अध्याय ८९ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं द्वितीयं विप्रर्षिस्तृतीयं त्वेवमेव च । विसृज्य स नृपद्वारि तां गाथां समगायत ॥२६॥

प्रथमा समचि द्वितीय तृतीय । सुतकुणपातें विप्रवर्य । नवमपर्यंत सशोकहृदय । ठेवूनियां नृपद्वारीं ॥५४॥
पूर्वोक्तवाक्यें दीर्घस्वरें । हाका मारूनि आक्रोशभरें । वारंवार सम्यक्प्रकारें । जाला तीव्रें बोलता ॥३५५॥
परंतु तयासी प्रत्युत्तर । कोणीं न केलें अल्पमात्र । तंव शेवटीं वर्तलें विचित्र । तें कौतुक समग्र परिसिजे ॥५६॥

तामर्जुन उपसृत्य कर्हिचित्केशवान्तिके । परेते नवमे बाले ब्राह्मणं समभाषत ॥२७॥

मेला असतां नवम बाळ । मृत ततुलाय जवनशीळ । ठेवूनि नृपद्वारीं शोकाकुळ । बोलिला प्राञ्जळ ते गाथा ॥५७॥
कीं भूपतीच्या दुष्कर्मदोषें । मृत्युसदनीं मत्संतान वसे । प्रायशा दुराचारी भूप ऐसे । तत्प्रजा विशेषें सीदती ॥५८॥
ऐसी उच्चरवें विलापगाथा । यदुपुङ्गव बैसले असतां । पूर्ववत् गायिली द्विजें तत्त्वता । अति आर्तता प्रकटूनी ॥५९॥
तंव अवचटें पाण्डववीर । धनंजयनामा महा शूर । यदुसंसदीं स्नेहप्रचुर । होता सादर हरिनिकटीं ॥३६०॥
तो तये गाथेतें सकळ । परिसूनियां प्रतापशीळ ॥ब्राह्मणातें कृपावत्सल । बोलिला यदुकुळउपहासें ॥६१॥

किंस्विद्ब्रह्मंस्त्वन्निवासे इह नास्ति धनुर्धरः । राजन्यबन्धुरेते वै ब्राह्मणाः सत्रमासते ॥२८॥

अरे ब्राह्मणा व्यर्थ कां रुदसी । ग्रीष्मनिदाघीं निवों पाहसी । अश्मकीं मार्दवातें इच्छिसी । तरी केंवि होसी कृतार्थ ॥६२॥
दंदनीं इच्छाफळ याचिलें । तें कल्पतरूवीण लाभे वहिलें । अर्कीं अमृता अभिलाषिलें । तरी वृथा गमलें मनोगत ॥६३॥
तेंवि तूं आपुल्या दुःखहरणा । क्षितिधर क्षत्री म्हणोनि रुदना । येथें करिसी शोकें विलपना । मोहें परीक्शणा न करूनी ॥६४॥
इये तुझिये निवासनगरीं । कोणी नाहींच धनुर्धारी । क्षतापासूनि रक्षी क्षेत्री । तो निर्धारीं मज न दिसे ॥३६५॥
जेथ धनुर्धारीच नसे पुसता । तेथें ब्राह्मणाची कैंची वर्ता । जो प्राणासमान विप्रा आर्त्ता । रक्षी तत्वता धार्मिक ॥६६॥
म्हणसी येथ हे सभेमाजी । बैसली इतुकी राजन्यराजी । तरी हे क्षत्रिय नव्हती जाण तूं आजी । जे ब्राह्मणकाजीं उपकरती ॥६७॥
जेव्हां झाला स्वधर्मलोप । जातिवैगुण्या तैं आरोप । यास्तव तुजसारिखें हे भूप । दीनस्वरूप ब्राह्मण ॥६८॥
हे इतुके ही क्षत्रकुलीन । जेंवि सत्रीं मिळाले ब्राह्मण । येथ तूं इच्छिसी प्रजारक्षण । तरी तें कोठूण घडेल ॥६९॥
क्षत्रिय असोनि कैसे नव्हती । ऐसें मानिसी जरी तूं सुमती । तें ही कथितों मी तुजप्रती । संशयनिवृत्तीकारणें ॥३७०॥

धनदारात्मजापृक्ता यत्र शोचन्ति ब्राह्मणाः । ते वै राजन्यवेषेण नटा जीवन्त्यसुम्भराः ॥२९॥

राजपदवी जयांसी प्राप्त । तयांसि राजन्य हा संकेत । तयांचे राज्यीं शोकाभिभूत । जरी क्लेशयुक्त ब्राह्मण ॥७१॥
न मिळे ब्राह्मणातें अन्न । व्यवहारार्थ काञ्चन धन । वर्षातपहिमवारणा सदन । वसनावीण पीडती ॥७२॥
जायातनयावांचूनि श्रम । पावती केवळ द्विजोत्तम । त्यांचें न वारिती दुःख विषम । ते नटासम वेषधारी ॥७३॥
जेंवि सोंगें घेऊनि जगीं नट । निर्ल्लज्जपणें भरिती पोट । तैसे प्राणपोषक राजे नष्ट । वृथापृष्ट अन्यायी ॥७४॥
शोकें आक्रंदती ब्राह्मण । जीविका संपादिती आपण । ते नटांहूनि ही केवळ हीन । कीं रंजवूनि तेजिती ॥३७५॥
यास्तव ऐसियां पुढें हाका । मारूनि वृथा कष्टसी तूं कां । जेंवि प्रेतापुढें करितां शोका । सान्तवी लोकां रडतयां ॥७६॥
मज देखूनि तुझें दुःख । कळवळा आला असे देख । सामर्थ्य आसोनि जो वंचक । तोही एक पापात्मा ॥७७॥
ऐसें बोलूनियां अर्जुन । भगवन् संबोधनें ब्राह्मण । संबोधूनि पुढें वचन । वदला संपूर्ण तें परिसा ॥७८॥

अहं प्रजां वां भगवन्रक्षिष्ये दीनयोरिह । अनिस्तीर्णप्रतिज्ञोऽग्निं प्रवेक्ष्ये हतकल्मषः ॥३०॥

तुम्ही स्त्रीपुरुषें अत्यंत दीन । मृतसंतानें शोकायमान । तुमचा भवतरु प्रजावीण । निष्फळ तो करीन मी सकळ ॥७९॥
मी आपुल्या सामर्थ्यबळें । निधनीम रक्षीन तुमचीं बाळें । हीं प्रतिज्ञोत्तरें माझीं अचळें । तुवां सुशीळें जाणावीं ॥३८०॥
जरी हे प्रतिज्ञा मी न निस्तरें । तरी पावकीं प्रवेशेन निर्धारें । करीन हे तूं जाण खरे । होईन तेणें निष्पाप ॥८१॥
ब्राह्मणाचे विलापध्वनी । क्षत्रियें ऐकावे आपुले कानीं । वरिष्ठपातक ययाहूनि । नाहीं अवनीवरी कांहीं ॥८२॥
आणि बोलिला बोल न कीजे साच । हेंही एनस त्याहूनि नीच । तें मी सेवूनि ज्योतिर्वर्च्च । अनृत वचन निस्तरीन ॥८३॥
राया कुरुभूमंगळसूत्र । तव पितामह यदु सर्वज्ञ । देखता ब्राह्मण पवित्र । त्या वाग्निस्तारा बोलिला ॥८४॥
तें ऐकोनि तो ब्राह्मण । धनंजयातें विचक्षण । देता जाला प्रतिवचन । तें तूं श्रवण करीं पां ॥३८५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP