अध्याय ८६ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तच्छ्रुत्वा क्षुभितो रामः पर्वणीव महार्णवः । गृहीतपादः कृष्णेन सुहृद्भिश्चान्वशाम्यत ॥११॥

तें ऐकूनियां बळभद्र । क्षोभला जैसा प्रळयरुद्र । कीं पूर्ण पूर्णिमे जेंवि समुद्र । तेंवि अनावर सरोप ॥८२॥
करकराटें खावूनि दाढा । हातीं वसिला प्रचंड मेढा । म्हणे बोडका यती बापुडा । कोठें मजपुढें जाईल ॥८३॥
संवर्तनामा परजिला हळ । अपर सौनंद मुसळ । कल्पान्त होतां कृतान्तकाळ । तेवि तत्काळ उठाविला ॥८४॥
नेत्रद्वारें निघती ज्वाळ । नासारंध्रें धूम्रकल्लोळ । हें देखूनि भक्तवत्सळ । आला गोपाळ सान्तवना ॥८५॥
कृष्णें येऊनि तत्क्षणीं । माथा ठेविला ज्येष्ठा चरणीं । प्रार्थिता जाला मधुर वचनीं । तें सज्जनीं परिसावें ॥८६॥
म्हणे भो भो श्रीबळरामा । तुमचा अगाध ऐश्वर्यमहिमा । नावगमेचि आगमनिगमां । तो तूं आम्हां सुलभ सखा ॥८७॥
ब्रह्माण्ड सगळें वाहसी मुकुटीं । त्या तव कोपाची सकोप भृकुटी । कवण साहों शकेल सृष्टी । मनुष्यनटीं जरी नटसी ॥८८॥
अमरेन्द्राच्या कैपक्षासी । आणि भूभार उतरावयासी । जन्म धरिला यादववंशीं । तें मानसीं आठविजे ॥८९॥
स्वधर्माचें संस्थापन । आणि साधुसंरक्षण । दुर्जनाचें निबर्हण । इतुकें कारण अवररणा ॥९०॥
जेणें सुभद्राहरण केलें । त्यातें नाहीं ओळखिलें । म्हणूनि क्रोधाचें भरतें आलें । तें उपसंहरिलें पाहिजे ॥९१॥
कुढाविला जो अमरेन्द्र । तो हा प्रत्यक्ष अर्जुन वीर । पितृश्वसेचा तृतीय कुमर । सुहृद साचार जिवलग हा ॥९२॥
आणिक एक ऐकें मात । परमगुह्य जो वृत्तान्त । जेणें होय दोषलिप्त । तो संकेत अवधारीं ॥९३॥
सुभद्रा जन्मली यादवां घरीं । परि हे शची पौरंदरी । यास्तव अर्जुनालागिं वरी । बिघड न करीं पैं यांचा ॥९४॥
इचा करिसी मनोभंग । तरी हे करील स्वतनुत्याग । तेणें अपकीर्तीचा डाग । लागल्या अभंग मग न वचे ॥९५॥
भो भो स्वामी संकर्षणा । तुझे अंतरींची वासना । सुभद्रा द्यावी दुर्योधना । ते अर्जुना केंवि दीजे ॥९६॥
तरी तूं ऐकें इये विशीं । सुरेन्द्र जाणोनि अर्जुनासी । इनें वरिला विश्वयेंसीं । दुर्योधनासी हे न वरी ॥९७॥
कलिपुरुषाचा अवतार । तो हा प्रत्यक्ष गान्धार । सुभद्रा याचा न शिवे कर । हा निर्धार मी जाणं ॥९८॥
बलात्कारें अघटित घडतां । सुभद्रा करील आत्मघाता । कृष्णें ऐसें स्मरण देतां । रामें तत्वता जाणितलें ॥९९॥
प्रबळ क्षोभला जरी अग्नि । तो उपशमे अनिन्धनीं । तेंवि कृष्णाच्या विवेकवचनीं । प्रशान्त मनीं बळ जाला ॥१००॥
भोज अंधक दाशार्ह मधु । जिवलग आप्त सुहृद बंधु । तिहीं प्रार्थूनि करुणासिन्धु । केला सावध बळभद्र ॥१॥
मग म्हणे भो जनार्दना । अर्जुनें केलें सुभद्राहरणा । त्यातें आणिजे द्वारकाभुवना । विध्युक्तलग्ना करावया ॥२॥
वसुदेवदेवकी कृष्ण राम । म्हणती विचार हाचि उत्तम । वाढवूनियां सुहृदप्रेम । विवाहसंभ्रम करावा ॥३॥
पुढें पाठवूनियां अक्रूर । स्थिर केला अर्जुन वीर । स्वयें जावूनि मग बळभद्र । आणिला सादर निजभुवना ॥४॥
द्वारके माजि परमोत्साह । कनिष्ठ भगिनीचा विवाह । रामकृष्णांहीं सुहृत्समूह । आणूनिकेला स्नेहभरें ॥१०५॥
उद्धव प्रद्युम्न धाडूनि मूळ । धर्म भीम पृथा यमळ । द्रौपदीसहित आणिले सकळ । सृञ्जय पाञ्चाळ मत्सादि ॥६॥
विध्युक्त पुण्याहवाचन । केलें देवकप्रतिष्ठान । महर्षिमंत्रें लागलें लग्न । नान्दीविधानपूर्वक पैं ॥७॥
याचकां दिधल्या कनकाञ्जली । अहेरीं सुहृदांची मंडळी । गौरवूनियां भूमंडळीं । कीर्ति भरिली बळकृष्णीं ॥८॥
अन्नोदकें त्रिजग तृप्त । उपायनीं सुहृद आप्त । धनीं वसनीं संतृप्त । केली लुप्त दुराशा ॥९॥
विवाहोत्सव दिवस सोळा । केला द्वारके माजि सोहळा । सवें घेऊनि सुभद्रा बाळा । अर्जुन निघाला स्वपुरातें ॥११०॥
तिये समयीं पारिबर्ह । रामें दिधले पदार्थ सर्व । ते निरोपी योगिराव । सावध स्वयमेव अवधारा ॥११॥

प्राहिणोत्पारिबर्हाणि वरवध्वोर्मुदा बलः । महाधनोपस्करेभरथाश्वनरयोषितः ॥१२॥

वधूवरांतें संतोषकर । हर्षें आंदण दे बळभद्र । धनें गोधनें कार्त्तश्वर । पदार्थ समग्र मूलाढ्य ॥१२॥
अश्व गज रथ दास दासी । चारु चपला चातुर्यराशी । अजा अविकें गायी महिषी । उपचारकासी बहु दिधलें ॥१३॥
अंगीकारूनि पाण्डवीं । पर्णूनि सुभद्रा यादवी । निघतां सुहृदीं आप्तीं सर्वीं । यथागौरवीं गौरविले ॥१४॥
पाण्डव गेले शक्रप्रथा । ऐसी सुभद्रा लाधली पार्था । आणीक श्रीकृष्णाची कथा । परीक्षितीप्रत शुक सांगे ॥११५॥
तें परिसावी श्रोतृजनीं । भाषा हरिवरदव्याख्यानीं । जैसें वदवी चक्रपाणी । दयार्नवबाणी तेंचि वदे ॥१६॥

श्रीशुक उवाच - कृष्णस्थासीद्द्विजश्रेष्ठः श्रुतदेव इति श्रुतः ।
कृष्णैकभक्त्या पूर्वार्थ शान्तः कविरलम्पटः ॥१३॥

शु म्हणे गा मात्स्यीरमणा । श्रुतदेवनामक द्विजवर कृष्णा । प्रियतम प्राणांहूनही जाणा । मिथिलापट्टणामाजि वसे ॥१७॥
अनन्यभावें श्रीकृष्णभक्ति । अव्यभिचारी भजनासक्ति । एकनिष्ठ श्रीपदराति । तृष्णा चित्तीं आन नसे ॥१८॥
जागृत होऊनि उषःकाळीं । आह्निकाचारें भजनशाळी । अहरह आराधी वनमाळी । जीव कां हेळी नभोगामी ॥१९॥
कृष्णभक्तीचा मात्र स्वार्थ । इतुकेन नित्यत्वें पूर्णार्थ । विषयलाभोचाअनर्थ । स्वप्नीं पदार्थ तो न शिवे ॥१२०॥
वनिता वनजाक्षी वालभें । भजत असतां मन्मथक्षोभें । लंपट नोहेचि जेंवि नभें । प्रावृट्गर्भें न लिंपिजे ॥२१॥
विरक्त विवेकी शान्त दान्त । विषयीं अनासक्त उपरत । संशयरहित विपश्चित । सर्वदा संतृप्त स्वानंदें ॥२२॥
ऐसा श्रुतदेवनामा द्विज । श्रुत सर्वत्र पूज्यापूज्य । भजनप्रेमें अधोक्षज । ज्यावरी सहज संतुष्ट ॥२३॥

स उवाच विदेहेषु मिथिलायां गृहाश्रमी । अनीहयागताहार्यनिर्वर्त्तितनिजक्रियः ॥१४॥

तो द्विज विदेहदेशान्तरीं । सुखसंतोषें मिथिळापुरीं । गृहस्थाश्रमीं निवास करी । विहिताचारीं अयाचित ॥२४॥
जीविकार्थ ईहारहित । श्रीकृष्णभजनीं ईहावंत । अनुद्यमें अकस्मात । जें आहारार्थ संपादे ॥१२५॥
तितुकियामध्यें सदाचार । अतिथिपूजनीं अत्यादर । श्रौतस्मार्तक्रियापर । यजी सुर पितर प्रति पक्षीं ॥२६॥

यात्रामात्रं त्वहरहर्देवादुपनमत्युत । नाधिकं तावता तुष्टः क्रियाश्चक्रे यथोचिताः ॥१५॥

भजनाचरणीं तत्पर गात्र । राहे तितुकी यात्रामात्र । शरीरनिर्वाह अहोरात्र । होय निरंतर जितुकेनी ॥२७॥
प्राप्त जालिया अयाचित । स्वीकरी इतुकें मात्र परिमित । सहसा अधिक न करी स्वार्थ । नियमवंत तपोधन ॥२८॥
नित्यनैमित्तिक उपासना । करी यथोक्त क्रियाचरणा । सदा संतुष्ट राखी मना । विषयवासना खंडूनी ॥२९॥
ऐसा श्रुतदेव द्विजसत्तम । तैसाचि तेथील नृपोत्तम । कृष्णभजनीं ज्या दृढनियम । ऐक नाम त्याचेंही ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP