अध्याय ८९ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नैच्छत्वमस्युत्पथग इति देशश्चुकोप ह । शूलमुद्यम्य तं हन्तुमरेभे तिग्मलोचनः ॥६॥
तंव येरू अंतरीं परीक्षाकाम । देखूनि शिवाचा स्नेहसंभ्रम । न इच्छी आलिङ्गनक्रम । स्तंभोपम दुरी ठेला ॥९८॥
ऐसें विपरीत आचरण । स्नेहवना दावाग्निसमान । देखोनियां तमाधिष्ठान । उमारमण कोपला ॥९९॥
भृगूतें म्हणे अरे मत्ता । उत्पथगामी दिससी पुरता । अशिष्टाचारी तूं होत्साता । वर्तसी अदान्ता विपरीत ॥१००॥
निगमागमोक्त उपेक्षणें । उचितीं अनुचितातें जें करणें । तोचि उत्पथ हें जाणणें । उन्मत्तपणें भलतैसें ॥१॥
सर्वत्र नम्रत्वें वर्तणें । हीं तंव सुज्ञाचीं लक्षणें । ना तरी सत्पुरुषीं तर्ही होणें । नम्र भलतेणें सद्भावें ॥२॥
अथवा ईश्वराचिया मूर्ति । कीं वंदिजे वडिलांची तो पंक्ति । हे अवघीच सोडोनियां पद्धति । तूं मंदमति उन्मत्त ॥३॥
ऐसें कठोर बोलता देव । क्षोभें कंपित जाले अवयव । सर्वांङ्गीं प्रकटला क्रोधभाव । आविर्भाव तमाचा ॥४॥
वाळार्का सरी अति आरक्त । किंवा खदिराङ्गार प्रज्वलित । तेंवि तीव्र जाले अक्ष समस्त । आवेशें अद्भुत क्षोभला ॥१०५॥
तत्काळ शूळ घेऊनि हातीं । भृगूतें माराया निश्चिती । प्रवर्तला क्रूरनिघातीं । न धरूनि चित्तीं स्नेह दया ॥६॥
तंव ऐसा वोडवतां अनर्थ । देवी पार्वती समीप तेथ । आड येऊनि वारिलें त्वरित । तें परिसें यथार्थ नृपनाथा ॥७॥
पतित्वा पादयोर्द्देवी सान्त्वयामास तं गिरा । अथो जगाम वैकुण्ठं यत्र देवो जनार्दनः ॥७॥
शंकराचें चरणयुगळ । तेथें ठेवूनि आपुलें मौळ । सान्तविती जाली केवळ । तयातें मंजुळ वाणीनें ॥८॥
अहो जी स्वामी देवाधिदेवा । इन्द्रादि इच्छिती तुमची सेवा । तेथ इतरांचा कोण केवा । लाहती विभवा तद्योगें ॥९॥
ज्यावरी कराल कृपेचा लेश । रंक तो होय त्रिजगाधीश । कीं वक्रावलोकनें अशेष । ब्रह्माण्डकोश संहारां ॥११०॥
तुम्ही केवळ परमेश्वर । तुमचाचि अवघा हा विस्तार । सृष्टि भासे नानाकार । स्वभावान्तर भिन्नत्वें ॥११॥
विविध जीवांचिया कोटी । विविध तयांचिया राहटी । न्यायान्यायपरिपाटी । त्या घडती अदृष्टीं नियमिल्या ॥१२॥
तया अदृष्टातें प्रेरक । प्रभु तुमचीच सत्ता मुख्य । युक्तायुक्ताचा विवेक । अधीन सम्यक त्या नाहीं ॥१३॥
दुरदृष्टाचिया क्षोभें । बुद्धिवंतहि विचंबे । ज्ञाताचि अयुक्तारंभें । वैगुण्य लाघे प्रसादें ॥१४॥
नावेक देखणा जैसा तरळे । कीं चालतां प्राणी अदखळे । किम्वा वक्ताची विसरें बरळे । विपरीतकाळें तैसें तें ॥११५॥
भृगु आपुला केवळ बंधु । तपस्वी पूर्ण सज्ञान साधु । त्यांशीं तो न घडावा प्रमादबाधु । परी रहस्य प्रसिद्ध हें न कळे ॥१६॥
अवचटें स्वहस्त निकरें उरीं । कीं श्लेष्मा नाकींचा आंगावरी । पडलिया छेदितां हानि पुरी । दुर्दशा दुसरी लोकांत ॥१७॥
तेंवि ऐसिया गोष्टीचा निकर । आपुलियावरी अत्यंत क्रूर । सहसा न करावा दुर्द्धर । हाचि प्रकार उत्तम ॥१८॥
शिष्टापासून अंतराय । घडतां न कीजे त्या अपाय । पश्चात्तप्त तो स्वयेंचि होय । मृत्युप्राय उमजल्या ॥१९॥
तथापि अपराध पाहूनि दंड । मनुष्य देखोनि प्रौढाप्रौढ । कीं आप्त परकीय सुज्ञ लंड । कीजे उघड सर्वज्ञीं ॥१२०॥
यास्तव भृगूचा प्रमादभाव । चित्तीं नाणावा सर्वथैव । शमिजे विषादप्रादुर्भाव । हेंचि अर्ह ईशत्वा ॥२१॥
जेंवि विद्या शोभे विनयेंकरून । कीं वैभव भोगें दानें पूर्ण । शक्ति करितां पररक्षण । पुरुष सज्ञान स्वधर्में ॥२२॥
कुळवंत शोभे सदाचारें । तरुवर पुष्पादिफळसंभारें । वक्ता सुललित शुभाक्षरें । तेंवि महत्त्व शांतिक्षमेनें ॥२३॥
तये शांतिक्षमेचें आगर । प्रभुवरा तुमचें शुद्धान्तर । तुमचिया आधारें धराधर । पृथ्वी समग्र शिरीं धरी ॥२४॥
तुमचिये क्षमेनें धरा । साहे संपूर्ण भूतभारा । समुद्र वडवानळा उदरा । माजि दुष्करा सांठवी ॥१२५॥
तरी आतां येथें प्रस्तुत । क्षमा प्रकटिजे हेंचि युक्त । इतुकी प्रार्थना यथार्थ । मानिजे समर्थशिरोमणि ॥२६॥
राया इत्यादि अमृतवाणी । करूनि भवानी चातुर्यखाणी । शान्तविती जाली शूळपाणी । तेचि क्षणीं नमूनियां ॥२७॥
यावरी भृगु बुद्धिवंत । सत्वभाव पाहूनि तेथ । सिन्धु देखोनी तृपाक्रान्त । परते तद्वत परतला ॥२८॥
मग जेथ वसे श्रीजनार्दन । स्वप्रकाशें देदीप्यमान । म्हणोनि शोभे ज्या देवाभिधान । जो लक्ष्मीरमण परमात्मा ॥२९॥
तया वैकुण्ठाप्रति सत्वर । गेला शेवटीं मुनीश्वर । आतां तेथील परीक्षाप्रकार । ऐक सादर निकराचा ॥१३०॥
शयानं श्रिय उत्सङ्गे पदा वक्षस्यताडयत् । तत उत्थाय भगवान्सह लक्ष्म्या सताङ्गतिः ॥८॥
स्वानंदमंचकीं भक्तानुरागी । शान्तिश्रियेच्या उत्संगीं । निर्विषयस्वसुखीं अभंगीं । निद्रित शार्ङ्गी परमात्मा ॥३१॥
ऐसियातें देखोनि नयनीं । प्रत्यगात्मा ब्रह्मयोनी । संकल्पचरणें हृदस्थानीं । ताडिता मुनी जाहला ॥३२॥
इतुकिया वरी तो श्रीहरी । सर्वान्तरात्मा निर्विकारी । शान्तिश्रियेसी बोधावरी । येऊनि सत्वरी ऊठिला ॥३३॥
राया कैसा म्हणसी रमापती । तरी भगवान आणि सताङ्गती । या विशेषणद्वयें तुजप्रति । उमजे ते रीती निवेदितों ॥३४॥
यश श्री आणि उदारता । ज्ञान वैराग्य सर्व सत्ता । येणें षड्गुणैश्वर्य ईश्वरता । श्रीधरीं तत्वता सूचविली ॥१३५॥
या षड्गुणांचें मुख्य कारण । वस्तुता पाहतां सत्वगुण । सत्वीं नांदे केवळ ज्ञान । तें सत्व पूर्ण श्रीधरीं ॥३६॥
म्हणोनि तया ज्ञानपूर्णता । ज्ञान वैराग्य आत्मसत्ता । या तिहींस्तव येरे तत्वता । यशादि सर्वदा आपैतीं ॥३७॥
ज्ञानास्तव यश संपादे । वैराग्यस्तव लक्ष्मी नांदे । ऐश्वर्य औदार्य समुदें । एवं मिथासंबंधें षड्गुण ॥३८॥
पूर्णत्वें हे साही गुण । वासुदेवीं अक्षय जाण । इतरांशीं हि हें विशेषण । ग्रंथीं कविजन देताती ॥३९॥
परंतु अंशत्व तयांचे ठायीं । षड्गुण नांदती कांहीं बाहीं । याची प्रतीति सर्वांसही । उपपत्ति ही कळतसे ॥१४०॥
हिरण्याक्षादि शंखासुरा । कीं मधुकैटभादि दुर्विकारां । विधीनें निर्मूनि देऊनि वरा । कोणत्या यशा संपादिले ॥४१॥
कीं वृकासुर बाणासुर रावण । शिवें या देऊनि वरदान । जालिया परिणामाची खूण । जाणती सुज्ञ सविस्तर ॥४२॥
आतांचि प्रस्तुत येथें । भृगूचिया अंतरातें । सर्वज्ञपणें जरी जाणते । तरी कां कोपते तयावरी ॥४३॥
अच्युतीं ऐसें विपरीत सहसा । न घडे कदापि ही नराधीशा । यास्तव भगवान् आदिपुरुषा । विशेषणदीक्षा यथार्थ ॥४४॥
आणि पूर्णबोधें स्वरूपस्थित । म्हणोनि निर्विकार अच्युत । ब्रह्मत्वेंची अनुस्यूत । गुणातीत परमात्मा ॥१४५॥
याकारणें विवेकेंकरून । ज्ञानवैराग्यभक्तिसंपन्न । तया संतांचें प्राप्तिस्थान । सच्चिद्घन मूर्तिमंत ॥४६॥
जयाचिया स्वरूपचिन्तनें । पावूनि तन्मयता पूर्णपणें । कदापि न पवती जन्ममरणें । पुनरावर्तनें सज्जन ॥४७॥
ऐसा भगवान् लक्ष्मीपती । लक्ष्मीसहित सताङ्गती । उठिला खडबडूनि निश्चिती । हाणितां भृगु मुनि पद हृदयीं ॥४८॥
स्वतल्पादवरुह्याथ ननाम शिरसा मुनिम् ।
आह ते स्वागतं ब्रह्मन्निषीदात्रऽसने क्षणम् । अजानतामागतान्वः क्षन्तुमर्हथ नः प्रभो ॥९॥
मग आपुला जो शेषतल्य । तयावरूनि विधीचा बाप । धर्मस्थापक ब्रह्माण्डभूप । वेगें निष्कोप उतरोनी ॥४९॥
जेंवि गुरूतें अवचटं तिष्ठतां । देखोनि सच्छिष्य होय नमिता । तेंवि मुनीतें त्रिजगत्पाळिता । स्वशिरें वंदिता जाहला ॥१५०॥
यावरी आमृतोपमभाषितें । बोलता जाला अतितर आर्तें । जाणोनी शान्तिवल्लीचीं रसभरितें । फळें तयातें अर्पिलीं ॥५१॥
तेंचि परिसें कुरुभूषणा । म्हणे अगा ये सुब्राह्मणा । सुखरू तवागमन सुज्ञा । असे कीं आज्ञा मज करीं ॥५२॥
येथ यया आसनावरी । स्वस्थ बैसें बा क्षणभरी । मजवरी पाहें कृपानेत्रीं । जालों अधिकारी अपराध ॥५३॥
तुज सारिखा तपोनिधी । येतां पुढें धांवोनि आधीं । लोटांगणें वंदिजे प्रपदीं । परि मंदप्रारब्धी मी खरा ॥५४॥
कीं तवागमनसुवेळें । निद्रित झालों दुर्दैवबळें । म्हणोनि अदृष्टें विफळें । मज दें घडलें अनुचित ॥१५५॥
स्वयेंचि पूर्णकृपाभरितें । येथ आलां ऐसिया तुम्हांतें । अभिगमनादिशिष्टाचरितें । दुर्दैवोदितें न भजलों ॥५६॥
ऐसी न कळूनि घडली अवज्ञा । म्हणोनि आमुतें जी सर्वज्ञा । तुम्ही योग्य आहां क्षमापना । क्षमापूर्णा मुनीश्वरा ॥५७॥
म्हणाल क्षमेची योग्यता कैसी । तरी शमदमादिसाधनविशेषीं । रजतम सांडूनि सत्वशुद्धीसी । आत्मबोधासी अवगमिलें ॥५८॥
यास्तव गेला देहाभिमान । तेणें नाठवे मानापमान । सर्वभूतीं आत्मा समान । अभेद पूर्ण अनुभवला ॥५९॥
या कारणें क्षमादिलक्षणीं । वसती केली तुमचे करणीं । तरी ममापराधाची करणी । कें अंतःकरणीं स्फुरेल ॥१६०॥
आणि मी संतांचा सेवक । केलों धर्माचा संस्थापक । ऐसिया मजहून न कळून चूक । घडली तरी योग्य क्षमापना ॥६१॥
इत्यादि सुललित भाषणें । गौरवूनी मुनींकारणें । आसनीं बैसविलें रमारमणें । पुढील वर्तणें अवधारा ॥६२॥
अतीव कोमलौ तात चरणी ते महामुनेः । इत्युक्त्वा विप्रचरणौ मर्दयन्स्वेन पाणिना ॥१०॥
पुन्हा नम्रत्वें करी प्रार्थना । कोमलशब्दें दावूनि करुणा । महामुनि या संबोधना । देऊनि ब्राह्मणा श्रीहरि ॥६३॥
म्हणे बापा महामुनी । तव पद कोमल कमळाहूनी । ताडितां मम हृदयीं कठिनीं । असेल जाली वेदना ॥६४॥
ऐसें बोलूनि रमारमण । तया विप्राचे दोन्ही चरण । स्वकरें मर्दित होत्साता जाण । जगदुद्धरण जगदात्मा ॥१६५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP