मौनीस्वामी

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


मौनीस्वामी या नांवाचे अनेक सत्पुरुष हिंदुस्थानांत आजवर होऊन गेले. नरसोबाची वाडी, काशी, कोल्हापूर, हरिव्दार, कल्याण व मुंबई या ठिकाणी एके मौनीस्वामी निरनिराळ्या काली विद्यमान होते. प्रस्तुत चरित्रनायक मौनीस्वामी हे कवि असून , ते थोडया वर्षापूर्वी मुंबई शहरी होऊन गेले. "न मौनी मुकतां याति न मौनी दुग्धललस: न मौनी व्रतनिष्ठोपि मौनि तल्लीनमानस: " अशा प्रकारचे हे मौनीस्वामी होते. नासिक जिल्ह्यांत सिन्नर, ब्रम्हपुरी हे गांव प्रसिद्ध आहे. तेथे सरस्वती नामक मुख्य नदी असून, शिवनदी व देवनदी दोन लहान नद्या आहेत. सिन्नर येथे ब्रह्मदेवाची एक खंडित मूर्ती असल्यामुळे त्या गांवचे मूळ नांव ब्रह्मपुरी असे होते. या गांवी भिकाराम उद्धव नामक एक देशस्थ शुक्ल यजुर्वेदी, भारव्दाज गोत्री ब्राह्मण गृहस्थ रहात असत. ते गांवचे वतनदार देशपांडे व कुलकर्णी असून त्यांचे आडनांव पारखी होते.
त्यांची पत्नी सौ. सत्यभामाबाई हिचे उदरी शके १७०४-०५ साली मौनीस्वामीची जन्म झाले. बाल्य संपल्यावर, विद्यार्थीदशेत त्यांनी, त्या कालच्या सामान्य शिक्षणपद्धतीप्रमाणे, मोडी बालबोध लिहिणे, गणित, हिशेब, इत्यादि विषयांचे शिक्षण संपादन केले. त्यांचे मोडी व बाळबोध अक्षर चांगले वळणदार होते. स्वामीचे तीर्थरुप, पूर्वी पेशवाईत मेंढयांवर कर असे, त्यावर मामलेदार होते. पुढे त्यांनी संन्यास घेऊन समाधि घेतली. त्यांची समाधि सिन्नर येथे सरस्वती नदीतीरी श्रीभैरवनाथमंदिराजवळ आहे.
यांचे पूर्वाश्रमीचे नांव नारायण. त्यांस नारो भिकाजी असे ह्मणत असत. शेवटच्या बाजीरावाच्या कारकीर्दीत हे नारो भिकाजी पुणे येथे दफ़्तरदार होते. त्यांना पेशव्यांकडून पालखी व अबदागीर मिळाली होती. अबदागीर त्यांच्या वंशजांपाशी अद्याप आहे. पुढे इंग्रजी अंमल सुरु झाल्यावर शेवटचे बाजीराव पुण्याहून ब्रह्मावर्तास गेले तेव्हा नारो भिकाजी यांस रजा मिळाली. ते पेशवाईत अंमलदार होते ही गोष्ट लक्षांत घेऊन इंग्रजांनी त्यांस जामनेर येथे एका हुद्यावर नेमिले. तेथे असतांना, एके दिवशी त्यांस स्वप्नांत दृष्टांत होऊन , सद्गुरुंनी यतिवेषाने दर्शन दिले.
"रघुनाथ माउली गुरु रघुनाथ हे माउली ।
यतीश्वराचे वेषाने जामनेरी भेटली ."
अशा शब्दांनी, या प्रसंगाचे वर्णन त्यांनी एका पद्यांत केले आहे. गुरुदर्शन होतांच फ़डणविशीच्या जागेचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला व नासिक येथे जाऊन, तेथील प्रसिद्ध सत्पुरुष श्रीरघुनाथ भटजी महाराज यांस ते शरण गेले. या रघुनाथ भटजींचे चरित्र छापून प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा मठ व समाधि नासिक येथे गोदातीरी असून शेजारी भव्य सभामंडप आहे. मंडपांत एक संस्कृत पाठशाळा आहे. श्रीमंत विंचूरकर यांजकडून पूजा, नैवेद्य , नंदादीप वगैरे व्यवस्था चालू आहे. हे रघुनाथ भटजी पूर्वाश्रमी, बेळगांव जिल्ह्यांत मलयप्रभा नदीतरी कुलकुंभी गांवी रहात असत. ते जातीने कर्‍हाडे ब्राह्मण असून त्यांचे आडनांव पित्रे होते. त्यांनी त्र्यंबक येथे बारा वर्षे अनुष्ठान केले ; व नंतर त्यांस साक्षात श्रीदत्तात्रयदर्शन होऊन, त्यांचा अनुग्रहही झाला. हे सिद्ध योगी होते. प्रसिद्ध संस्कृत पंडित अच्युतराय मोडक व प्रस्तुत चरित्रनायक मौनीस्वामी हे त्यांच ए शिष्य होत. अनगांव कवाडकर चिद्धनस्वामी ( सखारामबुवा ) हेही त्यांचेच शिष्य; परंतु त्यांस त्यांचा प्रत्यक्ष उपदेश झाला असून तो स्वप्नांत झाला होता, असे सांगतात. रघुनाथ भटजींच्या उपरिनिर्दिष्ट चरित्रांत मौनी स्वामीचा उल्लेख आहे.
गुरु-परंपरा :- श्रीदत्तात्रेयांचे शिष्य रघुनाथ भटजी व त्यांचे शिष्य मौनीस्वामी यामुळे यांच्या नांवाचा उल्लेख भजनांत " द्त्त दिगंबर जय रघुनाथ । गुरुवर स्वामी मौनीनाथ " अशा रीतीने केला जातो. रघुनाथ भटजी समाधिस्थ झाल्यावर मौनीनाथ स्वामी नासिकहून आपल्या सिन्नर गांवी गेले. तेथे सांसारिक उपाधी टाळण्यासाठी त्यांनी तीन चार वर्षे मौन धारण केले व त्यामुळे त्यांस मौनी हे नांव प्राप्त झाले. नंतर स्वामी मुंबईस गेले व तेथे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. शिष्यसंप्रदाय वाढला व नित्य भजनपूजन, पुराणश्रवण होऊं लागले. परंतु मध्येच त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे गृहभंग होऊन स्वामींनी संन्यास घेतला. माघशुद्ध ११ बुधवार शके १७६८ पराभव नाम संवत्सरे ( ता. २७ जानेवारी सन १८४७ ) रोजी, मुंबईत समुद्रतीरी, श्रीवालुकेश्वरासमीप, बाणगंगा तीर्थी त्यांनी विव्दत संन्यासदीक्षा घेतली.
मौनीस्वामी हे साक्षात्कारी, राजयोगी, ब्रह्मज्ञानी असून कवीही होते. मौनीस्वामीस एक वडील बंधु मात्र होते, त्यांचे नांव आतेजी भिकाजी. त्यांस शंकर नांवाचा पुत्र होता, त्याच्या पश्चात वंश खुंटला. श्रीमौनीनाथांस दोन पुत्र होते ; थोरल्या मुलाचे नांव शिवरम तात्या व धाकटयाचे वामनराव आप्पा. याशिवाय त्यांस, भागिरथी, कृष्णा व गंगा अशा तीन मुली होत्या. शिवराम तात्या व वामनराव आप्पा हे विव्दान असून पुराण सांगत असत ; व त्यांनी काही शिष्यही केले होते. वामनराव आप्पा यांनी बरीच कविताही केली असून, ती त्याच्या विव्दान चिरंजीवांनी ’ काव्यकोष ’ या नांवाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ह्या वामनरावांचे चरित्र याच भागात दुसरीकडे दिले आहे. असो.
मौनीस्वामीनी संन्यास घेतल्यावर ते नासिक क्षेत्री गेले व तेथे श्रीब्रम्हानंद सरस्वती स्वामीपासून संन्यास दीक्षा दंडग्रहणपूर्वक यथाविधि धारण केली. त्या वेळी त्यांचे नामाभिधान " श्रीनारायणेंद्र सरस्वतीस्वामी " असे ठेवण्यांत आले. त्या वेळी त्यांचे वय सुमारे ६३ वर्षाचे होते. या वयांत त्यांनी प्रस्थानत्रयी अवलोकन केली. त्यांच्या शिष्यवृंदाने त्यांस पुन: मुंबईस नेले व तेथे सकाळ संध्याकाळ पुराणसत्र पुन: सुरु झाले. पंचदशी, शंकरानंदी गीताटीका, अपरोक्षानुभूति, शतश्लोकी भागवत, वाक्यवृत्ति ह्या संस्कृत; एकनाथी भागवत, दासबोध ज्ञानेश्वरी, विवेकसिधु, परमामृत ह्या प्राकृत; व विचारसागर, मोक्षपंथ, सुंदरविलास, वृत्तिप्रभाकर या हिंदी गंथांचे व्याख्यान स्वामी करीत असत. काशीपासून रामेश्वरापर्यत स्वामींचे अनेक शिष्य होते; व त्यांत काही मोठमोठे विव्दान शास्त्री, पुराणिक , हरिदास वगैरेही होते.
राजयोग समाधि-स्वामी राजयोगी होते हे पूर्वी सांगितलेच आहे. तीनपासून सात दिवसपर्यंत ते सारखी समाधि लावून बसत. नासिक वगैरे ठिकाणच्या कांही लोकांनी छलबुद्धीने मुद्दाम पहारे वगैरे ठेवून त्यांच्या समाधीच्या खरेपणाची परिक्षा पाहिली होती. महाराजांच्या समाधीविषयी, रा. मनसुखराम सूरजराम त्रिपाठीकृत गोकुळदासजी झाला यांच्या चरित्रांत उल्लेख आला आहे. मुंबईतील पुष्कळ मोठमोठे गृहस्थ स्वामीचे शिष्य होते . श्री धुंडीराज विनायक बिवलकर, श्री उमाबाई साहेब बिवलकर, श्रीधर विठ्ठल दाते, बाळाजी पांडुरंग, शांताराम नारायण वकील, नारायण दाभोळकर, महादेव चिमाणाजी आपटे, डाँ. कुंटे, डाँ. भाऊ दाजी, डाँ. आत्माराम , मैराळ शास्त्री, आप्पा शास्त्री खाडीलकर, डाँ. शांताराम विठ्ठल संझगिरी, महादेव शास्त्री अमरापूरकर, कृष्णशास्त्री महाबळ, विश्वनाथ नारायण मंडलीक , नाना शंकर शेट, वगैरे थोर थोर शेंकडो गृहस्थांस स्वामीच्या योगविद्यानैपुण्याचा अनुभव आला होता. आपल्या समाधीचा भंग होणे स्वामीस आवडत नसे. त्यांस एकदां एक गृहस्थ म्हणाले " महाराज, आपण समाधि लावून बसतां, पण त्यामुळे, पुस्तकांचे फ़ेरिस्त करण्याचे काम हल्ली सुरु केले आहे, ते तसेच राहते; व दुसर्‍या कामासही हरकत होते. " दुसर्‍या एका प्रसंगी, ते समाधिस्थ असतां त्यांस कोणी बळेच हाक मारुन जागृत केले तेव्हा दिंडी वृत्तांत " मौनी म्हणे हो नका झोप मोडूं । ब्रम्हानंदाची तार नका तोडूं " असे उद्गार त्यांनी काढले. शेट कानजी खेतजी यांनी स्वामीस एक लक्ष रुपयांची रक्कम अर्पण केली होती व त्यांनीच स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिचा व्यय केला. सदर रकमेतून नासिक येथे श्रीमद्भागवताचा अष्टोत्तरदशत सप्ताह केला. नासिक. प्रयाग, व्दारका वगैरे ठिकाणी धर्मशाळा बांधल्या व पुढे शेटजीस संतती नसल्याने, त्यांच्या मिळकतीचे उत्पन्न धर्मार्थ अन्नसत्रे व सदावर्ते स्थापून , त्यांच्या खर्चाकडे लावून दिले. ही व्यवस्था हा कालपावेतो सुरळीतपणे चालू आहे. शेट कानजी यांनी आपल्या मृत्युपत्रांत, स्वामीच्या उत्तरकार्याप्रीत्यर्थ १००० रुपयांची  रकम लिहून ठेवली होती परंतु पुढे त्यांच्या पत्नीने ती रकम देऊन वर आणखी बरीच मोठी रकम दिली. आरंभी पुनर्विवाहास प्रतिकुल असलेले व नंतर त्या सुधारणेचे कट्टे पुरस्कर्ते झालेले गणेश शास्त्री मालवणकर हे स्वामींचे शिष्य होते व आरंभी स्वामीच्या कविता त्यांनीच छापून प्रसिद्ध केल्या. केशव मोरेश्वर्म बर्वे ( अलिबाग ) हे स्वामीचे शिष्य अद्याप विद्यमान असून , दरसाल पुण्यतिथीस येऊन द्रव्यव्दारे मदत करितात.
रामबुवा, ज्ञानमठ, बडोदे :- हे रामबुवा मौनीनाथांचे एकनिष्ठ शिष्य असून त्यांस रामगुरु बैरागी असे ह्मणत असत. त्यांनी पूर्वाश्रमांतच सिन्नर येथे जाऊन स्वामीचा अनुग्रह घेतला व गुरु आणि गुरुपत्नी यांची सेवा केली. हे ब्रह्मचारी असून निस्सीम रामोपासक होते. ते जातीने पंचगौडांपैकी असून स्वामी त्यांस फ़ार मानीत असत. त्यांजविषयी बोलतांना स्वामी आपल्या पत्नीस ह्मणत असत "ह्यांस गृहकृत्य, कामकाज वगैरे कांही करुं देऊं नको. हे पूज्य आहेत ; यांस वंदन करीत जा." पुढे हे रामबुवा स्वामीबरोबर मुंबईस येऊन श्रीवालुकेश्वरी राहिले. जनसंमर्दाची उपाधि त्यांस खपत नसे. फ़क्त प्रात:काली गुरुदर्शनास व उपदेशश्रवणास ते येत असत. येतांना चौपाटीवर लांकडे उचलणारे हमाल " हैले माली, हैली माली " म्हणत, त्यांस त्या शब्दांऐवजी " राम राम " म्हणा असे रामबुवांनी सांगावे. पहिल्या पहिल्याने हमालांनी त्यांचे सांगणे ऐकले नाही ; परंतु पुढे जेव्हा रामबुवांनी त्यांस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली तेव्हा रामबुवांनी त्यांस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली तेव्हा ते राम राम म्हणूं लागले. पुढे असे झाले की, रामबुवांस येतांना पाहतांच ते हमाल रामनामाचा घोष करुं लागले. असो. पुढे कांही दिवसांनी मौनीनाथांनी दक्षिण यात्रा करण्याचा आपला मनोदय रामबुवांस कळविला तेव्हा बुवा परत बडोद्यास गेले. त्यांनी भक्तिज्ञानवैराग्यसंपन्नता पाहून बडोदे येथील पुष्कळ लोक त्यांचे शिष्य झाले. बापूबुवा ब्रह्मचारी हे त्यांचे पट्टशिष्य होत ; व रामबुवांनी रावपुर्‍यांत स्थापलेल्या ज्ञानमठावर, गुरुंच्या पश्चात बापुबुवाच अधिष्ठित झाले. ह्या संस्थानास गायकवाड सरकारांतून नेमणूक चालू आहे. तेथे रामबुवांची समाधि असून, दरसाल भाद्रपद शुद्ध ३ रोजी पुण्यतिथीचा उत्सव होतो. रामबुवांचे दुसरे शिष्य मुंबईतील प्रसिद्ध सद्वोधप्रवर्तक ब्रह्मनिष्ठ जयकृष्ण महाराज हे होत. हे स्वत:चे घरी सकाळ संध्याकाळ वेदांतनिरुपण करीत असत. नंतर चतुर्थाश्रम स्वीकारुन ते मुंबईतच समाधिस्थ झाले. त्यांचे चिरंजीव वे. शा. सं जटाशंकर व्यास हे मोठे विव्दान व सत्वस्थ आहेत.
मौनीस्वामीचे प्रवचन ऐकण्यास जयकृष्ण महाराज नेहमी येत असत व राममहाराजांच्या निर्याणानंतर, प्रतिवर्षी भाद्रपद शुद्ध ३ दिवशी आपल्या गुरुंच्या पुण्यतिथीस मौनी महाराजांस घरी आणून त्यांची महापाद्यपूजा करीत असत. रामबुवांचे आणखी पुष्कळ शिष्य गुजराथ प्रांती होते व त्यांनी भक्ति आणि वेदांत मार्गाचा पुष्कळ प्रसार केला.
मौनीस्वामीची कविता :- स्वामीनी लघुबोध ’नामक एक लहानसे अध्यात्म प्रकरण ओवी वृत्तांत रचिले, ते आजपर्यंत दोन तीन ठिकाणी छापून प्रसिद्ध झाले आहे. दुसरा ’ स्वात्मबोध ’ हा ग्रंथ बराच मोठा असून त्यांत अव्दैत वेदांत विषय चांगल्या रीतीने प्रतिपादन केला आहे. यांशिवाय पंचीकरण व समाधी प्रकरण असे दोन लहान ग्रंथ आहेत. हे सर्व ग्रंथ ओवीबद्ध असून ते प्रकाशित झालेले आहेत. स्वामींनी रचिलेल्या ’ परमार्थपर आरत्या ’ ही छापलेल्या आहेत. ’ परमार्थपर नित्यक्रम ’ या पुस्तकांत अभंग वगैरे फ़ुटकळ कविता आहे. याशिवाय त्यांनी भक्तिज्ञानवैराग्यपर अनेक सुरस पदें केली आहेत, परंतु ती मात्र अद्याप अप्रकाशित आहेत.
तीर्थयात्रा :- मौनीस्वामींनी प्रथम दक्षिण यात्रेस जाऊन राशीन, जेजूरी, पंढरपूर, शंभुमहादेव, नृसिंगपूर, कोल्हापुर, भीमशंकर, नृसिंहवाडी, सासवड, देहू, आळंदी, चिंचवड वगैरे तीर्थ केली. नंतर मुंबईस येऊन कांही वर्षांनी ते उत्तर यात्रेस गेले. तिकडे त्रिस्थळी यात्रा झाल्यावर, पुढे शेवटपर्यत काशीवास करावा अशी इच्छा मनांत उद्भवली व त्याप्रमाणे त्यांच्या शिष्यमंडळींने व्यवस्था करुन दिली. कांही शिष्य नासिकपर्यंत स्वामीस पोचविण्यास आले. सत्पशृंगीची यात्रा झाल्यावर, धुळे, तापी, नर्मदा, बर्‍हानपूर, इंदेऊर वगैरे स्थले पहात पहात सातपुडा ओलांडून ओंकार, उज्जनी, वगैरे यात्रा करीत करीत प्रयागावरुन गयेस जाऊन काशीस आले. वाटेत इंद्रप्रस्थ ( दिल्ली ) कानपूर, लखनौ, ब्रह्मावर्त, विध्यवासिनी इत्यादी यात्र उरकण्यांत आल्या. स्थळोंस्थळी मानमान्यता व विव्दत्समागम होत असे. शेवटपर्यंत काशीवास करण्याचा महाराजांचा मनोदय असल्यामुळे ब्रह्मघांटावर एक घर खरेदी करण्यांत आले. सर्व खर्च  शिष्यमंडळीने केला. पुढे, महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव व शिष्य वामनराव यांच्या कुटुंबास त्याच घरांत देवाज्ञा झाली. शिवाय मौनी स्वामीस काशीची हवा मानवेना ; रक्त पडूं लागले. तेव्हा सर्व मंडळी पुन: मुंबईस आली. तेथे स्वामीच्या प्रकृतीस आराम पडला.
श्रीमौनीस्वामीकरितां, किंमतीचे घर मुगभाट काशीराम कंसारा यांनी १८००० रु. किंमतीचे घर मुगभाट गल्लीत विकत घेऊन त्यांत स्वामीस ठेविले. पूर्वी स्वामी आग्रंयाचे वाडीत मध्यभागी असलेल्या बंगल्यांत राहात असत. श्री. बाबासाहेब आंग्रे व त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब आंग्रे हे स्वामीचे शिष्य असल्याने त्यांनी ते स्थळ स्वामीच्या वास्तव्यार्थ दिले होते. त्यानंतर कांही वर्षे, कांदेवाडीत, शेट कानजी खेतसी यांच्या जागेंत स्वामी राहात असत. स्वामीचे वडील चिरंजीव शिवराम तात्या यांचा मुक्काम काशीक्षेत्रीच होता. कालांतराने स्वामीची वृद्धावस्था होऊन वयाची ९० वर्षे उलटून गेली. शरीर जराजर्जर झाले. तेव्हा, स्वामीनी देह ठेवल्यास त्यांच्या समाधीची व्यवस्था कोठे करावयाची, यासंबंधाने त्यांच्या शिष्यवर्गास विचार पडला. पुढे स्वामीचे जेष्ठ चिरंजीव काशीहून मुंबईस आले व स्वामीस काशीस घेऊन जातो, असे म्हणाले. परंतु धाकटे पुत्र वामनराव हे सिन्नरहून मुंबईस येतांच, मुंबईतच स्वामींचे समाधिस्थल करावे असे ठरविण्यांत येऊन, ठाकुरव्दार गल्लीत, कोळ्याचे वाडीतील स्थल ( हल्ली त्र्यंबक वैद्याचा वाडा ) पसंत करण्यांत आले व ती जागा विकत घेऊन तेथे श्रीराममंदिर उभारण्यात आले. पुढे, त्या स्थली स्वामीची समाधि बांधण्यास मंजुरी मिळावी, अशा अर्थाचा एक हजार सह्यांचा अर्ज सरकारांत पाठविण्यांत आला. मुंबईत मृत शरीर, ठराविक जागेशिवाय इतरत्र कोठेही पुरु देत नाहीत. त्या वेळी मि. क्राफ़र्ड हे प्रसिद्ध साहेब मुंबईतील म्युनिसिपालटीचे कमीशनर होते. सर्वांच्या खटपटीने , वरील ठिकाणी समाधी बांधण्याची परवानगी शिष्यवर्गास मिळाली. स्वामीच्या देहपातापूर्वीच, अशा रीतीने, स्थलयोजना करुन ठेवली असल्यामुळे, देहावसानसमयी विशेष त्रास पडला नाही.
सरासरी दोन चार महिने स्वामीची प्रकृति अस्वस्थ होऊन, शेवटी सात दिवस त्यांनी केवळ गंगादकावर काढले. ह्या सात दिवसात स्वामीस श्रीरामापुढे सोवळ्यांत ठेवून, गीता भागवतादि ग्रंथांची पारायणे मंडळीने चालू ठेवली होती. रात्रौ भजनही होत असे. शेवटी, वयाचे सुमारे ९२ वे वर्षी, मिति भाद्रपद शुक्ल १३ सोमवार, शके १७९८ रोजी प्रात:काली श्रीमौनीनाथस्वामी ब्रह्मीभूत झाले. तेव्हा सर्व मंडळीस मोठा खेद वाटला. मनोवेधक व सरळ स्वभाव, मधुर भाषण, सर्वावर सारखे प्रेम, परिणामकारक प्रवचनपद्धति, शांत वृति इत्यादि साधुलक्षणांनी युक्त असलेले मौनी स्वामी सर्व मंडळीस फ़ार प्रिय झाले होते ; अर्थात त्यांच्या निर्याणाने त्यांच्या शिष्यर्गास अत्यंत दु:ख व्हावे हे साहजिकच होय. असो. स्वामीच्या देहविसर्जनानंतर तेथे हजारों लोक जमा होऊन मोठा कोलाहल झाला. वाद्यांचे गजर झाले, पुष्पवृष्टि झाली, वेदमंत्र झाले व शेवटी संध्याकाळी स्वामींचे शव समाधिस्थ करण्यांत आले. मुंबईच्या आसपासचे पुष्कळ लोक या समारंभास आले होते व पोलिसांचा बंदोबस्तही चांगला होता. स्वामीचे पुत्रेच्छु शिष्य कै. बाळा पंडित पुराणिक पुणेकर यांनी समाधीपूर्वी, शंखप्रहार करुन स्वामीचा ब्रह्मरंध्रभेद केला व त्यायोगे त्यांस पुढे पुत्रलाभही झाला. मौनीस्वामीच्या समाधिस्थलाचा व कालाचा उल्लेख त्यांचे पुत्र व शिष्य वामनराव यांनी आपल्या मौनीचरित्रांत येणेप्रमाणे केला आहे :-

" श्रीमौनी गुरुचा सुकल्पतरु हा साकार आगार गा ।
ब्रह्मी शांतचि होय सागरतटी मुंबापुरा मध्य गा ॥
सत्राशे नव अष्ट भाद्र पहिली तेरावि तीथी यदा ।
रामाचे निकटी समाधिरचना ठेवूनि देहा तदा ॥ "
श्रीमौनीनाथांचे निधनलेख इंदुप्रकाश, मुंबईसमाचार आणि ’ टाइम्स आँफ़ इंडिया ’ ह्या पत्रांत प्रसिद्ध झाले. त्यांच्या पुण्य तिथीचा उत्सव एक महिनाभर चालू होता. शिष्यमंडळीने हजारो रुपये खर्च करुन आनंद केला.
संस्थान :- स्वामीच्या शिष्यवर्गाने ठाकुरव्दारी बांधलेल्या राममंदिराची व्यवस्था, स्वामीनी व मंडळीने ’ अर्पणपत्रिका ’ व ’ व्यवस्थापत्र ’ व्दारे, स्वामीचे पूर्वाश्रमस्थ पुत्र व शिष्य शिवराम तात्या आणि वामनराव आप्पा यांजकडे वंशपरंपरा सोपविली; परंतु कनिष्ठ पुत्र वामनराव अगोदर मृत झाल्याने, शिवरामतात्यांनी, वामनरावांच्या वंशजांस सिन्नर व काशी येथील मिळकतीच बराच मोठा भाग देऊन त्या ऐवजी मुंबईतील राममंदिराचा हक्क आपणाकडे घेतला. त्याप्रमाणे मंदिराची व्यवस्था हल्ली त्यांच्या वंशजांकडे असून , तेथे प्रतिवर्षी रामनवमीचा व श्रीमौनीस्वामीच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठया थाटाने होतो. देवास व सामाधीस, नित्यनैमित्तिक पूजा, नंदादीप, नैवेद्य, उत्सव, चौघडा, दीपोत्सव व वैगेरेच्या खर्चाकडे, शिष्यमंडळीने एक चाळ बांधून, तिचे उत्पन्न तोडून दिले आहे.
श्रीमौनीस्वामीचे एक पद्यात्मक चरित्र, त्यांचे कनिष्ठ पुत्र व शिष्य वामनराव अप्पा यांनी रचिले असून, ते त्यांच्या " काव्यकोष " ग्रंथात प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय स्वामीच्या इतर कांही शिष्यांनी स्वामीवर पदे, आरत्या, वगैरे बरीच कविता केली असून, त्यातील कांही पद्ये छापून प्रसिध्दही झाली आहेत. मौनीस्वामीच्या पादुका सिन्नर येथे श्रीदत्तमंदिरी दत्तमूर्तीपुढे स्थापन केल्या आहेत. शिवाय त्यांची मूर्ति, केळ्वे माहीम स्टेशनवर त्यांचे शिष्य ब्रह्मीभूत केशवराव महाराज यांनी देवालयांत स्थापन केली आहे. असो.
आतां मौनीनाथांच्या कवितेतले कांही निवडक उतारे देऊन हा चरित्रलेख पूर्ण करुं.
अभंग
माझी विनवणी श्रवण करावी । मनास आणावी रामराया ॥१॥
रामराया मी तो अनाथ किंकर । कृपा मजवर करी आतां ॥२॥
करी आतां तुझ्या चरणी स्रता । न ते विचारितां गुणदोष ॥३॥
गुणदोष माझे राघवा अपार । तयाचा निर्धार काय बोलू ॥४॥
प्रार्थितसे तुज पतितपावना । जानकीजीवना रघुपति ॥५॥
काय बोलू आतां पतित मी खरा । तुज रघुवीरा प्रार्थितसे ॥६॥
रघुपति तुझे रुप हे सगुण । मौनीते चरण दाखवावे ॥७॥
पद.
तो नर सुस्ती । श्रीहरिशी करितो मस्ती ॥ध्रु. ॥
ह्रदयी विसरुनि आत्माराम । करितो बाह्य प्रपंची काम ।
केवळ विषयसुखी विश्राम । तो मदहस्ती
अंगी तारुण्याचा ताठा । बोलण्याचा ठसका मोठा ।
बहुत सोंगटीचा चटका । सांपडे गस्ती ॥२॥
आईबापासी घेतो खडका । साधुनिंदा करितो धडका ।
परव्दारे जो झाला सडका । राहिल्या अस्थी ॥३॥
ख्याल तमाशा जातो धडका । हरिहरभजनाविषयी रडका ।
कामक्रोध आदळती थडका । केवळ हुस्ती ॥४॥
रामनाम म्हणतां कुच्चर । वनितावर्णनविषयी रडका ।
जे मागेल ते देतो सत्वर । त्या यम जास्ती ॥५॥
काढूनि पागोटयाची बिनी । धोतर चाप चोपी चुनी ।
अंगडे तंगबार घालुनी । लावितो दस्ती ॥६॥
वनिता देखूनि थरकी घोडा । वरती पाहूनि चावी विडा ।
पगडीबाहेर केस बुचडा । दोघे हंसती ॥७॥
ऐसा दुर्बुद्धीचा जोर । भगवद्भजनाविषयी चोर ।
मौनी म्हणे पुढे घोर । काळ कुस्ती ॥८॥
मौनीनाथांची काव्यवाणी किती परिणामकारक आहे हे या एकाच पद्यावरुन लक्षांत येते. स्वामीच्या वर्णनशैलीचे व शद्बयोजनएचे अमृतरायांच्या वर्णनशैलीशी व शद्बयोजनेशी बरेच साम्य दिसते.
२. स्वात्मबोध - अध्याय ११ वा. ओव्या. (शेवटच्या )
असो ग्रंथार्थ लिहिला जो कांही ॥ ते शेवटी सूचना लिहावी ॥ म्हणवोनि संक्षेपे निश्चयी ॥ ग्रंथान्वयी ऐक सांगो ॥६६॥ प्रथम अध्यायी निरुपण ॥ श्रीगणेशादि सद्गुरु संतस्तवन ॥ श्रोत्यांचा प्रश्न उत्थापून ॥ दिधले प्रतिवचन तयांसी ॥६७॥ श्रुद्ध अंत:करणे निश्चिति ॥ यथार्थ व्हावया भगवतप्राप्ती ॥ सत्कर्म भजनादि दृढभक्ति ॥ हे कथिले अल्पोक्ति प्रथमांत ॥६८॥ पुन: श्रोतयांचा प्रश्न ॥ आत्मानात्मविषयी जाण ॥ त्याचे देऊनि प्रतिवचन ॥ प्रथमाध्याय संपविला ॥६९॥ आत्मा एक सच्चिदानंद ॥ त्रिशब्दार्थी नसे भेद ॥ तोच तूं हे प्रसिद्ध ॥ कथिले विशद व्दितीयाध्यायी ॥७०२॥ मग साधनचतुष्टययुक्त जो शिष्य ॥ त्याच्या प्रश्नांचे करोनि मिष ॥ शठ लक्षणांचा किंचिंत अंश ॥ दर्शित केला कळवया ॥७१॥ म्हणून सच्छिष्यें कर जोडून  ॥ प्रश्न केला अतिनम्र होऊन ॥ हे गुरो आत्मा सच्चित्सुखघन ॥ कैशी ओळखण सांगा स्वामी ॥७२॥ तवं गुरु म्हणती शिष्यासी ॥ अरे आत्मा तंव ज्ञानराशी ॥ सदा प्रकाशूनि अवस्थात्रयांसी ॥ निर्विकारेंसी स्वत:सिद्ध ॥७३॥ त्या अवस्थात्रयाची करुन बाध ॥ निवडावी संवित शुद्ध ॥ ते ज्ञान अवस्थात्रयी अभेद ॥ वर्णिले विशद तृतीयाध्यायी ॥७४॥ मग जीवेश्वरांचे एकपण ॥ उपाधित्यागे केले वर्णन ॥ एषास्वयंप्रभा इत्यादि वचन ॥ अनेक प्रमाण दर्शविले ॥७५॥ अर्थ इतुका साधिला ॥ ज्ञानघन आत्मा तूं दर्शविला ॥ तो तूं साक्षी अससी एकला ॥ हा अनुभव कथिला चतुर्थी ॥७६॥ सर्वही भुवनी आत्मयाची ॥ व्याप्ति कथियेली चित्सत्तेची ॥ ओतप्रोत प्रतिपादक श्रुतिची ॥ आणि दर्शविली स्मृतीची प्रमाणता ॥७७॥ पुन: शिष्ये आशंका केली ॥ सर्वत्र चित्सत्ता व्यापिली ॥ कोणी जड्त्व कां पावली ॥ आणि चेतन कां झाली सांगा स्वामी ॥७८॥ अरे शिष्या चैतन्य व्यापक सर्वत्र । परी शुद्धोपाधीत प्रतिबिंब होत ॥ तेणे ते सचेत असे भासत ॥ अशुद्धी जडत्व प्रतिबिबाभावे ॥७९॥ पुन: शिष्ये केला प्रश्न ॥ पूर्वी पंचदशीच्या वचनेकरुन ॥ सांगितले ज्ञान अभिन्न ॥ आतां आपण म्हणतां तेच तूं ॥८०॥ ऐसा उभयवचनी दिसता भेद ॥ मग त्या आशंकेचा करुन छेद ॥ अव्दयसच्चिदानंदशुद्ध ॥ पूर्ण बोध तूं अससी ॥८१॥ तुझ्या स्वरुपाची ठाय़ी ॥ त्रिविध परिछेद नाही ॥ आणि सजातीय विजातीय पाही ॥ नसेच कांही स्वगत भेद ॥८२॥ एवं आत्मा चैतन्यघन ॥ तो तूंच गा निश्चय पूर्ण ॥ हे गुह्य पुन:पुन: शिष्यालागुन ॥ उपदेशिले जाण पंचमाध्यायी ॥८३॥ पुन: सतचित् आनंद पदांचा ॥ प्रमाणांतरे बोध साचा ॥ व्हावा म्हणून आनंदमयकोशाचा ॥ अनुभव प्राज्ञांचा वर्णिला पै ॥८४॥ त्या आनंदमय कोशविचारे करुन । ब्रह्मानंदाचे आणि वासनानंदाचे विवेचन ॥ स्पष्ट बोलून संपूर्ण ॥ केले प्रवचन षष्टमाध्यायी ॥८५॥ पुन: सच्चिदानंद ब्रह्म निश्चित ॥ आणि तद्विवर्तनामरुप जगत ॥ त्याविषयी श्रुतिस्मृतिसंमत ॥ केले दर्शित सप्तमाध्यायी ॥८६॥ मंदबुद्धि जो तयासी ॥ दृढबोध व्हावयासी ॥ पुन:पुन: निरुपणासी ।  सप्तमाध्यायी संपविले ॥८७॥ मग निर्विकारी जगद्भान ॥ कैसे भासते म्हणोन ॥ इत्यादि आशंका उत्थापून ॥ समाधान कथियेले ॥८८॥ ब्रह्म अव्दैत सिद्धांत ॥ माया मिथ्या विवर्त ॥ अनिर्वाच्य मृगजवळवत् दृष्टांतयुक्त । कथिले अष्टमी ॥८९॥ मग साधनचतुष्टयाचे स्वरुप ॥ तव्द्त वैराग्यादिकांचे हेतु स्वरुप ॥ आणि त्यांचा फ़लावधि अमुप ॥ न ठेविला अल्प संशयभ्रम ॥९०॥ पुढे वर्णिले समाधि प्रकरण ॥ सविकल्प निर्विकल्प लक्षण ॥ पुन: तो समाधि षट् प्रकारे करुन ॥ वर्णिला जाण अंतर्ब्राह्य  ॥९१॥ समाधिअभ्याससमयी ॥ विक्षेपादि विघ्ने येती त्या ठायी ॥ त्यांची निवृत्ति करुन उपायी ॥ अभ्यास पाही करावा ॥९२॥ कोणी आकाशासम ब्रह्म ह्मणती ॥ त्याची विवेकव्दारा करुन निवृत्ति ॥ सच्चिदानंद ब्रह्मस्थिति ॥ ती वर्णिली युक्ति नवमाध्यायी ॥९३॥ ऐसा अपरोक्ष ज्ञानयुक्त ॥ त्यासच म्हणती जीवन्मुक्त ॥ त्याचे आचरण विधियुक्त ॥ केले दर्शित यथाशास्त्रे ॥९४॥ ते इच्छाऽनिच्छा परेच्छानुसार ॥ जगी वर्तती निरंतर ॥ भक्ति ज्ञानादि प्रकार ॥ दाविला तो विचार दशमाध्यायी ॥९॥ संचित प्रारब्ध क्रियामाण ॥ त्यांचे स्वरुप कथिले पूर्ण ॥ पुढे विदेहमुक्तिप्रसंगेकरुन॥ कथिले निर्वाण एकादशी ॥९६॥ असो अपरोक्षज्ञान झालियावर ॥ राहावे कैसे तो प्रकार ॥ नीति संक्षेप सविस्तर ॥ तीही साचार लिहीयेली ॥ ९७॥ एवं इत्यादि निरुपण ॥ जे जे केले असे कथन ॥ ते ते ह्र्दयी दृढ धरुन ॥ व्हावे निमग्न स्वस्वरुपी ॥९८॥ श्रीरघुनाथाचार्यकिंकर ॥ देहास मौनी नामोच्चार ॥ निवासस्थान ग्राम सिन्नर ॥ हे बोधसार कथिले तेणे ॥९९॥ संवत अठराशे एक्याशीत ॥ शके सतराशे चाळीसांत ॥ तारण नाम संवत्सरात ॥ "स्वात्मबोध" ग्रंथ केलासे ॥१००॥ हेमंतऋतु पौषमासी ॥ शुक्लपक्ष द्शमीचे दिवशी ॥ प्रथम प्रहरांत निश्वयेसी ॥ केले ग्रंथासी समाप्त ॥१०१॥ इति श्रीस्वात्मबोध ग्रंथ॥ श्रीरघुनाथाचार्य समर्थ ॥ तप्तादरज मौनीकृत ॥ अध्याय समाप्त एकादश हा ॥१०२॥
पद
नरतनु दुर्लभ अति हे प्राण्या स्वरुपी सावध होई । गेले हे वय विषयी रमत वृथाचि रे लवलाहि ॥ प्राण्या स्वरुपी सावध होई ॥ ध्रुवपद ॥ बहुकाळ तूं अगणित जन्मी निजरुपा चुकलासी । मायामोहे विसरुनी रामा भवदवपथिं पडलासी । व्याघ्रश्वान सर्पादिक होऊनी श्रमलासी बहु पाही ॥१॥ प्राण्या. ॥ बा एकेक योनीत कोटि कोटि फ़ेर तुजलागी पडले । लक्षचौर्‍यांशि योनिंत मन हे बहु दु:खी हुरपळले ॥ काय तुजला झाले कैसे नकळे निजहित कांही ॥२॥ प्राण्या. ॥ ऐसे फ़िरता फ़िरता समान पापपुण्य जे काळी । नरतनुचा अतिलाभ तुजला जाली दैवसुकाळी । येथील आयुष्य परमार्थेविण वृथा घालिसी पाही ॥३॥ प्राण्या. ॥ धनसुतरमणीपशुदेहादि शाश्वत नसेचि काही । निशिदिनि यांसचि बहुजन्मी तू सक्त असतां पाही । गेले हरपुनि गतजन्मीचे तव्दत जाण तू  हेही ॥४॥ प्राण्या.॥ अझुनि तरी निजमनी करी क्तूं विवेक भक्ति हरीची । वैराग्यादिक चार साधने संपत्ति घे दैवची । मौनी म्हणे गुरुचरणप्रसादे आत्मा ओळख ह्रदयी ॥५॥ प्राण्या.॥
पद
पद रामाचे ध्याई ॥ ध्रुवपद ॥ कमलनयन सुखवदन पावन, अघहरण, शरण तूं जाई ॥१॥ जानकीरमण जगजीवन अमन, भवहरण, वामन तूं पाही ॥२॥ मौनी अमर सुखसागर अजर स्मरहर, सुलभ वदनी राम गाई ॥३॥
पद
हे मन निज चित्सुधिया हरिला भजावे । आसनि शयनि गमनि नयनि ह्रदयी स्मरावे ॥ ध्रुवपद ॥ टाकुनि विषय सर्व असार, । निशिदिनिं करी हेचि काज, । निजानंद कृष्णराज । चरणी रमावे ॥१॥ निरतिशयानंद जाण । त्रिभुवनिंचे जे निधान । अचल सुखे समरसोन । सुखी बा असावे ॥२॥ मौनी म्हणे परम गुज । हेचिकल्याण तूज । टाकुनियां विषय निज स्वरुपी राहावे ॥३॥
सवाया
नार्भित ब्रह्म असे एक दावित झळकत सांगतसे नयनी हो ॥ एकमतें भृकुटीतचि व्यापक नासिकिं दृष्टि म्हणे एक द्या हो ॥ सहस्त्रद्ळी एक ज्योति विराजत दाविति एक उजेड पहा हो ॥ मौनी म्हणे भ्रम टाकुनि सर्वहि साक्षि नभापरि ब्रम्ह अहा हो ॥१॥ जो तुझे अंतरि तोचि दिगंतरि तोचि चराचरि व्यापुनि आहे ॥ अंतरि बाहेरि नित्यनिरंतर पूर्ण चिदंबर ज्ञानदृगा हे ॥ लेउनि अंजन श्रीगुरुचे मग व्यापक चिद्घन सत्य तूं पाहे । देवनिरंजन मौनी म्हणे घनस्वात्मस्वरुपचि जाणुनि राहे ॥२॥
दिंडया.
ब्रह्मसौख्याची मना भूल येती । तेणे कामेहि सर्व राहताती ॥ ऐशी अवस्था जाहली मना माझ्या । कोणा सांगू हे सांग महाराजा ॥१॥ काम राहिले तरि माझे कय गेले । जन्मोजन्मी हे बहू काम केले ॥ जग मिथ्याचि ब्रह्म सर्व आहे । मना कलतांची तदाकार राहे ॥२॥ बहु श्रमलो विश्रांती मला झाली । ब्रह्मानंदाचि झोप मला आली ॥ मौनी म्हणे हो नका झोप मोडू । ब्रह्मानंदाची तार नका तोडू ॥३॥
पद.
यांत सौख्य कदापि नाही ॥ सांडुनि दृश्य प्रपंच दुराशा निजहित प्राण्या पाही म॥ यांत. ॥ ध्रु.॥
धनसुतदारा व्यर्थ पसारा । येथेच राहिल सारा ।
जै जाशिल यमपुरा कैचे सुह्रद आप्त सोयरे । येथेच राहतिल पाही ॥१॥
ज्या देहास्तव ह्मणसी माझे । आदि करुनियां गेह ।
तो येथेच राहिल देह । ऐसे तयांचे इतर कैचे । नये बरोबर कांही ॥२॥
धरुनि विरक्ति विषयासक्ति । सांडुनि करिं श्रीहरिची भक्ति ।
बा त्यागुनि सर्वासक्ति । सनकसनंदन श्रीशुक त्यागित गोपिचंद नृप तोही ॥३॥
देहबुद्धिने अनात्मयाते । आत्मपणा तूं धरिसी । मग वृथाचि गंतसि फ़ांसी ।
त्यजुनि कुबुद्धी जिंकिं तू वैरी साही ॥४॥
सद्‍गद भावे हरिसि भजावे । स्वस्वरुपा वळखावे ।
त्वां तरीच जन्मा यावे । मौनी ह्मणे गज सांगतसे तुज संतसमागमि राही ॥५॥
पद.
मन चिद्धनि हे मिळूनि अवघे स्वस्वरुपचि झाले ।
सबाह्य अभ्यंतरी सर्वही ब्रह्मचि कोंदाटले ॥ध्रु.॥
विश्वतरंगी चिज्जीवन हे तन्मय सुखकर भरले ।
माया विद्या भेद भ्रमात्मक जगचि जड हे विराले ।
चित्सागरि हे चिन्मय होउनि चित्तचि हारपले ॥१॥
मी चित्सागर सर्व चराचर चिन्मय भरोनि उरले ।
देशकाल वस्तुचे त्रयात्मक परिच्छेद हे सरले ।
मी तूं भ्रम हा सर्व जगत्रय सुखसागरि हे बुडाले ॥२॥
चित्सूर्योदयि व्दैतभ्रमात्मक उलुख पक्षी दडाले ।
अव्दैती हे भेद प्रजल्पक तस्कर दुर्जन पळाले ।
मौनी म्हणे मनविकल्प भ्रम हे सकळहि मावळे ॥३॥
अभंग
नको विसरु तूं येई आतां वेगे । चरण दावी गे रामाबाई ॥१॥
चरणदर्शनासी लागलीसे क्षुधा । तेणे थोर बाधा पावतसे ॥२।
अंतरीचे दु:ख सांगूं कोणापाशी । तूं एक जाणसी रामराया ॥३॥
कोण या दु:खाची करील निवृत्ति । राम रघुपति तुजविण ॥४॥
राघवा मी तुझ्या दर्शनावांचून । जालो फ़ार दीन रामराया ॥५॥
दर्शन भाषण तुझे हे घडेल । तेव्हा ते होईल सुख मज ॥६॥
मासोळी ही जैसी जीवनावांचून । तैसा तुजविण व्याकुळ मी ॥७॥
सत्य मिथ्या रामा जाणसी अंतरी। व्यर्थ मी मुरारी काय बोलूं ॥८॥
तुजवीण मज अन्य प्रिय नाही । शपथ हे पाही वाहतसे ॥९॥
कोटी ब्रह्महत्या पातक घडेल । प्रैय हे असेल अन्य जरी ॥१०॥
आत्मया श्रीरामा तूंचि मला प्रिय । सर्वही अप्रिय तुजविण ॥११॥
तुझ्या दर्शनाची तृषा लागलिसे । आणिक हे नसे प्रिय मज ॥१२॥
आतां किती माझा पाहशील अंत । दयाळू बहूत राघवा तूं ॥१३॥
मौनी म्हणे तुझे रुप हे सगुण । दाखवी भाषण करी मज ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP