अध्याय ८९ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न प्रद्युम्नो नानिरुद्धो न रामो न च केशवः । यस्य शेकुः परित्रातुं कोऽन्यस्तदवितेश्वरः ॥४१॥

प्रद्युम्न अनिरुद्ध बळराम । श्रीकृष्णही ऐश्वर्यधाम । मत्प्रजांचें रक्षणकाम । मी प्रतिसम विलपतां ॥४४०॥
करूं न शकले जे सर्वथा । तेथ यांहूनि वरिष्ठ कोणता । अन्य ईश्वर त्यां रक्षिता । जो दैवगता पालटी ॥४१॥
ऐसें अघटित मज हें कळतां । भ्रंश केला माझिया चित्ता । तुच्छ करूनियां समस्तां । ईश्वरमूर्ता उन्मादें ॥४२॥

धिगर्जुनं मृषावादं धिगात्मश्लाघिनो धनुः । दैवोपसृष्टं यो मौढ्यादानिनीषति दुर्मतिः ॥४२॥

धिक्कार ऐसिया अर्जुनातें । मृषावादें झकविलें मातें । आत्मश्लाघा मिरवी चित्तें । आपणातें स्तवूनियां ॥४३॥
कीं मी नव्हे रामकृष्ण । अनिरुद्ध किंवा प्रद्युम्न । ज्याचें गाण्डीव धनुष्य जाण । तो मी अर्जुन प्रतापी ॥४४॥
एवं आत्मश्लाघी अनृताथिला । धिक् धिक् त्याचिया धनुष्याला । अधिकार आपुला न विचारिला । वृथा वल्गला मूर्खत्वें ॥४४५॥
वारंवार धिक्कार यातें । आणि याचिया गाण्डीवातें । प्रतारिलें मोडूनि मातें । आत्मश्लाघेतें वदूनी ॥४६॥
अहो जे दैवें अंतकनिलय । पावले अलोट अनुपाय । ते मूर्खत्वास्तव साध्यप्राय । आणील काय हा दुर्मति ॥४७॥
सामर्थ्य आपुलें न विचारिलें । ईश्वरपुरुषांतें हेळिलें । शेखीं अपयश संपादिलें । दुर्मति स्वलीले अतएव ॥४८॥
राआ ऐसें सक्रोधभावें । धिक्कारूनि अति तुच्छत्वें । ब्राह्मण बोलतां अमार्द्दवें । अर्जुना उरुरवें यदुवृन्दीं ॥४९॥

एवं शपति विप्रर्षौ विद्यामास्थाय फाल्गुनः । ययौ संयमनीमाशु यत्राऽऽस्ते भगवान्यमः ॥४३॥

तेणें खोंचला अभ्यंतरीं । त्रपा उदेली सर्व गात्रीं । तथापि धैर्याचा हेमाद्री । प्रतापधरित्रीप्राणेश ॥४५०॥
विद्या अधिष्ठूनि अमानुषी । जेथ षड्गुणैश्वर्यराशी । यमधर्म राहे निश्चयेंसीं । जे सकळजीवांसी गमनीया ॥५१॥
तये संयमनीनगरी प्रति । परमत्वरेनें सुभद्रापति । जाता जाला भरंवसा चित्तीं । धरूनि तत्प्राप्तियशाचा ॥५२॥
गेले जे कां ब्राह्मणबाळ । ते मी रविजापासूनि केवळ । आणीन म्हणोनि उतावीळ । गेला परी विफळ पण जाला ॥५३॥
तेंचि राया इरारमणा । श्रवणजगतीविभूषणा । परिसें विस्तृत व्यासवचना । वरूनि सुज्ञा प्राञ्जळ ॥५४॥

विप्रापत्यमचक्षाणस्तत ऐंद्रीमगात्पुरीम् । आग्नेयीं नैरृती सौम्यां वायव्यां वारुणीमथ ।
रसातलं नाकपृष्ठं धिष्ण्यान्यन्यान्युदायुधः ॥४४॥

तये संयमनी माजी सादर । इतस्तता द्विजकुमार । पाहता जाला वारंवार । अर्जुन वीर अतंद्रित ॥४५५॥
परि तेथ सर्वथा विप्रापत्य । न देखता जाला निश्चित । तेथूनि तैसाचि त्वरान्वित । गेला पवनवत् ऐन्द्रीसी ॥५६॥
ऐन्द्री म्हणिजे इन्द्रनगरी । जेथ तो राहे सपरिवारी । तेथ धुंडिला द्विजतोक परी । सहसा नेत्रीं न देखिला ॥५७॥
त्या वरी अग्नीची देदीप्यमान । तेजःपुञ्ज नगरी जाण । तेथ गेला सुभद्राप्राण । द्विजनंदन साकाङ्क्ष ॥५८॥
तंव तेथही पाहतां स्वस्थ । जाला मनोरथ खंडित । त्यावरी फाल्गुन जवनवंत । निघाला त्वरित तेथूनिही ॥५९॥
निरृतीची नैरृतिनामा । नगरी विशाळ परमरम्या । तेथ प्रवेशला जेणोनि वर्मा । ब्राह्मणकामा पुरवावया ॥४६०॥
परी पाहतां न देखिला बाळ । मग चित्तीं करूनियां हळहळ । उत्तरदिशेस सौम्या केवळ । नगरी सुशील सोमाची ॥६१॥
तेथ जाऊनि द्विजबाळक । पाहता जाला धृतकार्मुक । नभीं प्रसूनवत निष्टंक । न लक्षूनि निःशंक परतला ॥६२॥
मग वायूची राजधानी । वायव्या नामें प्रसिद्ध जनीं । तेथ प्रवेशला अन्वेषणीं । गाण्डीवपाणी शिशूच्या ॥६३॥
जेंवि कां गगना आंगीं कोंभ । विरक्ता मनीं कुटुम्बलोभ । प्राप्तपुरुषीं जैसा दंभ । तेंवि द्विजडिम्भ न देखिला ॥६४॥
त्यावरी वरुणाची वारुणी । परम रमणीय ऐश्वर्यखाणी । तेथ जाऊनि आपुले नयनीं । पाहे प्रयत्नीं शिशूतें ॥४६५॥
जैसें रत्नखाणी माजी मुक्त । न लभे शोधितां नर सयुक्त । तेंवि अपूर्णकाम कृष्णाकान्त । परतला सचिन्त तेथूनी ॥६६॥
अथशब्दें ईशाननगरी । ईशानी जे रौद्रपुरी । तेही पाहिली शोधूनि पुरी । परी नाडळे नेत्रीं द्विजबाळ ॥६७॥
एवं अष्टौ दिक्पाळपुरें । पाहिलीं प्रतापें पार्थवीरें । त्यावरी सप्तपाताळविवरें । फिरला अतिसत्वरें ते वेळे ॥६८॥
रसातळी दैत्य वसती । ते पाहिले संपूर्ण निगुती । मग सर्वां तळीं कटुसंतती । नांदे श्रीपती आज्ञेनें ॥६९॥
तेथेंहि धुण्डिलें करूनि यत्न । परंतु द्विजबाळ अलभ्यमान । मग परतला अतिजवीन । अन्य स्थान करूनियां ॥४७०॥
नाकपृष्ठ म्हणिजे स्वर्ग । परमदिव्य जेथील भोग । जें अंतरिक्ष नभीं चांग । सुकृती साङ्ग लाभती ॥७१॥
तया नाकपृष्ठाही प्रति । जाऊन पाहिली द्विजसंतति । अलभ्य जाणोनि विरामवृत्ति । फिरला कुरुपति तेथूनी ॥७२॥
मग अन्य धिष्ण्यें उच्चावचें । निवास सुरसिद्धगंधर्वांचे । किन्नरचारनस्थानें साचें । कथितां वाचे बहुतेक ॥७३॥
ते सर्वही पाण्डुनंदन । फिरला करधॄतचापबाण । पर द्विजसुताची शुद्धि जाण । अन्वेषमाण न लाभला ॥७४॥
जों वरी आपुली सामर्थ्यगती । तेथवरी गेला प्रतापशक्ती । हिम्पुटी होऊनि आला अंतीं । द्वारके प्रती अनुपायें ॥४७५॥
यावरी पुढें वर्तलें जैसें । तेंहि राजा सावध परिसें । अर्जुन अतिखिन्न मानसें । व्रीडाविशेषें काय करी ॥७६॥

ततोऽलब्धद्विजसुतो ह्यनिस्तीर्णप्रतिश्रुतः । अग्निं विविक्षुः कृष्णेन प्रत्युक्तः प्रतिषेधता ॥४५॥

शोधितांस्थानें तीं पूर्वोक्त । न प्राप्त झाला ब्राह्मणसुत । ऐसा जिष्णु हळहळीत । द्वारके आंत पातला ॥७७॥
त्यानंतरें अग्निप्रवेश । करावया इन्धनविशेष । संपादिलें पावूनि त्रास । असत्यदोष निस्तरणा ॥७८॥
न निस्तरला स्वप्रतिश्रुत । जें ब्राह्मणा ऐकविलें निश्चित । कीं प्रतापें रक्षीन तव सुत । ते प्रतिज्ञा व्यर्थ जाहली ॥७९॥
तये प्रतिज्ञेचिये काळीं । नियमें गुन्तला स्ववाग्जाळीं । प्रतिज्ञा न निस्तरतां अनळीं । आपणा जाळीन निश्चयें ॥४८०॥
तैसेंच वोडवलें दैवें । म्हणोनि पावका इन्धनासवें । प्रज्वाळूनि प्रवेशभावें । उदित सत्यत्वें जाहला ॥८१॥
एवं पावकप्रवेशेच्छु । धनंजय धार्मिक स्वच्छ । त्याचा उद्योग करूनि तुच्छ । दावी पिच्छधरवत हा ॥८२॥
तयाचा तत्काळ धरूनि कर । कृष्णें वारिलें अतिसत्वर । मग बोलिला वाक्य मधुर । अमृताकार म्रियमाणा ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP