अध्याय ८९ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
धर्मः साक्षाद्यतो ज्ञानं वैराग्यं च तदन्वितम् । ऐश्वर्यं चाष्टधा यस्माद्यशश्चात्ममलापहम् ॥१६॥
स्वागत स्वतःसिद्ध केवळधर्म । साक्षात नांदे जया पें परम । ज्ञान जें केवळ निर्भ्रम । असे उत्तम ज्यापासीं ॥३४॥
भूतभविष्यद्वर्तमान । प्रवृत्तिनिवृत्त्यात्मक संपूर्ण । अतीन्द्रिय आणि अविच्छिन्न । सर्व हें ज्ञान भगवंतीं ॥२३५॥
आणि वैराग्य ही तदन्वित । म्हणिजे धर्मज्ञानयुक्त । जें उभयानुकुल विहित । असे निश्चित ज्यापासीं ॥३६॥
धर्मज्ञानासी प्रतिकूळ । कीं तयावांचून जें निखळ । तें वैराग्य अमंगळ । परिणाम वोफळ तयाचा ॥३७॥
धर्मज्ञानेंसीं संयुक्त । तेंचि वैराग्य यथास्थित । ऐसें श्रीधरी यथार्थ । परमपूत नांदतसे ॥३८॥
अथवा पाठान्तरें प्रसिद्ध । वैराग्यचि चतुर्विध । ऐसा मुळींचा व्यासनिगद । तें ही विशद परिसिजे ॥३९॥
प्रथम वैराग्य यतमान । व्यतिरेकनामक द्वितीय जाण । ऐक्यन्दिर्याख्य तिजाची खुण । चतुर्थ पूर्ण वशीकृत ॥२४०॥
यतमान म्हणिजे तें ऐसें । परमार्थाचिया यत्नवशें । विषय जाणिजती मिथ्यासे । परि सामर्थ्य नसे तत्त्यागीं ॥४१॥
म्हणोनि विषय त्यागूं न शकतां । तदिच्छा सहमान सर्वथा । टाकणें सेवीत ही असतां । हें वैराग्य तत्वता पाहिलें म्यां ॥४२॥
याहून वैराग्य जें दुसरें । कळेल तै़सें परिसा वरें । साङ्ग यथेष्ट कां श्रणी पुरे । इन्द्रियनिकर तोषिजे ॥४३॥
तैसी विषयांची उपलब्धी । न होतां चित्ता खेद न बाधी । रसिकत्व मनीं न उठे कधीं । सर्वदा बुद्धी उदास ॥४४॥
अन्नामाजी नसतां लवण । विरस विदृश किंवा अपूर्ण । थिटें घोंगडें प्रावरण । विरंग विलक्षण खरबड ॥२४५॥
तथापि तत्सेवनीं प्रवृत्ति । शरीरनिर्वाहीं मनोवृत्ति । उत्तरोत्तर विषयाप्रैत । तोडिजे विरक्ति व्यतिरेक हें ॥४६॥
आतां तृतीय वैराग्यलक्षण । तेंही परिसोत विचक्षण । मनीं रागशैथिल्य पूर्ण । असज्जपण तन्मात्रीं ॥४७॥
जेसें मद्यपाचें चालणें । कें विरहिणीचें वर्तणें । तैसें बाह्येन्द्रियें मात्र करणें । विषयसेवन सहजगती ॥४८॥
हृदयामाजी भोगानुराग । परमसूक्ष्मत्वें अंतर्म्ग । तेणें बाह्येन्द्रियीं घडती भोग । ऐक्येन्द्रियाख्या या म्हणिजे ॥४९॥
निःशेष भोगानुरागनिवृत्ती । इन्द्रियें स्वाधीनपणें वर्तती । नियमिल्या ठायीं स्थिरावती । हें वैराग्य निश्चिती वशीकृत ॥२५०॥
एवं हें संपूर्ण चतुर्विध । वैराग्य श्रीधरीं स्वतःसिद्ध । जयाच्या लाभें भक्तवृंद । परमार्थ शुद्ध साधिती ॥५१॥
मादिसिद्धिमंत । अष्टधा ऐश्वर्य हि समस्त । जयाचे ठायीं अव्याहत । असे शाश्वत सुखदायी ॥५२॥
तेंविचि यश ही आत्ममलापह । म्हणिजे जीवाचा दुर्धर मोह । अज्ञानमय मळ तमावह । जन्मादि ज्या स्तव श्रम भोगीं ॥५३॥
तो त्रिगुणात्मक अज्ञानमळ । जयाचें यश अतिनिर्मळ । परिसतां पढतां प्राञ्जळ । जाय समूळ निश्चयें ॥५४॥
धर्मस्थापन दुष्टहनन । करावया नाना अवतरण । करूनि ऊर्ज्जित चरित पूर्ण । प्रकटती अज्ञानमळहंतें ॥२५५॥
ज्यांचिया स्मरणें ध्यानें गुणचिन्तनें । जीवांचें अज्ञान जाय नाहींपणें । स्वरूपीं समरसे अभेदज्ञानें । हें यश पावन हरी आंगीं ॥५६॥
एवं शान्ति अभय धर्म ज्ञान । वैराग्य यश ऐश्वर्य पूर्ण । श्रीरमारमणीं विराजमान । भजककल्याण ज्या योगें ॥५७॥
ऐसा प्रत्यययुक्त सुनिश्चय । अंतर्यामीं मुनिवर निश्चय । करिता जाला निःसंशय । पुढील अन्वय अवधारा ॥५८॥
मुनीनां न्यस्तदण्डानां शान्तानां समचेतसाम् । अकिञ्चिनानां साधूनां यमाहुः परमां गतिम् ॥१७॥
ऋषि आपण आपणांमाजी । म्हणती निश्चयें स्वसमाजीं । शान्त्यादिसद्गुणीं युक्त कंची । भवभयभंजी परमात्मा ॥५९॥
ज्यातें आम्नायसमुच्चय । किंवा सनकादिक ऋषिवय्र । जो मुनींची परमगति होय । ऐसें निश्चयें बोलिलें ॥२६०॥
ते मुनि कवण्या प्रकारींचे । जिहीं परमार्थमननें साचें । ठाणें उठविलें कामादिकांचें । वदती वाचे शुभ शब्द ॥६१॥
मनें न इच्छिती परपीडन । जिव्हें सांडिलें दुर्भाषण । आंगें न करिती ताडन । केलें विसर्जन दंडाचें ॥६२॥
त्रिविधदंडाचा परित्याग । करूनि शान्ति जोडिली साङ्ग । कामक्रोधाचें जाळिलें दांग । जाले अभंग सुशान्त ॥६३॥
भूतमात्रीं आत्माराम । जाणोनि भेद जाळिला विषम । समता चित्तासी अत्युत्तम । बाणली निःसीम अनुभवें ॥६४॥
सर्वसाक्षित्वें उपाधिरहित । निःस्पृह होऊनि वैराग्ययुक्त । जाले अकिञ्चन स्वरूपस्थित । स्वधर्मनिरत निर्मम ॥२६५॥
जयां समान मृत्स्नाभर्म । न इच्छिती ऐन्द्रिय शर्म । उरगत्वग्वत मानिती वर्ष्म । जाणती वर्म भक्तीचें ॥६६॥
या प्रकारींचे जे मुनिगण । ऐसियांचें प्राप्तिस्थान । साक्षात परब्रह्म पूर्ण । ज्यातें सर्वज्ञ बोलिलें ॥६७॥
कीं सर्वां गतीहूनि चरमगति । जेथूनि नव्हे पुनरावृत्ति । जेथ अभेदें ज्ञानी समरसती । तो सत्वव्यक्ति श्रीविष्णु ॥६८॥
ऐसें बोलूनियां ते सुमती । या वरी आणिक जें निर्द्धारिती । भगवन्निष्ठा दृढाविती । ते परिसा युक्ती तयांची ॥६९॥
सत्वं यस्य प्रियामूर्त्तिर्ब्राह्मणास्त्विष्टदेवताः । भजन्त्यनाशिषः शान्ता यं वा निपुणबुद्धयः ॥१८॥
सत्व जयाची प्रियतम मूर्ति । म्हणिजे सत्वगुणात्मक जे व्यक्ति । तेचि विशेषें ज्या आवडती । जीस्तव प्राप्ती वास्तव ॥२७०॥
आणि ब्रह्मशब्दें बोलिजे वेद । तदभिज्ञ ते ब्राह्मण विशद । ज्याचें इष्टदैवत प्रसिद्ध । त्या भजे श्द्ध सद्भावें ॥७१॥
स्वयें आपन सत्वमूर्ति । भजे सत्ववर्णां द्विजांप्रति । ज्यातें सत्वसंपन्न भजती । निपुणबुद्धि निष्काम ॥७२॥
सदसद्विचारी परम दक्ष । अवलंबिती सन्मार्गपक्ष । भक्तिज्ञानविरागाध्यक्ष । धरिती लक्ष स्वरूपीं ॥७३॥
ऐसे निपुणबुद्धि अनाशिष । म्हणिजे निष्काम जे निःशेष । केवळ शान्त निरपेक्ष । भजती ज्यास सप्रेम ॥७४॥
तरी सत्वचि कां हरीतें प्रिय । जरी ऐसा होईल संशय । तो ही अंतरीं ये प्रत्यय । विषादान्वयगुणभेदें ॥२७५॥
त्रिविधाकृतयस्तस्य राक्षसा असुराः सुराः । गुणिन्या मायया सृष्टाः सत्त्वं तत्तीर्थसाधनम् ॥१९॥
वस्तुता पाहतां आकृति त्रिधा । सत्वरजस्तमात्मका विविधा । राक्षसासुरसुराभिधा । ज्या सृजिल्या प्रसिद्धा मायेनें ॥७६॥
एकत्वीं न रमवे व्हावें बहुत । ऐसी आदिपुरुषाची अनाकलित । इछाशक्ति जे कां महत । तीसीं संकेत गुणमयी ॥७७॥
ते लाहतां प्रभूची सत्ता । गुणत्रया प्रसवूनि तत्वता । स्थूळलिङ्गात्मका अनंता । उपाधिरूपता आंतली ॥७८॥
तया उपाधीमाजी परमात्मा । जिणें गवसूनि प्रकटली गरिमा । विविधाकृति अधमोत्तमा । आणि मध्यमा लेवविल्या ॥७९॥
जेंवि घटबाहुल्यें गगनाकृति अनेक प्रकारीं अवभासती । तेंवि वर्ष्मावच्छेदें अजस्र चित्तीं । अभेदभेदाप्रति अवगे ॥२८०॥
त्यामाजी सत्वगुणात्मक सुर । रजोगुणात्मक अनिर्ज्जर । तमप्रचुर राक्षसनिकर । एवं विस्तार हा अवघा ॥८१॥
तया भगवंताचा यया परी । मायासृष्ट गुण विकारी । तेथ सत्वरूप निजनिर्द्धारीं । कल्याणकारी शुद्धत्वें ॥८२॥
चहूं पुरुषार्थांचें कारण । जें तत्प्राप्तीचें साधन । तें सत्वचि निश्चयेंकरून । अवगम्यमान ऐसें हें ॥८३॥
जें जें कांहीं सत्वात्मक । तें तत्प्राप्तिसाधक सम्यक । कर्मधर्मदानादिक । वैराग्यविवेक तप पुण्य ॥८४॥
सत्वबुद्धीनें सत्वात्मका । भजतां करूनि दृढ विवेका । प्राणी पुरुषार्थां अशेखां । धर्मादिकां लाहातसे ॥२८५॥
एवं सकळकल्याणाचें बेज । तें तव सत्वचि पुण्यपुज्ज । तया सत्वाची मूर्ति सहज । पूर्णत्वें अज पुरुषोत्तम ॥८६॥
यास्तव साधकां मुमुक्षुवर्गा । भजनीय विष्णु संसृतिभंगा । आतां या निश्चयशतशृंगा । प्रतीतिधराङ्गा वरी स्थैर्य ॥८७॥
ऐसा मुनींचा कृतविवेक । प्रतीतिगत पारमार्थिक । कथिता जाला कवितिलक । वक्ता श्रीशुक नृपातें ॥८८॥
श्रीशुक उवाच - एवं सारस्वता विप्रा नृणां संशयनुत्तये । पुरुषस्य पदाम्भोजसेवया तद्गतिं गताः ॥२०॥
श्रीशुक म्हणे गा सुहाडा । परीक्षिति बुद्धिसुघडा । पूर्वोक्तप्रकारें निवाडा । करिते रोकडा ते जाले ॥८९॥
जे सरस्वतीतीरनिवासी । एकत्र मिनले ऋतुकार्यासी । विप्र विपश्चित विवेकराशी । कान्तदशीं प्रबुद्ध ॥२९०॥
ऐसे केवळ मुनि सर्वज्ञ । ब्रह्मानुभवें अभेद पूर्ण । परी उत्तरोत्तर नर अज्ञान । संशयापन्न स्वहितातें ॥९१॥
देवत्रयीं कोण वरिष्ठ । मोक्षप्रद भजकां इष्ट । कवणा भजिजे एकनिष्ठ । संशयाविष्ट यापरी ॥९२॥
तयांचिया संशयनिवृत्ती । कारणें इत्थंभूत सुमती । निश्चय करूनियां निगुती । भजन विहितीं विषज्जलें ॥९३॥
कीं श्रेष्ठ आचरोनि दाविती । इतरांसि लागे तत्प्रवृत्ती । निःसंषय स्वहिता भजती । सद्गति पावती तदाश्रयें ॥९४॥
जरी ते कैसे कवणा भजले । ऐसें पुससी मज तूं वहिलें । तरी जो पूर्णपनें शान्तिबहळें । सुलीन आपले स्वरूपीं ॥२९५॥
तो पुरुष परमात्मा रमेश । तयाचें पदपद्म हतकल्मष । महत्तम श्रद्धायुक्त सुरस । भजले विशेष निष्ठेनें ॥९६॥
अमळान्तरीं सच्चिदानंद । आदिपुरुषाचें जें श्रीपद । षोडशेन्द्रियोपच्चार विशद । अर्पूनि शुद्ध भजिन्नले ॥९७॥
ऐसिया सेवेनें सद्गति । म्हणिजे विष्णूची वास्तवप्राप्ती । अभेदात्मबोधें तये प्रति । पावले निश्चिती मुनिवर ॥९८॥
चतुर्थ मुक्ति जे सायुज्यता । लाभले अक्शय ते तत्वता । पुन्हा संसरणाची वार्ता । नसे सर्वथा जी योगें ॥९९॥
येथूनि संपला हा इतिहास । येथ सूचिला माधवोत्कर्ष । सर्वीं सर्वोत्तम रमाधीश । तद्भक्ति निःशेष मोक्षकर ॥३००॥
इतुकिया कथनाचें तात्पर्य । बादरायणि नृपासि काय । सूचिता जाला उपदेशप्राय । तें विद्वद्वर्य जाणती ॥१॥
सर्वांसि कळावयासाठीं । प्रकट बोलिजेल ते गोठी । स्वहिता साधकीं साधनाविष्टीं । ऐकिजे श्रुतिपुटीं विश्वासें ॥२॥
नृप विप्रशापें गतायुष । दुर्मरणास्तव कृतकल्मष । इच्छी अंतरीं केवळ मोक्ष । धरूनि लक्ष शुकवचनीं ॥३॥
कवणा देवा शरण जावें । कोण तें साधन आचरावें । ऐसिया या साशंकभावें । शुकासि दैवें पूशिलें ॥४॥
यास्तव सर्वविदें तेणें । अचुक साधन प्रौढवयुनें । आशु कैवल्याप्राप्ति जेणें । तें कथिलें कृपेनें हरिभजन ॥३०५॥
सत्यायशीवे अध्यायीं बोध । वास्तवस्वरूपाचा शुद्ध । करूनि शेखीं अभयप्रद । भजकां गोविन्द हें कथिलें ॥६॥
त्यावरी आशंकोनियां नृप । भोगी विष्णु त्यागी गरप । भोगी मोक्षद त्यागी अमूप । भोगद सकृप भजकांसी ॥७॥
कां हें ऐसें विपरीत शीळ । म्हणोनि पुसतां सौभद्रबाळ । अठ्यायशीवीं शुकें तें पघळ । कथिलें प्राञ्जळ कळेसें ॥८॥
कीं तमबाहुल्यें गुणसंवृत । शंभु केवळ सगुणमूर्त । आणि पूर्णसत्वें गुणातीत । रमानाथ परब्रह्म ॥९॥
यास्तव निर्गुण मायातीता । त्या श्रीहरीतें प्रेमें भजतां । भक्त पावती गुणातीतता । कैवल्य तत्वता सायुज्य ॥३१०॥
हा चि दृढत्वें अभिप्राय । प्रत्यया यावया व्यासतनय । सत्वपरीक्षात्मक अन्वय । मुनिकृत विस्तृत हा कथिला ॥११॥
कीं मुमुक्षु अनन्यशरण । पश्चात्तप्त विरक्त पूर्ण । विगतायुषी कृतप्रश्न । शमसंपन्न श्रद्दाळु ॥१२॥
ऐसा परीक्षिति अधिकारी । जाणोनि श्रीशुक निर्धारीं । परमसार त्या सर्वसारीं । मोक्षकारी निर्वाणींचें ॥१३॥
तें श्रीहरीचें अनन्यभजन । सर्वोत्कृष्ट अतिपावन । कथिता जाला मुनि सर्वज्ञ । भेषजीं निर्वाण सुधे परी ॥१४॥
इतिहासकथनीं अभिप्रेत । हेंचि शुकाचें इत्थंभूत । भगवन्निष्ठा यथास्थित । संशयरहित मोक्षदा ॥३१५॥
तरी श्रोतीं सुज्ञी हेचि खूण । जाणोनि कीजे भगवद्भजन । सुगम आणि मुक्तिकारण । सकळां पावन निर्धारें ॥१६॥
भेदभावना देवतान्तरीं । न धरूनि एकचि श्रीहरी । भजतां कैवल्य निर्धारीं । जें दुर्लभ अध्वरीं तपस्तीर्थीं ॥१७॥
अन्य साधनांचे सायास । स्वयें सोडुनियां निःशेष । आश्रयिजे रमाधीश । हेंचि रहस्य सर्वार्थें ॥१८॥
असो आतां हे शुकोक्तकथा । इचिया श्रवणाचें फळ तत्वता । शौनकादिकां जाला कथिता । सूत तें श्रोतां परिसिजे ॥१९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP