अध्याय ८६ वा - श्लोक ५१ ते ५५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीभगवानुवाच - ब्रह्मंस्तेऽनुहार्थाय सम्प्राप्तान्विद्ध्यमून्मुनीन् ।
सञ्चरन्ति मया लोकान्पुनन्तः पादरेणुभिः ॥५१॥
बह्मन् ऐसिया संबोधनें । ब्राह्मणातें श्रीकृष्ण म्हणे । अनुग्रह कराया तुजकारणें । मुनींचें येणें तव सदना ॥८४॥
नारदप्रमुख महामुनी । अनुग्रहावया तुज लागुनी । प्राप्त जाले तुझिया सदनीं । अंतःकरणीं हें जाण ॥३८५॥
मज हृदयस्थेंसिं ऐक्य । करूनि फिरती लोक अनेक । पदरेणुहि कलिमलपंक । क्षाळूनि सम्यक पूत करिती ॥८६॥
तपस्तेजाचे केवळ तरणी । सुकृतसागर अगाधपणीं । जयांच्या दर्शनमात्रें प्राणी । कैवल्यसदनीं विराजती ॥८७॥
प्रबोधाचे कल्पतरु । कारुण्याचे सुधाकरु । शान्तिसुखाचे अकूपारु । जे साकार परब्रह्म ॥८८॥
ऐसिया मुनींतें आपुल्या सदनीं । संप्राप्त अनुग्रहार्थ जाणोनी । मजहूनी तत्पर ब्राह्मनभजनीं । मामकीं जनीं विनटावें ॥८९॥
हृदयस्थेंसिं मज समवेत । अनेक लोक विलोकित । स्वसंचारें पावन करित । लोक समस्त पदरजीं जे ॥३९०॥
हाचि सातां श्लोकीं स्पष्ट । महिमा वदला श्रीवैकुंठ । तीर्थ क्षेत्र देवता श्रेष्ठ । त्याहूनि वरिष्ठ द्विजवर्य ॥९१॥
देवाः क्षेत्राणि तीर्थानि दर्शनस्पर्शनार्चनैः । शनैः पुनन्ति कालेन तदप्यर्हत्तमेक्षया ॥५२॥
तीर्थें क्षेत्रें आणि देवता । दर्शनें स्पर्शनें पूजनें करितां । हळूहळूचि पवित्रता । देती तत्वता चिरकाळें ॥९२॥
अर्चनविधानें पूजितां देवां । यथोक्त चिरकाळ करितां सेवा । पापक्षयाचिया नांवा । श्रुतिगौरवा मेळविती ॥९३॥
श्रुतिवाक्यांचा विश्वास जयां । ते मानिती पापक्षया । केवळ अविपश्चितां प्राणियां । अप्रत्यया न तरणें ॥९४॥
स्नानें पानें स्पर्शनाचमनें । तीर्थें करिती पातकदहनें । हा विश्वास श्रुतींच्या वचनें । परि प्रत्यय बाणणें दुर्ल्लभ कीं ॥३९५॥
मुखें स्तवितां स्पर्शमणी । लोह न पालटी स्पर्शें करूनी । तेंवि तीर्थांची माहात्म्यवाणी । दुष्टाचरणीं न पालटतां ॥९६॥
दरिद्र न वचता लक्ष्मीवंत । म्हणतां जनपद उपहासित । तेंवि वृथा प्रायश्चित्त । पूर्वाचरित न मोडतां ॥९७॥
तीर्थीं केलीं प्रायश्चित्तें । न पालटती पूर्वाचरितें । यथापूर्व सकामचित्तें । वर्त्तती त्यांतें कैं शुद्धि ॥९८॥
तैसींच श्रेष्ठें पुण्यक्षेत्रें । सदोषीं आलोकिलिया नेत्रें । दोष झडती दर्शनमात्रें । ऐसीं स्तोत्रें महिमेचीं ॥९९॥
तेचि क्षेत्रीं जार चोर । दुष्ट दुराचारी पामर । वसती त्यांचा अघसंहार । कां पं सत्वर न करिती तीं ॥४००॥
तरी काय त्यांचा महिमा लटिका । ऐसी न वदे शास्त्रपीठिका । जैं भग्यें ये दैवघटिका । तैं होय सुटिका सदोषियां ॥१॥
म्हणाल घटिका कोण ते येथ । सावध परिसा तो वृत्तान्त । अर्हत्तमांचा अपांगपात । भाग्यें अकस्मात जैं लाहती ॥२॥
जेंवि नृपाच्या अभयपत्रीं । पुरीं पट्टणीं वार्धुषमात्रीं । वस्तु आणितां ग्राहकीं नेत्रीं । पाहतां सर्वत्रीं घेयिजती ॥३॥
तेंवि श्रुतींच्या प्रशस्ता वचनीं । दर्शनस्पर्शनार्चना मुनी । येती त्यांचिया अवलोकनीं । अधिष्ठीं जनीं उद्धरिजे ॥४॥
एवं देवता क्षेत्रें तीर्थें । चिरकाळ सेवितां निष्ठावंतें । तेथेंही पूज्यांच्या अपांगपातें । फळती सुकृतें अघनाशें ॥४०५॥
परद्रव्याविषीं जे अंध । परस्त्रीविषीं केवळ बंड । परापवादकथनीं तोंड । वेडमूक जयांचें ॥६॥
सत्य सन्मात्र जे समदर्शी । ऋतभाषणी श्रुतिविश्वासी । आत्मवेत्ते विवेकराशी । योगाभ्यासी मनोजयी ॥७॥
ऐसियांचे पदरजःकण । दुर्ल्लभ तीर्थक्षेत्रां लागून । पदरजीं कें करिती पावन । ऐसें चिंतन तीं करिती ॥८॥
प्राणप्रतिष्ठादि श्रुतींच्या मंत्रीं । जिहीं देवता प्रतिमामात्रीं । प्रतिष्ठिजती तीर्थीं क्षेत्रीं । ज्यांची अघहंत्री पदधूळी ॥९॥
चैतन्यरूपी सर्वग एक । त्या मज देवताभेद अनेक । करूनि प्रतिष्ठिती सम्यक । तेथ निष्टंक मी प्रकटें ॥४१०॥
यालागिं तयांचा मी दास । लंघूं न शकें तद्वचनांस । ब्राह्मणवचनीं ज्यां विश्वास । तेही विशेष मज पूज्य ॥११॥
जिये क्षेत्रीं जे तपिन्नले । त्यांच्या तपस्तेजें तें भलें । तीर्थक्षेत्र वाखाणिलें । तें बोलिलें अर्हत्तम ॥१२॥
ऐसियांचिया अवलोकनें । तीर्थें क्षेत्रें देवायतनें । करूं शकती दोषदहनें । तियें द्विजरत्नें पूज्यतमें ॥१३॥
म्हणसी पूज्यतम ब्राह्मण । श्रेष्ठ कर्मठ तपोधन । श्रुतदेवा हें सहसा न म्हण । जन्मापासून मंगळ ते ॥१४॥
ब्राह्मणो जन्मना श्रेयान्सर्वेषां प्राणिनामिह । तपसा विद्यया तुष्ट्या किमु मत्कलया युतः ॥५३॥
प्राणिमात्रांहूनि वर । जन्मापासूनि द्विजशरीर । सर्वजीवांसि श्रेयस्कर । निर्ज्जरपितरमुनिप्रमुखां ॥४१५॥
जन्म पावतांचि ब्राह्मण । समस्त तोषती पितृगण । सावित्रजन्में सर्वमुनिजन । आल्हादती द्विजाचिया ॥१६॥
दारपरिग्रहानंतर । दैक्षजन्में यज्ञाधिकार । होतां तोषती निर्जर । एवं द्विजवर पूज्यतम ॥१७॥
सावित्रजन्में तपश्चर्या । दैक्षजन्में त्रैविद्यया । निष्कामकर्में संतुष्टधिया । त्रिजगा प्रियकर ब्राह्मण पैं ॥१८॥
एवं द्विजवर मजहूनि श्रेष्ठ । हें तुज कळलें कीं ना स्पष्ट । कीं पुनः जे मदेकनिष्ठ । लागे वरिष्ठ म्हणणें त्यां ॥१९॥
तापत्रयें जे तापले । उभयभोगीं विरक्त जाले । देशिकेन्द्रा शरण गेले । मन्निष्ठ जाले तद्बोधें ॥४२०॥
घेऊनि माझी उपासना । मनिष्ठ केलें वाड्मना । उमस न लाहे भववासना । मदाराधनाचेनि बळें ॥२१॥
शरीरें रंगले परिचर्येतें । वचनें रंगले गुणकथनातें । मनें रंगले मद्ध्यानातें । भरले पुरेत मत्प्रेमें ॥२२॥
ऐसे श्रेष्ठां श्रेष्ठतर । मदेकनिष्ठ जे द्विजवर । कीं पुन्हा लागे हें उत्तर । प्रशंसापर म्हणावें ॥२३॥
गुरूपदिष्ट जे मत्कळा । वैदिकतान्त्रिकसपर्याजाळा । माजि आकळूनियां स्वलीला । सुखकल्लोळा माजि रमती ॥२४॥
ते पूज्यतम तें काय म्हणूं । कीं मजसमान ऐसें गणूं । ऐसे नव्हेचि ते ब्राह्मणु । वरिष्ठ पूर्ण मजहूनि ही ॥४२५॥
न ब्राह्मणान्मे दयितं रूपमेतच्चतुर्भुजम् । सर्ववेदभयो विप्रः सर्वदेवमयोह्यहम् ॥५४॥
चतुर्भुज मम रूपडें । तें या ब्राह्मणांचेनि पाडें । सहसा मजलागिं नावडे । हें तुज पुढें गुज कथिलें ॥२६॥
सर्ववेदमय ब्राह्मण । वेदमंत्रादि देवगण । सर्वदेवमय मी जाण । प्रियतम पूर्ण मज विप्र ॥२७॥
दुष्प्रज्ञा अविदित्वैवमवजानन्त्यसूयवः । गुरुं मां विप्रमात्मानमर्चादाविज्यदृष्टयः ॥५५॥
हे गुज न जाणोनियां दुष्ट । ब्राह्मणां न भजती पापिष्ठ । मंदमति दोषाविष्ट । जाणती कनिष्ठ द्विजवर्या ॥२८॥
जगाचा अनक मी जो गुरु । केवळ जगदात्मा ईश्वरु । तोचि ब्राह्मण हा निर्धारु । नाहीं साचार मतिमंदां ॥२९॥
पाषाणप्रतिमादिकांच्या ठायीं । पूज्यता मानूनि सर्वदा ही । भजती परंतु द्विजांच्या देहीं । न भजती कहीं दुष्टात्मे ॥४३०॥
तैसा विप्र मत्पररति । लाहोनि वर्त्ते जो त्रिजगति । तयाची केवळ विशुद्ध मति । कथी श्रीपति तें ऐका ॥३१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP