मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
ईश्वरगीता

ईश्वरगीता

ईश्वरगीता


ऋषिवृन्द म्हणाला,
हे स्वामी, तुम्ही व्रह्मदेवाच्या सृष्टीचे योग्य तर्‍हेने कथन केलेत. तसेच ब्रह्माण्डाचा आदिम विस्तार आणि मन्वन्तरे कशी ठरवावीत हेही सांगितलेत. ॥१॥
तेथे परमेश्वर देवाची वर्ण आणि धर्माचे पालन करणार्‍यांनी, ज्ञान आणि योगात गढून गेलेल्या व्यक्तींनी आराधना करावी हेही तुम्ही सांगितले. ॥२।
सर्व संसार-दु:खाचा नाश करणारे श्रेष्ठ तत्त्व, एकच ब्रह्मविषयी ज्ञान आहे. तेच ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असे आम्ही जाणतो. ॥३॥
तुम्ही तर साक्षात्‍ नारायण आहात. कृष्णव्दैपायना (व्यासा) कडून सर्व सूक्ष्म ज्ञान तुम्ही मिळवले आहे म्हणून तुम्हाला परत आम्ही विचारतो. ॥४॥
ऋषीजनांचे हे बोलणे ऐकून कृष्णव्दैपायनांकडून पुराण जाणणार्‍या प्रभू सूतांनी बोलण्यास प्रारंभ केला. ॥५॥
त्याच वेळी स्वत: कृष्णव्दैपायन व्यास जेथे मुनिश्रेष्ठ मोठा यज्ञ करीत होते तेथे आले. ॥६॥
वेद जाणणार्‍या, कृष्ण मेघाप्रमाणे प्रभा असलेल्या त्या कमलदललोचन व्यासांना पाहून ब्राह्मणश्रेष्ठांनी प्रणाम केला. ॥७॥
त्यांना बघून लोमहर्षण दंडवत्‍ भूमीवर पडले (दंडवत केला). भूमीवर हात जोडून मस्तकाने वंदन करुन ते काय आज्ञा करतात ते ऐकण्यासाठी नम्र झाले (व्यासांना वश झाले.) ॥८॥
त्या ब्राह्मणांना अनामय (आरोग्य/ कुशल) विचारले असता, शौनक वगैरे ऋषिश्रेष्ठांनी योग्य आसन आणून त्यांच्यासाठी मांडले. ॥९॥
तेव्हा पराशरपुत्र भगवान व्यास त्यांना म्हणाले ‘तुमच्या तपात, अध्ययनात किंवा ज्ञानामध्ये काही बाधा नाही ना ?’ ॥१०॥
तेव्हा सूताने, आपल्या गुरुला प्रणाम करुन त्या मुनिश्रेष्ठांना त्याने म्हटले, आपण या मुनींना ते ब्रह्मविषयक ज्ञान सांगावे. ॥११॥
हे मुनी शांत आहेत, तप करणारे, धर्मतत्पर आहेत. त्यांना ऐकण्याची इच्छा झाली आहे त्यामुळे तुम्ही तत्त्वपूर्वक त्यांना सांगावे. ॥१२॥
विमुक्ती देणारे जे दिव्य ज्ञान तुम्ही मला साक्षात्‍ सांगितले आहे, ते पूर्वी कूर्मरुप विष्णूने ऋषीजनांना सांगितले आहे. ॥१३॥
सूताचे हे बोलणे ऐकून सत्यवतीपुत्र व्यासमुनी रुद्राला मस्तक नमवून वंदन करुन आनंददायी वाक्य बोलू लागले. ॥१४॥
मी आता ते पूर्वी सनत्कुमारदि योगी जनांनी विचारल्यावर स्वत:भगवान्‍ शंकरांनी सांगितले होते. ॥१५॥
सनत्कुमार, सनक, त्याचप्रमाणे सनन्दन, अंगिरा, रुद्र, त्यांच्याबरोबर श्रेष्ठ धर्मज्ञ भृगू, कणाद, कपिल, गर्ग, महामुनी वामदेव, शुक्र भगवान वसिष्ठ या सर्व संयत मनाच्या ऋषींनी आपापसात विचारविनिमय करुन पुण्यस्वरुप बदरिकाश्रमात घोर तप केले. ॥१६-१८॥
तेव्हा त्यांनी महायोगी धर्मपुत्र अनादी, अनंत असे नारायण ऋषी नरऋषींसहित पाहिले. ॥१९॥
सर्व वेदोक्त विविध स्तोत्रांनी त्या योगज्ञ श्रेष्ठ मुनींची स्तुती करुन भक्तियुक्त मनाने त्या योगीजनांनी त्यांना प्रणाम केला. ॥२०॥
सर्व जाणणार्‍या भगवानांनी त्यांची इच्छा जाणून गंभीर वाणीने त्यांना विचारले ‘कशासाठी तप चालले आहे?’ ॥२१॥
मनात आनंदित होऊन ते (ऋषी) सनातन, विश्वस्वरुप सर्व सिध्दींचे सूचन करणार्‍या, प्रत्यक्ष नारायणाच असलेल्या, (स्वत:होऊन) आलेल्या त्या देवाला म्हणाले- ॥२२॥
‘संयम प्राप्त करुन आम्ही सर्व ब्रह्मवादी ऋषी पुरुषोत्तम अशा केवल तुम्हालाच शरण आलो आहोत. ॥।२३॥
तुम्ही सर्व परत रहस्य जाणता. भगवान्‍ ऋषी तुम्ही आहात. साक्षात्‍ नारायण तुम्ही आहात. पुराणपुरुष आणि अव्यक्त पुरुष तुम्हीच आहात. ॥२४॥
तुमच्याहून दुसरा कोणी परमेश्वराला जाणणारा नाही. तुम्हीच आमचा दृढ संशय छेदण्यास समर्थ आहात. ॥२५॥
हे जे सर्व आहे त्याचे कारण कोणते? नेहमी कोण फिरत राहतो (संसारात कोण फिरतो?) आत्मा कोण आहे आणि मुक्ती म्हणजे काय? संसाराचे निमित्त कोणते? ॥२६॥
संसार कोणता आणि सर्वांवर देखरेख करणारा ईशान कोणता? या सर्वाच्या पलीकडे ब्रह्म आहे का हे सर्व आम्हांस सांगावे. ॥२७॥
एवढे बोलताना त्या मुनींना तापस वेष सोडून स्वत:चे तेज धारण करुन उभे राहिलेल्या पुरुषोत्तमाचे दर्शन झाले. ॥२८॥
ते फार सुंदर, तेजस्वी आणि प्रभामंडलाचे शोभिवंत दिसत होते. श्रीवत्साचे लांछन वक्षावर होते आणि तापवलेल्या सोन्याप्रमाणे त्या देवांची कांती लखलखत होती. हातात शंख, चक्र, गदा, शार्ड धनुष्य होते. त्यांच्या तेजामुळे त्याक्षणी नर ऋषीही दिसेनासे झाले. ॥२९-३०॥
तेवढयातच चंद्रशेखर, कृपाभिमुख, रुद्र,  महादेव महेश्वर आविर्भूत झाले. ॥३१॥
जगन्नियंत्या अशा त्या त्रिनेत्रधारी चंद्रभूषण परमेश्वराला पाहून आनंदित मनाने त्यांनी त्याची स्तुती केली. ॥३२॥
महादेवा, भूतपते, शिवा, ईश्वरा तुझा जयजयकार असो. सर्व ऋषींच्या ईश्वरा, तापस लोक तुझी पूजा करतात. तुझा जय असो. ॥३३॥
सहस्रस्वरुप, विश्वरुप, जगद्यन्त्रचालक, तुझाअ जय हो. जगाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करणार्‍या अनंता, तुझा जय असो. ॥३४॥
सहस्रचरण ईश्वरा, हे शंभो, योगिराजवंदित, अंबिकापते परमेश्वरा, तुला वंदन असो. ॥३५॥
अशी स्तुती केल्यावर भक्तवत्सल त्र्यंबक ईश्वर भगवान शंकराने हृषीकेशाला आलिंगन देऊन गंभीर वाणीने म्हटले. ॥३६॥
‘हे कमललोचना, हे ब्रह्मज्ञानी ऋषिश्रेष्ठ या ठिकाणी कशासाठी आले आहेत? अच्युता, मी काय करायचे आहे?’ ॥३७॥
त्याचे ते बोलणे ऐकून कृपाभिलाषी महादेवाला देवाधिदेव जनार्दन म्हणाला- ॥३८॥
हे सर्व ऋषिजन तप करणारे आहेत, त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे. योग्य ज्ञानाची इच्छा करणार्‍या शरणागतांचे ते आश्रय आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न असाल तर भावितात्मा अशा या मुनींना ते दिव्य ज्ञान माझ्या सांनिध्यात सांगावे. तूच तुझे आत्मस्वरुप जाणतोस, दुसरा कोणीही जाणणारा नाही. तेव्हा हे शिवा तू स्वत:च तुझ्या रुपाला या मुनिश्रेष्ठांबरोबर प्रकट कर. ॥३९-४०॥
हृषीकेशाने असे बोलून मुनिवरांना म्हटले शंकराकडे पहात आपल्या योगसिध्दीचे दर्शन घडविले. ॥४२॥
महेश्वर शूलधर शंकरास पाहून तत्त्वत: तुम्ही धन्य झाला असे जाणा. ॥४३॥
आता आपण समोर असलेल्या महेशाचे दर्शन घेण्यास योग्य झाला आहात. माझ्या सांनिध्यात तो महेश सविस्तर सांगण्यास पात्र आहे. ॥४४॥
सनत्कुमारादी ऋषिगण भगवान विष्णूचे बोलणे ऐकून शंकरास नमस्कार करुन महेशाला विचारु लागले. ॥४५॥
दरम्यान शिवासाठी दिव्य आसनांवरुन अचिंतनीय आकाशवाणी झाली. ॥४६॥
तिथे योगात्मा विष्णूबरोबर विश्व निर्माण करणारे देव महेश जगतास तेजाने भरुन त्या आसनावर प्रकटले. ॥४७॥
ब्रह्मवादी ऋषींनी त्या पवित्र आसनावर तेजाने तळपत असलेल्या देवाधिदेव शिवास पाहिले. ॥४८॥
मुनींनी त्या आसनावर बसलेल्या भूतपती शिवास पाहिले. हे सर्व विश्व त्याच्याशी एकरुप झालेले आहे. ॥४९॥
मुनींनी विष्णुसहित ईशान महेशदेवास पाहिले. मुनींनी विचारल्यावर परमेश शिव म्हणाले. ॥५०॥
हे पवित्र मुनींनो तुम्ही सर्व जण शान्त चित्ताने मी यथाक्रम सांगणार असणारे ते ईश्वरविषयक पवित्र ज्ञान ऐका. ॥५१॥
देव व ब्राह्मण प्रयत्न करुन देखील जे समजू शकत नाहीत ते अनादी व गोपनीय असे महादेवविषयक ज्ञान वस्तुत: सांगर्ता कामा नये. ॥५२॥
हे ब्राह्मणश्रेष्ठांनो, पूर्वीचे ब्रह्मवादी या ज्ञानाचा आश्र्य करुन ब्रह्माशी एकरुप होऊन पुन्हा या प्रपंचाकडे परतले नाहीत. ॥५३॥
ब्रह्मवादी व भक्तिमान अशा तुम्हाला ते रहस्यातील रहस्य, प्रयत्नपूर्वक गोपनीय असे ज्ञान मी सांगणार आहे. ॥५४॥
हा आत्मा एकमेव, स्वच्छ, शुध्द, सूक्ष्म, अनादि, सर्वांभूती असणारा साक्षात्‍ चित्‍ ( ज्ञान) स्वरुप आणि अंधकाराच्या पार आहे. ॥५५॥
तो अन्तर्यामी, पुरुष, प्राण, महादेव, काल, अव्यक्त, श्रुती आहे असे वेद म्हणतात. ॥५६॥
हे विश्व याच्यापासून निर्माण झाले आणि शेवटी त्याच्यात विलीन झाले. तो माय़ी, मायेने बध्द होऊन वेगवेगळी शरीरे धारण करतो. ॥५७॥
तो कधी स्वत:संसार करीत नाही किंव तो प्रभू संसारस्वरुप होत नाही, तो पृथ्वी, पाणी, तेज , वायु वा आकाश असा पंचमहाभूतस्वरुप देखील नाही. ॥५८॥
तो आत्मा प्राण, मन, अव्यक्त, शब्द ,स्पर्श, रुप ,  रस, गन्ध, अहंस्वरुप कर्तृत्वरुप वाक्यस्वरुप नाही. ॥५९॥
हे ब्राह्मणश्रेष्ठांनो तो आत्मा हात, पाय, गुद,उपस्थ नाही तो कर्ता, भोक्ता, प्रकृति वा पुरुष नाही. ॥६०॥
खरे पाहता तो माया वा प्राण नाही. ज्याप्रमाणे उजेड वा अंधार यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो . ॥६१॥
सावली व ऊन जसे जगात एकमेकांकडून वेगळे आहेत, त्याचप्रमाणे संसार व  परमात्मा यांत वास्तवात काहीही ऐक्यसंबंध नाही. ॥६२॥
तद्वत्‍ संसार व परमात्मा वास्तवांत एकमेकांहून वेगळे आहेत. आत्मा मलिन होऊन विकार उत्पन्न होऊन सृष्टावस्थेस पावतो. ॥६३॥
शेकडो जन्म झाले तरी आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही. केवळ मुनी आत्म्याला मुक्तावस्थेत पाहू शकतात. ॥६४॥
करणारा, विकारहीन , व्दंव्दातीत आनंदस्वरुप अविकारी आत्म्याला मी करणारा, सुखी, दु: खी, काटकुळा, जाड आहे अशी जी कल्पना त्या कल्पनेचे कारण केवळ अहंकार आहे. आणि लोकांनी आत्म्याला ठायी लादलेली असते. वेद जाणणारे, साक्षी, आत्मा प्रकृतीहून श्रेष्ठ असा आहे असे म्हणतात. ॥६५-६६॥
तसेच, तो भोक्ता, अक्षर, बुध्द, सर्वाठायीं उपस्थित आहे असेही म्हणतात. सर्व शरीधार्‍यांचा प्रपंच अज्ञानावर आधारित असतो. ॥६७॥
नेणीव वा भ्रान्ति यामुळे आत्मतत्व प्रकृतिसंबध्द आहे असे मानले जाते. परमपुरुष नेहमी प्रकाशमान, स्वयंप्रकाशी व सर्वांच्या ठायी आहे. ॥६८॥
अहंकारामुळे उत्पन्न झालेल्या सारासारबुध्दीच्या अभावामुळे जीव मीच कर्ता आहे असे मानतात. ॥६९॥
ब्रह्मवादी प्रकृती, पुरुष यांस कारण जाणून त्यापाशी हा कूटस्थ निर्लेप आत्मा त्यांच्याशी संबध्द आहे असे जाणतात. ॥७०॥
आत्म्यास वास्तविक अक्षर ब्रह्म न जाणणे, जो आत्मा नाही त्याला आत्मा जाणणे यामुळे दु:ख उत्पन्न होते. याहून उलट आत्मब्रह्मैक्य मानल्यास सुख उत्पन्न होते. ॥७१॥
स्नेह, मत्सर वगैरे सर्व दोष भ्रमाधिष्ठित आहेत. त्यामुळे सदसत्‍ कर्मे निर्माण होतात आणि त्यांपासून अनुक्रमे पुण्य वा पाप निर्माण होतात. ॥७२॥
पुण्यापापामुळे सर्व शरीरांची उत्पत्ती होते. प्रत्यक्षात आत्मा गुह्यरुप, कूटस्थ व दोषातीत आहे. ॥७३॥
आत्मा एकमेव मायाशक्तीमुळे असतो. परमार्थत: तो नसतो म्हणून ऋषिगण परमार्थत: अव्दैत मानतात. ॥७४॥
अव्यक्तस्वभावांतच भेद असतो. माया आत्म्याच्या आश्रयाने असते ज्याप्रमाणे धुराच्या संबंधाने आभाळ मलिन होत नाही. ॥७५॥
त्याप्रमाणे अंत:करणांत उत्पन्न होणार्‍या भावाने आत्म्यास मालिन्याचा लेप लागत नाही. जसा स्फटिक दगड केवळ आपल्या तेजाने तळपतो. ॥७६॥
तसा बाह्य उपाधिरहित निर्मल आत्मा स्वयंप्रभेने प्रकाशतो. विव्दान्‍ लोक विश्व ज्ञानात्मक आहे असे मानतात. ॥७७॥
इतर कुदृष्टी यास वस्तुरुप मानतात. स्वरुपत: चिदात्मा कूटस्थ, निर्गुण, व्यापी असा आहे. ॥७८॥
ज्ञानदृष्टी लोकांना हा यथास्वरुप दिसतो. याउलट सामान्य जन पारदर्शन स्फटिक रंगीत समजतात.॥७९॥
तांबडया उपाधीमुळे स्फटिक लाल दिसतो तसा सामान्यांना परमपुरुष अन्यस्वरुप दिसतो. वास्तविक आत्मा अक्षर, शुध्द, नित्य सर्वत्र जाणारा आणि अविकारी आहे. ॥८०॥
मोक्षेच्छूंनी त्या आत्म्याची उपासना, मनन, श्रवण या क्रिया कराव्यात जेव्हा मनांत सर्व स्थळी सर्व काळी चित्स्वरुप भासते ॥८१॥
तेव्हा श्रध्दाळू योग्याला तो आत्मा स्वत:प्रकट होतो. जेव्हा तो सर्व भूतांना आपल्या ठिकाणी पाहतो. ॥८२॥
आणि आपणास सर्व भूतांच्या ठायी पाहता तेव्हा ब्रह्म प्रकट ते जेव्हा समाधिअवस्थेत सर्व भूते पहात नाहीत. ॥८३॥
तेव्हा परमात्म्याशी एकरुप होऊन तो केवलरुप होतो. जेव्हा त्याच्या हृदयात असलेले सर्व काम मुक्त होतात. ॥८४॥
तेव्हा तो विद्वान्‍ अमृतस्वरुप घेऊन क्षेम प्राप्त करतो. जेव्हा तो सर्व भूतांना वेगळे असले तरी एक ठिकाणी जाणतो. ॥८५॥
तेव्हाच ब्रह्म विस्तार पावते. जेव्हा वास्तविक परमार्थ दृष्टीने एक आत्मा पाहतो. ॥८६॥
तेव्हा सर्व विश्व मायामात्र जाणून तो समाधान पावतो. ॥८७॥
जेव्हा जनन, वार्धक्य, दु:ख, रोग या सर्वांना ब्रह्मज्ञान हे एकमात्र रामबाण औषध होते तेव्हां तो महादेवस्वरुप होतो. ॥८८॥
जसे जगात नद्या, नद समुद्राशी एकरुप होतात, त्याप्रमाणे जीवात्मा अक्षर व पवित्र परात्म्याशी एकरुप होतो. ॥८९॥
म्हणून विश्वात केवळ आत्मज्ञान सत्य आहे. संसार वा प्रत्यय काहीही नाही. आत्मज्ञान अज्ञानाने झाकले गेल्याने लोक मोह पावतात. ॥९०॥
आत्मज्ञान विमल, सूक्ष्म, निर्विकार असून तेच तदितराशी एकरुप आहे (म्हणजेच तदितर काहीही नाही. ) ॥९१॥
हे उत्तम सांख्यज्ञान तुम्हास सांगितले . तेच सर्व वेदांताचे सार आहे. त्याच्या ठिकाणी एकचित्त होणे म्हणजे योग होय. ॥९२॥
योगामुळे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानामुळे योगास चालना मिळते योग व ज्ञान यानी युक्त असलेल्या आणखी काही मिळविणे असत नाही. ॥९३॥
योगी जिथे प्राप्त होतात तिथेच सांख्य प्राप्त होतात. ज्यास सांख्य व योग एक भासतो तो खरा तत्त्ववेत्ता होय. ॥९४॥
इतर जे योगी ब्राह्मण केवळ ऐश्वर्येच्छा करतात त्यांची मति भ्रष्ट होऊन ते त्याच ऐश्वर्याच्या ठिकाणी गटांगएळ्या खातात. ॥९५॥
सर्वमान्य, स्वर्गीय, निर्मल ऐश्वर्य म्हणजेच महत्तत्व आहे. ज्ञान आणि योग यांची जोड असलेल्यास शरीर नष्ट झाल्यावर त्याची प्राप्ति होते. ॥९६॥
हा अहंस्वरुप व आत्माच अव्यक्त,  मायासंपन्न परमेश्वर, सर्वांचा आत्मा व सर्वांचे मुख आहे असे सर्व वेद वाड्‍मयात सांगितले आहे. ॥९७॥
तो परमात्माच सर्व रुपमय, रसमय, गंधमय आहे. तो अजर, अमर, सर्वत्र हस्त व चरण असलेला अंतर्यामी नित्य असा हा आत्मा आहे. ॥९८॥
अहंस्वरुप आत्मा हातपाय नसूनही वेगवान आहे. हृदयस्थ असूनही सर्व जाणणारा आहे. मी डोळे नसून सर्व पाहाणारा कान नसून सर्व ऐकणारा आहे. ॥९९॥
मी यच्चयावत्‍ सर्व जाणतो. कोणीही मला जाणत नाहीत. तत्त्ववेत्ते मलाच एकमेव महान्‍ पुरुष म्हणतात. ॥१००॥
गुणातीत मलातीत असे जे परम ऐश्वर्य त्यासच सूक्ष्म विचार करणारे ऋषिगण स्वत:चे कारण मानतात. ॥१०१॥
हे ब्रह्मवादी ऋषिजनहो माझ्या मायेने मूढ झालेले देव देखील जे जाणत नाहीत, ते (ज्ञान) तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ॥१०२॥
मी स्वभावाने मायेच्या पार असल्याने माझी सर्वांकडून फारशी स्तुति होत नाही, तरी देखील मी या विश्वास चालना देतो त्याचे कारण मुनींना माहीत आहे. ॥१०३॥
तत्त्व जाणणारे योगी माझ्या सर्वगामी गुह्यतम शरीरामध्ये प्रवेश करुन अविकारी सायुज्यमुक्ति मिळवितात. ॥१०४॥
माझी माया विश्वात्मक आहे. जे मायेच्या पार गेले आहेत ते माझ्या ठिकाणी परम पवित्र मोक्ष मिळवतात. ॥१०५॥
हे योगिश्रेष्ठांनो, शेकडो कल्पकोटिनंतरही ते माझ्या कृपेमुळे या संसारात परतत नाहीत असे वेदवचन आहे. ॥१०६॥
मी सांगितलेले हे योगासहित सांख्याज्ञान ब्रह्मवादी ऋषींनी स्वत:चे मुलगे, छात्र व इतर ऋषींना द्यावे. ॥१०७॥
अव्यक्तापासून काल झाला नंतर प्रधान व परपुरुष झाले. त्यांच्यापासून हे सर्व विश्व उत्पन्न झाले म्हणून विश्व ब्रह्ममय आहे. ॥१०८॥
हे ब्रह्म सर्वत्र हात पाय, डोळे, डोके, तोंड, कान असलेले आहे ते सर्वांना व्यापून उरले आहे. ॥१०९॥
ब्रह्माच्या ठिकाणी सर्व इन्द्रियांच्या गुणाचा आभास होतो तरी देखील ते सर्व इन्द्रियविरहित आहे. सर्वांचा आधार, नित्यानन्द अव्यक्त व अव्दैत आहे. ॥११०॥
त्याला कोणतेही उपमान नाही. ते सर्व प्रमाणांच्या पलीकडे आहे. विकल्पहीन, आभासहीन, सर्वांचा आश्रय असे ते ब्रह्म श्रेष्ठ अमृत आहे. ॥१११॥
ते वेगळे नाही पण वेगवेगळ्या ठिकाणी राहते. नित्य, स्थिर आणि न बदलणारे (अव्यय) तसेच अविनाशी आहे. ते निर्गुण आणि परम तेज (ज्योती) आहे. विव्दानांना त्याचे यथार्थ ज्ञान झाले आहे. ॥११२॥
तो प्राणिमात्रांचा आत्मा आहे बाह्य, अभ्यन्तर आणि पर तोच आहे. तोच मी सर्वत्र आहे, शान्त, ज्ञानस्वरुप परमेश्वर मी आहे. ॥११३॥
मी हे स्थावर आणि जंगम असे सगळे जग व्यापले  आहे. माझ्यामध्ये सर्व प्राणी आहेत. अशा मला सर्व वेदवेत्ते जाणतात. ॥११४॥
त्या वस्तूला प्रधान आणि पुरुष म्हणतात. त्यांच्या संयोगातून अनादी परम काल सांगितला जातो. ॥११५॥
अनादी आणि अनन्त अशी ही तीनही तत्त्वे अव्यक्तामध्ये सामावली आहेत. तत्स्वरुपी वेगळेच असेल. माझे रुप त्याचेच आहे. ॥११६॥
महत्‍ पासून सुरु होऊन विशेषापर्यंत असलेले सर्व जग त्याच्यापासून निर्माण होते. जी प्रकृती म्हणून विशेषापर्यंत असलेले सर्व जग त्याच्यापासून निर्माण होते. जी प्रकृती म्हणून सांगितली आहे ती सर्व प्राणिमात्रांना मोहविते (भ्रम निर्माण करते.) ॥११७॥
प्रकृतिस्थ पुरुष आहे तो प्रकृतीच्या गुणांचा उपभोग घेतो. त्याच्या ठिकाणी अहंकार (तत्त्व) नसल्याने तो पंचविंशात्मक (पंचवीस तत्त्वस्वरुपी) आहे असे म्हणतात. ॥११८॥
प्रकृतीचा पहिला विकार महत्‍ (महत्तत्त्व) म्हणून सांगितला जातो. विज्ञातृ शक्तीच्या (जाणण्याच्या) विज्ञानामुळे (जाणीवेमुळे) त्यातून अहंकार निर्माण होतो. ॥११९॥
महत्स्वरुप अहंकार एकच आहे असे म्हणतात. तत्त्वचिंतक त्याला जीव, अंतरात्मा म्हणतात. ॥१२०॥
त्याच्यामुळे जन्मामधील सुख आणि दु:ख समजते . तो विज्ञानस्वरुप आहे आणि त्याचे मन उपकारक आहे. ( म्हणजे मनाच्या साहाय्यामुळे सुखदु:ख कळतात. ) ॥१२१॥
त्याच्यामुळे (मनामुळे) पुरुषाचा संसार तन्मय होतो. तोच अविवेक आहे. कालाशी प्रकृतीच्या संयोगामधून तो झाला. ॥१२२॥
काल सर्व सृष्टी निर्माण करतो आणि संहार करतो. कालाच्या सर्व वश आहेत. काळ कोणाला वश होत नाही. ॥१२३॥
तो अन्तर्यामी आणि सनातन आहे. सर्वांचे तो नियंत्रण करतो. त्यालाच भगवान, प्राण,  सर्वज्ञ, पुरुषोत्तम म्हणतात. ॥१२४॥
मानी किंवा विव्दान (मनीषी) मन हे सर्व इंद्रियांहून श्रेष्ठ आहे असे म्हणतात. मनाहून अहंकार आणि अहंकारापेक्षाही ‘महान्‍’ श्रेष्ठ आहे. ॥१२५॥
महत्‍ च्या पलीकडे अव्यक्त आणि अव्यक्ताच्याही पलीकडे पुरुष आहे. पुरुषाहून श्रेष्ठ भगवान आहे. सर्व जग त्याचेच प्राण आहेत. ॥१२६॥
प्राणाहून परतर आकाश (व्योम) आहे. व्योमाहून अतीत अग्री ईश्वर आहे. तोच अव्यय शांत ब्रह्मा मी आहे. हे सर्व जग मायातीत आहे. ॥१२७॥
माझ्याहून श्रेष्ठ कोणीही प्राणी नाही. मला जाणून मुक्त होतात. जगामध्ये कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नित्य नाही. ॥१२८॥
माझ्या व्यतिरिक्त अव्यक्त आणि व्योमरुप महेश्वरच फक्त आहे. तो मी सर्व जग निर्मितो आणि नेहमी संहारतो. ॥१२९॥
मायावी आणि मायास्वरुपी देव, कालाशी संयोग पावतो. माझ्या सांनिध्यात हा काळ सर्व जग निर्माण करतो. आणि अनन्तस्वरुपी आत्मनियोजन करतो, हे वेदांचे सांगणे आहे. ॥१३०॥
ज्यामुळे हे सर्व निर्माण होते त्या देवदेवाचे माहात्म्य मी आता सांगतो. ब्रह्मवेत्ते ऋषीजनहो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. ॥१३१॥
सर्वश्रेष्ठ भक्ती सोडून इतर कोणत्याही मार्गांनी तप, विविध दाने, याग यांनी लोक मला जाणू शकणार नाहीत. ॥१३२॥
मी सर्व भूतांचा अंत आहे. मी सगळीकडे आहे. हे मुनिश्रेष्ठांनो, मी सर्वसाक्षी आहे हे लोक जाणत नाहीति. ॥१३३॥
ज्याच्यामध्ये हे सर्व आहे आणि जो सर्वांचा नाश करतो, तो मी धाता (निर्माता) आणि विधाता (घडविणारा) आहे. काल आणि सर्वतोमुख अग्री मीच आहे. ॥१३४॥
मुनी मला बघत नाहीत, पितर, स्वर्गवासी देव, ब्रह्मा, सर्व मनू, इन्द्र आणि इतर जे कोणी रव्यातकीर्त आहेत ते कोणीही मला जाणत नाहीत. ॥१३५॥
माझी, एकाच परमेश्वराची सर्व वेद स्तुती करतात. आणि ब्राह्मणही वैदिक यज्ञांनी मला उद्देशून यज्ञ करतात. ॥१३६॥
ब्रह्मा लोकांचा पितामह आहे हे सर्व लोक जाणत नाहीत. योगी जन भूताधिपती ईश्वराचे ध्यान करतात. ॥१३७॥
यज्ञात अर्पिलेल्या सर्व हवींचा मीच भोक्ता आहे. मीच त्यांचे फल देतो. सर्व देवांचे रुप घेऊन मीच सर्वस्वरुप होतो आणि सर्वांमध्ये मीच असतो. ॥१३८॥
विव्दान, धार्मिक असे वेदविद्‍ माझाच विचार करतात. जे माझी नित्य उपासना करतात, त्यांच्याजवळ मी नेहमीच असतो. ॥१३९॥
जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कोणीही धार्मिक माझी उपासना करतात, त्यांना मी सर्वश्रेष्ठ पद असलेले आनन्दस्वरुप असे ते स्थान देतो. ॥१४०॥
इतरही आपले नित्य कर्तव्य करणारे शूद्रादिजातीगत व्यक्ती भक्ती करत असतील तर कालाच्या सांनिध्यात येऊन शेवटी मुक्त होतात. ॥१४१॥
माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. त्यांचे सर्व कल्मष (पाप) दूर झालेले असतात. सुरुवातीसच मी सांगितले आहे की माझा भक्त नाश पावत नाही. ॥१४२॥
जो अज्ञानी त्याची (भक्ताची) निन्दा करतो तो त्या देवदेवाची निंदा करतो. जो भक्तीने पूजा करतो तो नेहमी माझी पूजा करतो. ॥१४३॥
माझी आराधना करण्यासाठी जो मला सतत पान, फूल, फळ किंवा पाणी देतो तो माझा प्रिय भक्त असतो. ॥१४४॥
सृष्टीच्या सुरुवातीस मीच परमेष्ठी ब्रह्म्याची निर्मिती केली आणि माझ्यापासून निघालेले सर्व वेद त्याला दिले. ॥१४५॥
सर्व योग्यांचा मीच अव्यय गुरु आहे. धार्मिकांचा रक्षणकर्ता आणि वेदांचा व्देष करणार्‍यांचा निहन्ता मीच आहे. ॥१४६॥
योगी जनांना सर्व संसारातून मुक्त मी करतो. सर्व संसारातून वर्जित असूनही मीच संसाराचा हेतू आहे. ॥१४७॥
मीच संहारक आहे, स्रष्टाही मीच आहे आणि पालनकर्ता हरीही मीच. माया माझी शक्ती आहे. ती जगाल मोहित करत. ॥१४८॥
जिला विद्या म्हटले जाते ती माझीच परा शक्ती आहे. योगी जनांच्या हृदयात राहून त्या मायेला मी नष्ट करतो. ॥१४९॥
सर्व शक्तींचा प्रवर्तक आणि निवर्तक मीच आहे. सर्वांचा आधार मीच होतो आणि अमृताचे स्थान मीच आहे. ॥१५०॥
सर्वांच्यात असलेली एकच शक्ती विविधस्वरुपी जग घडवते. ब्रह्माचे रुप घेऊन ती मत्स्वरुपी शक्ती माझ्या आधाराने असते. (हे विप्रजनहो, मी परमयोगाचा आश्रय घेतला आहे म्हणून मी प्रेरक नसतो. ) ॥१५१॥
दुसरी विपुला शक्ती माझ्या या जगाची संस्थापना करते. अन्यत्र नारायण होऊन ती जगन्नाथ होते, जगत्स्वरुप होते. ॥१५२॥
तिसरी महती शक्ती सर्व जगाचा संहार करते. ती तामसी असून तिला काल म्हणतात. ती रुद्रस्वरुपी आहे. ॥१५३॥
काहीजण मला ध्यानाने पाहतात तर काही ज्ञानाने. काही भक्तियोगाने तर काही कर्मयोगाने माझे दर्शन घेतात. ॥१५४॥
जो ज्ञानाने माझी आराधना करतो, इतर कोणत्याही मार्गाने करीत नाही तोच सर्व भक्तांमध्ये माझा इष्ट आणि प्रियतम होतो. ॥१५५॥
माझी आराधना करणारे इतर हरीचे भक्त, ते देखील माझ्याकडेच पोचतात. आणि पुन्हा जन्माला येत नाहीत. ॥१५६॥
प्रधान आणि पुरुषात्मक असे हे सर्व जग मीच व्यापले आहे. चित्तही माझ्यातच स्थिर असते; जगाला मीच प्रेरणा देतो. ॥१५७॥
विप्रहो, परम योगात स्थिर झाल्याने मी प्रेरक नसतोच. तरीही जो कोणी असे जाणतो की मी सर्व जगाचा प्रेरक आहे तो अमृत (मुक्त) होतो. ॥१५८॥
स्वभावत:च  निर्माण होणारे हे सर्व मी पाहत असतो. भगवान महायोगेश्वर कालच हे स्वत: करत असतो. ॥१५९॥
शास्त्रांमध्ये विव्दान्‍ मला माया म्हणतात, तो मी म्हणजे भगवान योगीश्वर, महायोगेश्वरच स्वत: आहे. ॥१६०॥
परमेष्ठी सर्व सत्त्वांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्याचे महत्त्व आहे. भगवान ब्रह्मा महाब्रह्ममय आणि मलरहित आहेत असे म्हटले जाते. ॥१६१॥
महायोगेश्वर अशा ईश्वरस्वरुप मला जो जाणतो त्याचा अविकल्पक (नि:संदेहस्वरुप) योगाशी योग येतो यात संशय नाही. ॥१६२॥
परम आनंदाच्या आश्रयाला राहून प्रेरणा देणारा ईश्वर मी आहे. मी योगी नेहमी नृत्य करतो. जो हे जाणतो तो योग जाणतो. ॥१६३॥
हे परम गुप्त ज्ञान आहे. ते सर्व वेदांमध्ये निश्चित केले आहे. ते प्रसन्नचित्त असलेल्या, धर्मरत आहिताग्रीला द्यावे. ॥१६४॥
एवढे बोलून योगीजनांचा भगवान परमेश्वर श्रेष्ठ असा ईश्वरीय भाव दाखवून नाचू लागला. ॥१६५॥
निर्मल गगनात विष्णूसह नृत्य करणार्‍या त्या ईश्वराला, तेजाचे परमनिधान असलेल्या महादेवाला त्यांनी पाहिले. ॥१६६॥
तत्त्वज्ञ, संयतमनस्क योगी ज्याला जाणतात त्या सर्व भूतांच्या ईश्वराला त्यांनी आकाशात पाहिले. ॥१६७॥
ज्याच्या मायेने परिपूर्ण जगाला जो प्रेरणा देतो त्या विश्वेशाला स्वत: नृत्य करताना विप्रांनी पाहिले. ॥१६८॥
ज्याच्या पादकमलांचे स्मरण करुन पुरुष अज्ञानातून निर्माण झालेल्या भयातून  मुक्त होतो त्या भूतपतीला नृत्य करताना त्यांनी पाहिले. ॥१६९॥
जे निद्रेने श्वास जिंकतात, ते शांत आणि भक्तियुक्त योगी ज्योतिस्वरुपा (तत्त्वा) चे दर्शन करतात तो परम योगी आज दिसतो आहे. ॥१७०॥
प्रसन्न आणि भक्तवत्सल असा जो अज्ञानामधून तातडीने मुक्त करेल तो परम मुक्तिदाता (मोचक) रुद्र आकाशात त्यांनी पाहिला. ॥१७१॥
त्या देवाला हजार शिर, हजार चरण, स्वरुपे, हजार बाहू होते. जटाधारी देवाने अर्ध चंद्राचे शिरोभूषण धारण केले होते. ॥१७२॥
व्याघ्र चर्म परिधान केले होते. महाबाहू शूलावर आधाराला होता. हातात दंड होता. सूर्य- चन्द्र-अग्रींचे तीन नेत्र होते. ॥१७३॥
आपल्या तेजाने ब्रह्माण्ड त्याने वेढून टाकले होते. उग्रदंत आणि दुर्धर्षी अशा त्याचे तेज कोटी सूर्यासारखे होते. ॥१७४॥
अग्रीच्या ज्वाला निर्माण करुन सर्व जगाचा दाह तो करीत होता. विश्व करणार्‍या त्या ईश्वराला नृत्य करताना त्यांनी पाहिले. ॥१७५॥
महादेव, महायोगी, देवांचेही दैवत असलेल्या, पशूंचा पती, ईशान, आनंदरुपी आणि अखंड तेज अशा ईश्वराला, ॥१७६॥
पिनाकधारी, विशालनेत्र, भवरोगग्रस्तांना औषध-भूत, कालस्वरुप, कालाचा काल, देवाधिदेव, महेश्वर, ॥१७७॥
उमापती, दीर्घनेत्र, योगानन्दमय श्रेष्ठ, ज्ञान-वैराग्याचे निधान, ज्ञानयोगस्वरुप आणि सनातन, ॥१७८॥
शाश्वत, ऐश्वर्य आणि वैभव स्वरुप, धर्माचा आधार आणि दुष्प्राप्य अशा त्या ईश्वराला, ज्याला इन्द्र, उपेन्द्र वंदन करतात, महर्षीगण वंदन करतात; ॥१७९॥
योगी जनांच्या हृदयात जो राहतो, योग मायेने जो वेढलेला असतो, क्षणात जो जगाचे उत्पत्तिस्थान होतो, अनामय नारायणाच जो आहे, ॥१८०॥
ईश्वराशी जो एकरुप झाला आहे, त्या रुद्राचे ते ईश्वरीय नारायणात्मक रुप पाहून ते ब्रह्मर्षी स्वत:ला धन्य समजले. ॥१८१॥
त्र्यैलोक्याधीश भगवान रुद्र नारायणरुपाचा डावा भाग या रुपात सनत्कुमारसनक, भृगु सनातन, सनन्दन, रैभ्य, अंगिरस, वामदेव, शुक्र, अत्रि, कपिल या ऋषींना दिसले. हृदयस्थ परमेश्वराचे ध्यानकरुन मस्तक टेकून नमस्कार करुन हात जोडून तो मस्तकावर टेकवून ऋषींनी पुन्हा पुन्हा वंदन केले. शरीराच्या गुहेतील देवाला प्रत्यक्ष समोर पाहून ते ऋषि अत्यंत आनंदित झाले. ऊँकाराचा उच्चार करुन ज्ञानमय वचनांनी त्यांनी परमेश्वराची स्तुती आरंभिली. हे  रुद्रा ! तूच एकमेव ईश आहेस. पुराणपुरुष, प्राणांचा ईश्वर, अनंत योगानी युक्त, चेतनामय, ज्ञानमय, पवित्र अशा हृदयात वास करणार्‍या तुला आम्ही वंदन करतो. जितेंद्रिय आणि शांत असे मुनी ब्रह्माचेही उत्पत्तिस्थान असलेल्या पवित्र, सुवर्णवर्णयुक्त परमज्ञानी, परमश्रेष्ठ अशा तुला ध्यानाने आपल्या शरीरातच पहातात. ॥१८२-८६॥
तुझ्यापासून सर्व जगाची उत्पत्ति झाली आहे. तू परमाणुभूत आहेस आणि इतर सर्व तुझ्यानंतर निर्माण झाले आहेत. तूच अणूहूनही सूक्ष्म, आणि स्थूलाहूनही विशाल आहेस असे सज्जन लोक म्हणतात. जगाचा अंतरात्मा असलेला हिरण्यगर्भ तो पुराणपुरुष तुझ्या पासून निर्माण झाला. निर्माण झाल्याबरोबर तूच त्याला सोडून दिलेस. पूर्वीसारखंच सृष्टीचं सृजन तू त्याच्याकडून करवून घेतलंस . सर्व वेद तुझ्यापासूनच निर्माण झाले आणि अंती ते तुझ्यातच लीन होणार आहेत. जगाचा निर्माता असलेला तूच हृदयात नृत्य करताना आम्हाला दिसतो. ॥१८७-८९॥
ब्रह्मचक्राला तूच फिरवतोस, मायामय असा तूच सर्व ब्रह्मांडाचा एकमेव नाथ आहेस, दिव्य नृत्य करणार्‍या, योगात्मा अशा तुला शरण येऊन नमस्कार करतो. ॥१९०॥
तुला नाचताना पाहून, ब्रह्मानंदाचा अनुभव वारंवार घेऊन परमाकाशात वसणार्‍या पण सर्वात्म अशा तुझ्या महिम्याचे आम्ही स्मरण करतो. ॥१९१॥
मोक्षाचं बीज असलेला ऊँकार तुझा वाचक आहे. सृष्टीमध्ये लपलेलं अक्षर तत्त्व तूच आहेस. तू स्वयंप्रकाशित, परमसत्य ते तूच आहेस असे सज्जन लोक ठामपणाने सांगतात. ॥१९२॥
सर्व वेद सतत तुझी स्तुती करतात. पापक्षय झालेले ऋषी तुला नमस्कार करतात. आंतरबाह्य शांत झालेले ब्रह्मनिष्ठ संन्यासी, सत्यप्रतिज्ञ आणि सर्वश्रेष्ठ अशा तुझ्यामध्येच प्रवेश करतात. ॥१९३॥
पृथ्वीचा नाश तू करतोस. तुला आदी नाही. पूर्ण विश्व म्हणजे तूच आहेस. तूच ब्रह्मा, तूच ब्रह्मा, तूच विष्णू आणि सर्व श्रेष्ठ परमेश्वरही तूच आहेस. सुखाचा नित्यमुक्त मुनी अनुभव घेतात. नित्यमुक्त असे हे मुनी स्वयंज्योती- स्वयंप्रकाश अशा ( तुझ्यात) प्रवेश करतात. ॥१९४॥
तू एकटाच हे रुद्रा ! हे जग निर्माण करतोस, एकटाच त्याचे पालनपोषण करतोस. शेवटी त्याचा अंतही तूच करतोस. शरण आलेले आम्ही तुला नमस्कार करतो. ॥१९५॥
अनेक शाखा असलेला अनंत वेद तू एकरुप असल्याचे ज्ञान करुन देतो. जे ज्ञानी (ब्राह्मण) वंद्य अशा तुला अनन्य भावाने शरण जातात. ते संसाररुपी माया तरुन जातात. ॥१९६॥
हे रुद्रा ज्ञानी अशा तुलाच ब्रह्माची स्तुती करणारा हरी, अग्री, ईश , रुद्र, सनातन वायु, प्रजापती, आदित्य अशा अनेक रुपांनी युक्त असलेला म्हणतात. ॥१९७॥
तूच जाणण्यास योग्य असे अंतिम परम अक्षर अविनाशी तत्त्व आहेस ! तूच विश्वाचा परमाधार आहेस. तूच अविकारी असा शाश्वत धर्माचा रक्षणकर्ता आहेस. ॥१९८॥
तूच सनातन असा पुरुषोत्तम आहेस. तूच विष्णू, तूच  ब्रह्मदेव, तूच रुद्र आणि भगवान्‍ ईशही तूच. तूच विश्वाचा पालक, तूच प्रकृती, तूच विश्वाची प्रतिष्ठा. तूच सर्वेश्वर आणि तूच आहेस परमेश्वर. ॥१९९॥
ज्ञाते लोक तूच तमाच्या पलीकडील आदित्य वर्णाचा पुराण  पुरुष आहेस असे म्हणतात. तूच चेतनामय , अव्यक्त अनंतरुपे असलेले आकाश , ब्रह्म, (महा)  शून्य, प्रकृती आणि तिचे गुण हेही तूच आहेस. ॥२००॥
हे विश्व जे तुझ्यात भासते, जे अव्यय, निर्मल व एकरुप असे तुझ्यातील तत्त्व असे तुझे हे रुप अचिन्त्य आहे. ॥२०१॥
त्यातून (त्यामुळे) हे सर्व जग पसरले आहे. हे भूतनाथा ! महेशा ! योगेश्वर, भद्र, अपरिमित शक्ती असलेल्या, परमाश्रयस्थान ब्रह्माचे प्राचीन व्यक्तरुप अशा तुला आश्रयाची इच्छा करणारे आम्ही नमस्कार करतो. ॥२०२॥
तुझ्या पदकमलांच्या स्मरणाने बीज संपूर्णपणे नाश पावते (म्हणून) आम्ही मनाला काबूत ठेवून शरीराला स्थिर करुन ह्या एकमेव ईश्वराला प्रसन्न करीत असतो. ॥२०३॥
भव, संसाराचा निर्माता, काळ सर्व, हर, रुद्र, कपर्दी, शिव अग्नी अशा अनेक नावांनी युक्त अशा तुला नमस्कार असो. ॥२०४॥
तेव्हा तो बैल हे वाहन असलेला देव प्रसन्न होवून आपले  उग्र रुप टाकून मूळ रुपाला प्राप्त झाला. ॥२०५॥
रुद्राला, आपल्या मूळ रुपाला प्राप्त झालेल्या भगवान नारायणाना पाहून आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले- ॥२०६॥
हे भगवंता, भूत आणि भावी यांच्या नाथा, हे भूतनाथा हे पुराण पुरुषा, तुझे अद्‍भूत रुप पाहून आह्मी कृतार्थ झालो आहोत. ॥२०७॥
तुझ्याच कृपेमुळे निर्मळ अशा परात्पर परमेश्वरावर तुझ्याप्रमाणेच आमची अनन्य भक्ती जडते. ॥२०८॥
हे शंकरा, आता आम्ही तुझे महात्म्य ऐकण्यास उत्सुक आहोत. तसेच परमात्म्याचे जे सनातन आत्मस्वरुप तेही पुन्हा ऐकण्याची आमची इच्छा आहे. ॥२०९॥
योग्यांना सिध्दि देणारा तो शंकर त्यांचे ते भाषण ऐकून माधवाकडे पाहून गंभीर वाणीने असे म्हणाला - ॥२१०॥
ईश्वर म्हणाले,
वेदवेदत्यांना माहीत असलेले परमेश्वराचे माहात्म्य मी तुम्हाला जसेच्या तसे / जसे आहे तसे सांगतो. ते हे ऋषींनो तुम्ही ऐकावे. ॥२११॥
सर्व लोकांचा (चौदा भुवनांचा ) एकमेव निर्माता, पालनकर्ता आणि संहार करणारा पुराणपुरुष मीच आहे. ॥२१२॥
सर्व वस्तुजातामध्ये महेश्वर मी भरुन राहिलो आहे. सर्व माझ्यात आहे पण मी सर्वत्र नाही. ॥२१३॥
माझे जे अद्भुत रुप तुम्ही पाहिलेत ती मी निर्मिलेली, दाखवलेली माझी माया होती. माझ्या स्वरुपासारखे स्वरुप होते. ॥२१४॥
सर्व प्राणिमात्रांच्या अंतरंगात राहून मी सर्व जगाला प्रेरणा देतो. प्रेरणा हीच माझी क्रियाशक्ती आहे. ॥२१५॥
मी या जगात चेतना हालचाल निर्माण करतो. माझ्या इच्छेप्रमाणे ते चालतं. मीच काळ होऊन क्षणरुपाने जगाला प्रेरित करतो. ॥२१६॥
क्षणाक्षणाला घडणार्‍या सर्व क्रिया माझ्यामुळे घडतात. हे मुनींनो ! माझ्या एका अंशाने मी जग निर्माण करतो. एका अन्य रुपाने मी त्याचा संहार करतो. आणि जगाची धारणा-स्थिती हीही माझ्या एका अंशामुळे होते ॥२१७॥
सृष्टीच्या आरंभी, आदी, मध्य, अन्त यापासून पूर्णपणे अलिप्त असलेला मायातत्त्वाचा प्रवर्तक मी प्रधान आणि पुरुष या दोघांना कार्यप्रवण करतो. ॥२१८॥
एकमेकांशी संयुक्त झालेल्या त्याच्यापासून विश्व निर्माण होते. महद्‍ आदि तत्त्वापासून माझेच तेज प्रकट होते. ॥२१९॥
जो सर्व जगाचा साक्षी, कालचक्राला गती देणारा हिरण्यगर्भ सूर्य तोही माझ्या देहापासूनच निर्माण झाला आहे . ॥२२०॥
माझे दिव्य ऐश्वर्य, सनातन ज्ञानयोग आणि चारही वेद कल्पाच्य आरंभीच मी त्याला दिले. ॥२२१॥
माझ्या आज्ञेने, माझा भाव ग्रहण करुन माझे ते दिव्य ऐश्वर्य ब्रह्मदेवाने सदासर्वकाळ जाणले आहे.॥२२२॥
तोच सर्व लोकांचा निर्माता माझ्या आज्ञेवरुन झाला आहे. सर्वज्ञ असलेला चार मुखांनी युक्त होऊन तो आपल्यामधूनच सर्व निर्मिती करतो. लोकांचा प्रभु असलेला अनंत अनन्य नारायण हे माझेच एक रुप असून तोच लोकांचे पालनपोषण करतो. जो काळरुप सर्व प्राणिमात्रांचा संहार करणारा रुद्र तोही माझ्या आज्ञेनेच सतत माझ्या देहाचा अंत करील. ॥२२३-२५॥
माझ्या शक्तीने प्रेरित झाल्यामुळेच अग्नी हविर्द्रव्ये देवांना व श्राध्दान्ने पितरांना नेऊन पोहचवतो आणि अन्न शिजवतो. ॥२२६॥
महेश्वराच्या आज्ञेने वैश्वानर अग्नी खाल्लेले अन्न रोज पचवितो. ॥२२७॥
सर्व प्राण्यांचे उत्पत्तिस्थान , देवश्रेष्ठ वरुण सर्वांना (पाणी देऊन) तहान भागवितो. ॥२२८॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठायी व बाहेर असलेला वायुदेव माझ्या आज्ञेने सर्वांना हवा देऊन प्राणधारण करतो. ॥२२९॥
माझ्या आज्ञेने प्रेरित झालेला अमृताचा साठा असलेला चन्द्रदेव मानव व देव दोघांना प्राणदान करीत राहिला. ॥२३०॥
सदा आपल्या तेजाने सर्व विश्व तळपवणारा सूर्यदेव ईश्वराच्या प्रभेने निर्माण झालेला पाऊस पाडतो. ॥२३१॥
माझ्या आज्ञेने देवराज इन्द्र सर्व विश्वाचे नियमन करतो आणि यज्ञ करणारांना त्याचे फल देतो. ॥२३२॥
ईश्वराच्या आज्ञेने वैवस्वत यमदेव नियमपूर्वक वाईट लोकांचा नाश करतो. ॥२३३॥
सर्व धनाचा पती, धन देणारा कुबेर देखील नेहमी ईश्वराच्या आज्ञेने राहतो. ॥२३४॥
सर्व राक्षसांचा नाश करणारा आणि तामसी लोकांना तसे फल देणारा निऋति देखील माझ्या आज्ञेने राहतो. ॥२३५॥
वेतालगण व भूतांचा स्वामी त्यांना भोगफल देणारा, भक्तांचा ईशानदेव माझ्याच आज्ञेवरुन राहतो. ॥२३६॥
अडिरसाचा शिष्य वामदेव व रुद्रगणांचा नेता आणि योग्यांचा पालनकर्ता माझ्याच आज्ञेने राहतो. ॥२३७॥
सर्व विश्वास पूजनीय, विघ्नविनायक भगवान्‍ विनायक माझ्याच आज्ञेने धर्मरत असतो. ॥२३८॥
देवांचा सेनापती कार्तिकेय जो स्वयंभू असून ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहे तोही ईश्वरप्रेरित आहे. ॥२३९॥
मरीचिऋषी आदि प्रजापती महेश्वराच्या आज्ञेने विविध लोक निर्माण करतात. ॥२४०॥
विष्णुपत्नी लक्ष्मी, जी प्राणिमात्रांना वैभव देते ती देखील माझ्या आज्ञेत राहते. ॥२४१॥
विपुल वाणी देणारी देवी सरस्वती, ती देखील महेश्वराच्या आज्ञेने प्रवर्तित होते ॥२४२॥
सर्व मानवांना भीषण नरकांत पडण्यापासून वाचविणारी सावित्री देखील माझ्या आज्ञेचे पालन करते. ॥२४३॥
ध्यान केले असता ब्रह्मविद्या देणारी परमदेवी पार्वती देखील माझ्या आज्ञेचे पालन करते. ॥२४४॥
अनंत शेषनाग जो अपार महिमायुक्त असून सर्व देवांचा नेता आहे तो महेश्वराच्या आज्ञेने डोक्यावर पृथ्वीस आधार देतो. ॥२४५॥
घोडीचे रुप धारण करणारा संवर्तक अग्नी ईश्वराच्या आज्ञेने सर्व समुद्र पिऊन टाकतो. ॥२४६॥
ज्यांचे तेज सर्वत्र पसरले आहे, ते चौदा मनु ईश्वराच्या आज्ञेने सर्व प्रजांचे रक्षण करतात. ॥२४७॥
आदित्य , वसू, रुद्र, मरुद्‍गण, अश्विनकुमार आणि इतर सर्व देवता ईश्वराच्या शास्त्रानेच उत्पन्न झाले. ॥२४८॥
ईश्वरानेच गंधर्व, गरुड, सिध्द-साध्य, चारण, यश,राक्षस, पिशाच्च निर्माण केले. ॥२४९॥
कला, काष्ठा, निमेष , मुहूर्त, दिन , रात्र, ऋतु, पंधरवडा, महिना वगैरे कालपरिमाणे प्रजापतीश्वराच्या शासनानेच निर्माण झाले. ॥२५०॥
युग, मन्वतरे, परार्ध वगैरे कालपरिमाणे माझ्याच शासनाधीन आहेत. ॥२५१॥
जारज, अण्डज, स्वेदज व उद्भिज्ज प्राणिमात्र, स्थावर व चर परमेश्वराच्या आज्ञेतच राहतात. ॥२५२॥
सर्व पाताल, चौदा भुवने, सर्व ब्रह्माण्डे ईश्वराच्या आज्ञेतच राहतात. ॥२५३॥
भूतकाळी होऊन गेलेली अपरिमेय ब्रह्माण्डे पदार्थसमूहांसह माझ्याच आज्ञेने प्रवृत्त झाली. ॥२५४॥
भविष्यकाळी परमात्म्यांत विलीन होणार्‍या जीवात्म्यासहित जी ब्राह्माण्डे होतील ती देखील ईश्वराच्या आज्ञा पाळतील. ॥२५५॥
पृथ्वी, जल , अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूते मन, बुध्दी, भूतांची मूळ जी आदिप्रकृति माझ्या आज्ञेत आहे. ॥२५६॥
सर्व विश्वाचे मूलकारण, सर्व शरीरधार्‍यांचा भ्रम उत्पन्न करणारी, विवर्तरुपाने असणारी माया ईश्वराच्या आज्ञेनेच उत्पन्न होते. ॥२५७॥
देहधारण करणार्‍यांत जो पुरुष म्हणून वास करतो तो जीवात्मा ईश्वराच्या आज्ञेत राहतो. ॥२५८॥
मोहकलित दूर करुन ज्यायोगे ते श्रेष्ठ महेशपद पाहातो. ती बुध्दी देखील ईश्वराच्या आज्ञेत आहे. ॥२५९॥
जास्त काय सांगावे, माझ्या प्रभावाने विश्व उत्पन्न झाले, माझ्या आज्ञेने त्याची स्थिती आहे आणि माझ्याठिकाणीच ते विलीन होईल. ॥२६०॥
मीच भगवान, ईश्वर, स्वयंप्रकाशी, सनातन परमात्मा, अपर ब्रह्म आहे. माझ्याहून वेगळे काहीही नाही. ॥२६१॥
जे जाणले असता जन्म, प्रपंच या पाशांतून प्राणिमात्राची सुटका होते असे हे परम ज्ञान मी तुम्हाला सांगितले आहे. ॥२६२॥
हे सकळ मुनिजनहो, जो जाणतो असता मानव मोक्ष पावून प्रपंचात पुन्हा येत नाही, तो ईश्वराचा प्रभाव ऐका. ॥२६३॥
परात्पर, सनातन, अचल, अविकारी, नित्यानंद, विकल्पातीत, असे ब्रह्म माझे परम धाम आहे. ॥२६४॥
ब्रह्म जाणणार्‍यांमध्ये मी ब्रह्मा आहे. मी स्वयंभू, मायेच्याशिवाय असलेला महादेव, प्राचीन आणि अव्यय असा हरि आहे. ॥२६५॥
मी योग्यांमध्ये शिव, स्त्रियांमध्ये पार्वती देवी, आदित्यांमध्ये विष्णू आणि अष्टवसूंमध्ये मी पावक आहे. ॥२६६॥
मी योग्यांमध्ये राम (परशुराम, दशरथपुत्र राम, बलराम ) आहे. ॥२६७॥
मी मुनींमध्ये वसिष्ठ, देवांमध्ये इंद्र, कारागिरांमध्ये विश्वकर्मा आणि असुरांमध्ये प्रल्हाद आहे. ॥२६८॥
मी ऋषींमध्ये व्यास, गणांमध्ये विनायक, वीरामध्ये वीरभद्र आणि सिध्दांमध्ये कपिल ऋषि आहे. ॥२६९॥
मी पर्वतांमध्ये मेरु, नक्षत्रांमध्ये चंद्र, शस्त्रांमध्ये वज्र आणि व्रतांमध्ये सत्यव्रत आहे. ॥२७०॥  
मी सर्पांमध्ये अनंतनाग, सेनान्यांमध्ये कार्तिकेय,आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम आणि ईश्वरांमध्ये महादेव आहे. ॥२७१॥
मी कल्पांमध्ये महाकल्प, चतुर्युगांत कृतयुग, सर्व यक्षांमध्ये कुबेर आणि सर्व उद्भिजांमध्ये वेल आहे. ॥२७२॥
मी प्रजापतींमध्ये दक्ष, सर्व राक्षसांत निऋति, वेगवानांमध्ये वायुदेव आणि बेटांमध्ये पुष्कर आहे. ॥२७३॥
मी जनावरांत सिंह, अस्त्रांमध्ये धनुष्य, चतुर्वेदांत सामवेद आणि यजुर्वेदांत शतरुद्रिय आहे. ॥२७४॥
मी सर्व मंत्रांत गायत्रीमंत्र, रहस्यांमध्ये ऊँ, सूक्तांत पुरुषसूक्त आणि सर्व सामांमध्ये ज्येष्ठ साम आहे. ॥२७५॥
मी सर्व वेदवेत्त्यांमध्ये स्वायंभुव मनु, देशांमध्ये ब्रह्मावर्त आणि क्षेत्रांमध्ये अविमुक्तक आहे. ॥२७६॥
मी विद्यांमध्ये अत्मज्ञान, ज्ञानांमध्ये ईश्वरविद्या, पंचमहाभूतांमध्ये आकाश  आणि तत्त्वांमध्ये मृत्युतत्त्व आहे. ॥२७७॥
मी पाशामध्ये माया, मेय वस्तूंमध्ये काल, गतींमध्ये मोक्ष आणि सर्व परांत महेश्वर आहे. ॥२७८॥
या विश्वात तेज, बल यांनी श्रेष्ठ असे जे काही सत्त्व आहे तो माझ्याच तेजाचा विस्तार आहे असे समजा. ॥२७९॥
प्रपंचात असलेल्या सर्व जीवात्म्यांत पशु म्हणतात. त्यांचा पक्षी मी देव म्हणून प्राज्ञ लोक मला पशुपति म्हणतात. ॥२८०॥
माझ्या लीलेने या जीवात्म्यांना मी मायापाशात जखडतो. वेदवेत्ते मलाच जीवांचा मोक्षदाता म्हणतात. ॥२८१॥
अविकारी, भूतपति, परमात्मा अशा माझ्याशिवाय मायापाशात गुरफटलेल्यांना सोडविणारा दुसरा कोणी नाही. ॥२८२॥
२४ तत्त्वे ही मायेचे कर्मगुण आहेत. हेच पशुपतीचे पाश आहेत क्लेश हेच पशुबंधन आहेत. ॥२८३॥
मन, बुध्दी, अहंकार, आकाश, वायु, अग्नी, जल व पृथ्वी , पंचमहाभूते मिळून आठ प्रकृती होत. त्याहून भिन्न विकृती होत. ॥२८४॥
कान, त्वचा, डोळे, जीभ, पांचवे नाक ही ज्ञानेंद्रिये पायू, उपस्थ, हात, पाय, वाचा ही कर्मेंद्रिये शब्द , स्पर्श, रुप , रस, गन्ध हे सर्व मिळून २३ तत्त्वे होत. ॥२८५-८६॥
विश्वाचे कारण, आदी, मध्य व अंत नसलेले जे त्रिगुण लक्षण, अविकारी प्रधान हे २४ वे तत्त्व होय. ॥२८७॥
सत्त्व, रजस, तमस्‍ हे तीन गुण होत. यांच्या साम्यावस्थेला अव्यक्त प्रकृती म्हणतात. ॥२८८॥
सत्त्वज्ञान, तामसज्ञान व रजोज्ञान असे ज्ञानाचे तीन प्रकार आहेत. गुणांमध्ये साम्याचा अभाव हा बुध्दीच्या साम्याच्या अभावाने होतो. ॥२८९॥
धर्म व अधर्म हे दोन कर्मनामक पाश होत. मला अर्पिलेली कर्मे बंधनास कारण नसून मोक्षास कारण होतात. ॥२९०॥
अज्ञान , अहंकार , आसक्ती , व्देष, अभिनिवेश हे आत्मनिबंधक क्लेश म्हणून म्हटले जाणारे पाश आहेत. ॥२९१॥
या पाशांचे कारण म्हणजे माया होय. ती मूलप्रकृती, अविकारी अशी शक्ती माझ्या ठायी असते. ॥२९२॥
तोच, सनातन महेश्वर, मूलप्रकृती, प्रधान, पुरुष व महदादिविकार, त्याला कोणी जाणीत नाही. त्यालाच पुराणपुरुष म्हणतात. ॥२९३॥
हे ब्राह्मणश्रेष्ठांनो आणखी दुसरे गोपनीय ज्ञान मी सांगतो. या ज्ञानाने प्राणिमात्र संसारसमुद्र तरुन जातो. ॥२९४॥
हा ब्रह्मा, तमस, शान्त, सनातन, विमस, अविकारी, एकाकी, भगवान केवल व परमेश्वर अशी त्याला नावे आहेत. ॥२९५॥
महद्‍ब्रह्म हे उत्पत्तिस्थान , त्याठिकाणी मी मूलमाया नामक गर्भ ठेवतो. त्यापासून हे विश्व उत्पन्न झाले. ॥२९६॥
त्यापासून प्रधान, पुरुष, महद्भूत, पंच तन्मात्रे, मन , पंचमहाभूते व इंद्रिये उत्पन्न झाली. ॥२९७॥
कोटयवधी सूर्याप्रमाणे तेजस्वी, सोन्याचे ब्रह्माण्ड त्यापासून झाले. त्यापासून माझ्या शक्तीने पुष्ट ब्रह्मा जन्मला. ॥२९८॥
त्यापासून जे विविध जीव उत्पन्न झाले, ते माझ्या मायेने भ्रान्त होत गेल्याने मला पिता म्हणून जाणत नाहीत. ॥२९९॥
ज्या ज्या उत्पत्तिस्थानांमध्ये हे जीव उत्पन्न होतात त्यानाच परा माता मानतात. (मला मात्र पिता मानतात.) ॥३००॥
जो बीजस्वरुपी मला पिता मानतो. तो सर्व लोकांत श्रेष्ठ होय. त्याला भ्रान्ति उत्पन्न होत नाही. ॥३०१॥
सर्व विद्यांचा स्वामी, सर्व भूताचा परमेश्वर, प्रणवस्वरुप असा मी ब्रह्मा प्रजापती आहे. ॥३०२॥
सर्व भूतांच्या ठायी समानरुपाने राहणार्‍या आणि भूते नष्ट झाली असता नाश न पावणार्‍या ब्रह्माला जो जाणतो तो खरे जाणतो. ॥३०३॥
ईश्वरास सर्व ठायी समानरुपाने राहणारा जाणून जो आत्म्याचा घात करीत नाही तो परमपदास प्राप्त होतो. ॥३०४॥
सात सूक्ष्मे व षडड ईश्वरास जाणून, प्रधानविनियोग जाणणारा श्रेष्ठ ब्रह्मपदास प्राप्त होतो. ॥३०५॥
सर्वज्ञत्व,  समाधान, अनादिज्ञान, स्वच्छन्दत्व, अलुप्तशाक्ति आणि अनन्तशक्ति ही ईश्वराची षडडे होत. ॥३०६॥
पंच तन्मात्रे, मन व आत्मा ही सात सूक्ष्मे होत. या सर्वांचे कारण जी शक्ती तिला विनयाने प्रधानबध्द म्हटले आहे. ॥३०७॥
प्रकृतीच्या ठायी लीनरुपाने असणार्‍या शक्तीस वेदांमध्ये ब्रह्म, चेतन वा कारण म्हटले आहे. तिचा एक परमेश्वर एकच सत्यस्वरुप पुरुष महेश्वर होय. ॥३०८॥
ब्रह्मा, योगी, परमात्मा, महीयस्‍  व्योमव्यापी, वेदांव्दारा जाणला जाणारा, सनातन रुद्र, मृत्यु, अव्यक्त बीज, सर्व जगत्‍ व तो ईश्वर एकच होय. ॥३०९॥
तो एक असून इतर लोक त्याला अनेक म्हणतात.तुला कोणी आत्मा म्हणतात त्याला कोणी महान्‍ म्हणतात. तो महेश्वर अणुहून अणु व मोठयात मोठा आहे. तो विश्वरुप आहे. ॥३१०॥
रहस्यमय, पुराण पुरुष, विश्वरुप प्रभू, हिरण्यम यास जो बुध्दिमंताचे श्रेष्ठ आश्रयस्थान समजतो, तो बुध्दिमान प्राणी बुध्दीच्या पार जाऊन राहतो. ॥३११॥
ऋषी म्हणाले,
हे ब्राह्मणांनो मी विश्व नाही आणि विश्व माझ्याशिवाय राहू  शकत नाही. याला कारण माझ्यामध्ये असलेली मायाशक्ती होय. ॥३१३॥
माया ही आदी अंत नसलेली, आश्रयाच्या पलीकडे असलेली अशी शक्ती आहे. या प्रपंचास ती कारण आहे तर हा संसार अव्यक्तापासून उत्पन्न होतो. ॥३१४॥
ब्रह्म अव्यक्त , कारण , आनंद, अक्षर आणि ज्योति असे म्हणतात. मीच ब्रह्म आहे माझ्याहून ब्रह्म वेगळे नाही. ॥३१५॥
म्हणून ब्रह्मवादी मुनींनी माझ्या ठायी असलेली विश्वरुपता मान्य केली आहे. माझ्या एकत्व व नामात्वाचे तेच उदाहरण होय. ॥३१६॥
मी ते परम ब्रह्म आहे. मी सनातन परमात्मा आहे.हे ब्राह्मणांनो मला अकारण असे जे म्हणतात त्यात आत्म्याचा अपराध नाही. ॥३१७॥
अनन्त अव्यक्त शक्ति मायेनें स्थिर आहेत. आकाशात केवळ अव्यक्त अशी एकच शक्ती आहे. ॥३१८॥
अव्यक्त, चिरंतन ब्रह्म एक असूनही अनंत, स्थिर असूनही एकटया मायेने युक्त झाल्याने विविध वाटते. ॥३१९॥
पुरुषाहून वैभव भिन्न नाही, ते दुसर्‍यापासून लपलेले नाही. पुरुष आदि व मध्य नसून विद्येसह स्थित आहे. ॥३२०॥
हे श्रेष्ठ अव्यक्त, तेजोवलयाने शोभित, अक्षर, श्रेष्ठ प्रकाश, तेच विष्णूचे श्रेष्ठ स्थान होय. ॥३२१॥
सर्व विश्व त्याच्या ठायी आडवे उभे विणलेले आहे.या सर्व विश्वाला याचे ज्ञान झाले की मोक्ष मिळतो. ॥३२२॥
मनासहित वाणी जिथे न पोचता परतते, तो ब्रह्मानन्द जाणणारा कशासही घाबरत नाही. ॥३२३॥
मी या सूर्यस्वरुप महान्‍ पुरुषास जाणतो त्याला जाणले असता नित्य आनंद होऊन ब्रह्माशी एकरुप होऊन मोक्ष मिळतो. ॥३२४॥
प्रभायुक्तांमध्ये प्रभायुक्त आकाशांत असलेल्या आत्म्याहून भिन्न  काही नाही. इतर कोणी आत्मा नाही, त्यालाच समजून चालणारा व जाणणारा जीव ब्रह्माशी ऐक्य पावून मुक्त होतो. ॥३२५॥
ब्रह्मवादी ब्राह्मण ते कलिल, गूढशरीर, ब्रह्मानन्द, अमृत पद म्हणजे सर्वत: प्रकाश मी आहे असे म्हणतात. त्या पदी गेले असता पुन्हा प्रपंचात परत येत नाही. ॥३२६॥
सुवर्णमय परमाकाशातत्त्व अशा स्वर्गात जे तेज आहे ते जाणण्यास गेले असतां धीर लोकांना तळपणारे निर्मल आकाशतेज दिसते. ॥३२७॥
त्याच्यापुढे धीर लोक आत्म्याच्या ठायीं आत्मा अनुभवून स्वत: परमेष्ठी,महीयान्‍, ब्रह्मानन्द अनुभवणारा ईशप्रभु भगवान् त्या पलीकडे अनुभवास दिसतो. ॥३२८॥
सर्व प्राणिमात्रांत लपलेला, सर्वांना व्यापणारा, सर्वांचा अंतरात्मा जो एकमेव देव त्यास जे धीर लोक पाहतात. त्यासच खरी कायम शांती मिळते. इतरांस नव्हे. ॥३२९॥
सर्व बाजूंना पाय, डोकी व माना असलेला सर्व भूतांच्या ठायी वास करणारा असा तो भगवान्‍ आहे तो त्या ठिकाणाहून इतरत्र आढळत नाही. ॥३३०॥
हे ऋषिश्रेष्ठांनो, योग्यांना देखील दुर्मिळ, विशेषत: गोपनीय असे ईश्वर विषयक ज्ञान सांगितले. ॥३३१॥
ब्रह्म नक्की अलिड‍ अव्यक्तलिंग, स्वयंप्रकाश, आकाशस्थ असे परतत्त्व आहे. ॥३३२॥
अव्यक्त, कारण, अक्षर परमस्पद निर्गुण असे जे ब्रह्म त्यास धीरलोक सिध्दिज्ञान म्हणतात. ॥३३३॥
आपले, स्वान्तसंकल्प त्याच्या ठिकाणी विलीन करुन नेहमी तद्‍भवांत भावित राहणारे जे धीर लोक ते ब्रह्म पहातात. त्यासच लिड असे म्हणतात. ॥३३४॥
हे मुनिश्रेष्ठांचे, एरव्ही मला पहाणे शक्य नाही ते परपद जाणतां येईल असे कोणतेच ज्ञान नाही. ॥३३५॥
केवळ धीर लोकच हे परमस्थान जाणतात. विश्व मायारुप आहे असे अज्ञानान्धकाररुपी ज्ञान आहे. ॥३३६॥
विमल, युध्द, निर्विकल्प, निरंजन असा हा आत्मा आहे हेच ज्ञान आहे असे शहाणे लोक म्हणतात. ॥३३७॥
एक अविकारी तत्त्व जाणून, अत्यंत निष्ठेचा अवलंब करुन धीट लोक ते परमपद पाहातात. ॥३३८॥
पुन:एक वा अनेक असे परम तत्त्व जे भक्त पाहतात ते भक्त तत्स्वरुप होतात असे जाणा. ॥३३९॥
ते साक्षादेव साक्षात्‍ आत्म परमेश्वर जो नित्यानन्द निर्विकल्प व सत्यस्वरुप आहे त्यास पाहतात ही वस्तुस्थिती होय. ॥३४०॥
स्वात्मावस्थित शान्त असे जे धीर ते विश्वरुप सर्वगामी परमानन्दरुप परमात्म्याची उपासना करतात. ॥३४१॥
विद्वान्‍ लोक याला श्रेष्ठ मोक्ष, सायुज्यता, निर्वाण, ब्रह्माशी एकरुपता वा कैवल्य म्हणतात. ॥३४२॥
आदि, मध्य व अंत नसलेले , परमशिव अशी जी वस्तू आहे तोच महादेव ईश्वर आहे त्यास जाणले असतां मोक्ष मिळणारे. ॥३४३॥
तिथे सूर्य, चन्द्र, नक्षत्रगण, वीज नाही ते उलट तो विश्वास आपल्या प्रकाशाने प्रकाशित करतो, त्याचा प्रकाश उत्पन्न निर्मल आहे. ॥३४४॥
निष्कल, निर्विकल्प, शुध्द, बृहत्‍ परम प्रकाश त्यासच ब्रह्मवेते जन त्या अचल नित्य तत्त्वास पहातात, तोच ईश आहे. ॥३४५॥
सर्व वेद म्हणतात की पुरुष नित्यानन्द, अमृत सत्यस्वरुप व युध्द आहे.वेदाचा अर्थ ज्यांना कळला आहे ते म्हणतात की तो ऊँकाराने प्राणांचे नियमन करतो. ॥३४६॥
पृथ्वी, आप, मन,अग्नी, प्राण , वायू, आकाश , बुध्दी दुसरा सजीव असे  कोणीही नाही. केवल ईश्वरच आकाशात प्रकाशतो. ॥३४७॥
सर्व वेदांत सांगितलेले हे अत्यन्त रहस्य तुम्हाला सांगितले . योग्याला एकान्त स्थानी नियमन करुन योग केला असता पुष्कळ प्रयत्नाने त्याचे ज्ञान होते. ॥३४८॥
यानंतर अत्यन्त दुर्लभ अस योग सांगतो. त्यामुळे आत्म्याला परमात्मा ईश्वरास सूर्याप्रमाणे पाहणे शक्य होईल. ॥३४९॥
योगरुपी विस्तव प्राणरुपी पिंजर्‍याचे दहन करतो. नंतर मोक्षसिध्दी देणारे निर्मल ज्ञान निर्माण होते. ॥३५०॥
योगामुळे ज्ञान निर्माण होते. ज्ञानामुळे योगास प्रेरणा मिळते. ज्याला योगज्ञान आहे त्याच्यावर महादेव प्रसन्न होतो. ॥३५१॥
एकदा, दोनदा, तीनदा अथवा कायम महायोगात जे गढलेले असतात त्यांना महादेव समजावे. ॥३५२॥
योग दोन प्रकारचा आहे असे जाणा पहिला अभाव होय. सर्व योगात श्रेष्ठतम असा महायोग हा दुसरा होय. ॥३५३॥
ज्यामध्ये शून्य, सर्व आभासरहित स्वरुपाचे चिन्तन करुन आत्मा पाहिला जातो तो अभावयोग होय. ॥३५४॥
ज्यामध्ये नित्यानन्द, निरंजन आत्म्यास पाहातो व माझ्याशी एकरुपता होते तो परमयोग होय. ॥३५५॥
अनेक ग्रन्थांच्या पसार्‍यांत इतर जे योग सांगितले आहेत त्यांना ब्रह्मयोगाच्या १/१६ (सोळाव्या) भागाची देखील सर येणार नाही. ॥३५६॥
मुक्त लोक विश्वाला ईश्वराचे ठायी पाहाता तो सर्व योगांच्यामध्ये श्रेष्ठ होय. ॥३५७॥
इतर जे हजारो अनेक महेश्वरापासून  दुरावलेले योगी आहेत ते मनावर ताबा मिळवून मला पाहू शकत नाहीत. ॥३५८॥
प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, धारणा, समाधी, यम, नियम, आणि आसन हे योगाचे भाग आहेत. ॥३५९॥
माझ्या ठायी मन एकाग्र करणे म्हणजे योग. त्याची साधने तुम्हाला सांगितली आहेत. ॥३६०॥
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम मानवाचे मन मलहीन करतात. ॥३६१॥
आचार, विचार व उच्चार या योगे कुठल्याही प्राणिमात्राला क्लेश उत्पन्न न करणे म्हणजे अहिंसा होय. ॥३६२॥
अहिंसेच्या परता धर्म नाही. अहिंसा म्हणजे उत्तम सुख यज्ञविधिपूर्वक झालेली हिंसा अहिंसाच होय. ॥३६३॥
आहे तसे सांगणे व वागणे म्हणजे सत्य होय. सत्याने सर्व प्राप्त होते. सत्यामध्ये सर्व आश्रित आहे. ॥३६४॥
चोरी वा बळजोरी वापरुन दुसर्‍याचे द्रव्यादिक पळविणे म्हणजे स्तेय. ते न करणे म्हणजे धर्माचे साधन अस्तेय होय. ॥३६५॥
सर्व अवस्थांमध्ये नेहमी आचार, विचार आणि उच्चार योगे कामभावनेचा त्याग म्हणजे ब्रह्मचर्य होय. ॥३६६॥
संकटसमयी स्वेच्छापूर्वक द्रव्य न घेणे म्हणजे अपरिग्रह त्याचे प्रयत्नपूर्वक आचरण करावे. ॥३६७॥
तपश्चर्या, वेदाध्ययन , समाधान, शुध्दता, ईश्वराची पूजा हे योगसिध्दि देणारे यम होत. ॥३६८॥
उपवास, पराक, कृच्छ्र, चांद्रायण इत्यादीनी देहाचा शोषण करणे म्हणजे उत्तम तप होय. ॥३६९॥
वेदान्त, शतरुद्रीय, ऊँकार, जप हे सर्व सत्त्वसिध्दि संपणारे स्वाध्याय होत. ॥३७०॥
स्वाध्यायाचे तीन प्रकार- वाचिक, उपांशु, मानस यातील नंतर नंतरचा अधिक फळ देणारा आहे. ॥३७१॥
ऐकणार्‍या दुसर्‍याना ज्यातील शब्दन्‍ शब्द कळतो तो वाचिक स्वाध्याय होय. ॥३७२॥
दोन ओठांच्या केवळ कंपनाने ऐकणार्‍या दुसर्‍यात शब्द कळत नाही तो उपांशु स्वाध्याय होय. हा वाचिकाकडून उत्तम. ॥३७३॥
अक्षरे, शब्द यांच्या अन्वयाने सर्व शब्दांचे चिन्तन ओठांच्या हालचालींशिवाय करणे म्हणजे मानस स्वाध्याय होय. ॥३७४॥
प्रयत्न न करता सहजी जे धन मिळेल त्यातच सुख मानणे म्हणजे समाधान होय. ॥३७५॥
शुध्दतेचे दोन प्रकार बाह्यशुध्दी व अंतरशुध्दी माती व पाणी यांनी बाह्य शुध्दता, मन स्वच्छ करणे म्हणजे आतील शुध्दता होय. ॥३७६॥
वाचा, मन, शरीर, क्रिया यांच्या योगे स्तवन, जप, पूजन यांच्या मदतीने शिवाच्या ठिकाणी अढळ भक्ती म्हणजे ईशपूजा. ॥३७७॥
यमनियम सांगितले आता प्राणायाम ऐका- आपल्या शरीरात असलेले व्यान, समान, अपानादी वायू म्हणजे प्राण.त्याच्यावर वर्चस्व मिळविणे म्हणजे आयाम. ॥३७८॥
प्राणायामाचे तीन प्रकार उत्तम, मध्यम व अधम, प्राणायामाचे दोन प्रकार म्हणजे सगर्भ व अगर्भ. ॥३७९॥
१२ मात्रांचा प्राणसंरोध म्हणजे मंद प्राणायाम, २४ मात्रांचा मध्यम, तर ३६ मात्रांचा प्राणसंरोध हा उत्तम प्राणायाम होय. ॥३८०॥
घाम, थरकाप व धाप उत्पन्न करणारा व मानवाला उत्तम आनंद देणारा तो उत्तमोत्तम प्राणायाम होय. ॥३८१॥
सगर्भ विजय नावाच्या, सुनफा ही दुसरी संज्ञा असलेल्या प्राणायामाचा वापर फक्त योग्यांनाच सांगितला आहे. ॥३८२॥
व्याहृती, ओंकार, शिर यांसह तीनदा गायत्री मंत्राचा जप म्हणजे नाम प्राणायाम. ॥३८३॥
यतमानस योग्यांनी प्राणायामाचे रेचक, पूरक व कुम्भक हे तीन प्रकार सांगितले आहेत. ॥३८४॥
रेचक म्हणजे बाहेर उच्छ्‍वास टाकणे, त्याचे संयमन म्हणजे पूरक. साम्यवस्था म्हणजे कुम्भक. ॥३८५॥
स्वभावेकरुन विषयाच्या ठिकाणी रममाण होणार्‍या इंद्रियांचा विरोध म्हणजे प्रत्याहार. ॥३८६॥
हृदयकमळ, बेंबी , मस्तक किंवा मेंदूच्या ठिकाणी मन एकाग्र करणे म्हणजे धारणा होय. ॥३८७॥
देशस्थितीच्या आधारे वरच्या दिशेला जी वृत्ति संतति प्रत्यन्तरात निर्माण न होणारी तिला बुधजन ध्यान म्हणून जाणतात. ॥३८८॥
देशाश्रयविरहित एकाकार ती समाधी होय. अर्थामुळेच याची प्रतीती होते. हे उत्तम योगशासन होय. ॥३८९॥
१२ आयाम म्हणजे १ धारणा, १२ धारणा = १ ध्यान, १२ ध्यान म्हणजे १ समाधी होय. ॥३९०॥
स्वस्तिक, पद्म व अर्ध अशी तीन आसने सर्व साधनांमध्ये उत्तम साधने आहेत.॥३९१॥
दोन्ही मांडयावर दोन्ही पायाचे तळ ठेवून बसणे म्हणजे पद्मासन. हे उत्तम आसन होय. ॥३९२॥
दोन्ही पायाच्या पोटर्‍यावर दोन्ही पायाचे तळ ठेवून बसणे म्हणजे हे श्रेष्ठ स्वस्तिकासन. ॥३९३॥
एक पाय दुसर्‍या पायावर छातीला टेकून ठेवून बसणे म्हणजे अर्धासन. हे उत्तम आसन होय. ॥३९४॥
अयोग्य ठिकाणीं , अयोग्यवेळी, आगीजवळ, पाण्यांत आणि वाळलेल्या पाचोळ्यावर योग करु नये. ॥३९५॥
जन्तुव्याप्त मसणवट, जुना गोठा, चव्हाटा, आवाज करणारा वस्तूंचा पसारा, चौथरा, वारुळ, ॥३९६॥
अशुभ ठिकाणी, दुष्टांचा घोळका असताना, डासांचा उपद्रव, शरीरपीडा आणि मन प्रसन्न असता योग करु नये. ॥३९७॥
राखून ठेवलेल्या शुभकारक जागी, डोंगरातील गुहा, नदीकाठ, पुण्यप्रदेश, देऊळ, एकांत व जंतुरहित शुभ निवास येथे योगाचा अवलम्ब करावा. ॥३९८-९९॥
योगीन्द्र, शिष्य, विनायक, गुरु व मला नमन करुन योगाचा प्रारंभ करावा. ॥४००॥
स्वस्तिक, पद्म किंवा अर्ध आसनात बसून, नाकाच्या शेंडयावर नजर एकाग्र खिळवून, डोळे जरा उघडे ठेऊन (योग करावा). ॥४०१॥
भीती व मायामय विश्वाचा त्याग करुन शान्ततापूर्वक स्वत:च्या ठायी असलेल्या परमेश्वराचे ध्यान करावे. ॥४०२॥
शेंडीच्या वर बारा अंगुळे अन्तरावर एका कमळाची कल्पना करावी. हे धर्मरुपी कंदापासून उत्पन्न झालेले असून त्याला ज्ञानरुपी नाल आहे. ॥४०३॥
त्याला ऐश्वर्यरुपी आठ पाकळ्या आहेत. (सिध्दी) ते पांढरे असून त्याला वैराग्यरुपी कर्णिका आहे. कर्णिकेच्या ठिकणि हिरण्यमय, ईश्वराचे ध्यान करावे. ॥४०४॥
तो ईश्वर सर्वशक्तियुक्त , दिव्य, अविकारी, प्रणववाच्य, अव्यक्त, किरणज्वालायुक्त आहे. ॥४०५॥
तेथे निर्मल परम प्रकाश अक्षर कल्पून त्या ज्योतीच्या ठायी माझा भेद करुन स्वानन्द कल्पावा. ॥४०६॥
परमकारण ईशाचे कर्णिकेच्या मध्यभागी ध्यान करावे. तो आत्मा सर्वत्र जातो याशिवाय अन्य कुठलाही विचार करु नये. ॥४०७॥
हे गुह्यतम ज्ञान आहे. आता दुसरे ध्यान सांगतो. पूर्वी सांगितलेले उत्तम कमळ हृदयाचे ठिकाणी कल्पावे. ॥४०८॥
अग्रीप्रमाणे तेजस्वी आत्मा हा अरण्यस्वरुप असल्याचे व त्यामध्ये अग्रिज्वालाकार पंचवीस पुरुष असल्याचे कल्पावे. ॥४०९॥
त्यामध्ये परमात्मा हा आकाश कल्पावा. प्रणवबोधित चिरन्तन तत्त्व शिव होय. ॥४१०॥
परमज्योती अव्यक्त असून प्रकृतीमध्ये लीन आहे. त्यामध्ये आत्म्याचा आधार निरज्जन परमतत्व लीन आहे. ॥४११॥
सर्व तत्त्वे ओंकाराचे शुध्द करुन एकाग्र होऊन नित्य एकरुप महेश्वराचे ध्यान करावे. ॥४१२॥
ज्ञानरुपी पाण्याने आपले शरीर शुध्द करुन विमल परमपदाच्या ठायी आत्म्याची स्थापना करावी. ॥४१३॥
माझा आत्मा व माझे मन एकच होत असे म्हणून अग्नी व आदित्य एकच आहेत असे कल्पून अग्रिहोत्राची राख घेऊन सर्व शरीरावर उधळावी. ॥४१४॥
परंज्योतिस्वरुप ईशानाचे आपल्या आत्म्याच्या ठायी चिंतन करावे. हा पाशुपत योग जीवात्म्याचे बंधन दूर होण्यासाठी आहे. ॥४१५॥
हा सर्व वेदान्ताचा मार्ग आश्रमांच्या पलीकडे आहे असे वेदवचन आहे. माझ्याशी सायुज्य मिळवून देणारे हे परम गुह्यज्ञान आहे. ॥४१६॥
हे व्रत त्रैवर्णिक ब्रह्मचारी व भक्तांना सांगितले आहे.ब्रह्मचर्य , अहिंसा, सहनशीलता, शौच, तपश्चर्या, इंद्रियनिग्रह - ॥४१७॥
समाधान, सत्य, आस्तिक्य अशी या व्रताची अंगे आहेत यांतील एकादेही दोषयुक्त असले तरी व्रताचा भड होत नाही. ॥४१८॥
म्हणून आत्मगुणोपेत मनुष्य माझे व्रत आचरु शकतो. आसक्ती, भीती, कोप यांनी मुक्त मद्रूप होऊन माझा आश्रय करुन माझ्या भक्तीमुळे, अनेक या योगाने पवित्र झाले. जे जसे मला शरण येतात, त्याच भावनेने मी त्यांना वागवितो. ॥४१९-२०॥
म्हणून ईश्वर अशा मला ज्ञानयोग, भक्तियोग वा श्रेष्ठ अशा वैराग्ययोगाने भजावे. ॥४२१॥
भिक्षेवर जगून, परिग्रह न करता सर्व कर्मांचा त्याग करुन , शुध्द माणसाने ज्ञानयुक्त चित्ताने माझी भक्ती करावी. ॥४२२॥
त्या योगे माझ्याशी सायुज्य प्राप्त होते हे रहस्य मी सांगितले . सर्व प्राणिमात्रांचा व्देष न करणारा, त्यांच्याशी सख्य करणारा ममत्वरहित, अहंकाररहित, समाधानी, योगी, आत्मा वश असलेला, पक्का निश्चय असलेला, असा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥४२३-२४॥
ज्याचा लोकांना उबग येत नाही. ज्याला लोकांचा उबग येत नाही, मन व बुध्दीवर ताबा असलेला भक्त मला प्रिय आहे. ॥४२५॥
आनंद, क्रोध, भय, उव्देग यांनी मुक्त, निरपेक्ष, शुध्द, सावधान , उदासीन, व्यथाहीन भक्त मला प्रिय आहे. ॥४२६॥
सर्व कर्मांचा त्याग करणारा, मौनव्रती, कशानेही समाधानी असलेला भक्त मला प्रिय आहे. ॥४२७॥
घर नसलेला, स्थिरबुध्दी असा मलाच आश्रय समजून सर्व कर्मे सदा करणारा माझा भक्त माझ्याकडे येतो. ॥४२८॥
सर्व कर्मे माझ्या ठिकाणी सोपवून, माझा भक्त माझ्या कृपेने चिरंतन परमपद प्राप्त करतो. ॥४२९॥
आशारहित, ममत्वरहित, आश्रयरहित होऊन नेहमी समाधानी होऊन, कर्मफलाची आसक्ती सोडून मला एकटयाला शरण जावे. ॥४३०॥
आशारहित, मन व आत्म्यावर ताबा मिळविणारा, सर्व परिग्रहाचा त्याग करणार कर्मासाठी प्रवृत्त झाला तरी त्या कर्माचा त्याला लेप चढत नाही. ॥४३१॥
सहजपणे मिळणार्‍या वस्तूंवर समाधानी असलेला, रागव्देषरहित असा भक्त केवळ शरीरिक कर्मे करुनही ते पद प्राप्त करतो. ॥४३२॥
असा भक्त कर्मे जरी करीत असला तरी माझ्या कृपेने त्याच्या प्रपंचाचा नाश होतो. माझ्यामध्ये मन गुंतविणारा, मला वन्दन करणारा, माझी भक्ती करणारा मला आश्रय समजणारा योगिश्रेष्ठ- ॥४३३॥
मला महेश्वर समजून माझ्याकडेच येईल. परस्परांना जाणणारे मलाच ‘परंज्योति’ म्हणतात.॥४३४॥
नेहमी माझा नामोच्चार करणारे माझ्याशी सायुज्य पावतील. याप्रमाणे नेहमी उद्योगी असणार्‍यांचे कर्म सात्त्विक असते. ॥४३५॥
मी प्रकाशमान ज्ञानरुपी दिव्याने (अज्ञानरुपी) अंधार घालवितो. जे लोक माझ्या ठिकाणी बुध्दी ठेवून नेहमी पूजा करतात. ॥४३६॥
नित्याभियुक्त अशा त्यांचा निर्वाह मी करतो. जे भोगकर्माच्या इच्छेने इतर देवतांचे भजन करतात. ॥४३७॥
त्यांना त्या त्या देवतांनुसार तितकेच फळ प्राप्त होते. जे इतर देवतांचे भक्त इतर देवतांची पूजा करतात, ॥४३८॥
ते मनुष्य माझ्या भजनांत रत नसले तरी त्यांची सुटका होते म्हणून इतर सर्व विनाशी देवांचा सर्वस्वी त्याग करुन ॥४३९॥
महेश्वर अशा माझ्याच आश्रय केल्यास मानव परम पदास प्राप्त होतो. पुत्रादिकांची आसक्ती सोडून शोकरहित व परिग्रहहीन. ॥४४०॥
विरक्त होऊन मरणापर्यंत लिडरुप महेश्वराची पूजा करावी. जे सर्वस्वी भोगांचा त्याग करुन शिवलिडाची पूजा करतात. ॥४४१॥
त्यांना एकाच जन्मात परम पद मी देईन,  परमात्म्याचे लिड चांदीप्रमाणे चकाकणारे ॥४४२॥
ज्ञानरुप, सर्वगामी असून नेहमी योग्यांच्या हृदयांत राहाते. जे इतर इंद्रियनिग्रही भक्त विधिपूर्वक- ॥४४३॥
ते लिड कुठल्याही ठिकाणी कल्पून महेश्वराची पूजा करतात- पाणी, आग, आकाश, सूर्य किंवा इतरत्र- ॥४४४॥
रत्नादिकांच्या ठिकाणी लिड कल्पून महेश्वराची पूजा करावी. हे सर्व म्हणून लिडमय आहे . कुठेही लिडाच्या ठिकाणी महेश्वराची पूजा करावी. ॥४४५॥
क्रिया करणार्‍यांनी आग वा पाण्याच्या ठिकाणी मनन करणारांनी आकाश वा सूर्याच्या ठिकाणी लिड कल्पून पूजा करावी. ॥४४६॥
मूर्खांच्या बाबतीत शिवलिंड लाकूड वगैरे वस्तूंत असते. योग्यांच्या बाबतीत शिवलिडं हृदयांत असते. जर ज्ञान असेल, मन रिकामे असेल तर त्याने भक्तिपूर्वक- ॥४४७॥
जन्मभर ब्रह्म्याचे शरीर जो ओंकार त्याचा जप करावा. किंवा मरणापर्यंत शतरुद्रियाचा जप करावा. ॥४४८॥
तो एकटा, मन व आत्म्यास ताब्यात ठेवून परम पदास प्राप्त होईल. त्याने मरणापर्यंत समाधानपूर्वक काशीत रहावे. ॥४४९॥
तो देखील सर्व देहधार्‍यांच्या उत्क्रांत्तिकाळी महेश्वराच्या कृपेने परमपदास प्राप्त होतो. ॥४५०॥
माझा भक्त सर्व वर्ण व आश्रमाची कर्तव्ये करीत त्याला परम ज्ञान प्राप्त होते ज्यायोगे तो पाशमुक्त होतो.॥४५१॥
त्याच जन्मांत परम ज्ञान प्राप्त होऊन तो महेश्वरपदास प्राप्त होतो. तेथे जे पातकी नीच लोक असतात. ॥४५२॥
त्यांना महेश्वरकृपेने प्रपंच तरता येतो मात्र पापाने मनावर परिणाम झालेल्या लोकांच्या बाबतीत अडथळे येतात. ॥४५३॥
म्हणून हे व्दिजांनो मोक्षासाठी कर्तव्यांचा आश्र्य करावा हे वेदांचे रहस्य आहे. ते कोणाला शिकवू नये. ॥४५४॥
हे ज्ञान फक्त ब्रह्मचारी धार्मिक भक्तास द्यावे. याप्रमाणे महेश्वराने उत्तम योग सांगून ॥४५५॥
तिथे बसलेल्या निष्कलंक विष्णूस म्हटले ब्रह्मवादी लोकांच्या कल्याणाकरिता मी हे ज्ञान सांगितले. ॥४५६॥
आपण शान्तमनस्क शिष्यांना हे पवित्र ज्ञान द्यावे. अनादी परमेश्वर मग योगीन्द्रांना म्हणाले ॥४५७॥
हे ब्राह्मणश्रेष्ठांनो सर्व त्रैवर्णिक भक्त अशा शिष्यांना मी सांगितलेले ज्ञान यथाविधि आपण - ॥४५८॥
द्यावे आपण सर्व भक्तांना ते ज्ञान द्यावे अशी मी आज्ञा करतो. हा विष्णू आहे तोच महेश्वर आहे यात मुळीच संदेह नाही. ॥४५९॥
जे देवादेवांमध्ये भेद पाहात नाहीत त्यांना हे ज्ञान द्यावे. नारायण नावाचा देव माझा अवतार आहे. ॥४६०॥
हा अवतार सर्व भूतांच्या आत्म्याच्या ठायी आहे. अक्षरस्थ असून शान्त आहे. जे व्दैत मानणारे लोक मला भिन्न मानतात- ॥४६१॥
त्यांना मोक्ष मिळत नाही. ते पुन्हा जन्मतात. जे अव्यक्त विष्णू आणि महेश्वर अशा मला - ॥४६२॥
अव्दैतरुपाने पाहतात त्यांना पुनर्जन्म नाही. म्हणून आदी, अंत व व्यय अशा परमात्मा विष्णूला- ॥४६३॥
मी (म्हणजे महेश्वर) समजा व त्याप्रमाणे पूजा करा. मात्र जे मला व विष्णूला भिन्न देवता मानून भिन्नपणे पाहातात- ॥४६४॥
ते भीषण नरकात जातात. मी त्यांच्या ठायी रहात नाही. मूर्ख असो वा विव्दान्‍ असो, माझा आश्रय करणारा ब्राह्मण- ॥४६५॥
असो वा चाण्डाल असो तो जर विष्णूची निन्दा करणारा नसेल तर त्याला मी मोक्ष देतो. म्हणून माझ्या भक्तांनी महायोगी विष्णूची - ॥४६६॥
पूजा करावी , नमस्कार करावा ज्यायोगे मी संतुष्ट होईन. असे बोलून शिव विष्णूस मिठी मारुन - ॥४६७॥
त्या सर्वांच्या देखत अन्तर्धान पावला. भगवान विष्णू उत्तम तापसवेष घेता झाला. हे योग्यांनो आपण सर्वांचा त्याग करुन महेश्वराच्या कृपेने निर्मल सर्वश्रेष्ठ शुध्द ज्ञान (मिळवा.) महेश्वराचे ज्ञान प्रपंच दूर करणारे आहे. तापरहित होऊन महेश्वराच्या विशेष ज्ञानाप्रत जा. ॥४६८-७०॥
हे मुनिश्रेष्ठांनो धर्मप्रवण शिष्यांना प्रेरणा द्या. भक्त, शान्त, धर्मप्रवण, अग्रिहोत्री अशा लोकांना विशेष करुन ब्राह्मणास हे माहेश्वरज्ञान द्यावे. असे बोलून तो विश्वात्मा, योग्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगज्ञ महायोगी विष्णू अंतर्धान पावला. ऋषींनी (अन्तर्धान पावलेल्या) देवश्रेष्ठ शिवाला नमस्कार केला. ॥४७१-४७३॥
व भूतश्रेष्ठ विष्णूस नमस्कार केला व ते आपापल्या स्थानास गेले. भगवान्‍ संत महर्षी सनत्कुमार याने संवर्तास- ॥४७४॥
महेश्वराचे ज्ञान दिले. तोही सत्यत्वास प्राप्त झाला. सनन्दन योगीन्द्राने महर्षी पुलहास,- ॥४७५॥
पुलह प्रजापतीने गौतमास व अडिरसाने वेदवेत्या भारव्दाजास (माहेश्वर ज्ञान) दिले. ॥४७६॥
कपिलाने जेगीषव्य आणि पज्चशिखास (माहेश्वर ज्ञान दिले) माझा पिता, सर्वतत्वदर्शी पराशराने सनकमुनीकडून - ॥४७७॥
ते परममाहेश्वर ज्ञान प्राप्त केले.  पराशराकडून वाल्मीकीस ते परम माहेश्वर ज्ञान प्राप्त झाले. सतीचा पुत्र जो ईश्वर त्याने मला (माहेश्वर ज्ञान ) सांगितले. ॥४७८॥
शिवरुद्राने महायोगी वामदेवास (माहेश्वर ज्ञान ) दिले. देवकीपुत्र कृष्ण वा विष्णू भगवानाने - ॥४७९॥
स्वत:होऊन अर्जुनास हे उत्तम (माहेश्वर ज्ञान) दिले.(सतीचा पुत्र) वामदेव रुद्राकडून (माहेश्वर ज्ञान) मला मिळाले. ॥४८०॥
त्या काळापासून शिवाविषयी विशेषकरुन भक्ती माझ्या ठायी उत्पन्न झाली. मी विशेष करुन शिवरुद्रास शरण गेलो. ॥४८१॥
तुम्हीही भूतपती, गिरीश, स्थाणू, देवाधिदेव, त्रिशूलधारी शंकर, नन्दीवाहन अशा त्या देवाला -॥४८२॥
त्या महादेवाला बायकामुलांसहित शरण जा. त्याची कृपा जो कर्मयोग त्याने शंकराच्या (सेवेत) रहा. ॥४८३॥
महेश्वर, पशुपती, सर्पभूषण अशा शिवाची पूजा करा. असे बोलले गेल्यावर ते शौनकादी ऋषी महादेवास - ॥४८४॥
जो शाश्वत व स्थाणू आहे, त्यास नमस्कार करते झाले. प्रसन्नमनस्क होऊन सत्यवतीपुत्र कृष्णव्दैपायन व्यासप्रभूस म्हणाले. ॥४८५॥
जो व्यास साक्षात्‍ देव विष्णू आणि लोकेश्वर आहे - त्यास मुनी म्हणाले- (व्यासमहर्षे) आपल्या कृपेने शरणस्थानीय नन्दीवाहन (शिवाविषयी) एकनिष्ठ - ॥४८६॥
भक्ती जी की देवांना देखील दुर्मिळ आहे - आता उत्पन्न झाली आहे हे ऋषिश्रेष्ठ उत्तम कर्मयोग सांग. ॥४८७॥
ज्या योगे मोक्षेच्छूंना भगवान शिवाची उपासना करता येईल. सूतदेखील आपल्या उपस्थितीत आपले कथन ऐकतील. ॥४८८॥
त्याचप्रमाणे कूर्मावतारधारक देवाधिदेव विष्णूने सर्व लोकांचे पालन व धर्म वाढविणार जे सांगितले (ते देखील सांगा) ॥४८९॥
ऋषींनी असे विचारले असतां सत्यवतीपुत्र व्यासाने समुद्रमंथनाच्या समयी जो सनातन कर्मयोग इंद्राने - ॥४९०॥
सांगितला होता तो सर्व प्रसन्नचित्ताने ऋषींना सांगितला. महेश्वर शंकराचे सननत्कुमार वगैरेंशी झालेले संभाषण जो कोणी वाचतो- ॥४९१॥
तो सर्व पातकांपासून मुक्त होतो. ब्रह्मचर्ययुक्त पवित्र त्रैवर्णिकास (तो संवाद) ऐकवावा ॥४९२॥
जो त्याच्या अर्थाचे मनन करील त्याला परम गती प्राप्त होईल. जो भक्तिपूर्वक दृढव्रत होऊन (तो संवाद) नेहमी ऐकेल- ॥४९३॥
तो सर्व पातकांपासून मुक्त होऊन ब्रह्मलोकात प्रवेश पावेल. म्हणून सर्वप्रयत्नांनी विचारवंतांनी ( तो संवाद ) वाचावा. ॥४९४॥
विशेषकरुन ब्राह्मणांनी तो ऐकावा आणि अनुमोदन द्यावे. ॥४९५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP