अध्याय ८६ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


फलार्हणोशीरशिवामृतांबुभिर्मृदा सुरभ्या तुलसीकुशाम्बुजैः ।
आराधयामास यथोपन्नया सपर्यया सत्वविवर्द्धनान्धसा ॥४१॥

पूजासंभार सिद्ध केले । ते श्रीशुकें जैसे कथिले । तैसे अनुक्रमें वाखाणिले । जाती वहिले तें ऐका ॥२७०॥
चूत कदळें बदरें पनसें । नारिकेळें कपित्थें सुरसें । जंबु जंबीरें अननसें । शेवें शेपें आमळक ॥७१॥
इत्यादि अनेकफळसंभार । छात्रीं करितां वनसंचार । अनायासें ते समग्र । इक्षुदंडादि आणिले ॥७२॥
शिवा म्हणिजे राजधात्री । तियेचीं फळें प्रिय सर्वत्रीं । सहज संपादिलीं जीं छात्रीं । वनस्म्चारीं परिभ्रमतां ॥७३॥
यावरी सुगंधद्रव्यजाती । मृदाशब्दें वेधवती । प्रकट कस्तूरी जियेतें म्हणती । आणि संपत्ति वनोद्भवा ॥७४॥
कमळें कुश तुळशी पवित्रा । उशीर मूळिका सुगंधतरा । पंचामृतादि सुस्वादु नीरा । पूजासंभारा आणूनी ॥२७५॥
ऐसे संभार यथोपपन्न । परोपतापरहित जाण । संपादिले तिहीं करून । अर्ची भगवान सप्रेमें ॥७६॥
पादावनेजन पूर्वीच कथिलें । त्यावरी पूजन आरंभिलें । तें ही जातसे निरूपिलें । श्रवण केलें पाहिजे ॥७७॥
करूनि पादपूजा प्रथम । मग अर्चितसे पुरुषोत्तम । वसनाभरणें उत्तमोत्तम । स्मरूनि अक्षता वाहिलिया ॥७८॥
ब्रह्मसूत्र वाहिलें कंठीं । चंदन रेखियला ललाटीं । पुष्पावतंस खोविले मुकुटीं । मलयजउटी चर्चियली ॥७९॥
कंठीं घातले सुमनहार । वरी उधळिला परिमळ धूसर । धूप दीप सकर्पूर । बहुप्रकार आरतिया ॥२८०॥
जेणें सत्वाची वृद्धि होय । आयुः सत्व बळ निरामय । सुखतम आणि रसाळ प्रिय । ते रससोय वोगरिली ॥८१॥
दिव्यपक्कान्नें अमृतोपमें । तृणधान्याचीं उत्तमोत्तमें । सत्वशुद्धीचीं मुनिसत्तमें । अतिसप्रेमें रुचविलीं ॥८२॥
ऐसा नैवेद्य अर्पूनि हरि । आंचवणार्थ सुतप्त वारी । केशरकस्तूरी चंदन करीं । करोद्वर्तना मर्द्दविला ॥८३॥
सूक्ष्म सपूर श्वेत वसनें । परिमार्जूनि करतळवदनें । सभास्थानीं समाधानें । बैसते जाले मुनिवर्य ॥८४॥
मध्यें बैसला घननीळ । भवंता मुनिवर्यांचा मेळ । फळें अर्पिलीं रुचिरें बहळ । दीधलें ताम्बूल सकळांतें ॥२८५॥
काया वाचा मन धन सदन । दक्षिणे करूनि कृष्णार्पण । यथाशक्ति भूरि हिरण्य । अर्पूनि मुनिजन तोषविले ॥८६॥
कर्पूर नीराजन उजळिले । मंत्रपुष्पा समर्पिलें । प्रदक्षिणा करूनि केलें । अभिवंदन पोष्येंसीं ॥८७॥
अपराधाचें क्षमापन । करवी अंजलिपुट जोडून । अमृतवचनीं केलें स्तवन । आज मी धन्य म्हणे आपणा ॥८८॥
ऐसा पूजूनि चक्रपाणी । ब्राह्मण आनंदभरित मनें । वितर्क करी अंतःकरणीं । तो सज्जनीं परिसावा ॥८९॥

स तर्कयामास कुतो ममान्वभूद्गृहान्धकूपे पतितस्य सङ्गमः ।
यः सर्वतीर्थास्पदपादरेणुभिः कृष्णेन चास्यात्मनिकेतभूसुरैः ॥४२॥

मग तो श्रुतदेव ब्राह्मण । मानसीं वितर्क करी पूर्ण । कोण्या महत्सुकृतें करून । मज सन्निधान हें जाहलें ॥२९०॥
माझा अधिकार निजमानसें । मी च विवरूनि पाहतसें । गृहान्धकूपीं पतित दिसें । त्या मज ऐसें सन्निधान ॥९१॥
सच्चिदानंदा अनुपलब्धि । मनःसंकल्पें तरळली बुद्धि । धांवे करणांचे पाणधी । विषयासिद्धिप्रलोभें ॥९२॥
यालागिं अंधधिषणानयन । न लाहती उपनिषद्बोधाञ्जन । नुदेजतं गुर्वर्क पूर्ण । अंध वयुन निजस्मृतीचें ॥९३॥
घोर निशीथ अंधकूपीं । तो हा भवभ्रम संसाररूप । गृहासक्तिगृहिणीस्तनप । पोष्य धनधान्यपश्वादि ॥९४॥
मी ऐसिये अंधकूपीं । पडिलों अहंताममताजल्पीं । आत्मविसरें मनःसंकल्पीं । बद्ध त्रितापीं जाचतसें ॥२९५॥
ऐसिया अंधकूपीं पतिता । मज हा दुर्ल्लभ संगम आतां । प्रपत जाला पैं अवचिता । कोणा सुकृतास्तव न कळे ॥९६॥
दुर्ल्लभ संगम तो कोणता । ऐसी शंका कीजेल श्रोतां । तरी जो वदला श्रीशुकवक्ता । तेंचि आतां अवधारा ॥९७॥
सर्वतीर्थांचें माहेर । तो जयाचा पदपांसुनिकर । केवळ भूतळींचे निर्ज्जर । निवासमंदिर कृष्णाचें ॥९८॥
तया भूसुरांसहित कृष्ण । अकस्मात माझें सदन । प्रवेशूनि कल्मषदहन । केलें सन्निधान देऊनी ॥९९॥
शतक्रतूचे तुलने वारी । ऐसा संगम नर निर्ज्जरीं । न भोगिजे तो बैसल्या घरीं । कवणे परी मज घडला ॥३००॥
ऐसे वितर्क वारंवार । करूनि विस्मय करी फार । दुर्लभ संग सुखाचा भर । सेवनीं सादर तें ऐका ॥१॥

सूपविष्टान्कृतातिथ्यान्श्रुतदेव उपस्थितः । सभार्यस्वजनापत्य उवाचाङ्घ्र्‍याभिमर्शनः ॥४३॥

सप्रेम आतिथ्य केलें ज्यांचें । सुष्ठु आसनीं उपविष्ट साचे । निकट बैसूनि चरण त्यांचे । मर्दी सभार्य स्वजनेंसीं ॥२॥
श्रुतदेव ब्राह्मण सप्रेमभरित । सन्निध बैसला एकाग्रचित्त । भार्यापत्यां स्वजनांसहित । चरण मर्दी कृष्णाचे ॥३॥
ऐसा चरणसंवाहनीं । सादर असतां मंजुळवाणी । बोलता जाला तें सज्जनीं । सावध श्रवणीं परिसावें ॥४॥

श्रुतदेव उवाच - नाद्य नो दर्शनं प्राप्तः परं परमपूरुषः ।
यर्हीदं शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्तया ॥४४॥

म्हणे भो भो भोगशयना । भवभजनीया भवभंजना । भगणपवंशा भासुरवदना । भद्रारमणा भगवंता ॥३०५॥
तुझें दर्शन आजीच आम्हां । जाहलें म्हणों जरी पुरुषोत्तमा । तरी हें पूर्वींच आगमा निगमां । कथितां महिमा जाणतसों ॥६॥
करणनिकरा अगोचर । जो तूं प्रकृतीहूनियां पर । त्या तव स्वरूपाचा पार । नेणती विधिहरमुनिवर ही ॥७॥
तथापि नेणती हें न म्हणावें । निगम सुगमत्वें करिती ठावें । तेव्हां वास्तव तत्व आगह्वें । मादृशजीवें जाणिजतें ॥८॥
प्रधानाचेनि अंगीकारें । शुद्धसत्वाच्या आविष्कारें । पूर्णचैतन्यपद उभारे । तैं त्वां ईश्वरें जागोनी ॥९॥
न रमे एकाकी हे वाणी । बहुत्व व्हावें हे शिराणी । तैं स्वशक्ती सत्वादिगुणीं । विश्व सृजनि उभारिसी ॥३१०॥
तया विश्वीं स्वसत्ताप्रविष्ट । तैम्चि गोचर गोगणां प्रकट । आजीच दर्शन जालें स्पष्ट । म्हणतां नीट न घडे कीं ॥११॥
विश्वीं प्रविष्ट जाहलासि जेव्हां । तैंच फावला दर्शनठेवा । आजीच दुर्ल्लभ लाभ म्हणावा । कां पां केशवा तें ऐक ॥१२॥
आजीच नव्हसी दर्शन प्राप्त । विश्वं विष्णुःहा नामसंकेत । महर्षिमुखें मादृशां विदित । तैं अप्रपतदर्शन कें ॥१३॥
तस्मात दर्शन पूर्वींच आहे । पैं तें भ्रामक मायामयें । झांकिलें विषयांच्या प्रवाहें । आत्मप्रत्ययें कवळेना ॥१४॥
तो तूं आजी परमपुरुष । मुनिजनेंसीं निजात्मतोष । मूर्त होऊन गोगणांस । फावसी विशेष हा येथ ॥३१५॥
कृषीवळें क्षेत्रीं उत्पन्न जोंधळा । कोंभ करवाड ग्रंथि पाला । पोटरा कणिस फुलवरा आला । एवं सगळा यावनाळ ॥१६॥
ऐसियाचें दर्शन जालें । तरी काय यावनाळा न देखिलें । परंतु मूळीं बीज विरूढलें । निर्धारिलें तें न वचे ॥१७॥
यालागिं पाहतां हा अन्वय । तूंचि विश्वात्मा विश्वमय । परं म्हणिजे उत्कृष्ट सोय । दर्शनलाभ आजि या ॥१८॥
कस्तूर्यादिसुरभिवस्तु । माज जडत्वें सौरभ्य स्वस्थु । तैसाचि पोतासही पदार्थु । घनीभूत अवघाची ॥१९॥
वर्ण नयनांतें गोचर । सौरभ्य घ्राणातें रुचिकर । नाम श्रवणाचा व्यापार । जाणे रसभर रसना ही ॥३२०॥
त्वगिन्द्रियासी शीतळ स्पर्श । एवं पंचधा करणां दृश्य । म्हणतां शनैः शनैः अदृश्य । होय निःशेष अगोचर ॥२१॥
तेंवि चैतन्य घनीभूत । केवळ सच्चिदानंद मूर्त । यादववंशीं श्रीभगवंत । दर्शना प्राप्त दुर्ल्लभ पैं ॥२२॥
मायिक सृष्टि मिथ्याभूत । तेथ आत्मा नित्य सत्य । प्रविष्ट जाला हा वृत्तान्त । ऐक दृष्टान्त देहींचा ॥२३॥

यथा शयानः पुरुषो मनसैवात्ममायया । सृष्ट्वा लोकं परं स्वाप्नमनुविश्यावभासते ॥४५॥

जैसा शयनीं निद्रित पुरुष । मनःसंकल्पें विश्वाभास । अविद्याभ्रमें सृजूनि अशेष । तदनुप्रविष्ट भासतसे ॥२४॥
अथवा आत्मा तूं ईश्वर । तुझिये मायेकरूनि अपर । स्वप्नींची सृष्टि भासे पर । सत्य साचार जीवातें ॥३२५॥
तये सृष्टीचा अभिमानी । स्वप्नींचा लोक विलोकूनी । तदनुप्रविष्ट आपणा मानी । हर्षग्लानी अनुभूत ॥२६॥
परी ते मिथ्या स्वाप्नसृष्टी । स्वप्नामाजि यथार्थ दृष्टि । तूं ही तैसिये परिपाटीं । विश्वपटीं प्रविष्टवत् ॥२७॥
यास्तव तुझें तें दर्शन । जालें असतां न जालें जाण । म्हणोनि आजि दुर्ल्लभ पूर्ण । मजलागून हा लाभ ॥२८॥
दुर्ल्लभ लाभ मज हा जाला । तैसा नोहेचि आणिकाला । साधनसंपन्ना साधकाला । तो तूं गोपाळा अवधारीं ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP