अध्याय ८६ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - भवान्हि सर्वभूतानामात्मा साक्षी स्वदृक्प्रभो । अथ नस्त्वत्पदाम्भोजं स्मरतां दर्शनं गतः ॥३१॥

हीति निश्चयेंकरूनि साचा । तूं आत्मा या सर्व भूतांचा । स्वदृक् साक्षी उपनिशद्वाचा । तव महिमेचा बडिवार ॥९॥
आत्मा म्हणिजे चेतयितार । साक्षी स्वबोधप्रकाशकर । स्वदृक् स्वप्रकाश साचार । अन्यविचार अनपेक्षी ॥२१०॥
ज्या कारणास्तव प्रभो समर्था । तव पादाम्बुजस्मरणनिरता । दर्शनावाप्ति होय तत्वता । हा निश्चय पुरता श्रुतींचा ॥११॥
तो आजि प्रत्यय बाणला आम्हां । एकें जें स्मरतां सदैव तुम्हां । प्रत्यक्ष देखिलें पादपद्मां । संप्राप्त सद्मा माजिवडें ॥१२॥

स्ववचस्तदृतं कर्त्तुमस्मद्दृग्गोचरो भवान् । यदात्थैकान्तभक्तान्मे नानन्तः श्रीरजः प्रियः ॥३२॥

आपुलें उपनिषद्वाक्य बोलणें । सत्य करावया कारणें । मम सद्माप्रति केलें येणें । गोचरपणें भगवंता ॥१३॥
माझिये दृष्टीसी गोचर । जालासी भगवंता साचार । जैसा उपनिषद्वाक्योच्चार । तूं तत्पर होत्साता ॥१४॥
जैसी अभेदभक्ताप्रति । समरसैकात्मबोधावाप्ति । मजकारणें प्रतीति । तैसी न लाहती अंगलगें ॥२१५॥
ज्येष्ठ अनंत संकर्षण । अज परमेष्ठी निजनंदन । रमा रमणी प्रियकर पूर्ण । त्यांलागून हें न लाभे ॥१६॥
मां इतरांचा कोण पाड । तव पदप्राप्ति अति अवघड । जाहली जाणोनि कोण मूढ । पुन्हा विघड करील ॥१७॥

को नु त्वच्चरणाम्भोजमेवं विद्विसृजेत्पुमान् । निष्किञ्चनानां शान्तानां मुनीनां यस्त्वमात्मदः ॥३३॥

अहंता ममता ज्यांच्या ठायीं । तुजवीण निपटून उरलीच नाहीं । त्वंता तवता पाहतां तेही । केली जिहीं निःशेष ॥१८॥
ऐसे पुरुष निष्किंचन । प्रशान्तवृत्ति मानसलीन । मननशीळ जे मुनिजन । त्यां आत्मदानकर्त्ता तूं ॥१९॥
आपणा देऊनि निष्किञ्चनांतें । त्यांचें सर्वस्व होऊनि पुरतें । संपादिसी तो तूं येथें । मर्त्यभुवनातें आलासी ॥२२०॥
मर्त्यभुवनीं तो कोण म्हणसी । तयातें येणें कोण कार्यासी । तें तूं ऐकें हृषीकेशी । तुझें तुजपासीं निवेदितों ॥२१॥

योऽवतीर्य यदोर्वशे नृणां संसरतामिह । यशो वितेने तच्छान्त्यै त्रैलोक्यवृजिनापहम् ॥३४॥

स्वयें यदुवंशीं अवतरून । वृजिनार्णवीं बुडतां जन । त्यांचें कल्याण अनुलक्षून । स्वयशा विस्तीर्ण प्रकटी जो ॥२२॥
वृजिनार्णव हा भवसागर । त्यासि नाहींच पारावार । ज्याप्रति बळेंच सचराचर । अहोरात्र संचरती ॥२३॥
तया संचरतया नरांसी । तारावया कारुण्यराशी । स्वयशें वृजिनार्णवचि नाशी । जो यदुवंशीं अवतरूनी ॥२४॥
राया म्हणसी स्वयश कैसें । जयाचे श्रवणें भवाब्धि नाशे । स्मरणें मननें स्वसंतोषें । जन स्मरसे निरंजनीं ॥२२५॥
तो तूं प्रत्यक्ष माजिया घरा । भाग्यें पातलासि वृष्णिप्रवरा । मी लाधलों नमनाधिकारा । उत्कृष्टतरा महालाभा ॥२६॥
ऐसें म्हणूनि चतुर्थ्यत । नामषट्कें मिथिलानाथ । नमिता जाला तो श्लोकार्थ । परिसें यथोक्त कुरुवर्या ॥२७॥

नमस्तुभ्यं भगवते कृष्णायाकुण्ठमेधसे । नारायणाय ऋषये सुशान्त तप ईयुषे ॥३५॥

कृष्णा नमूं तुजकारणें । ऐसिया मंत्रें साष्टांगनमनें । नमस्कारूनि पुढती म्हणे । तूं षड्गुणें परिपूर्ण ॥२८॥
मथुरा नेली द्वारकेसी । सुधर्मा आणिली भूतळासी । ऐसा षड्गुणैश्वर्यराशी । त्या तुजकारणें नमो नमो ॥२९॥
श्रेष्ठमुनि सुर ऐश्वर्यवंत । तैसाचि म्हणसी मी भगवंत । तरी त्यांचें ऐश्वर्य होय कुंठित । तूं अकुण्ठित मेधावी ॥२३०॥
इच्छामात्रें ब्रह्माण्डकोटी । सृजूनि पाळूनि ठेविसी पोटीं । अकुण्ठमेधावी जगजेठी । नमितों मुकुटीं त्या तुज मे ॥३१॥
सकळनरांचें आयतन । तो तूं केवळ नारायण । त्या तुजकारणें माझें नयन । अहंममएनःशमनार्थ ॥३२॥
तूं त्रिजगाचा करणपति । तुझेनि करणां ज्ञानप्रवृत्ति । प्रत्यक्प्रवण करणवृत्ति । कर्त्ता निगुती ऋषिवर्य तूं ॥३३॥
महर्षींच्या करणवृत्ति । तुझेनि त्यां प्रवृत्ति निवृत्ति । महर्षींतें ही ऋष्यकशक्ति । देता निश्चिती ऋषिवर्य तूं ॥३४॥
यालागिं ऋषिवरा तुजकारणें । नमन माझें अनन्यपणें । सुष्ठु शान्तत्व तुझें वाखाणें । वेदवदनें ब्रह्माण्डीं ॥२३५॥
तपःसंपन्न सुशान्तता । तुझ्या ठायीं श्रीभगवंता । जाणोनी विद्यमान तत्वता । तुजकारणें नमितों मी ॥३६॥
इत्यादिनमनें करूनि काय । प्रार्थनेचा अभिप्राय । पुससी तरी तोही कथिताहें । सदयहृदया भगवंता ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP