नाथभुजंग
महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.
नाथभुजंग हे जातीने डवरी असून, परांडे गांवी रहात असत. त्यांचे निर्याण होऊन सुमारे ८५/९० वर्षे झाली असावी. सदर गांवी त्यांचे वंशज अद्याप आहेत, असे सांगतात. भुजंगनाथांची सर्व देवांवर, स्थानदेवतांवर व वेदान्तपर अशी पुष्कळ पदें व अभंग असून, ती मराठी व हिंदुस्थानी भाषेत आहेत. परंतु त्यांपैकी फ़क्त तीनचारच पदें काय ती छापलेली असून बाकीची सर्व कविता अद्याप अप्रकाशित आहे. यांची वाणी फ़ार रसाळ असून, यांच्या कित्येक पदांच्या रचनेवरुन यांस संस्कृत भाषेंचेही थोडेसे ज्ञान असावे असे वाटते. " वद वद वद रसने शिव सांब सांब " व " तोम तननन वाजवि वेणू " ही त्यांची दोन पद्ये तर महाराष्ट्रांत सर्वतोमुखी झाली आहेत. प्रत्येक डवर्याला नाथभुजंगाचे एक तरी पद येत असते. त्यांचा पुत्र काशीनाथ याने मांडी दिली असतांना " तेहि गेले बा " हे शेवटचे पद त्यांनि रचिले ; व त्या पदाचा ’ हर हर म्हणतां नाथ भुजंग तेहि गेले बा ! " हा शेवटचा चरण म्हणतांच त्या महात्म्याचे देहावसान झाले. त्यांनी अगोदर सांगून ठेविल्याप्रमाणे तिसरे दिवशी चितेवर दर्शन देऊन नाथभुजंग अदृश्य झाले. त्यांची पिकलेली भव्य दाढी व वैराग्यवृत्ती यांमुळे ते ऋषीसारखे दिसत, असे त्यांना पाहिलेल्या एका गृहस्थाने म्हटल्याचे कै. विष्णु आप्पाजी कुळकर्णी यांनी ’ प्रभात ’ मासिकांतील आपल्या एतव्दिषयक लेखांत लिहिले आहे.
नाथभुजंगाची कांही पदे येथे देतो :-
वद वद वद रसने शिव सांब सांब सांब सांब ॥धु.॥
विश्वेशा बद्रिनाथ महाकाल सोमनाथ ।
ॐ कारा घुश्मेश्वर त्र्यंबकेश मृडशूलि
जगदंब दंब दंब दंब ॥ वद.॥१॥
भीमाशंकर महेश वैजनाथ नागेशा ।
रामेश्वर मल्लेश व्दादश लिंगादिकरुनि अंब अंब
अंब अंब ॥वद.॥२॥
अनुदिनिं सत्संग धरुनि रंगि रंगला भुजंग नाथ
नमुनि हर हर हर हर हर ॥वद.॥३॥
२.
काय गुण वर्णू सखये ऐसी सद्गुरु माउली ।
एकाएकी वृत्ति कैसी स्वरुपिं सामावली ॥ध्रु.॥
जागृति स्वप्न सुषुप्ती । तुर्येने नेउनि एकांती ।
त्रिवेणी तरोनी तैसी उन्मनि विसावली ॥१॥
जागत जागत जागी झाले । आपणा आपें विसरले ।
मागिल कौतुक सकळ माव ऐसी कळली ॥२॥
उपरति समरति..... । साधू समरसले ।
चिन्मय आपण येचि स्थिति कांहि नाहिं उरले ॥३॥
देऊनि सत्संगी भाव । संतसंगतिचे नांव ।
दाखवी निजपदी ठेव करुनी कृपासाउली ।\४॥
नाथ भुजंगाचा सुत । सदाही चरणी रत्त ।
पाजवित अर्धचंद्रामृतरस गाउली ॥५॥
३.
विठ्ठल मम प्राणसखा जिविंचे जीवन भेटेल कै ॥ध्रु.॥
पुंड्लीक राई रखुमाई । श्रवण मनन ठायी ठायी ।
तुळसीमाळ प्रेमबुका दाटेल कै ॥१॥
नेत्रकमळदळविशाळ । भाळि बुका तुळसिमाळ ।
कवळुनी तनुसी तनु भेटेल कै ॥२॥
भीमातटिं निकट निपट । कटि कर ठेवूनि उभा ।
इटेवरी समचरण नमुन भेटेल कै ॥३॥
श्रीहरी भुजंगनाथ । रंगि भरुनि रंगनाथ ।
जन्ममरण पुन्हा खत फ़ाटेल कै ॥४॥
" तोम तननन वाजवि वेणु " हे नाथभुजंगांचे पद फ़ारच बहारीचे आहे, परंतु पाठांतरामुळे त्याचे मूळ शुध्द स्वरुप इतके विकृत झालेले आहे की, तसल्या स्थितीत त्याचे तेथे अवतरण करणे मला योग्य वाटत नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 28, 2019
TOP