मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
निर्धारयोग

आदिखंड - निर्धारयोग

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥ सर्वबोधा इमे नित्या माया तत्त्वैकरुपिणी ॥
॥ चिरास्तरंगकगणा जलसंकलिता यथा ॥१॥
जैं बोध होय निर्मळ । तैं देखीजे आत्ममय सकळ। कां जे आत्मयावेगळ । कांहि चि नसे ॥१॥
जैसें जळीं चित्राकार । तरंग दिसती अपार । तेवि हे चराचर । परब्रह्मीं ॥२॥
असें जो देखे नयनीं । तो चि देवरुप मेदिनीं । या चि मनुष्या माजि तिनी । प्रकृति असती ॥३॥
देवी मानुवी आसुरी । या प्रकृतिं त्ति प्रकारी । दाखवुं मनुष्या माझारीं । वोळखी याचि ॥४॥
शांति धर्मु सुशीलता । उपकारी परहिता । तीर्थ भजन व्रतां । नेमां आचरे ॥५॥
वेद शास्त्राचे आधारे । नित्यें नैमित्ये आचरे । दैवीप्रकृति निर्धारें । जाणावी ते ॥६॥
जन बुध्दि व्यापार । आहार व्यवहार निरंतर । समकर्मि चातुर । मानवी ते ॥७॥
क्रुर दुष्ट घातक हिंसी । ते प्रकृती राक्षसी । या मनुष्या माजीचि परीयेसी । देवदैत्य मानवी ॥८॥
सत्कर्मी ते देव । समकर्मि मानव । असत्कर्मी दानव । वोळखावे ॥९॥
हें असो जो देवो सच्चिदानंदु । ईश्वरु पूर्ण अभेदु । तो मिंपणें व्दिविधु । आपणचि जाला ॥१०॥
तेथ महत्तत्व प्रगटले । ते अहंकार त्रया प्रसवले । या पासाव उठले । पिंड ब्रह्मांड हें ॥११॥
या माजी प्रमाण । कपील महामुनिचें वचन । जे देवाचे आज्ञे पासुन । माया कर्तीं ॥१२॥
प्रकृतिसी पुरुषाची आज्ञा । केली बहुविध संज्ञा । तें येका सारिखें सर्वज्ञा । येक नसे ॥१३॥
पाहे पां वन तरु फळें शीळा । नाना यां जीवां सकळा । पाहातां येका सारिखें डोळां । येक ही न दिसे ॥१४॥
हें सम कोण देखे । परि मुख ही नाहि सारिखें । पत्रें पुष्पें हि येक मुखें । असती चि ना ॥१५॥
जरि देवो मुखें बोलतां । तरि नेणों काय करिति हे जनितां । संज्ञेस्तव भिन्नता । दाविली असी ॥१६॥
बहुधा भिन्न भिन्न । हें प्रकृतिचें लक्षण । तर्‍हिं देवाचें येकपण । चळे ना ढळे ॥१७॥
तंव शिष्यें बोलिलें । गोसावि हें निरुपीलें । आह्मिं पुराणी आइकीलें । तें अनुसारिखे ॥१८॥
कोण्हा येकाचें मत । काश्यपा पासाव समस्त । कोण्हा येकाचें प्रणित मन्वादि सृष्टि ॥१९॥
कोण्हा येकां पुराणीं । देवाचां पांचा वदनी । यें सृष्टी येषणी । रचली असे ॥२०॥
किं सृष्टि निर्मिता गोविंदु । हा हि बोलु प्रसिधु । किं सृष्टिकर्मि सन्मधु । चतुरानन ॥२१॥
असी नानाविध बोलणीं । आह्मीं आइकुं श्रवणीं । गोसावी सांगितले पूर्वि चि होउनि । रचले सर्व ॥२२॥
तरि हें किं तें साच असा । संदेह पडला मानसा । तवं येरु ह्मणें तुझा भर्वस । कळला येथें ॥२३॥
आरे सांडोनि परमार्थगंगा । झोंबतासी भेदतरंगा । सांडोनि पूर्णस्थिति कां गा । हे प्रति घेतली ॥२४॥
असों हें तुवां पुसीलें । ते हि सांगिजैल भलें । आरें हें सर्व ही रचलें । एकेचि वेळें ॥२५॥
ग्रह चंद्रादित्य मुख्य । तारांगणें किंन्नर यक्ष । महोरग जे जे दक्ष ।शेषादिक ॥२६॥
मनु महर्षि गंधर्व । लोकपाळ ब्रह्मादिक देव । हे उत्पन्न जाले सर्व । ते चि दिसीं ॥२७॥
स्वर्गे पाताळें लोकस्थानें । व्दिपें खंडें भुवनें । गिरीकंदरें वनें । समुद्र सरिता ॥२८॥
माये पासुनि येथवरी । तुज सांगितली भरोवरी । हें येकें चि वेळें निर्धारी । रचलें सर्व ॥२९॥
माया देह महाकारण । येथीचें जे जें लक्षण । तें जालें उत्पन्न । येकें चि वेले ॥३०॥
या पासाव अहंकारु । जो जो त्रिपुटी विवरु ।तो ही जाला आकारु ।येकें चि वेळे ॥३१॥
तेथूनि हिरण्यगर्भ देहलिंग । सुर इंद्रियेम जेथिचें जेथिचें भाग । ते हि जाले चांग । येके चि वेळें ॥३२॥
या वरीं चौथा देहो विराटु । जो थूळरुप घनवटु । हा ही जाला प्रगटु । येकें चि वेळें ॥३३॥
हें ब्रह्मांड समुदाइक । देवाचे देह सकळैक । येका वेगळें येक । जालें नाहिं ॥३४॥
प्रथम आमचें शरीर । आले गर्भा बाहिर । त्या वेगळें काय येर । जालें सांग ॥३५॥
ब्रह्येयाचां दिनांति । एकार्णव होय क्षिति । तेथूनि देखे उत्पत्ति । पुराण तें ॥३६॥
ज्यासी थापावें जेणें । तें चि मूळ करुनि मानावें तेणें । यास्तव तें पुराणें । आखरिके ॥३७॥
जें हिरण्यगर्भाचि इंद्रियें । मुख्य करुन देवत्रय । तया अखंड कार्य । सृष्टी रचनेचे ॥३८॥
भूतें रचिलीं प्रजापतिं । तया नसावीं विश्रांती । तें रक्षीं श्रीपति । पालन धर्में ॥३९॥
संहारा नेंमला रुद्रु । पक्षातें चाळी चंद्रु । राज्यधर्मी इंद्रु । निरंतर ॥४०॥
सूर्यें चालावें दिनमान । यमें करावें भूतभक्षण । पावकें दहन । कर्म करावें ॥४१॥
मदनें चेतवावें भूतें । वन रचावें वसंतें । असे व्यापार देवाते । नेमले असती ॥४२॥
हे जैं सुखातें इच्छिति । क्षणेक विश्रांति विसावती । तैं तोचि कर्मलोपु क्षिति । होउं पाहे ॥४३॥
असे आपुलाले व्यापार । ये हीं चालवावें निरंतर । आतां आईक उत्तर । एकार्णवीचे ॥४४॥
नित्य प्रलयो ब्रह्म दिनु । त्या ब्रह्मयांचे जागृतिपासुनु । सप्त ऋषि च्यार्‍हि मनु । सृष्टिकर्ते ॥४५॥
दिनांत प्रलय निरासी । भूतां व्यक्ति होणें असी । श्रध्दा उपजे ज्यासी । तो चि कर्ता ॥४६॥
जै ब्रह्मयांचि विस्मृती । तै एकार्णव होय क्षिति । जे ब्रह्मयांचि सुषुप्ती । तो दिनांत प्रळय ॥४७॥
जो या देवाचा नाशु । तो महाप्रलय विभंसु । या पुढिला कथनी रसु । आणिजैल हा ची ॥४८॥
या ब्रह्मांडा प्रळय च्यारी । पिंडा प्रळय याचि परी । तें हें असेंचि चातुरीं । वोळखावें ॥४९॥
जागृति लयो होत । थूळविकारें अचेत । लिंग स्वप्रें वर्त्तत । हा प्रथम प्रळय ॥५०॥
तो स्वप्र जागृतिसीं सरे । थूळ लिंग व्यापारु पुरे । तो निद्रा प्रलय चातुरें । वोळखावा ॥५१॥
जो देहासी क्षयो । तो जीवां महाप्रळयो । पण महाकारणी ठावो । असे तया ॥५२॥
कां जें माये अविद्येचेंनि संगे । जीवु संसारीं रीगे । याचा ही प्रळयो तै त्या उगे । जन्म मरण ॥५३॥
तरि गा सृष्टीचां अंति । जीव ब्रह्मिं लय पावति । कां ब्रह्मज्ञानें होती । ब्रह्ममय ॥५४॥
जेवि सृष्टिचिं सर्व लवणें । एकार्णवीं होतिं लीनें । अथवा जळसन्निधानें । द्रवत ते ॥५५॥
तेवि महत्प्रळयीं जीवत्व नुरे । कां ब्रह्मज्ञानें ब्रह्मीं मुरे । तैं चि यातायत सरे । वासनामये ॥५६॥
ज्या कल्पातिंच्या गोष्टी । कोण लागे त्याचे पाठीं । ज्ञानप्रळयो दीठी । प्रत्यक्ष दिसे ॥५७॥
तो हा प्रळयो श्रेष्ट असा । सरे जीवाचि जीवदशा । तैं भोगावया गर्भवासाअ । कोण उरे ।५८॥
असो या प्रळयाचे परी । लयस्थानें आहाति च्यारी । हे हिं प्रांजळ कुसरी । करुंनि देवों ॥५९॥
हें पिंडा लया जाति । येथे चि इंद्रियें फांकति । तें ब्रह्मांडी मिळती । जेथिची तेथें चि ॥६०॥
ब्रह्मांडा लयो ऊँकारीं । तो ही असे याची परी । हारपती तत्वें निर्धारीं । उत्पन्न स्थानीं ॥६१॥
ऊँकार त्रिपुटी सहितु । महब्रह्मीं होय शांतु । हा लयो साक्षांतु । तीजा असे ॥६२॥
ते माया या चि परी । लय पावे ईश्वरीं । एवं लय स्थानें च्यारी । वोळखावीं ॥६३॥
येथवरी उत्पत्ति नाशु । असा जाण तुं विश्वासु । यास्तव ज्ञानप्रळय सुर्सु । बहुतांमध्ये ॥६४॥
परी गा श्रीगुरु वाचुनु । हा प्रळयो नेणें जनु । तो जाणावया आनु । प्रकारु नसे ॥।६५॥
ज्यासी गुरुकृपा नाहीं । तो ज्ञानप्रळय नेणें कांहीं । तेणें भ्रमका असें पाहिं । भ्रमावें चित्ते ॥६६॥
ज्यासी नसे जननीं । त्यासी सर्व ही सीराणि । ते बहुतांचां वाहानि । धावे चि तो ॥६७॥
समूळ निर्धनु संसारीं । तो चि हिंडे घरोघरीं । तेवि सद्रुरुवांचुनि सर्वाचारीं । झोंबे पुरुषु ॥६८॥
पन्यांगनेचा सुतु । पितु नेणें शाश्वतू । तेवि प्रपंचरतु । नेण वस्तु ॥६९॥
हो कां कोटिचें भूषण । परि न करावे घ्राणाअत्सादन । ते क्षत घ्राण वांचुन । दुजा ने घे ॥७०॥
कीं उपनेत्राचीं बिंबे । ते दृष्टीमंदा शोभे । वांचुनि देखन्या वल्लभे । होईल काई ॥७१॥
सदोषा प्रायश्चितें । नेमली विज्ञानमतें । पवित्रु शुचिका त्यातें । धुंडो जाईल ॥७२॥
ज्यासी निसळती -मिष्टान्नें । उच्छिष्टे भक्षावीं तेणें । जैसें व्याधी केशीके धुडणें । वैद्य औषधी ॥७३॥
माळेचि सप्तपदें चढउनि । बैसवीति मोक्ष स्थानि । हें कौळिकां वाचुनि ।शोभा न पवे ॥७४॥
तैसीं निरर्थकें टवाळीं । प्रपंचीकु हावा कवळी । परी ज्ञाता कोण्हे काळीं । नातळे तया ॥७५॥
ज्याचें हातीं प्रकाशमणि । त्यासी कोण शीराणी । परी गा गुरुकृपे अंजनी । साधकु असावा ॥७६॥
ह्मणसी देह विसर्जन । परि हा ही प्रळयो नोहे जाण । कां जें अखंड आया गमन । आहे जीवा ॥७७॥
जन्म नव्हे तो संयोगु । मरण नव्हे तो वियोगु । असा संयोगवियोगभोगु । अखंड यासी ॥७८॥
जैं हा जीवु ब्रह्मीं भरे । तो चि यातायात सरे । ये अमरपदिं मरे । तें चि मरण ॥७९॥
पूर्णब्रह्म दृष्टी भ्ररे । तैं जीवदशा सर्व सरे । असें हें मरण सोपारें । असतेनि देहें ॥८०॥
हे अनुभवावांचुन । मिथ्या सुखावती अज्ञान । अंडजां स्तन पान । तयावरी ॥८१॥
जैसी नपुंसकाची कांता । सांगे सुरत संग्रामाची वार्त्ता । कां अभोळा मिरवी योग्यता । संभोग रितुचि ॥८२॥
कां प्राणियां अचेक्षां । सांगणें रत्नाची परीक्षा ।तैसें अनुभवेविण मोक्षा । मानिती मूढ ॥८३॥
नाहिं अनुभवासी आलें । देखो वेखी प्रेमे डोले । त्याचें जाणपण तेतुलें । भेंडाळा पडे ॥८४॥
हा ज्ञानप्रळय पांचवा । अति सुलभु आणि बरवा । जन्ममरणाचा गोवा ।तुटे येणे ॥८५॥
कर्माकर्माचें कळवटें । प्राणियां करीं हींपुटे । परी गा ज्ञानप्रळयीं तुटें । गोवी यांची ॥८६॥
हे चंडीहराचे कृपें । निर्धारलें आपणपें । तै चि जालें सोपें । त्र्यंबक ह्मणे ॥८७॥
इति श्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमब्दालावबोधे पूर्णानंदे आदिखंडे निर्धारयोगो नाम चतुर्दश कथन मिति ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP