अध्याय ८९ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पुनीहि सहलोकं मां लोकपालांश्च मद्गतान् । पादोदकेन भवतस्तीर्थानां तीर्थकारिणा ॥११॥
खुणावूनि इन्दिरा रमणी । पदाक्षालना आणिलें पाणी । स्वमुखें म्हणे चक्रपाणी । अमृतवाणी करूनिया ॥६६॥
सर्वैश्वर्यप्राप्तिस्थान । त्रिजगीं केवळ सद्ब्राह्मण । तिष्ठति जयापाशीं षड्गुण । अळुमाळ वचन नुलंघिती ॥६७॥
या अभिप्रायें गदाधर । भगवन् संबोधनें विप्र । संबोधूनियां सादर । प्रार्थनापर विनयत्वें ॥६८॥
कीं चतुर्दशभुवनात्मक जे लोक । ते सर्वही माझिये आंगीं देख । ऐसा सहलोक मी सम्यक । मज एकीं अनेक अवघे हे ॥६९॥
तया मातें पवित्र करीं । आणि जे सृष्टीचे नियमनकारी । मद्गत लोकपाळ आज्ञाधारी । मज अंतरीं नांदती ॥१७०॥
इंद्र नांदे माझिये करीं । अग्नि राहे मुखाभीतरी । यमहि तयाचे शेजारीं । गुदद्वारीं निरृति ॥७१॥
वरुण जिह्वेन्द्रियीं राहें । वायुं त्वचेमाजी समाये । सोम हृदयीं वसती लाहे । ईशही आहे रवि नेत्रीं ॥७२॥
इत्यादि सर्वही लोकपाळ । मद्गतचि तयांचा मेळ । तयांतेंहि पवित्र निखिळ । करीं प्राञ्जळ दयाळुवा ॥७३॥
मज एकातें केलिया पुनीत । पवित्र त्रैलोक्यही समस्त । जैसी जेवविल्या गर्भिणी होत । गर्भहि तृप्त तत्सह ॥७४॥
कीं मूळीं घालितांचि उदक । पाल्हाळती सर्व ही शाख । ग्रहणीं निवळतां रविमयंक । शुद्धता अनेक प्रतिबिम्बां ॥१७५॥
म्हणसी कैसेन कीजे पूत । तरी न्जपादोदकें यथार्थ । जें तीर्थासि तीर्थकारी तीर्थ । अक्षयपरमार्थप्रापक ॥७६॥
तीर्थासि तीर्थकारी कैसें । तरी तीर्थासी तीर्थत्व विशेषें । तुम्हां तपस्वियांच्या पादस्पर्शें । जगाच्या दोषें न लिम्पती ॥७७॥
भलतैसें हो का पाणी । स्पर्शतांचि तुमचे चरणीं । अखिळ भूगोळींच्या तीर्थाहूनी । कल्मषहरणीं पटुतर तें ॥७८॥
जैसें भास्करकिरणें । तम पावकदीप्तीस्तव हिम । कीं आत्मज्ञानें न तह्रे भ्रम । तेंवि तत्तीर्थें नाम पापाचें ॥७९॥
ऐसा पदस्पृष्टजलाचा महिमा । साक्षात तव पदाची गरिमा । कोण करी तयाची सीमा । जे निगमा आम्हां न वर्णवे ॥१८०॥
सकळमंगळांचें स्थान । सर्वैश्वर्याचें अधिष्ठान । अखिलाभ्युदयाचें कारण । पावन चरण हे तुमचे ॥८१॥
यास्तव धन्य आजींचा दिवस । कीं हा प्रसवला महल्लाभास । अर्ह जालों पदस्पर्शास । जेणें सर्व सुखास पात्रता ॥८२॥
आद्याहं भगवँल्लक्ष्म्या आसमेकान्तभाजनम् वत्स्यत्युरसि मे भूतिर्भवत्पादाहतांहसः ॥१२॥
आजी मी भो तपोधना । षड्गुणैश्वर्यसंपन्ना । एकान्ताचें पात्र जाणा । जालों स्वाङ्गनालक्ष्मीचें ॥८३॥
कीं हे सुकृताची अंकिली । सुकृत देखोनि झडा घाली । असुकृतीं निर्बुजे वहिली । जिये पापसाउली न सोसे ॥८४॥
ऐसी हे केवळ निर्मळ । अखिलमंगलांचें मंगल । आजिचेन मम हृदयस्थळ । वसवी निश्चळ होऊने ॥१८५॥
आतां माझिया हृदयालयीं । स्थैर्य पावली हे अक्षयी । अविनासंबंधें चि पाहीं । भरंवसा निश्चयीं मज जाहला ॥८६॥
जैसी चंद्रा न सोडी ज्योत्स्ना । किंवा पृथ्वी लागूनि मृत्स्ना । वसंतातें वनश्री कृत्स्ना । पंकजजनना मज तैसी ॥८७॥
हें व्हावया कारण कोण । ऐसें म्हणाल तरी परिसा खूण । हृदयीं लागतां तुमचा चरण । गेलें संपूर्ण अंहस ॥८८॥
आजि तुमचेन चरणें सहज । हतकल्मष पुण्यपुञ्ज । जालों म्हणोनि हें घडलें चोज । महाराज ऋषिवर्या ॥८९॥
पुण्यपुञ्ज जालों ऐसा । अव्ययत्वें निधि जैसा । अतःपर जिणें एनसा । मन्नामेंचि सहसा न थारे ॥१९०॥
मां मातें स्पर्शूनि दूषित । करी हे कैंची घडेल मात । म्हणोनि श्री मज हृदयीं स्वस्थ । कीं जालों अंकित पदचिह्नें ॥९१॥
यया चिह्नें हृदयीं जाण । निरंतर श्री वसे म्हणोन । हें प्रसिद्ध शीवत्सचिह्न । येणें श्रीवत्सलाञ्छन मम नाम ॥९२॥
ऐसा नाममु़द्राङ्कित तुमचा । अंकिला स्थापिला त्रिवाचा । त्रिजगत्पाळक तुमचेनि साचा । ब्रह्मण्यदेव मी म्हणवीं ॥९३॥
श्रीशुक उवाच - एवं ब्रुवति वैकुण्ठे भृगुस्तन्मन्द्रया गिरा ।
निर्वृतस्तर्पितस्तूष्णीं भक्त्युत्कण्ठोऽश्रुलोचनः ॥१३॥
राया ऐसें देवाधिदेव । श्रीवैकुण्ठ वासुदेव । ऋषीतें देऊनियां गौरव । बोलतां स्वयमेव नम्रत्वें ॥९४॥
तयाच्या तिये गंभीरवाणी । करूनियां तो भृगुमुनि । आनंद पावला सुखावूनी । जैसा ज्ञानी स्वलाभें ॥१९५॥
जिज्ञासेची हरली क्षुधा । उत्कृष्ट महिम्नानुभवसुधा । प्राशूनि तृप्त झाला बहुधा । श्रीधरीं श्रद्धा पावूनियां ॥९६॥
आणि राव ज्या परी रंका । किंवा पंडित ज्ञानाल्पका । सम्मानितां न मानूनि लेखा । अपराधशंका निवारणें ॥९७॥
मग तो अंतरीं तोषूनि बरवा । पावूनिया संकोचभावा । आदरें दाटे माजि जीवा । कांहीं न सुचूनि मौनावे ॥९८॥
तया परी तूष्णीम्भूत । जाला मुनीश्वर आनंदभरित । भगवन्निष्ठा बाणली यथार्थ । प्रेमा अद्भुत प्रकटला ॥९९॥
जेंवि सरोवर भरतां पूर्ण जळें । तटाकें सांडूनियां उचंबळे । तेंवि भक्त्युत्कंठित प्रेमबळें । होतां अथिलें सत्वाष्टकें ॥२००॥
शरत्काळींच्या मंदानिळीं । डोलती जैशा वृक्षडाहाळी । तेंवि सर्वावयवमंडळी । सकंप जाली शरीरीं ॥१॥
वर्षारंभीं जेंवि का अद्री । विरूढे कोमळतृणाङ्कुरीं । तैसी सपुलक त्वग्भूवरी । रोमाञ्चहारी थरकली ॥२॥
हेमंतींच्या निशारमणें । स्पर्शितां सस्यीं आर्द्र होणें । तद्वत भगवद्वाक्यगुणें । प्रस्वेदकणें डवरला ॥३॥
आणि वर्षान्तींच्या पर्वतदरी । सजल जैशा स्रवती नीरी । सबाष्पलोचन तया परी । अश्रुधारीं च्यवमान ॥४॥
सासुरवासियें बहुता काळें । माता भेटतां मोहबहळें । तैं गहिवरें शब्द पांगुळे । वृत्ति मांदुळे स्नेहभरें ॥२०५॥
तेंवि भृगूचा सद्गद कंठ । होतां रोधिली शब्दवाट । ज्ञप्ति मुराली आनंदपुष्ट । होतां यथेष्ट अंतरीं ॥६॥
एवं सात्विक अष्टभाव । प्रेमोत्सुक्यें तो भूदेव । सत्वशान्तीचा अनुभव । देखूनि अभिनव पावला ॥७॥
मग तेणेंचि प्रेमोद्रेकें । स्वस्तव परमपुरुषमुखें । न सहूनि अधिकारविवेकें । उठिला वेगें तेथोनियां ॥८॥
पुनश्च सत्रमाव्रज्य मुनीनां ब्रह्मवादिनाम् । स्वानुभूतमशेषेण राजन्भृगुरवर्णयत् ॥१४॥
परिसें राया श्रवणनिधि । मग तो स्मरोनि मागील शुद्धि । पुन्हा सत्राप्रति येऊनि धीरधी । कृतार्थबुद्धि मुनीश्वर ॥९॥
चकोरन्यायें मार्ग लक्षी । कीं चातकापरी स्वार्थापेक्षी । सरस्वतीतीरवासी ऋषी । सत्राध्यक्षीं सर्वही ॥२१०॥
वेदविद्यापारंगत । वेदार्थ संपूर्ण ज्यां अवगत । सदैव ब्रह्मचर्चानिरत । मननवंत विवेकी ॥११॥
तयां ब्रह्मावादियां मुनींस । स्वानुभूत जें अशेष । तें साद्यंत गुणरहस्य । कथितां संतोष जाहला ॥१२॥
आधीं ब्रह्मसभे जें वर्तलें । कीं रजोदिनकरें ताविलें । त्याहूनि तमानळें पोळविलें । संतप्त केलें कैलासीं ॥१३॥
शेखीं शान्तिपूर्णिमाधीश । चिदाकाशींचा स्वप्रकाश । वैकुण्ठमंडळीं अविनाश । विष्णु परेस परमात्मा ॥१४॥
तयाप्रति जातां त्वरान्वित । देखोनि मृगाक्षी सह निद्रित । हृदयीं केलें पदलाञ्छित । तंव जाला उदित शान्तिसुखें ॥२१५॥
तयाचिया सत्वप्रकाशें । अमृतवाक्यकिरणस्पर्शें । निवाला अत्यंतसुखसंतोषें । तें विस्तारवशें वर्णिलें ॥१६॥
जर्ही महदपराध केला । तर्ही शान्तिविशेषें साहिला । अपकार उपकारसा मानिला । हा अद्भुत देखिला हरिमहिमा ॥१७॥
ऐसें साद्यंत वर्तमान । भृगु सप्रेम कथितां पूर्ण । सकळ ऋषींहीं केलें श्रवण । श्रोतृगगनव्द्यष्टकरा ॥१८॥
तं निशम्याथ मुनयो विस्मिता मुक्तसंशयाः । भूयांसं श्रद्दधुर्विष्णुं यतः शान्तिर्यतोऽभयम् ॥१५॥
तें परिसिल्यानंतर । विस्मित जाले मुनीश्वर । कां म्हणसी तरी अभ्यंतर । ऐक सादर तेथींचें ॥१९॥
ज्यातें विनयें मात्र न वंदिलें । विधीश्वर इतुकेन ते कोपले । चरणें हृदयावरी ताडिलें । तरी मानिलें श्रीधरें ॥२२०॥
आंगीं असोनि पूर्ण सत्ता । मदन्यायें अतिक्रमितां । जेणें हृदयीं साहिली लत्ता । परंतु शान्तता न भंगली ॥२१॥
हे हरीची अविकारता । अद्भुत ऐकोनि मुनींच्या चित्ता । विस्मय वाटला तत्त्वता । इराकान्ता नृपवर्या ॥२२॥
एवं अगाध हरीची शान्ती । जाणोनि विस्मयपन्न चित्तीं । संशयातीत जाले सुमती । विवेकवृत्ती मुनीश्वर ॥२३॥
देवत्रयीं कोण वरिष्ठ । ऐसी चित्तीं होती हुटहुट । ते निरसिली कळल्या स्पष्ट । शीळ प्रकट तिघांचें ॥२४॥
रजस्तमात्मक ब्रह्मा भर्ग । हें अनुभवूनि मुनिवरवर्ग । केवळ सत्वायतन श्रीरंग । हा निश्चय साङ्ग करूनियां ॥२२५॥
मग महत्तम निश्चितवंत । तया विष्णूतें श्रद्धायुक्त । वरिष्ठ मानिते जाले समस्त । निष्ठा यथार्थ दृढाविली ॥२६॥
म्हणाल कोण्या हेतूस्तव । तरी ज्याचे ठायीं शान्ति यास्तव । शान्ती स्तव अभय सर्व । असे स्वयमेव जया पें ॥२७॥
शान्ति म्हणिजे अविकारता । केवळ जे दशा सुलीनता । पूर्णसत्वें ते निवान्ता । असे सर्वथा ज्यापासीं ॥२८॥
आणि आर्त्त जिज्ञासु अर्थार्थी । ज्ञातहि परम पुरुषार्थी । हे भयनिवृत्ती कारणें भजती । विविधा वृत्ती करूनियां ॥२९॥
ते ते प्राणी शरणागत । होती निश्चयेंशीं अनार्त । भयनिरासें निष्ठावंत । पावती समस्त अभयातें ॥२३०॥
अथवा विरोधी जे द्वेषिती । शेखीं ते हि अभय पावती । पुन्हा जन्ममरणांतें न पवती । त्यां स्वरूपीं श्रीपती समरसवी ॥३१॥
सापराधी कां निरपराधी । जया प्रति पावल्या निरवधी । पावती निश्चयें अभयसिद्धी । संपूर्ण भयनदी उतरूनी ॥३२॥
एवं शान्ति आणि अभय । पूर्णसत्वें श्री अच्युतीं आहे । आणिक ही चिह्नसमुदाय । असे अनपाय ज्यापासीं ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP