चिदंबरदास राजाराम.

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


पेशवाईच्या अखेरीस कर्नाटकांत गुर्लहोसूर येथे चिदंबर दीक्षित नामक एक सिध्द पुरुष होऊन गेले, त्यांचे शिष्य हे चिदंबरदास राजाराम होत. त्यांची कविता पुष्कळच असून , ती बहुतेक सगळी अप्रसिध्द व अप्रकाशित आहे. स्वत: राजाराम बुवाच सांगतात की :-
एक लक्ष एकावन्न सहस्त्र । चारशे एक्याण्णव एकंदर ।
अभंग करविले सविस्तर । त्यामाजी चरित्रविस्तार लिहिला ॥
म्हणजे राजारामबुवांनी नुसते अभंगच १५१४९१ लिहिले !!  महाराष्ट्रांत आजपर्यंत, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीसिध्द पुरुष होऊन गेले त्यांच्याच मालिकेंत ओवण्याच्या योग्यतेचे श्रीचिदंबर दीक्षित हे महान अवतारी पुरुष होत. यांचे जन्मस्थान मुरगोड. चिदंबरचरित्र नामक एका अर्वाचीन ओवीबध्द ग्रंथांत यांचे विस्तृत चरित्र भाविकपणाने वर्णिले असून, वर राजारामबुवांच्या ज्या लक्षावधि अभंगांचा उल्लेख केला आहे, ते सगळे अभंग चिदंबरचरित्रपरच असावेत हे वरील ओवीतील " चरित्रविस्तार " या शब्दांवरुन उघड दिसते. श्रीचिदंबर दिक्षित यांची थोडीशी कविता जरी उपलब्ध असती, तरी त्यांच्या विस्तृत व मनोरंजक चरित्राचा समावेश प्रस्तुत ग्रंथांत मी मोठया आनंदाने केला असता, परंतु ’ कवि ’ या नात्याने त्यांची प्रसिध्द नसल्यामुळे प्रस्तुत चरित्रविषयक राजारामबुवा यांचे गुरु या नात्याने त्यांचे अल्प मात्र चरित्र येथे देतो. श्रीचिदंबर दीक्षितांचे घराणे मूळ विजापूर प्रांतांतील गोठे या गांवचे राहणारें. यांचे पूर्वीचे उपनांव जोशी. चिदंबर महाराजांचे तीर्थरुप मार्तंड मल्हार यांनी एक सोमयाग केला, तेव्हापासून त्यांना दीक्षित हे उपनाम प्राप्त झाले. नागेश भट्ट नामक एक शुक्ल यजुर्वेदीय कण्व शाखेचा देशस्थ ब्राह्मण फ़ार सात्विक वृत्तीचा होता, त्याचा पुत्र शंकर भट्ट. या शंकरभट्टाचा पुत्र त्र्यंबक जोशी हा मोठा विव्दान ज्योतिषी होऊन गेला. त्र्यंबक ज्योतिषी यांचे पुत्र मार्तंड दीक्षित हे चिदंबर महाराजांचे तीर्थरुप होत. त्यांना ऐन तारुण्यांतच कांही बलवत्तर पूर्वसंस्काराने जोशीपणाचा कंटाळा येऊन ते श्रीक्षेत्र काशी येथे विद्याभ्यास व तपोवृध्दि करण्यास जाऊन राहिले. " ब्राह्मणस्य तु देहोयं क्षुद्र कामाय नेष्यते" ह्या श्लोकाने त्यांच्या मनास एकदा फ़ार चटका लागला. कांही दिवसांनी त्यांचे तपोबल उदयास येऊन, मणिकर्णिकेच्या घाटावरील स्वयंप्रकाश नामक यथार्थ नामधारी सत्पुरुषांचे त्यांना दर्शन झाले. त्यांच्या सेवेस राहून गुरुभकीचा संचय झाल्याव, काही तिखट परिक्षेच्या प्रकाराने हे मार्तंड जोशी, इतर शेंकडो शिष्यांपेक्षा, स्वामीच्या पसंतीस उतरले व त्यांनी त्यांजवर पूर्ण अनुग्रह केला. नंतर त्यांच्या स्वत:च्या इच्छेविरुध्द, केवळ गुवार्ज्ञेमुळे, ते बेळगांव जिल्ह्यात मुरगोड मुक्कामी आपली मंडळी रहात होती तिकडे आले, आणि गृह्स्थाश्रमी झाले. सौ. लक्ष्मीबाई नामक सुशील पत्नीसहवर्तमान ते प्रपंचपरमार्थ यथासांग रीतीने संपादूं लागले. ते चांगले योगशास्त्रसंपन्नही होते. लोकांत त्यांची मोठी मानमान्यता असे. गुर्वाज्ञेनुसार, वंशवृध्दर्थ मार्तंड देवाचे क्षेत्र हिप्परगी येथे जाऊन त्यांनी पुत्त्रप्राप्त्यर्थ सहा महिने त्या आपल्या कुलदेवाची एकनिष्ठपणे आराधना केली. तेव्हा " दक्षिणप्रांती आकाश चिदंबर नामक माझे स्थान आहे तेथे जाऊन अनुष्ठान कर, " असा दृष्टांत त्यास झाला. त्याप्रमाणे तेथे ते सहकुटुंब जाऊन बारा वर्षे राहिले. ते स्वत: निष्काम असे एकांतिक भक्त होते. गुरुवचनप्रतिपालनाचे पुण्यईने अनुष्ठानान्ती त्यांस, भगवान चिदंबरांनी ह्मणजे प्रत्यक्ष शंकरानीच दर्शन देऊन " मीच तुमचा पुत्र होऊन येतो, निर्भय असा." असा आशीर्वाद दिला व त्यांच्या मस्तकी वरद हस्त ठेऊन ते गुप्त झाले. आनंदपूर्ण चित्ताने हे भाग्यवान दांपत्य पुन:मुरगोडास आले; आणि लवकरच साध्वी लक्ष्मीबाई गर्भवती झाल्या. मार्तंड दीक्षितांनी मुरगोडाहून एकदीड कोसाचे अंतरावर असलेल्या सोगळ ( सुगल ) नामक पुण्यस्थली जाऊन ब्रह्मतेजोवृध्दीसाठी तीन गायत्री पुरश्चरणे केली. पूर्ण नऊ मास भरतांच लक्ष्मीबाई प्रसूत होऊन त्यांस पुत्ररत्न झाले. तेच भगवान् चिदंबर दीक्षित होत. शके १६८० कार्तिक वद्य षष्ठी, सूर्यादयानंतर १० घटकांनी मकरलग्नी त्यांचे जन्म झाले.
दीक्षित महाराजांचे पुढील चरित्र ज्यांनी प्रत्यक्ष पाहून वर्णिले आहे त्यांपैकी अब्बूनाना ( कोकणस्थ ब्राह्मण ), राजाराम महाराज ( भाबूळगांवचे पाटील व प्रस्तुत चरित्रनायक ) व शिवशास्त्री ( दक्षिणेकडील तैलंगी ब्राह्मण ) हे तीन लेखक मुख्य होत.
चिदंबरमहाराजांच्या जन्मकाली जे अनेक अलौकिक चमत्कार घडून आले त्यांची सविस्तर हकीकत देण्याचें हे स्थल नव्हे. राजारामबुवांनी चिदंबरावतारोद्देश येणेप्रमाणें सांगितला आहे :-
अभंग

मागे झाले फ़ार नाना अवतार । ब्राह्मण आचार घडला नाही ॥१॥
वामनावतारी ब्राह्मणाचे कुळी । घातला पाताळी बळी ऐसा ॥२॥
विप्रकुळी झाला असे परशुराम । क्षत्रियचा धर्म सर्व केला ॥३॥
पृथिवी दानासी दिली ब्राह्मणासी । समाधान त्यासी झाले नाही ॥४॥
भृगूने मारिली लात महाकोपें । भूषण अद्यापि वागवीत ॥५॥
कृष्ण अवतारी मागूं गेले अन्न । कोपोनि ब्राह्मण निंदिताती ॥६॥
ह्मणती याचे भेणे आलों नदीतटी । तेथे आमुची पाठी पुरविली ॥७॥
ऐसे नानापरी करिती आचार । ह्मणे मी अवतार घेतो पुढे ॥८॥
दास ह्मणे ऐसे अनंत प्रकार । ह्मणोनि चिदंबर विप्र झाला ।\९॥
२.
बहुत कठिण कली हा दुर्धर । भ्रष्टवी आचार चहूं वर्ण ॥१॥
मुख्य वर्ण तोही आचार लोपला । इतर यातीला पुसे कवण ॥२॥
वर्ण आश्रमाचा झाला कर्मलोप । कलि महापाप वर्ततसे ॥३॥
ह्यालागी अवतार धरिला चिदंबर । ब्राह्मण आचार अंगे वर्ते ॥४॥
अनंत जनांच्या उध्दारालागून  । मूर्ति हे सगुण प्रगटली ॥५॥
चिदंबर दीक्षितांनी बालपणीच दाखविलेले अनेक चमत्कार पाहून व ऐकून , हा अवतारी पुरुष आहे अशा समजुतीने शेंकडो लोक यांच्या दर्शनार्थ येऊं लागले, तेव्हा आईबापांनी -
गुप्तरुपे देवा असावे आपण । सुख ते संपूर्ण भोगूं आह्मी ॥
नाही तरी यात्रा मिळतसे दाटी । मग तुझी भेटी दुर्लभ की ॥
अशी त्यांस विनंती केली. आपण देह ठेवीपर्यंत मुलाने आपला अवतारीपणा प्रगट करुं नये अशी मार्तंड दीक्षितांची इच्छा व आज्ञा होती व मुलानेंही ती बिनचूक पाळिली. मार्तंड दीक्षितांचे देहावसान शके १७१४ त झाले, तेव्हापासून चिदंबरनाथांचे देवपण लोकांत प्रगट झाले. ब्रह्मचर्याश्रम पूर्ण होतांच चिदंबर गृहस्थश्रामी झाले. सरस्वती व सावित्री नांवांच्या दोन बायका त्यांना होत्या. सहा मुलगे व एक मुलगी अशी सात अपत्यें त्यांस झाली. मुरगोड येथे मोठी पाठशाळा स्थापन करुन अनेक प्रकारच्या लीला व ज्ञानदान करीत देशोद्धार व धर्मसेवा करीत कांही वर्षे घालविल्यावर तल्लरकर देसायाच्या कांही प्रकरणावरुन, मुरगोड येथे एक ब्रह्महत्या झाल्यामुळे, तत्काळ मुरगोडचें ठाणे उठवून चिदंबरमहाराज तेथून बारा मैलांवर मलप्रभेच्या कांठी जाऊन राहिले. त्यासच गुर्लहोसूर ( कानडी ’ गळ हास ऊरु ’ गुरुरायाचे नवे गांव ) ह्मणतात. पेशवे व रास्ते, गोखले वगैरे त्यांचे सरदार चिदंबर दीक्षितांच्या सेवेस येऊन रहात असत. त्यांनी आपणासाठी बांधलेले मोठमोठे वाडे  अद्यापही तेथे दिसतात. निपाणीकर, नंरगुंदकर, वगैरे संस्थानिकही चिदंबर प्रभूचे एकनिष्ठ शिष्यभावाने वागणारे सेवक झाले.
अशा या महासिध्द चिदंबर दीक्षितांचे राजाराम बुवा हे शिष्य होत. त्यांनी आपले थोडेसे चरित्र ’ निजात्मबोध’ ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणांत दिले आहे ते येणेप्रमाणे :-
ओव्या
जन्म गंगा गोदावरीतीरी । रजपूत रघुवंशी क्षत्रियाचे उदरी ।
माता पिता वसती बाभुळगांव नगरी । पूर्व जन्मभूमि असे ॥
तपोनिधि पंचाग्निसाधनी । व्दारकादास बैरागीबावा तया स्थानी ।
वडिली गुरु करविला बाळपणी । भागवतश्रवणी जातसे तेथे ॥
ध्रुवासी भेटे देव पांचवे वर्षी । ऐकोनि पश्चाताप झाला मजसी ॥
वय तेव्हा होते अष्टवर्षी । झुरें चित्तासी निशिदिनी ॥
नित्य प्रात:काळी जातसे स्नानासी । तीरी शिवालयी ईश्वरपूजनासी ।
तेथे मूर्ति देखिली दिगंबर ऐसी । ते संज्ञेसी सांगत ॥
मौनेचि होते दावितसे खूण । तेव्हा गंध लाविले मुख प्रक्षाळून ।
चरणावरी मस्तक ठेवून । आलो जाण घरासी ॥
मातेलागी सांगोनि त्यासी । बोलावू गेलो भोजनासी ।
तो तो गुप्त त्या ठायासी । न पडे दृष्टीसी धुंडाळितां ॥
तणें अधिकचि वेध लागला चित्तासी । सगुण देव कधी भेटेल मजसी ।
भाषण करील आनंदेसी । डोहाळे मनासी नित्य ऐसे ॥
मग गुरु आत्मज्ञानासि बाळेश्वर । तेणे ज्ञान उपदेशिले प्रखर ।
मजसी कल्पना असे थोर । सगुण साक्षात्कार व्हावा आधी ॥
तेणें सांगितले कृपावचन । ईश्वर इच्छा पुरवील जाण ।
त्याच्या कृपेंकरुन । भेटला सगुण चिदंबर ॥
यावरुन, राजारामबुवांची परमार्थाकडे जन्मत:च प्रवृत्ती होती हे उघड दिसते. क्षत्रियकुलोत्पन्न बालकास लहानपणीच परमार्थाची आवड उत्पन्न व्हावी, हे त्याच्या पूर्वजन्मीच्या सुकृताचें फ़ल होय. बालपणीं व्दारकादास बैरागी, पुढे बाळेश्वर व शेवटी चिदंबर दीक्षित असे तीन गुरु राजाराम बुवांनी केले. चिदंबर दीक्षितांच्या दर्शनाचा व साक्षात्काराचा प्रसंग राजारामबुवांनी येणेप्रमाणे वर्णिला आहे :-
मज ऐसा पतित कोणी । दुजा नसे त्रिभुवनी ।
चिदंबरा ऐसा पावन धनी । ब्रह्मांड भुवनी दुजा नाही ॥
दूरदेशी शत योजनें जाण । बळे बोलाविले दृष्टांत देऊन ।
सप्त दिवस उपोषण करवून । अनुग्रह आपण करीतसे ॥
स्वप्नी बैसवोनि अंकावरी । मज ह्रदयी आलिंगोनि धरी ।
श्रवणी मंत्रोपदेश करी । बहुतापरी समजाविले ॥
शर्करा नारिकेळ पात्र भरोनी । प्रसाद भक्षविला पोट भरोनी ।
आपुला प्रताप दावी बोलूनी । ईश्वरत्व नयनी  दाविले ॥
जागृत जाल्या जाण । मुखीं प्रसादाची दावी खूण ।
तृप्ति जैसे झाले भोजन । मंत्रस्मरण आनंदयुक्त ॥
त्यावरी समक्ष दर्शन । दुरोनि पाहंता जवळी ये धावून ।
आनंदे बोले कृपा करुन  । झाला प्रसन्न चिदंबर ॥
ह्मणे काय इच्छा मानसी । तेंचि मागावे मजपाशी ।
मागून घेतो ईश्वरासी । देतो तुजसी याचि वेळे ॥
ऐसा प्रसन्न होवोनि चिदंबर । बळे मागावें ह्मणे ईश्वर ।
यात्रा जन पाहती लहानथोर । बोले चिदंबर सर्वा देखतां ॥
एकांत बोलावे माझिया चित्ती । मग बोलावूनी मज एकांती ।
मागावे ह्मणतसे कृपामूर्ति । अनुभवप्राप्ति करीतसे ॥
ऐसा प्रसन्न होवोनि चिदंबर । मागितले ते दिले वर ।
करोनि ठेविले दृष्टांती आज्ञाधार । निवविलें अंतर स्वामिराये ॥
चिदंबर महाराजांनी आपणास काव्यस्फ़ूर्ति देऊळ आपल्याकडून काव्यलेखन कसे करविले हे राजारामबुवा सांगतात :-
जयंतिकथा विस्तारपूर्वक । अवतारी अभंगी चरित्र देख ।
पूर्वी करोनि ठेविला लेख । अभंगसुख स्वामिसी बहुत ॥
दृष्टांती स्वमुखे अभंग सांगून   वरप्रसाद् देउनिया जाण ।
अभंग करविले लेखन । झाला प्रसन्न चिदंबर ॥
एक लक्ष एकावन्न सहस्त्र । चारशे एक्याण्णव एकंदर ।
अभंग करविले सविस्तर । त्यामाजी चरित्रविस्तार लिहिला सर्व ॥
म्हणोनि ग्रंथी संकलित सांगत ।  चरित्रविस्तार असे बहुत ।
जैसे वाजविल्यावीण वाजत । मज बोलवीत चिदंबर त्यापरी ॥
येथे नसे कवित्वलाघव । मज बोलवी देवाधिदेव ।
अंध मी अज्ञानस्वभाव । ह्रदयी प्रकटे देव चिदंबर ॥
पुढे राजारामबुवा आणखी चमत्कार सांगतात :-
आज्ञा करोनिया मजसी । नग्न शस्त्रे वाहवी जोड्यावरी तुळसी ।
नवा जोडा करवी प्रतिवर्षी । प्रतीती करोनी एसी वर्तवी बळे ॥

भोगमूर्ति बैसवोनि अश्वावरी । छत्रचामर नग्न शस्त्रेंसहित स्वारी ।
जोडा बांधोनि ह्रदयावरी । देशदेशांतरी पाठविले ॥
निशाणपातका भजनमंडळीसहित । प्रयाग काशी गंगा करित ।
मथुरा वृन्दावन दिल्ली कुरुक्षेत्रतीर्थ । जोडा मिरवीत आपुला ॥
लोमहर्ष जागा रेवाळेश्वर । पर्वत भेटे चालती पाण्यावर ।
भोगमूर्ति देखोनी समोर । चालोनि येती सत्वर यात्राजन पाहती ॥
ज्वालामुखी देवीसी जावोनी । यात्रा करवुनी आणिले आपुले स्थानी ।
अवतारप्रतापकरणी । उघड नयनी दावितसे ॥
यावरुन चिदंबरमहाराजांची राजारामबुवांवर मोठी कृपा होती हे उघड दिसते. स्वत: राजारामबुवांनीही अनेक चमत्कार केले होते असे सांगतात. यासंबंधाने, राजारामबुवाकृत ’ पंचपदी अभंग ’ नामक पुस्तकाच्या प्रस्तावनेंत प्रकाशकानी म्हटले आहे :- ’ अद्भुत चमत्कार हे सिध्दीच्या योगे होत असतात आणि सिध्दि म्हटल्या म्हणजे ज्ञानाला त्या प्रतिबंधक होत असे म्हणून कांही ज्ञानी लोक व त्यांचे अनुयायी सिध्दीची थोडीशी अवहेलना करीत असतात. सिध्दी ज्ञानाला प्रतिबंधक आहेत ही गोष्ट खरी पण त्या कोणाला ? ज्याचें ज्ञान अपरिपक्व असून देहात्मभाव पूर्णपणे नष्ट झालेला नाही अशा कच्च्या मनुष्याला त्या बाधक होतील. नि:संदेह झालेल्या पूर्ण ब्रह्मनिष्ठास तपाने प्राप्त झालेल्या सिध्दी ह्या लोककल्याणार्थ उपयोगी पडून, त्यांपासून जनतेंचे पुष्कळ हित होते. अवतारिक पुरुषांना तर सिध्दी या नैसर्गिकच असतात. वास्तविक पाहतां थोर महात्म्याच्या या अमानुष सामर्थ्यास ’ सिध्दी ’ ह्मणणेंच अयोग्य आहे. उज्ज्वल उपासनेनें, अपेक्षा नसतांही प्राप्त झालेले व होणारे हे " अनंताशी साधर्म्य" होय. प्राकृत महत्वांकाक्षा अंतरी धरुन केलेल्या योगाभ्यासाने प्राप्त होणार्‍या योगसिध्दि व निष्काम पण उत्कट प्रेमळ उपासनेने प्राप्त होणारे ’ अनंताशी साधर्म्य ’ अथवा आत्मसिध्दी अगर ईश्वरप्रसादाने प्राप्त होणार्‍या ’ देवसिध्दि ’ यांमध्ये महदंतर आहे. चांगदेवाचे ’ चमत्कार ’ व तुकाराम रामदासादिकांच्या ’ लीला ’ यांचे स्वरुप बहिर्दृष्टीस एकच दिसते, पण त्या त्या महात्म्याच्या योग्यतेंत जमीन अस्मानाचे अंतर आहे."
वरील विवेचनांत पुष्कळ तथ्यांश आहे यांत संशय नाही. अवतारी पुरुषांचे चमत्कार, चांगदेवासारख्या ज्ञानशून्य हठयोग्याचे चमत्कार, तुकारामादि संतांचे चमत्कार व गारुडयाचे चमत्कार एकाच स्वरुपाचे किंवा एकाच कारणाने घडणारे नाहीत. श्रीराम, कृष्ण,येशू ख्रिस्त यांस सिध्दीची अनुकुलता निसर्गत:च होती; चांगदेवासारख्यानी ती योगबलाने प्राप्त करुन घेतली होती व ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी ज्ञानी भक्तांस, त्यांच्या उत्कट उपासनेच्या योगाने सहज साध्य झाली होती. असो.
राजारामबुवांचा जन्ममृत्युकाल उपलब्ध नाही. त्यांचे वंशज वगैरे कोठे आहेत की काय याचीही माहिती मिळाली नाही. त्यांच्या स्वत:च्याच शब्दात वर दिले, तेवढेच काय ते त्यांचे चरित्र उपलब्ध आहे. त्यांनी लिहिलेल्या सहस्त्रावधि अभंगाशिवाय, निजात्मबोध, ब्रम्हानंदलहरी, महानुभाव, ज्ञानगर्भ, ब्रह्मानुभव, सद्गुरुपदेश, गुरुगम्यठेव, अव्दैतसार हे त्यांचे ग्रंथ बेळगांव येथील ’ रामतत्वप्रकाश ’
छापखान्याच्या मालकांनी प्रकाशित केले आहेत. राजारामबुवा जरी मोठे व्यत्पन्न नव्हते, तरी त्यांची ग्रंथरचना स्वानुभवयुक्त असल्यामुळे, तति एक प्रकारच्या अधिकारीपणाचे तेज ठिकठिकाणी चमकत असलेले आढळून येते. आतां त्यांच्या ग्रंथांतले थोडसे वेंचे येथे देतो.
ज्ञानहीनाचें वेदांतज्ञान :-
वेदांत शास्त्र गोष्टी ऐकतां । वाटे समाधान बहुत चित्ता ।
तेथोनियां उठोनि जातां । जडे अहंता देहभाव ॥३॥
ज्ञान सांगावया येतें बहुतांपरी । मन निवांत न राहे क्षणभरी ।
विषय हिंडे दारोदारी । साक्ष माझ्या अंतरी येतसे ॥४॥
स्वामी तो ह्मणती तूंचि ब्रह्म । परी न जाय माझा देहभ्रम ।
न कळे निजस्वरुपाचे वर्म । कोण कर्म आड आले ॥५॥
मी ब्रह्म ऐसे असतां । ब्रह्मासी भ्रम कैसेनि चित्ता ।
अंधकारे गिळिला सविता । नवलाई तेचि वाटे ॥६॥
जोवरी विषयासी न विटे मन । तवं कैसे होय बा उन्मन  ।
वायां सांगे शब्दज्ञान । नव्हे समाधान कल्पांती ॥८॥
जंव विरक्ति मनासी नये हाता । चित्तासी नये नैराश्यता ।
वेदांत शास्त्र निर्माणकर्ता । जरी जाला विधाता न पवे सुख ॥९॥
मन इंद्रिये विषयासाठी । आशा लोभ धरोनि पोटी ।
कामक्रोधादि महा हटी । लिंगदेह गांठी वासनामय ॥१०॥
असुर दोनी रजतम । हेचि पाडिती देहभ्रम ।
हेचि आड आले खोटे कर्म । न कळे वर्म सत्वाचे ॥११॥
जाणत असतां आपणासी । देह अहंभावाच्या पडे फ़ांसी ।
जैसा राहू आड सूर्यासी । तैसी गती आत्मयासी जाणिजे ॥१२॥
मन निवांत राहेल कैसे । मदमत्सरादि दुराशा विषय पिसे ।
ब्रह्मरुप स्वत:सिध्द असे । पडळ येतसे मायेचे ॥१३॥
मम माया दुरत्यया । श्रीकृष्ण सांगे धनंजया ।
मज शरण येतां माझी माया । न बोधे तया सद्भक्ता ॥१४॥
साधकासी विघ्न थोर । करिती मन इंद्रिय विषयपर ।
न सुटे देह अहंकार । येथे बलात्कार कोणाचा ॥१५॥
ऐसी कल्पना येईल जरी । तरी ऐके बापा सांगतो परी ।
कामक्रोध हे दोन्ही वैरी । आपुले अंतरी असताती ॥१६॥
कामक्रोध मांग महाहटी । ऋषिमुनि तप करिताति कोटी ।
या दोघांसि पाहतां दृष्टी । तपश्चर्या कोटी बुडविता ॥१७॥
ब्रम्ह्यासि लाविती कन्येपाठी । विष्णु वेडावे वृन्देसाठी ।
शिवाची फ़िटे लंगाटी । मोहिनी दृष्टी पाहतां ॥१८॥
यासी म्हणती उपाय कोण । तरी नामस्मरण संकिर्तन ।
प्रेमयुक्त सद्भावे भजन । श्रीगुरुचरण सेवावे ॥२०॥
एक ईश्वर सर्वाचे ह्रदयी । हे मुख्य भक्तीचे लक्षण पाही ।
ज्ञान विज्ञान लागे त्याचे पायी । ब्रह्मसुख अक्षयी जाणिजे ॥२६॥
श्रवण मनन निदिध्यास । निशिदिनी पाहिजे हा अभ्यास ।
क्षणभरी बैसे श्रवणास । अहंता अंगास जडतसे ॥२७॥
विषयकामना सोडोनि चित्ती । भजन करावे अतिप्रीती ।
सदा धरावी सत्संगति । पालटे मती दुर्जनाची ॥२८॥
निजात्मबोध, प्रकरण ३
ब्रम्हस्वरुपवर्णन:-
जैसे भिंतीवेगळे चित्र न दिसे । चित्र पाहतां भिंतचि दिसे ।
अज्ञानासी भ्रम भासे । सज्ञानासी असे स्वरुप एक ॥७॥
सूर्यापासोनि दिसती किरणे । परी ती सूर्यासि वेगळी न होती जाणे ।
तैसे जग ब्रह्म पूर्ण । कळे खूण अनुणवेसी ॥८॥
नातरी औदूंबरासी फ़ळे असंख्य़ात । एकेक फ़ळामाजी जीव असंख्यात ।
ऐसा प्रतिवर्षी फ़ळे येत । औदुंबर निश्चित एकचि तें ॥९॥
तैसे ब्रह्मापोटी ब्रह्मांडे अनेक । एकेक ब्रह्मांडी जीव असंख्य ।
त्या ब्रह्मांडांसी संख्या नसे देख । ब्रह्मचि एक अनेकामाजी ॥१०॥
शब्दज्ञान्यांचे वर्णन :-
शब्दज्ञाने ब्रह्म न होती । सद्गुरुकृपेवीण अनुभवप्राप्ती ।
ऐसे जे वाचाळ बोलती । सुख कल्पांती न मिळे त्यांसी ॥
जैसा जंबुक नीळ्कुंडामाजी पडला । निळेचा रंग देहावरी आला ।
तो ह्मणे सर्व वनचरांला । राज्यपद मला तुम्हांमाजी ॥
वनचरे देखोनि त्याच्या रंगासी । नकळे ह्मणती हा कोण जाती कैसी ।
राहती त्याच्या आज्ञेसी । होतां निशी मध्यरात्री ॥
तये वळी भुंकती जंबुक । यासी नावरे जातिस्वभाव देख ।
जुंबक राजे केला भुंक । आपुले सुखे भुंकों लागे ॥
तो वनचरे म्हणती कोल्ह्यासी । स्वभावे परीक्षा कळली आम्हासी ।
बरे ताडण करोनि त्यासी । अतिदु:खेसी प्राण सोडी ॥
तैसे शब्दज्ञानी नर । वायां धरिती ज्ञान-अहंकार ।
दु:ख पड्तां देहावर । दु:खे अपार शोक भोगती ॥
अभंग
श्वानसू कर ते किडे । जितके फ़िरती दृष्टीपुढे ॥१॥
तितुके उद्धरती देख । जीवजंतु ते मशक ॥२॥
अणू रेणू पक्षीकुळ । त्यांच्या उद्धराचा वेळ ॥३॥
दा़स म्हणे महिमा थोर । जेथे असे चिदंबर ॥४॥
२.
प्रत्यक्ष येवोनी राहावे भजनी । तेव्हा माझे मनी समाधान ॥१॥
प्रसन्न होवोनी देई वरदान । ऐसे हे भजन चालवावे ॥२॥
कलिमाजी भक्त जाहले ते अपार । होतासी तप्तर भजनी त्यांच्या ॥३॥
मजविषयी कां हो करितां आळस । तरी भजनास कां लाविले ॥४॥
दास म्हणे जैसे लाविले भजना । तैसी ही वासना पुरवावी ॥५॥
३.
बहुत होत आले भक्तांचे अवतार । केलासे विस्तार नानापरी ।१॥
ग्रंथ हे अभंग ठेविले लिहून । न करवे जाण लेखा त्यांची ॥२॥
बोलिले जे बोल ल्याहावे ते किती । विचारुनी चित्ती उमजावे ॥३॥
देव भक्त होती नाना अवतार । त्या रीती विस्तार वाढतसे ॥४॥
दास म्हणे चित्ती पहा विचारुनी । अवतार जनी चिदंबर ॥५॥
सूर्य नारायणा प्रार्थी मी तुम्हासी । आम्ही सूर्यवंशी म्हणवितो ॥१॥
आपुल्या वंशीचे झुरे देवासाठी । येऊ द्यावी पोटी करुणा त्याची ॥२॥
अवतार ब्राह्मण दावी त्या पाउले । जेणे तोषविले तुह्मा देवा ॥३॥
चिदंबरासाठी दास तो प्रार्थितो । मानुसी विनवितो कोटी वेळां ॥४॥
४.
चिदंबरनाम सौभाग्य संपूर्ण । सकळ आभरण नाम तुझे ॥१॥
पांडुरंग नाम कंचुकी मी ल्याली । पीतांबर नेसली रामनाम ॥२॥
केशवाचे नाम प्रकट मंगळसुत्र । पुतळ्यांचा हार नारायण ॥३॥
माधवाचे नाम पदक जडित । गोविंद ताईत मोतीमाळा ॥४॥
विष्णु तुझे नाम मोत्यांचा कठाण । सरी मधुसूदन जंबूमाळा ॥५॥
त्रिविक्रम नाम शोभे मोहनमाळा । चंद्रहार गळां वामन नाम ॥६॥
श्रीधर हे नाम रत्नजडित काप । बाळ्या ते अमूप ह्रषीकेशी ॥७॥
पद्मनाभ नाम मोत्यांची बुगडी । भोकरांची जोडी दामोदर ॥८॥
संकर्षण नाम वांक्या बाजूबंद । विराजत छंद वासुदेव ॥९॥
प्रद्युम्न नाम रवीसम चूडा । पाटल्यांचा जोडा अनिरुध्द ॥१०॥
पुरुषोत्तम नाम जव हे गगनी । चंद्रसूर्य दोन्ही अधोक्षज ॥११॥
नरसिंह हे नाम राखडी केवडा । शोभे मूदजोडा अच्युत नाम ॥१२॥
जनार्दन नाम माजपट्टाभरण । सांखळ्या ते जाण उपेंद्र पै ॥१३॥
हरि तुझे नाम दांडा मोतियांचा । श्रीकृष्ण नामाचा नाकी मोती ॥१४॥
सर्वेश्वर नाम दुल्लड शोभत । कुंकुम अनंत दास म्हणे ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP