श्रीरंगनाथस्वामीकृत श्रीगुरुगीता
मूळ संस्कृत ग्रंथाचे समश्लोकी रूपांतर
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसद्गुरुनिजानंदाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु परब्रह्म । तूं निर्विकल्प कल्पद्रुम । हरहृदयविश्रामधाम । निजमूर्ति राम तूं स्वये ॥१॥
तुझा अनुग्रह जया घडे । तयां नाहीं कांही सांकडें । दर्शने मोक्षद्वार उघडे । तुझेनि पडिपाडें तूंचि तूं ॥२॥
कोणे एके दिवसीं श्रीसदाशिव कैलाईं । ध्यानस्थ असे तो मानसीं । पुसे तयासी पार्वती ॥३॥
जयजया जी परात्परा । जगद्गुरु कर्पूरगौरा । गुरुदीक्षा निर्विकारा । श्रीशंकरा मज देई ॥४॥
कवणें मार्गे जी स्वामी । जीव परब्रह्म होती तें मी । पुसतसें तरी सांगुजे तुम्हीं । अंतर्यामीं कळे ऐसें ॥५॥
कृपा करावी अनाथनाथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । नासोनिया भवव्यथा । कैवल्य - पंथा मज दावीं ॥६॥
ईश्वर म्हणे वो देवी । तुझी आवडी मातें वदवी । लोकोपकारक प्रश्न पूर्वीं । देवीं दानवीं जो न केला ॥७॥
तरी दुर्लभ या त्रिभुवनांत । तें तूं ऐके वो सुनिश्चित । सद्गुरु ब्रह्म सदोदित । सत्य सत्य वरानने ॥८॥
वेद शास्त्र पुराणा । मंत्रतंत्रादि विद्या नाना । करितां तीर्थव्रततप - साधना । भवबंधमोचना न पावती ॥९॥
शैव शाक्त आगमादिकें । अनेक मतें अपभ्रंशकें । समस्त जीवां भ्रांतिदायकें । मोक्षप्रापकें नव्हतींच ॥१०॥
जया चाड पराभक्ति । तेणें सद्गुरु सेवावा एकांतीं । गुरुतत्त्व न जाणती । मूढमती जन कोणी ॥११॥
होवोनी निःसंशय । सेवावे सद्गुरुपाय । भवसिंधु तरणोपाय । तत्काळ होय जडजीवां ॥१२॥
गूढ अविद्या जगन्माया । अज्ञान संहारित जीवा या । मोहांधकारा गुरुसूर्या - । सन्मुख यावया मुख कैचें ॥१३॥
जीव ब्रह्मत्त्व त्याचिये कृपा । होते,ए निरसुनी सर्व पापा । सद्गुरुस्वयंप्रकाशदीपा । शरण निर्विकल्पा रिघावें ॥१४॥
सर्व तीर्थांचें माहेर । सद्गुरुचरणतीर्थ निरंतर । सद्भावें सच्छिष्य नर । सेवितां परपार पावले ॥१५॥
शोषण पापपंकाचें । ज्ञानतेज करी साचें । वंदितां चरणतीर्थ सद्गुरूचें । भवाब्धीचें भयकाय ॥१६॥
अज्ञानमूलहरण । जन्मकर्मनिवारण । ज्ञानसिद्धीचे कारण । गुरुचरण - तीर्थ तें ॥१७॥
गुरुचरणतीर्थ प्राशन । गुरुआज्ञा उच्छिष्टभोजन । गुरुमूर्तींचे अंतरीं ध्यान । गुरुमंत्र वदनीं जपे सदा ॥१८॥
गुरुसान्निध्य तो काशीवास । जान्हवी चरणोदक निःशेष । गुरु विश्वेश्वर निर्विशेष । तारकमंत्र उपदेशिता ॥१९॥
गुरुचरणतीर्थ पडे शिरीं । प्रयागस्नान तें निर्धारीं । गयागदाधर सबाह्यांतरी । सर्वांतरीं साधका ॥२०॥
गुरुमूर्ति नित्य स्मरे । गुरुनाम जपे आदरें । गुरुआज्ञापालक नरें । नेणिजे दुसरें गुरुविना ॥२१॥
गुरुस्मरण मुखीं राहे । तोचि ब्रह्मरूप पाहे । गुरुमूर्त्ति ध्यानीं वाहे । जैशी कां हे स्वैरिणी ॥२२॥
वर्णाश्रमधर्म सत्कीर्ति । वाढवावी सद्वृत्ति । अन्यत्र त्यजोनियां गुंती । सद्गुरुभक्ति करावी ॥२३॥
अनन्यभावें गुरूसी भजतां । सुलभ परमपद तत्त्वतां । तस्मात्सर्वप्रयत्नें आतां । सद्गुरुनाथा आराधीं ॥२४॥
गुरुमुखीचे महावाक्य - बीज । गुरुभक्तिस्तव लाभे सहज । त्रैलोक्यीं नाचे भोज । तो पूज्य होय सुरनरां ॥२५॥
गुकार तो अज्ञानांधकार । रुकार वर्ण तो दिनकर । स्वयंप्रकाशतेजासमोर । न राहे तिमिर क्षणभरीं ॥२६॥
प्रथम गुकार शब्द । गुणमयी मायास्पद । रुकार तो ब्रह्मानंद । करी विच्छेद मायेचा ॥२७॥
ऐसें गुरुपद श्रेष्ठ । देवां दुर्लभ उत्कष्ट । गणगंधर्वादि वरिष्ठ । महिमा स्पष्ट नेणती ॥२८॥
शाश्वत सर्वां सर्वदाही । गुरुपरतें तत्त्व नाहीं । कायावाचेमनें पाहीं जीवित तेंहि समर्पावें ॥२९॥
देहादिभुवनत्रय समस्त । इतर पदार्थ नाशिवंत । वंचोनियां विमुख होत । अधःपात घडे तया ॥३०॥
म्हणोनि आराधावा श्रीगुरु । करोनि दीर्घदंड नमस्कारु । निर्लज्ज होऊनियां परपारु । भवसागरु तरावा ॥३१॥
‘ आत्मदारादिकं चैव ’ । निवेदन करूनि सर्व । हा नाही जयां अनुभव । तयांस वाटे अभिनव वरानने ॥३२॥
जे संसारवृक्षारूढ झाले । पतन नरकार्णवीं पावले । ते गुरुरायें उद्धरिले । सुखी केले निजभजनीं ॥३३॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव । गुरुरूप तें स्वयमेव । गुरु परब्रह्म सर्वथैव । गुरुगौरव न वर्णवे ॥३४॥
अज्ञानतिमिरें अंध । ज्ञानांजनशलाका प्रसिद्ध । दिव्य चक्षु शुद्धबुद्ध । महानिधि दाखविला ॥३५॥
अखंड मंडलकार । जेणें व्यापिलें चराचर । तय पदीं केले स्थिर । नमस्कार तया गुरुवर्या ॥३६॥
श्रुतिसार शिरोरत्न । चरणांबुज परम पावन । वेदांतकमलिनीचिद्भानु । तया नमन गुरुवर्या ॥३७॥
ज्याचे स्मरणमात्रें ज्ञान । साधकां होय उत्पन्न । ते निजसंपत्ति जाण । दिधली संपूर्ण गुरुरायें ॥३८॥
चैतन्य शाश्वत शांत । नित्य निरंजन अच्युत । दानबिंदुकलातीत । नमन प्रणिपात गुरुवर्या ॥३९॥
ज्ञानशक्तिसमारूढ । तत्त्वमाला - भूषित दृढ । भुक्तिमुक्तिदाता प्रौढ । सद्गुरु गूढ सुखदानीं ॥४०॥
अनेक जन्मीचें सुकृत । निरहंकृति निर्हेत । तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरुहस्त मस्तकीं ॥४१॥
जगन्नाथ जगद्गुरु एक । तो माझा स्वामी देशिक । ममात्मा सर्वभूतव्यापक । वैकुंठनायक श्रीगुरु ॥४२॥
ध्यानमूल गुरुराय । पूजामूल गुरुपाय । मंत्रमूल निःसंशय । मोक्षमूल गुरुकृपा ॥४३॥
सप्तसिंधु अनेक तीर्थीं । स्नानें पानें जे फलप्राप्ती । एक बिंदूसम न पवती । सद्गुरुचरणतीर्थाच्या ॥४४॥
ज्ञानेंवीण सायुज्जपद । अलभ्य लाभे अगाध । सद्गुरुभक्तीनें प्रबोध । स्वतःसिद्ध पाविजे ॥४५॥
सद्गुरुहूनि परात्पर । नाहीं नाहीं वो साचार । ‘ नेति ’ शब्दें निरंतर । श्रुतिशास्त्रें गर्जती ॥४६॥
मदाहंकार - गर्वेंकरूनी । विद्यातपबळान्वित्य होवोनि । संसारकुहारावर्ती पडोनि । नाना योनी भ्रमताति ॥४७॥
न मुक्त देवगणगंधर्व । न मुक्त यक्षचारणादि सर्व । सद्गुरुकृपेनें अपूर्व । सायुज्यवैभव पाविजे ॥४८॥
ऐके वो देवी ध्यानसुख । सर्वानंदप्रदायक । मोहमायार्णवतारक । चित्सुखकारक श्रीगुरु ॥४९॥
ब्रह्मानंद परमाद्भुत । ज्ञानबिंदु - कलातीत । निरतिशयसुख संतत । साक्षभूत सद्गुरु ॥५०॥
नित्य शुद्ध निराभास । नित्यबोध चिदाकाश । नित्यानंद स्वयंप्रकाश । सद्गुरु ईश सर्वांचा ॥५१॥
हृदयकमळीं सिंहासनीं । सद्गुरुमूर्ति चिंतावी ध्यानीं । श्वेतांबर दिव्यभूषणीं । चिद्रत्नकिरणीं सुशोभित ॥५२॥
आनंदमानंदकर प्रसन्न । ज्ञानस्वरूप निजबोध - पूर्ण । भवरोगभेषज जाण । सद्वैद्य चिद्धन सद्गुरु ॥५३॥
सद्गुरुपरतें अधिक कांहीं । आहे ऐसा पदार्थ नाहीं । अवलोकितां दिशा दाही । न दिसे तिहीं त्रिभुवनीं ॥५४॥
प्रज्ञाबळें प्रत्योत्तर । गुरूसी विवादती जे नर । ते भोगिती नरक घोर । यावच्चंद्रदिनमणीं ॥५५॥
अरण्य निर्जल स्थानीं । भ्रमती ब्रह्मराक्षस होवोनी । गुरूसी बोलती उद्धट वाणी । एकवचनी सर्वदा जे ॥५६॥
क्षोभतां देव ऋषि काळ । सद्गुरु रक्षी न लागतां पळ । दीनानाथ दीनदयाळ । भक्तवत्सल सद्गुरु ॥५७॥
सद्गुरूचा क्षोभ होतां । देव ऋषिमुनि तत्त्वता । रक्षिती हे दुर्वार्ता । मूर्खही सर्वथा नायकती ॥५८॥
मंत्रराज हे देवी । ‘ गुरु ’ हीं दोनी अक्षरें बरवीं । वेदार्थवचनें जाणावीं । ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥५९॥
श्रुतिस्मृति न जाणती । ( परी ) गुरुभक्तीची परम प्रीति । ते संन्यासी निश्चितीं । इतर दुर्मति वेषधारी ॥६०॥
नित्य ब्रह्म निराकार । निर्गुणबोध परात्पर । तो सद्गुरु पूर्णावतार । दीपासि दीपांतर नाही जैसें ॥६१॥
गुरुकृपाप्रसादें । निजात्मदर्शन स्वानंदे । पावोनियां पूर्ण पदें । पेलती दोंदे मुक्तिसी ॥६२॥
आब्रह्मस्तंबपर्यंत । स्थावरजंगमादि पंचभूतें । सच्चिदानंदाद्वय अव्यक्त । अव्युतानंत सद्गुरु ॥६३॥
परात्परतर ध्यान । नित्यानंद सनातन । हृदयीं सिंहासनीं बैसवून । चित्तीं चिंतन करावें ॥६४॥
अगोचर अगम्य सर्वगत । नामरूपविवर्जित । निःशब्द जाण निभ्रांत । ब्रह्म सदोदित पार्वती ॥६५॥
अंगुष्ठमात्र पुरुष । हृदयी ध्यातां स्वप्रकाश । तेथ स्फुरती भाव - विशेष । निर्विशेष पार्वती ॥६६॥
ऐसें ध्यान करितां नित्य । तादृश होय सत्यसत्य । कीटकीभ्रुकुटीचे निमित्य । तद्रूप झाली ते जैशी ॥६७॥
अवलोकितां तयाप्रति । सर्वसंगविनिर्मुक्ति । एकाकी निःस्पृहता शांति । आत्मस्थितीं रहावें ॥६८॥
सर्वज्ञपद त्या बोलती । जेणें देहीं ब्रह्म होती । सदानंदें स्वरूपप्राप्ति । योगी रमती पैं जेथे ॥६९॥
उपदेश होतां पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ति । ह्मणौनि करावी गुरुभक्ति । हें तुजप्रति बोलतसें ॥७०॥
जें मी बोलिलों तुज । जे गुजाचें निजगुज । लोकोपकारक सहज । हें तूं बुझ वरानने ॥७१॥
लौककि कर्म तें हीन । तेथें कैचे आत्मज्ञान । गुरु - भक्तासी समाधान । पुण्यपावन ऐकतां ॥७२॥
एवं या भक्तिभावें । श्रवणें पठणें मुक्त व्हावें । ऐसें बोलतां सदाशिवें । डोलती अनुभवें गुरुभक्त ॥७३॥
गुरुगीता हे देवी । शुध तत्त्व पूर्णपदवी । भवव्याधिविनाशिनी स्वभावी । स्वयमेव देवि जपे सदा ॥७४॥
गुरुगीतेचें अक्षर एक । मंत्रराज हा सम्यक । अन्यत्र मंत्र दुःखदायक । मुख्य नायक हा मंत्र ॥७५॥
अनंत फळें पावविती । गुरुगीता हे पार्वती । सर्वपाप - विनिर्मुक्ति । दुःखदारिद्र्यनाशिनी ॥७६॥
कालमृत्युभयहर्ती । सर्वसंकटनाशकर्ती । यक्ष - राक्षस - प्रेतभूतीं । निर्भय वृत्ती सर्वदा ॥७७॥
महाव्याधिविनाशिनी । विभूतिसिद्धिदायिनी । अथवा वशीकरण मोहिनी । पुण्यपावनी गुरुगीता ॥७८॥
कुश अथवा दूर्वासन । शुभ्र कंबल समसमान । एकाग्र करूनिया मन । सद्गुरुध्यान करावें ॥७९॥
शुक्ल शांत्यर्थ जाण । रक्तासनें वशीकरण । अभिचारीं कृष्णवर्ण । पीतवर्ण धनागमीं ॥८०॥
शांत्यर्थ उत्तराभिमुख । वशीकरणा पूर्व देख । दक्षिण मारण उल्लेख । धनागमा मुख पश्चिमे ॥८१॥
मोहन सर्व भूतांसी । बंधमोक्षकर विशेषीं । राजा वश्य निश्चयेंसीं । प्रिय देवांसी सर्वदा ॥८२॥
स्तंभनकारक जप । गुणविवर्धन निर्विकल्प । दुष्कर्मनाशक अमूप । सुखस्वरूप सनातन ॥८३॥
सर्वशांतिकर विशद । वंध्यापुत्र - फलप्रद । अवैधव्य सौभाग्यप्रद । अगाध बोध जपतां हे ॥८४॥
आयुष्य आरोग्य ऐश्वर्य । पुत्रपौत्र धैर्यौदार्य । विधवा जपतां परमाश्चर्य । मोक्षैश्वर्य पावती ॥८५॥
अवैधव्याची कामना । धरितां पूर्ण होय वासना । सर्व दुःखभयविघ्ना । पासोनि सुजना सोडवी ॥८६॥
सर्वबाधाप्रशमनी प्रत्यक्ष । धर्मार्थकाममोक्ष । जें जें चिंतिलें तो पक्ष । गुरुदास दक्ष पावती ॥८७॥
कामिकां कामधेनु गाय । कल्पिती तया कल्पतरु होय । चिंतिती त्या चिंतामणिमय । मंगलमय सर्वांसी ॥८८॥
गाणपत्य शाक्त सौर । शैव वैष्णव गुरु किंकर । सिद्धी पावती सत्वर । सत्य सत्य वरानने ॥८९॥
संचारमलनाशार्थ भवबंधपाशनिवृत्त । गुरुगीतास्नानें सुस्नात । शुचिर्भूत सर्वदा ॥९०॥
आसनीं शयनीं गमनागमनीं । अश्व गज अथवा यानीं । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं । पढतां होय ज्ञान गुरुगीता ॥९१॥
गुरुगीता पढतां भक्त । सर्वदा तो जीवन्मुक्त । त्याच्या दर्शनें पुनीत । पुनर्जन्म न होत प्राणियां ॥९२॥
अनेक उदकें समुद्रउदरीं । नानावर्णा धेनू क्षीर क्षीरीं । अभिन्नरूपें निर्धारीं । सर्वांतरीं एकचि ॥९३॥
घटाकाश मठाकाश । उपाधिभेदें भिन्न वेष । महादाकाश निर्विशेष द्वैताचा लेश नाढळे ॥९४॥
भिन्न भिन्न प्रकृति । कर्मवेषें दिसती आकृति । घेऊनि जीवनपणाची बुंथी । विविध भासतीं नामरूपें ॥९५॥
नाना अलंकारीं सुवर्ण । तैसा जीवात्मा पूर्ण । तेथें नाहीं वर्णावर्ण । कार्यकारणातीत तें ॥९६॥
या स्वानुभवें गुरुभक्त । वर्तती ते जीवन्मुक्त । गुरु रूप ते वेदोक्त । जे कां विरक्त सर्वस्वें ॥९७॥
अनन्यभावें गुरुगीता । जपतां सर्व सिद्धि तत्त्वतां । मुक्तिदायक जगन्माता । संशय सर्वथा न धरीं तूं ॥९८॥
सत्य सत्य हें वर्म । मी बोलिलों सर्व धर्म । नाही गुरुगीतेसम । तत्त्व परम सद्गुरु ॥९९॥
एक देव एक जप । एक निष्ठा परंतप । सद्गुरु परब्रह्मस्वरूप । निर्विकल्प कल्पतरु ॥१००॥
माता धन्य पिता धन्य । याति कुल वंश धन्य । धन्य वसुधा देवी धन्य । धन्य धन्य गुरुभक्ति ॥१०१॥
( गुरुपुत्र अपंडित । जरी मूर्ख तो सुनिश्चित । त्याचेनि सर्व कार्यसिद्धि होय । सिद्धांत हा वेदवचनीं ॥१०२॥ )
शरीर इंद्रिये प्राण । दारा - पुत्र - कांचन - धन । श्रीगुरुचरणांवरून । वोवाळून सांडावे ॥१०३॥
आकल्प जन्म कोडी । एकाग्रमनें जपतां प्रौढी । तपाची हे फळजोडी । गुरूसी अर्धघडी विमुख नोहे ॥१०४॥
ब्रह्मादिक देव समर्थ । त्रिभुवनीं वंद्य यथार्थ । गुरुचरणोदकावेगळें व्यर्थ । अन्य तीर्थ नीरर्थक ॥१०५॥
सर्व तीर्थांत तीर्थ श्रेष्ठ । श्रीगुरुचरणांगुष्ठ । निवारी संसारकष्ट । पुरवी अभीष्ट इच्छिलें ॥१०६॥
हें रहस्यवाक्य तुजपुढें । म्यां कथिलें निजनिवाडे । माझेनि निजतत्त्व गौप्य उघडें । करूनि वाडेकोडें दाखविलें ॥१०७॥
मुख्य गणेशादि वैष्णव । यक्ष - किन्नरगणगंधर्व । तयांसही सर्वथैव । हें अपूर्व न वदें मी ॥१०८॥
अभक्त वंचक धूर्त । पाखंडी नास्तिक दुर्वृत्त । तयांसी बोलणें अनुचित । हा गुह्यार्थ पै माझा ॥१०९॥
सर्व शास्त्रांचे मथित । सर्ववेदांतसंमत । सर्व स्तोत्रांचा सिद्धांत । मूर्तिमंत गुरुगीता ॥११०॥
सकल भुवनें सृष्टि । पाहतां व्यष्टि समष्टि । मोक्षमार्ग हा दृष्टी । चरणांगुष्ठीं सद्गुरूच्या ॥१११॥
उत्तरखंडीं स्कंदपुराणीं । ईश्वरपार्वती संवाद वाणी । गुरुगीता ऐकतां श्रवणी । विश्वतारिणी चिद्गंगा ॥११२॥
हे गुरुगीता नित्य पढे । तया सांकडें कवण पडे । तत्काळ मोक्षद्वार उघडे । ऐक्य घडे शिवस्वरूपीं ॥११३॥
हे न म्हणावी प्राकृत वाणी । केवळ स्वात्मसुखाची खाणी । सर्व पुरवी शिराणी । जैसा वासरमणि तम नाशी ॥११४॥
श्रोतयां वक्तयां विद्वज्जनां । अनन्य - भावें विज्ञापना । न्यूनपूर्ण नाणितां मना । क्षमा दीनावरी कीजे ॥११५॥
हे गुरुगीतेची टीका । न म्हणावी जे पुण्यश्लोका । पदपदार्थ पाहतां निका । दृष्टीं साधकां दिसेना ॥११६॥
आवडीची जाती वेडी । वाचे आलें तें बडबडी । मूळ ग्रंथ कडोविकडी । न पाहतां तातडी म्यां केली ॥११७॥
नाही व्याकरणीं अभिनिवेश । नाहीं संस्कृतीं प्रवेश । धीटपणें लिहितां दोष । गमता विशेष मनातें ॥११८॥
परी सलगी केली पायासवें । तें पंडितजनीं उपसहावें । उपेक्षा न करूनि सर्वभावें । अवधान द्यावें दयालुत्वें ॥११९॥
विकृतिनाम संवत्सरीं । भाद्रपदमासीं भृगुवासरीं । वद्य चतुर्थी नीरातीरीं । ग्रंथ केला समाप्त ॥१२०॥
अनंदसांप्रदाय वंशोद्भव । माध्यंदिनशाखा अभिनव । गुरुगीतेचा अनुभव । हृदयीं स्वयमेव प्रगटला ॥१२१॥
सहजपूर्ण निजानंदें । रंगला जो साधुवंदें । श्रवण करावा स्वच्छंदे । ग्रंथ निर्द्वंद्व गुरुगीता ॥१२२॥
इति श्रीगुरुगीता संपूर्णा ॥ श्रीसद्गुरुनिजानंदार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ ॐ तत्सत् ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2017
TOP