अध्याय ८६ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
सोऽपश्यत्तत्र महतीं कन्यां वीरमनोहराम् । प्रीत्यत्फुल्लेक्षणस्तस्यां भावक्षुब्धं मनो दधे ॥६॥
कपटी यतिवर तये सदनीं । उपवर कन्या लावण्यखाणी । वीरमनोहरा देखोनि नयनीं । जाहला मनीं स्मर क्षुब्ध ॥३२॥
प्रीतिपूर्वक सप्रेम वक्त्रें । शरत्फुल्लारपंकजनेत्रें । सादर पाहतां सुंदर गात्रें । मन्मथशस्त्रें भेदियला ॥३३॥
तियेच्या ठायीं रुतलें मन । कामें कलुषी केले नयन । ऐसिया यतिवरा देखून । वेधले नयन कन्येचे ॥३४॥
सा च तं चकमें वीक्ष्य नारीणां हृदयङ्गमम् । हसन्ती व्रोडितापाङ्गी तन्न्यस्तहृदयेक्षणा ॥७॥
तंव ते सुभद्रा तन्वंगी । त्यातें देखूनि भुलली वेगीं । दाटली कामोर्मी सर्वांगीं । व्रीडितापांगी स्मितवदना ॥३५॥
देखिलें यतीचें नवयौवन । आजानुबाहु सरळ सुपीन । ज्यांतें देखतां स्त्रीजन । हृदयें द्रवोन वश होती ॥३६॥
ऐसा लावण्यरसपुतळा । सुभद्रेनें देखतां डोळां । सलज्जहास्यवदनकमळा । वेधिली अबळा स्मरबाणें ॥३७॥
परस्परें मिनले नयन । मनें आळंगिलें मन । हृदयीं कडतरले स्मरबाण । न थरे अवसान धैर्याचें ॥३८॥
भिक्षु भिक्षार्थ आणिला सदना । तेणें पाहोनि कन्यकावदना । वश्य जाला म्हणती मदना । यास्तव रदना खाऊनी ॥३९॥
बळेंचि अवलंबूनि विरक्ति । सवेग गेला मठाप्रति । परंतु चटपट लागती चित्तीं । ते शुकोक्ति अवधारा ॥४०॥
तां परं समनुध्यायन्नन्तरं प्रेप्सुरर्जुनः । न लेभे शं भ्रमच्चित्तः कामेनातिबलीयसा ॥८॥
जाऊनि आसनीं बैसला मठीं । सुभद्रास्वरूपीं जडली दृष्टी । ध्यानस्थ तियेतें आठवी पोटीं । उपायकोटी तर्कितसे ॥४१॥
कोण उपाय कीजे आतां । कैसी नव वधू चढेल हाता । ध्यानीं मनीं हेचि चिन्ता । लक्षी तत्वता हरणसंधि ॥४२॥
अंतःपुरा बाहेर येती । तरी ते संधि साधिली जाती । कोण्याप्रकारें सुंदर युवती । आपुले हातीं चढेल ॥४३॥
ऐसा मन्मथें केला समळ । न फवे एकान्तसुख अळुमाळ । कामसंभ्रमें चित्त व्याकुळ । लोटी निष्कळ पळ घटिका ॥४४॥
अर्जुन धैर्याचा पर्वत । अक्षय अभंग प्रतापवंतें । कामें बळिष्ठें केला भ्रमित । न सुचे वृत्तान्त मग कांहीं ॥४५॥
स्नान संध्या कीं तर्पण । यतिवरवेषी आपण पूर्ण । गृहीतवेषाचें आचरण । नोहे आठवण ते कांहीं ॥४६॥
ऐसा विह्वळ सुभद्रावेधें । स्मरज्वराच्या संतापखेदें । तापला असतां मग प्रारब्धें । अघटितसाध्य तें घडलें ॥४७॥
महत्यां देवयात्रायां रथस्थां दुर्गनिर्गताम् । जहारानुमतः पित्रोः कृष्णस्य च महारथः ॥९॥
महा थोर रैवताचळीं । मात्रा मिनली पर्वकाळीं । तो उत्साह पहावया सकळी । आली मंडळी यादवांची ॥४८॥
यादवांचीं अंतःपुरें । गजरथयानीं निघालीं गजरें । भोंवतें क्षरक वीर भारें । वाजती तुरें सोत्साहें ॥४९॥
सुभद्रा ऐसिये अवसरीं । आरूढोनियां रहंवरीं । द्वारकादुर्गाहूनि बाहेरी । वनिताभारीं निघाली ॥५०॥
द्वारकावासी नागरजन । यात्राप्रसंगें चारी वर्ण । परिवारें थोर लहान । करिती स्मरण पथ क्रमितां ॥५१॥
भोंवती महावीरांच्या घरटी । शूर प्रतापी महाहटी । पदातिहयगजरथांच्या थापी । शस्त्रें मुष्टी लखलखिती ॥५२॥
मार्गीं चालती स्थिर स्थिर । तंव संन्यासी अर्जुनवीर । निकट सुभद्रारहंवर । देखोनि जर्ज्जर स्मरबाणें ॥५३॥
अर्जुनाचें मनोगत । पूर्वींच कृष्णासी होतें विदित । देवकीवसुदेवां वृत्तान्त । तेणें गुप्त सूचविला ॥५४॥
यती नव्हे हा पृथातनय । अर्जुननामा पाण्डव तृतीय । सुभद्राहरणीं लक्षूनि समय । खगेन्द्रन्यायें टपतसे ॥५५॥
ऐसी कृष्ण करितां सूचना । देवकीवसुदेवांच्या मना । गोष्टी मानली हें श्रीकृष्णा । अंतःकरणीं जाणवलें ॥५६॥
तदनुमतें तिये काळीं । रथस्था सुभद्रा वेल्हाळी । हरिता जाला प्रतापशाळी । वीरमंडळीमाजूनी ॥५७॥
खगेन्द्र जैसा अमृतकुंभ । तैसा अवचित अमरेन्द्रडिम्भ । सुभद्रारथीं वळंघूनि क्षोभ । दावी स्वयंभ वीरश्रीचा ॥५८॥
चडकणा मारूनि वीरां करींचें । इषुधिकार्मुक हरिलें साचें । मंडळ भेदूनियां यादवांचें । सुभद्रा घेऊनि निघाला ॥५९॥
अर्जुन प्रतापी महारथ । पवनवेगें आक्रमी पथ । ठाकूं पाहे इंद्रप्रस्थ । तंव जाला आकान्त यदुभारीं ॥६०॥
सुभद्रेचिया सहचरी । सखिया अनुचरी किंकरी । म्हणती हरिली वसुदेवकुमरी । नव नोवरी यतीश्वरें ॥६१॥
दंड कमंडलु भिरकाविला । इषुधि इष्वास परजिला । अकस्मात रथीं चढला । घेऊनि गेला कुमरीतें ॥६२॥
ऐशा किंकरी दीर्घस्वरें । हाहाकार करिती गजरें । ऐकूनि वीर रक्षक सारे । लोटके निकरें धांवणिया ॥६३॥
रथस्थो धनुरादाय शूरांश्चारुन्धतो भटान् । विद्राव्य क्रोशतां स्वानां स्वभागं मृगराडिव ॥१०॥
म्हणती केवढें नवल जालें । बोडकें संन्यासी कामें भ्रमलें । नोवरी घेऊनियां पळालें । आतां विटंबिलें जाईल ॥६४॥
डोई बोडूनि घेतला जोग । मग कां इच्छावा वनितासंग । तस्मात् न चुके प्रारब्धभोग । छी थू जग मग करिती ॥६५॥
ऐसे वरवाळले वीर । म्हणती सुभद्रा नेतो चोर । धरा बांधा अतिसत्वर । मारा क्रूर शरघातें ॥६६॥
उभा रे उभा कोठें पळसी । कामिनीहारक केंव संन्यासी । आरूढ पतन पावलासी । तव वधीं आम्हांसि दोष नसे ॥६७॥
ऐसा सुभटीं रोधिला रथ । भोंवते वर्षती शरजीमृत । एक म्हणती हें अनाथ । सुभद्रा घेऊनि सोडा हो ॥६८॥
दंड कमंडलु फडकें भगवें । याचें वैभव हें आघवें । राजकन्येतें हरूनि न्यावें । हें कां जीवें या रुचलें ॥६९॥
आपुला न पाहता सरिपाड । वनिताहरण मानिलें गोड । न पुरे कामसुखाचें कोड । काळे तोंड वृथा जाहलें ॥७०॥
ऐसी वल्गना परस्परें । भंवते वीर करिती गजरें । तंव अर्जुनें वाग्दोरे । निजचरणाग्रें सांवरिले ॥७१॥
सज्जूनि चाप घेतलें करीं । शरजीमूत वारिला शरीं । निजरथ रोधित्या वीरांवरी । स्वयें शरधारीं वर्षोनी ॥७२॥
बाणें छेदिल्या कोदंडयष्टी । खिळिल्या उदितायुधांया मुष्टी । वर्मीं खोंचले प्रतापजेठी । देऊनि पाठी मग पळती ॥७३॥
एक एका म्हणती स्थिर । पळों नका धरा धीर । एक म्हणती महावीर । नोहे यतिवर केवळ हा ॥७४॥
अर्जुन पिटूनि घातले मागें । कोणी न पवती सुभद्रालागें । मग निघाला लागवेगें । कथिती अवघे बळभद्रा ॥७५॥
म्हणती राया संकर्षणा । यतिवर नव्हे तो वीरराणा । सुभद्रा हरिली आंगवणा । समराङ्गणा उठावला ॥७६॥
वीर भेदिले तिखट बाणीं । धनुर्विद्येचा अपर तरणी । करचापल्या न पुरे कोणी । पडले धरणी महारथ ॥७७॥
स्वजन भोंवते आक्रोश करिती । वीर शरधारीं वर्षती । तयां मधूनि प्रतापमूर्ती । गेला युवती घेऊनी ॥७८॥
भोंवती श्वानें भुंकती गजरीं । तया न गणूनि जयापरी । मृगेन्द्र जैसा स्वभाग हरी । येणें नोवरी तेंवि हरिली ॥७९॥
यदुकुळशौर्या लाविली लाज । वीरश्रीचें दाविलें चोज । सुभद्रा हरिली घालूनि पैज । केलें निस्तेज रामकृष्णां ॥८०॥
वृथा आमुच्या छप्पन्न कोटी । वीरश्रीगर्व वाहती पोटीं । सुभद्रा हरूनि यतिवर कपटी । गेला पाठी पाहोनी ॥८१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP