पर्भारा स्वामी माझा ॥
होणारासारिखी करितो सूचना । सादवितो दीना होई जागा ॥
किती उपकार आठवूं स्वामीचे । सर्व खेळ याचे अगणित ॥
अनंत ब्रह्मांडे व्यापूनि भरला । पुरोनी उरला निराळाची ॥
इच्छेविना काडी पानही न हाले । जग चाले बोले सत्ता त्याची ॥
हानी मृत्युलाभ उत्पति प्रळय । स्तिति समुदाय कर्ता तोची ॥
याचा पार वर्णी ऐसा आहे कोण । शेषाही संपूर्ण वर्णवेना ॥
वेद नेति नेति स्तवितां शिणले । तटस्थ राहिले अधोमुखें ॥
ब्रह्मादिक अंत पाहतां भागले । साधक शिणले ठायीं ठायीं ॥
तोचि कृपा करी जरी दीनावरी । भुक्ति मुक्ति चारी दासी होती ॥
वर्म आहे थोडें स्वामीचें आईका । भक्तिभावें एका वश्य होतो ॥
कलयुगामाजी वर्णाश्रमधर्म । करुनि सत्कर्म आचरावें ॥
ऐसें प्रेरुनियां कथा करवितो । नित्य चालवितो महाविष्णु ॥
पुढील प्रसंग जाणे नारायण । अवस्थेचा प्रश्न ऐसा आहे ॥
पृच्छेचें उत्तर वदवितो देव । बोले अनुभव कचेश्वर ॥
हे सगळे अभंग अतिशय प्रेमळ आणि फार गोड आहेत. ‘पृच्छेचें उत्तर वदवितो देव’ या वाक्यावरुन, कोणाच्या तरी प्रश्नास उत्तर म्हणून कचेश्वरांनीं हें आत्मचरित्र सांगितलें असावें, हें उघड दिसतें. ह्या चरित्रांत कवीची ईश्वरनिष्ठा आणि साधुत्व यांचा ठसा अगदीं स्पष्ट उमटला आहे. ‘तुकोबांनीं स्वप्नांत उपदेश दिल्यापासून आपणास कीर्तनाची स्फूर्ति झाली व त्यामुळें फार दिवसांची व्यथाही दूर झाली, असें कचेश्वर म्हणतात; ही व्यथा कोणती, हें समजण्यास कांही मार्ग नाहीं. लौकिकाची लाज सोडून हीन वर्णाच्या लोकांशीं बंधुत्वाच्या नात्यानें वागल्याबद्दल तत्कालीन भटाभिक्षुकांनीं व प्रत्यक्ष कवीच्या बापानें त्याचा जो छळ केला, तो आमच्या जुन्या साधु-संतांच्या चरित्रांत अगदीं सर्वसाधारण असल्यामुळें, त्याबद्दल कोणास आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं; पण ह्या छळास भिऊन आमचे संत आपल्या अंगीकृत कार्यापासून परावृत्त झाले नाहीत, हे मात्र खरोखर मोठें आश्चर्य होय. सदर चरित्राचे पहिले ५७ अभंग उपलब्ध नाहींत, ही मोठया दु:खाची गोष्ट आहे. थोरले शाहूमहाराज, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, चिमाजी अप्पा, नानासाहेब, सदाशिवराब भाऊ, रावरंभा निंबाळकर, फत्तेसिंग भोसले, फत्तेसिंगाची स्त्री अहल्याबाई भोसले, कान्होजी आंग्रे, तुकोजी होळकर, दुसरे बाजीराव, माधवराव, नारायणराव व सवाईमाधवराव पेशवे इत्यादि स्त्री-पुरुषांची कचेश्वरांवर व त्यांचे पुत्रपौत्रांवर भक्ति असे, असें राजवाडे यांनीं लिहिलें आहे. कचेश्वरांस तुकारामबुवांनीं स्वप्नांत दृष्टांत दिला व पुढे महिपतींसही स्वप्नांत दृष्टांत देऊन, तुकारामांनीं त्यांजकडून संतचरित्रे वदविलीं, ह्या गोष्टीचें रहस्य काय आहे, ह्याचा खुलासा करणें माझ्या सामर्थ्याबांहेरची गोष्ट आहे. असो. कचेश्वरांचे देहावसान कृष्णातीरीं उंब्रज येथें शके १६५३ फाल्गुन शुद्ध द्वितीया, या दिवशीं झालें. त्यांचे गुरुभक्त शिष्य रामचंद्र खटाटोपे यांनीं त्यांच्या देहाचें दहनादि सार्थक कृष्णावेणीसंगमीं माहुली येथें केलें व तेथेंच आपल्या अंगणांत कचेश्वरांच्या अस्थी पुरुन, त्यांजवर समाधि बांधिली. ह्या समाधीचा एक मजला जनिनींत असून, त्यांत कचेश्वरांच्या पादुका आहेत. ह्या ठिकाणीं कचेश्वरांचे अतीत येथील वंशज प्रतिवर्षी येऊन, फाल्गुन शुद्ध द्वितीयेस त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव करितात; इतर वंशज आपआपल्या गांवींच हा उत्सव साजरा करतात. पुणें जिल्ह्यांत खेड व चांडोली या गांवी कचेश्चरांनी श्रीपांडुरंगाच्या मूर्ति स्थापन केल्या आहेत. कचेश्वरांची बरीच कविता त्यांचे वंशज व शिष्यसंप्रदायी लोक यांच्या संग्रहीं आहे; त्यापैकीं सुदामचरित्र व गजेंद्रमोक्ष हीं त्यांची दोन काव्यें मात्र काव्यसंग्रहांत प्रसिद्ध झालीं आहेत. याशिवाय, काव्यसंग्रहांत विठ्ठल कविकृत कवितासंग्रह या सदराखाली एक श्लोकबद्ध द्रौपदीवस्त्रहरण प्रसिद्ध झालें आहे, तेंही कचेश्वरांचेंच असावें असें वाटतें. शेवटचे कांहीं श्लोक कमी असल्यामुळें त्यांत कचेश्वरांच्या नांवाचा उल्लेख नाहीं; पण त्या काव्याची एकंदर रचना कचेश्वरी थाटाची दिसते. सुदामचरित्राचे १०३, गजेंद्रमोक्षाचे ९५ व द्रौपदीवस्त्रहरणाचे २३१ श्लोक आहेत. कचेश्वरांचीं पदे वगैरे इतर कविता अद्याप अप्रकाशित आहे. कचेश्वरांची एकंदर कविता मध्यम प्रतीची आहे; तींत यमक चमत्कार नाहींत, अलंकार नाहींत किंवा फारसें भाषासौंदर्यही नाहीं. तथापि त्या कवितेंत प्रसाद आहे व भक्ति रस विशेष आहे. कचेश्वर हे वामन-मोरोपंतांसारखे भाषापंडित नव्हते, ते एक प्रेमळ हरिभक्त होते व याच दृष्टीनें त्यांच्या कवितेचें अवलोकन केलें पाहिजे. त्यांच्या काव्यांची भाषा साधी, प्रेमळ व रसवती आहे; त्यांनीं वृत्तेंही निरनिराळी उपयोजिलीं आहेत, तथापि क्वचित् स्थलीं वृत्तसुखार्थ शब्दांची ओढाताण झालेली दृष्टीस पडते. सुदामचरित्र व गजेंद्रमोक्ष हे दोन्ही विषय करुणरसप्रधान असून यांपैकीं पहिल्या विषयावर आजपर्यंत निरनिराळ्या दहा बारा कवींनीं कविता केला आहे, पण कचेश्वरांच्या सुदामचरित्रांतल्या इतका करुणरस दुसर्या कोणत्याही कवीस साधला नाहीं. पुढील उतारे पहा:-
सुदाम्याचे दारिद्र्य: -
श्लोक.
सुदामा दरिद्रें बहू पीडिलासे । कुटुंबी गृहामाजि तो बैसलासे ॥
गृहाची रिती वर्णितां वर्णवेना । कुठें ऊपमा द्यावया पूरवेना ॥५॥
गृहा पांच वांसे, असे एक आडें । असावीं तिथें कासयाचीं कवाडें ? ॥
शिरीं उष्ण पाऊस वारा भरारा । तिळातुल्यही नाहिं तेथें निवारा ॥६॥
अशाही गृहामाजि त्या अन्न नाहीं । मुलें माणसें पीडिलीं फार देही ॥
समस्तां मिळोनी असे एक वस्त्र । कदाही नसे स्वप्निं त्यां पाकपात्र ॥७॥
सुदामा व त्याची पत्नी यांचा संवाद:-
श्लोक.
तदां बोलली पत्नि सूदामजीला । ‘नका हो स्मरूं सांगतें कृष्णजीला ॥
तुम्हाला नसे नाम तें धारजीणें । किती सीकवूं, नायका, कोण जीणें ?॥९॥
स्त्रियेसी म्हणे ‘कृष्णजी मित्र माझा । बरा जाण गे । पांग फेडील तूझा ॥
गुरुदक्षिणे पुत्र दीला जयानें । बळें मारिले कंस चाणूर ज्यानें ॥१०॥
प्रतापी पहा कृष्ण माझा कसाहे । अहंकार त्या पापबुद्धी न साहे ॥
असे लक्षुमीसारिखी ज्याचि रामा । उणें काय आतां ? प्रिये ! सांग आम्हां ॥
‘बोलतां असें नित्य मंदिरीं । वाटतें मला व्यर्थ अंतरी ॥
कासया मला नित्य सांगतां । मित्रथोरवी व्यर्थ वानितां ॥१२॥
करितां उपवास मला वरिं हो । कवितां वडिवार कसा तुम्हिं हो ! ॥
मज वस्त्र नसे, अशि हे अपदा । किति सांगतसां हरिची संपदा ॥१३॥
जरि मित्र असे हरि हो तुमचा । तरि भोग कसा न सरे अमुचा ? ॥
दिसती अगदीं बहु दीन मुलें । हरिभेटिस जा, मज हें सुचलें ॥१४॥
‘रिक्तपाणि काय जाऊं, सांग सांग सुंदरी ।
कृष्णजीस काय नेऊं, बोल शीघ्र लौकरी ॥
मीळते जरी पृथू हरीस शुद्ध न्यावया ।
वाटतें तरी मनांत श्लाघ्य तेथ जावया ॥१५॥
लागला बहूत हेत जावयास अंतरीं ।
कंद मूळ पत्र पुष्प कांहिं पाहिं मंदिरीं’ ॥
म्हणे ‘घरांत अस्ति नास्ति सर्व ठाउकें असे ।
कसें हळूच पूसतां ? प्रपंच यांत हा दिसे ॥१६॥
कृष्णजीस न्यावया असून काय ठेवितें ? ।
मी तुम्हास कासयास फार ध्यास लागला असे ।
परंतु काय मी करुं ? घरांत अर्थ ना दिसे" ॥१७॥
सुदामा द्वारकेस जाऊन पोचल्यावर त्याच्या मनांत काय विचार उत्पन्न झाले व नागरिकांनीं त्याच्याशी कशी वर्तणूक केली, त्याचें वर्णन:-
जशी द्वारका देखिली कांचनाची । तशी फीरली वृत्ति भावें मनाची ॥
म्हणे ‘येवढें भाग्य, हा कृष्णराजा । तिथें रंक मी कायसा पाड माझा ॥२४॥
वोळखी जरी ना धरी हरी । बूडिजे तरी शोकसागरी’ ॥
एक पाय तो टाकितां पुढें । पाउलापदीं वृत्ति नातुडे ॥२५॥
श्रमें पावला द्वारकाद्वारदेशीं । पुसों लागले ग्रामिंचे ग्रामवासी ॥
‘अहो ! कोण कोठून आलेत तुम्हीं ? ।’ म्हणे ‘कृष्णजीचे सखे बंधु आम्ही’ ॥२६॥
म्हणे आयका ‘नाम माझें सुदामा । बरा जाणतो कृष्णजी पूर्ण आम्हां ॥
त्वरें जाणवा राउळीं मात माझी । नका रे करुं हेळणा बुद्धि दूजी’ ॥२७॥
असें ऐकतां हांसले द्वारपाळ । वदों लागले ‘कृष्णजीचें कपाळ ॥
विनोदार्थ सांगूं चला राउळासी’ । त्वरे जाउनी बोलती माधवासी ॥२८॥
पण त्या द्वारपालांची ही विनोदवृत्ति लवकरच मावळली, कारण -
‘दरिद्री असे विप्र नामें सुदामा । उभा राहिला द्वारिंच्या द्वारधामा’ ॥
असें ऐकतां धांवला दीनबंधु । त्वरें शीघ्र आलिंगिला विप्रबंधु ॥२९॥
सुदाम्याचा भोजनाचा थाट:-
वाजती बहू ढोल दुंदुभी । भेरिया तुरें गर्जती नभीं ॥
हर्ष वाटला कृष्णअंतरीं । पंक्ति मांडिल्या रत्नमंदिरीं ॥३६॥
पक्वान्नें बहु वाढिलीं षडरसें, शाका बहूतांपरी ।
नाना पापड सांडगे लगुवडे मांडे पुर्या भीतरीं ॥
सांबारीं कथिका बहू ठिकरिच्या मेथ्याकुटें लोणचीं ।
बेलें कोमल आम्ल तीक्षण मिरें नाहीं कदा वाणिचीं ॥३७॥
क्षीरि मालति बोटवेंच गहुंले क्षिप्रा अनेका परी ॥
चीनी साखर पांढरी मगदुमी तैशीच नाबादही ।
अंब्याचे रस पींवळे शिखरिणी नाना मधूरें दहीं ॥३८॥
स्वयें विंझणें वारिती कृष्णनारी । करी प्रार्थना फार आंगें मुरारी ॥
असो, यापरी सारिलें भोजनातें । बसूं घातलें उत्तमा आसनातें ॥४०॥
विडे दीधले कर्पुरेला लवंगा । अनेकापरी चर्चिले गंध अंगा ॥
सुवासीकही लाविली सर्व तेलें । करें आपुल्या मर्दिली चापियेलें ॥४१॥
पक्वान्नवर्णनाचे वरील श्लोक कोंकणांतल्या भोजन-समारंभांत वरचेवर ऐकूं येतात. यासंबंधानें काव्यसंग्रहकार म्हणतात:-
‘हा कचेश्वराच्या वेळचा भोजनाचा थाट ! साखरभात, लाडू, जिलब्या, श्रीखंड इत्यादि पक्वान्नें रसास्वादनिविष्ट भट्टाचार्यांनीं पेशवाईंत, विशेषत: रावबाजींच्या अमदानींत सुरु केलीं असावीं. ’ यावरुन पेशवाईच्या पूर्वी हीं पक्वान्नें, निदान महाराष्ट्रांत तरी अस्तित्वांत नव्हती, असें काव्यसंग्रहकारांचे मत दिसतें. पण वस्तुत: तसें समजण्याचें कांहीं प्रयोजन नाही. कारण कचेश्वर हे पक्वान्नभोजनपंडित रावबाजींच्या पूर्वी सुमारें १०० वर्षे होऊन गेले व दुसरें असें कीं, कचेश्वरांपूर्वी १०० वर्षे लिहिलेल्या मुक्तेश्वरी भारतांत यांतील बहुतेक पक्वान्नांची नांवे आढळतात.
सुदामश्रीकृष्णसंवाद:-
‘वोहिनी सुखी ?’ श्रीहरी पुसे । ’ काय संतती संपती असे ?
योगक्षेम तो चालतो कसा ? । काय खातसां काय लेतसां ?’ ॥४३॥
येरु बोलिला ऐक श्रीहरी । काळ तीनही नांदती घरीं ॥
संतती बहू फारशी असे । संपती कदां स्वप्निंही नसे ॥४४॥
सर्वही सुखी बाळकें मुलें । स्नेह हा तुझा याचियामुळें ॥
काळ कर्मिती तूज चिंतिती । तूजवेगळें आन नेणती’ ॥४५॥
कृष्ण बोलिला ‘आठवे मला । उज्जनीमधें खेळ मांडिला ॥
गुरुपत्निनें धाडिलें वना । आठवे बहू माझिया मना ॥४७॥
पावसांत रे ! फार भीजलों । वायुसंकटीं थोर कष्टलों ॥
धोत्र तूं तधीं आपुल्या करीं । घातलें असे माझिया शिरीं ॥४८॥
काष्ठाच्या लघु कावडी धरुनियां होतों वटाखालते ।
वारा पाउस घेतला वटतळीं, मोठी अवस्थाचि ते ॥
तेव्हां त्वां लघु धोत्र रे ! मजवरी घालोनियां रक्षिलें ।
कांसे लावुनि कावडी मज तुवां क्षिप्रेमधें तारिलें ॥४९॥
लागली मला भूक रे जशी । कावडी तुवां घेतली तशी ॥
आठवूं किती काय रे तुझें । नाहिं दाविलें त्वां कधीं दुजें’ ॥५०॥
सुदामा म्हणे ‘तूं भलें आठवीशी । बहुतांपरी तूं मला गौरवीशी ॥
तरी रे तुला राज्य कां प्राप्त झालें । मला रे कसें दैन्य धावूनि आलें’ ? ॥५१॥
‘विचारी मनीं’ श्रीहरी गुह्य ऐसें । दिल्यावांचुनी पाविजे सांग कैसें ?॥
परी पूर्वपुण्यें मला भेटलासी । श्रुतीच्यानि योगें मला पावलासी ॥५२॥
कदा ब्राह्मणालागिं कांही न दीलें । कदा स्वप्निंही पुण्य कांही न केलें ॥
कदा तीर्थयात्रा तुवां नाहिं केली । कदा सत्कथा स्वप्निंही नायकीली ॥५३॥
नसे देह हा लाविला ऊपकारा । नसे भक्तिचा लागला लेश वारा ॥
नसे आदरें साधुसन्मान केला । नसे वस्तिला ब्राह्मणा ठाव दीला’ ॥५४॥
द्वारकेंत श्रीकृष्णमंदिरीं सुखानें कालक्रमणा करणार्या सुदामदेवास जेव्हां आपल्या स्त्री-पुत्रांची आठवण झाली, तेव्हां त्यानें आपल्या गांवी जाण्यास श्रीकृष्णाचा निरोप मागितला. सुदामाच्या भक्तीनें संतुष्ट होऊन, विश्वकर्म्याकडून भगवंतांनी आपल्या द्वारकेसारखीच सुदामनगरी तयार करवून, तेथें सुदाम्याची स्थापना करण्याचा विचार केला होता. परंतु, सुदाम्याच्या मनाची परीक्षा करण्यासाठीं, तो जेव्हां आपल्या गांवी जाण्यास निघाला, तेव्हां भगवान् त्यास म्हणतात:-
‘परी ऐक रे ! एक ती मात माझी । नको आणुं तूं मानसीं बुद्धि दूजी ॥
बहू फीरती चोरटे भिल्ल मार्गी । असा देखतां खंडिती शस्त्रखड्गी ॥६५॥
वस्त्रभूषणें सर्व ठेवुनी । जाइजे घरा शुद्ध हौनी ॥
मार्गि रे बहू चोर फिरती । अर्थ देखिल्या जीव मागती’ ॥६६॥
या भाषणाचा भावार्थ असा आहे:- भगवान् म्हणतात, सुदाम्या ! तूं आपल्या गांवी खुशाल जा; पण मी एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतों ती लक्ष्यांत घे; तींत कांही कपट आहे असें समजूं नको. तूं आतां ज्या वाटेनें जाणार आहेस, त्या वाटेंत चोरटे फार आहेत, ते तुला असा वस्त्राभरणमंडित पाहून तुला ठार करावयाला चुकणार नाहींत; म्हणून हीं सगळीं वस्त्रभूषणें येथेंच ठेवून, तूं शुद्ध होऊन जा.’ वरील श्लोकांचा सकृद्दर्शनीं असा अर्थ दिसतो खरा, पण त्यांत दुसरा कांहीं गूढार्थही आहे. भगवान् म्हणतात-ह्या ज्या दृश्य (नश्वर) वस्तु आहेत, त्या सर्व टाकून देऊन शुद्ध म्हणजे निष्काम हो. म्हणजे षड्रिपूंच्या त्रासांतून तूं सहज मुक्त होशील.’ पण संसारांत निमग्न झालेल्या सुदामदेवास हा उपदेश क्सचा रुचतो ? कचेश्वर म्हणतात:-
ऐकतां असें वस्त्रभूषणें । ठेवुनी पुढें, शब्ददूषणें ॥
कष्टला, बहू शोक वाटला । ‘चोरटा’ म्हणे हाचि भेटला ॥६७॥
जाउं मी कसा रिक्त त्या घरा । काय दाखवूं पत्निकूमरां ॥
चोरटा ठकू ठाउका हरी । गोरसा मिसें गौळियां घरीं ॥६८॥
परद्वारी हा गोरखा गौळियांचा । कसा मांड हा मांडिला आजि याचा ॥
घरीं पातल्या गौळणी जार नारी । मला ठाउका पूर्ण होता मुरारी ॥६९॥
रडायास मी कासया व्यर्थ आलों । अरे ईश्वरा ! फार मी कष्टि झालों ।
रित्या हस्तकें काय म्यां व्यर्थ जावें । कसें पत्निला तोंड हें दाखवावें ॥७०॥
घरी सांगतों थोरवी नित्य याची । न माये कुठें, लाज मोठी जनाची ॥
जरी वाटखर्चीस हा पीठ देता । तरी लौकिकीं फारसें येश घेता ॥७१॥
बहू फार होती मला आस याची । निराशा परी थोर झाली मनाची ॥
पहा हो ! कसें सर्वही व्यर्थ झालें । मुलांमाणसांमाजि मूर्खत्व आलें ॥७२॥
स्त्रियेसी नसे वस्त्र नेसावयासी । करावें कसें काय आतां तियेसी ? ॥
जरी रुक्मिणी जीर्णसें वस्त्र देती । तरी अंतुरी फार संतुष्ट होती ॥७३॥
xxx
मार्गि चालतां फार गहिंवरे । आपुल्या मनीं आठवी झुरे ॥
‘धांवती मुलें देखतां मला । काय मी करें देउं त्यांजला ॥७६॥
ब्राह्मणीस मी काय रे कथूं ? । कोणती कशी गोष्ट मी जथूं’ ॥
हेंचि भावितां पंथ चालिला । पाहतां पुढें ग्राम देखिला’ ॥७७॥
वरील श्लोकांत सुदामदेवाच्या अज्ञान्यजन्य निराशेचें व निराशाजन्य करुणास्पद स्थितीचें किती समर्पक वर्णन केलें आहे ! भगवंताने आपल्यासाठी सुदामपुरी निर्माण केली असून, ती आपणास लवकरच प्राप्त होणार आहे, हें ठाऊक नसल्यामुळें व श्रीकृष्णाच्या कपटचरित्राशी पूर्वपरिचय असल्यामुळें, अशा निराशेच्या वेळीं, श्रीकृष्णासंबंधानें सुदामाच्या तोंडांतून जे उद्गार बाहेर पडले आहेत ते क्षम्य होत, असें म्हणण्यास हरकत नाहीं. सुदामाचे हे उद्गार वाचून हसूं येतें व त्या वेळच्या त्याच्या मन:स्थितीबद्दल अनुकंपा उत्पन्न होते. एखादा अत्यंत दरिद्री मनुष्य, आपल्या श्रीमान् मित्राकडून आपणास खचित साह्य होईल अशा भावनेनें त्याजकडे गेला असतां, त्याची जर सर्वस्वी निराशा झाली, तर त्या वेळीं त्याच्या मुखांतून वरच्यासारखे उद्गार निघावे, हें अगदी साहजिक होय व हा मनुष्यस्वभाव लक्ष्यांत घेऊन, त्याचें यथार्थ चित्र रेखाटण्यांत कचेश्वरांनीं मोठें कौशल्य दाखविलें आहे यांत शंका नाहीं. असो. वर लिहिल्याप्रमाणे, बिचारा सुदामा विचारमग्न होऊन मार्ग क्रमीत असतां, भगवदाज्ञेवरुन विश्वकर्म्यानें नुकतीच वसविलेली सुदामपुरी त्याच्या दृष्टीस पडली. द्वारकेसारखीच तिची एकंदर रचना पाहून, आपण वाट चुकून पुन: द्वारकेंतच आलों की काय असा संशय उत्पन्न झाला. कचेश्वर म्हणतात:-
कळस देखिले कांचनाकृती । ‘चूकलों’ म्हणे ‘मार्ग मागुती ॥
भ्रांत जाहलों काय अंतरीं ?।’ लागला पुसों ‘कोण हे पुरी ? ॥७८॥
अहो पांयि हो ! चूकलों मार्ग मी रे !। पुढें ग्राम हा कोण सांगा मला रे ! ॥
नसे ठाउका आपुला कीं दुजा रे ! । बरा सोनियाचा दिसे चांगला रे !’ ॥७९॥
पुसों लागले ‘नाम रे काय तूझें’ ? ‘सुदामा असें बोलती नाम माझें’ ॥
‘पुरीचें तुझें नाम रे एक जालें !’ । म्हणे ‘लोकही बोलती दैन्य बोलें’ ॥८०॥
पण पुढें लवकरच नागरिकांनीं सुदामदेवास ओळखून त्यास पालखीत बसविलें व मोठया थाटानें त्याची मिरवणूक काढिली. हा अकल्पित प्रकार पाहून सुदामदेवास तरे वेड लागण्याचा प्रसंग आला:-
मात फांकली राजमंदिरीं । मंत्रि धांवले मुख्य आदरी ॥
पालखीमधें घालिती बळें । कंप सूटला ब्राह्मणा चळें ॥८३॥
भेरी दुंदुभि वाजती चवघडे धो धो धमामे किती ।
यंत्रांचे भडिमार थोर सुटती नादें कडे फूटती ॥
आवाजें नभ कोंदलें उडुगणें धाकें पडों पाहती ।
विप्राचे मनिं भीति फारचि दिसे, गात्रें बहू कांपती ॥८६॥
करीं आरत्या सुंदरी नागरीका । बहू पातल्या दामिनी कामिनीका ॥
अनंतापुरी हेमपुष्पे वहाती । करी अक्षवाणें द्विजातें पहाती ॥८७॥
पुढें पालखी मंदिरामाजि गेली । प्रिया आरती शीघ्र घेऊनि आली ॥
झणत्कारले हो ! अलंकार तीचे । तसे झांकले नेत्र सुदामजीचे ॥८८॥
बहू विप्र व्याकूळ पाहूनि तीला । मनी घाबरोनी निचेष्टीत झाला ॥
प्रिया हालवी डोलवी दिव्य हस्तें । म्हणे ‘ओळखाना कसें स्वामि मातें ?
कांता मी तुमची सुशीळ गृहिणी कां ओळखाना पती ? ।
झाली ज्या परिसासि भेट तुमची, तो ओळला श्रीपती ॥
प्रीतीनें पृथु भक्षिले मटमटां तो तूमचा हो सखा ।
तेणें हेमपुरी तुम्हांसि दिधली जैशी दुजीं द्वारका’ ॥९०॥
कांतेच्या तोंडून हा सगळा खरा प्रकार ऐकेपर्यंत, बिचार्या सुदामदेवाची स्थिति, आरबी भाषेंतील सुरस गोष्टींतल्या अबु हुसेनसारखी झाली होती. बगदादच्या कालिफानें अकस्मात् राज्यपद दिल्यामुळें अबुहूसेनाची काय विलक्षण स्थिति झाली; त्यानें डोळे कसे मिटले; सभोंवतालच्या दासींस, आपण कोण आहों, म्हणून किती प्रश्न केले; आपण जागृत आहों कीं झोपेंत आहों हे समजून घेण्यासाठीं एका दासीकडून आपला हात कसा चालविला व शेवटीं आपण खरोखरच बादशहा झालों आहों अशी खात्री झाल्यावर, लगेच आपला बादशाही अंमल गाजविण्यास त्यानें कसा प्रारंभ केला, हें वाचकांस माहीत आहेच; व हाच प्रकार सुदामदेवाच्या बाबतींतही झाला असला पाहिजे हें उघडच आहे. मात्र येथें ही गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे कीं, सुदामदेव हा अबूहुसेनसारखा निव्वळ प्राकृत मनुष्य नव्हता; तो मोठा सात्त्विक व प्रेमळ हरिभक्त होता व याच प्रकृतिभेदामुळें त्या दोघांच्या चरित्रांत पुढें जमीन
अस्मानाचें अंतर पडलें आहे. असो. ज्या श्रीकृष्णाची आपण इतका वेळ निंदा केली, त्यानेंच हें सगळें वैभव आपणास दिलें आहे, ही गोष्ट लक्ष्यांत येतांच सुदामदेवास अतिशय पश्चात्ताप झाला. कचेश्वर म्हणतात:-
ऐकतां असें खोंचला मनीं । नीर सूटलें फार लोचनीं ।
कृष्णदेव म्यां व्यर्थ द्रोहिला । निंदिला बहू अंत पाहिला ॥९१॥
सिंधु जो उडे त्यासि पोहणें । कायसे पृथू काय त्या उणें ? ।
भक्तिचा बहू आळका हरी । देत संपदा आपदा हरी ॥९२॥
अरे कृष्णजी काय कौशल्य केलें ! । तुझ्या दर्शना चित्त माझें भुकेलें ॥
तयालागिं तूं ग्रास दे दिव्य हस्तें । करी रें क्षमा तारिं तूं शीघ्रा मातें ॥९३॥
अंत:करणावर आलेलें तात्कालिक निराशापटल दूर होतांच सुदामाचा मूळचा उदात्त स्वभाव लागलाच प्रगट झाला. तो आपल्या स्त्रीस म्हणतो: -
‘हरीचा नमस्कार हा तूजला ग । निरोपामध्यें कोणि ठेवूं नये गे ॥
म्हणोनी तुला सांगतों आदरेंशी । हरीतें स्मरीं अंतरीं निश्चयेंशी’ ॥९८॥
मग सुदामदेवानें आपल्या प्रजाजनांस काय आज्ञा केली ?: -
समस्तांसि आज्ञा दिली राजयानें । अलंकार वस्त्रें दिली शोभमानें ॥
म्हणे ‘प्रार्थना हेचि सर्वां जनांसी । करा कीर्तनें, रंजवा माधवासी’
कवीनें येथें, सुदामदेवाच्या तोंडी ‘प्रार्थना’ हा शब्द घातला आहे व त्यावरुन, प्राप्तनवश्रीपुरुषाप्रमाणें सुदामदेव उन्मत्त न होतां, उलट तो विशेष विनयसंपन्न झाला, असें दाखविलें आहे. एकंदरित या लहानशा काव्यांत कवीनें आपलें काव्यरचनाचातुर्य बर्याच स्पष्टतेनें दाखविलें आहे, यांत संशय नाही. हें काव्य मला इतकें सरस वाटलें कीं, त्यांतले उतारे देतां देतांच हा लेख इतका लांबला. आतां कचेश्वरांच्या गजेंद्रमोक्षांतले कांही निवडक श्लोक येथें देऊन कचेश्वरांची तूर्त रजा घेऊं. द्रवीड देशचा विष्णुभक्त राजा इंद्रद्युम्न हा पुष्कर सरोवराच्या कांठी ध्यानस्थ होऊन बसला असतां, तिकडून अगस्तिऋषि आले. राजानें आपणांस उत्थापन दिलें नाही म्हणून अगस्ति ऋषींनीं त्यास ‘मदोन्मत्त तूं हत्ति होशील रानीं’ असा शाप दिला. त्यावेळीं इंद्रद्युम्न त्यांस म्हणतो:
‘जरी तुम्हांसि देखिलें असेल आजि लोचनीं ।
तरी घडेल देहपात त्वरित याचि भूवनीं ॥
असें असोनि शापिलें अनाथनाथ बंधुजी !
बरें तुम्हांसि मानलें अहा ! अनाथनाथ ! जी ! ॥१०॥
अन्यायाविण शापिले मज तुम्हीं स्वामी अगस्ती मुनी ।
धानीं मी निजमंदिरीं नदितिरी ध्यानस्थ होतों मनी ॥
कर्माची गति ना टळे विधि हरी लक्ष्मीपतीलागुनी ।
बोलों काय पुढें तुम्हां ऋषि मला उ:शाप द्यावा झणी’ ॥११॥
पुढें राजा इंद्रद्युम्न हत्ती होऊन, पुष्करसरोवरांतल्या नक्राच्या दाढेंत सांपडला असतां, त्याच्या पुत्रांनीं कशी वर्तणूक केली, हें कवि सांगतात: -
‘काय पाहतां सांखळी करा । सोंड पुच्छ हो सर्वही धरा ॥
एक नेट घ्या सर्वही बळें’ । वोढिती बहू शक्तिच्या बळें ॥३५॥
ओढ मांडिली त्यासि दोंकडे । यातना बहू कुंजरा घडे ॥
स्थूळदेहि तो ओढिती किती । त्रास पावले आस टाकिती ॥३६॥
‘मरावे कसें मेलिया पाठिसी हो ! ।
क्षुधा लागली फार आतां चला हो ॥
परी सर्वही एकची नेट घ्या हो ।
जळीं स्वामिसी लोटुनी शीघ्र द्या हो ॥३७॥
जीव जायसें सत्वरें करा ॥
येश हें तुम्हां येइ घडी । स्वामि लोटुनी द्या चला तडी ॥३८॥
आपल्या संकटकाळीं, आपल्या पुत्र-पौत्रांची ही वर्तणूक पाहून व असले उद्गार ऐकून बिचार्या गजेंद्रास काय वाटलें असेल ! एकंदरींत ‘कठिण समय येतां कोण कामास येतो ?’ या रघुनाथ पंडितांच्या वचनाचा प्रत्यय प्रत्यहीं येतो; यांत संशय नाहीं. असो. कचेश्वर म्हणतात:-
सरोवरांत लोटिला गजेंद्र पुत्रपौत्रकीं ।
निघोन सर्व चालिले जळांत तोचि एक कीं ॥
पूर्वभक्ति धांवली मनांत हर्ष वाटला ।
सर्व दु:ख वीसरोनि सद्गदीत दाटला ॥३९॥
स्मरोनि विष्णु अंतरांत धाय फार मोकली ।
म्हणे ‘असा तसाचि धांव शक्ति फार वेंचली ॥
व्यर्थ फार पीडिलों जळांत नक्रसंगतीं ॥
तयाकडून सोडवीं त्वरीत तूंचि श्रीपती ॥४०॥
पीडिलों बहू पावगा हरी । पायिंची व्यथा शीघ्र तूं हरीं ॥
लागल्या कळा थोर या पदीं । पीडिलें मला नक्राआपदीं ॥४१॥
नक्रगांठिसी अग्नि लागला । पाहतोस तूं काय ऊगला ? ॥
पाव गा हरी ! दासपालका ! मोकलूं नको विश्वव्यापका ॥४२॥
भक्तवत्सल दीनमोचन पाव सत्वर तूं हरी ।
थोर संकट विघ्न उद्धट पातलें मज केसरी ॥
नक्रगांठिसि सोडुनी पद मोकळें करिं यादवा ।
झोंबला करुं काय तस्कर नाकळे मज माधवा ॥४३॥
विधीकारणें मत्स्य झालासि वेगें । त्वरें दानवां मारिलें शीघ्र आंगें ॥
बळें आणिले वेद हीरोनि चारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥४५॥
महीमाजि मंदागिरी चालियेला । तईं कूर्म होवोनियां स्थीर केला ॥
अशी कीर्ति केली महीमाजि भारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥४६॥
धरित्रीं बळें दानवीं चालवीली । वराहेरुपें स्वामि तूं थांबवीली ॥
हिराण्याक्ष मर्दोन भक्तास तारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥४७॥
तुवां नारसिंहें बहू खेळ केला । महाभक्त प्रल्हाद तो रक्षियेला ॥
अरी मर्दुनी फोडिला स्तंभ भारी । गजेंद्रास वेळेस आलास हारी ॥४८॥
क्षितीकारणें वामना धांवलासी । बळीदान घेऊनियां राहिलासी ।
तयां कारणें तूं उभा नित्य द्वारीं । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥४९॥
अरे भार्गवा ! थोर अद्भूत केलें । सहस्त्रार्जुनालागिं तूं मर्दियेलें ॥
जहालासि तूं ब्राह्मणां साहकारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥ ॥५०॥
तुझी राघवा ! वर्णु मी काय लीला । पदस्पर्शनीं तारिली शापलीला ॥
सुरां सोडुनी मर्दिला तो सुरारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥५१॥
अरे कृष्णजी काळिया नाथिला रे ! । रिकामा तिव्हां काय होतास तूं रे ? ॥
अरी मर्दुनी तारिल्या गोपनारी । गजेंद्रास वेळेस आलासि हारी ॥५२॥
पहा बौद्धरुपा कलंकी स्वरुपा । बहू वेंचला प्राण रे ! नामरुपा ॥
न देखों तुझी स्वामिजी वाट येतां । क्षणामाजि हा टाकीन आतां ॥५३॥
तुझें नाम घेतां हरे सर्व वेथा ! । असें ऐकिलें संतमूखें अनंता ! ॥
तयालागिं त्वां लाविला बोल आतां’ । असें ऐकतां धांवला जीवदाता ॥५४॥
गजेंद्राचा हा धांवा ऐकून भगवान् त्या ठिकाणीं प्राप्त झाले, व आपल्या चक्रानें नक्रमुख विदारुन त्यांनीं गजेंद्रास मुक्त केलें. वैकुंठास जाण्याकरितां गजेंद्र विमानारुढ झालेला पाहतांच, नक्रानें काय केलें ? कचेश्वर म्हणतात: -
असें दिखुनी हांसला नक्र दृष्टीं । म्हणे ‘वर्तलें थोर आश्चर्य सृष्टीं’ ॥
पुसे श्रीहरी ‘कां तुवां हास्य केलें ? ’ म्हणे म्यां तुला लोचनीं देखियेलें ॥
विमानीं गजा घालुनी चालवीसी । मला रे कसा हे वनीं मोकळीसी ? ॥७३॥
पतितपावन नाम तुझें हरी । तरि कसा मज टाकिसी तूं दुरी ? ॥
नवल थोर मनीं मज वाटलें । ब्रिदचि काय तुझें हरि सूटलें ? ॥७४॥
गजराज कसा वरि चालविला । हरि नक्र तुवां वनिं सांडियला ॥
जरि पातकि मीच खरा असतों । तरि हेच जळीं हरि रे नसतों ॥७५॥
कितिएक तुतें भजती पतितें । कितिएक तुतें जपती मुनि ते ॥
कितिएक गिरीवर ते असती । कितिएक उदास तुतें भजती ॥८०॥
कीतीएक ते पर्वतीं राहताती । कितीएक ते कर्वतीं देह देती ॥
कितीएक ते अग्निसंगा सहाती । तुझेवीण अन्या न जोडूं पहाती ॥८१॥
परी नातुडे स्वप्निं त्यां ध्यान तूझें । तयां आगळें श्रीहरी पुण्य माझें ॥
अकस्मात म्यां तूजला देखियेलें । मला टाकुनी इंद्रद्युम्रासि नेलें ॥८२॥
म्हणोनि मला हास्य आलें दयाळा । त्वरें उद्धरीं श्रीहरी हो कृपाळा’ ॥
असें बोलतां देव भक्ताभिमानी । म्हणे ‘चालवा नक्र आधीं विमानीं’ ॥८३॥
अशी कथा सांगून, कथेश्वर सत्संगाचा महिमा वर्णन करितात: -
सत्संग होतां तरती दुरात्मे । सत्संगयोगें परब्रह्म आत्मे ॥
सत्संग होतां बहु सौख्य आहे । सत्संग नक्रा फळलाचि पाहें ॥८७॥
संतसंग करितां हरि भेटला । संतसंग करितां तरलाहे ॥८८॥
असा हा थोर सत्संग आम्हांस प्राप्त होवो, अशी त्या भगवंताची प्रार्थना करुन हा लेख पूर्ण करितों.