अध्याय ७४ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - एवं युधिष्ठिरो राजा जरासंधवधं विभोः ।
कृष्णस्य चानुभावं तं श्रुत्वा प्रीतस्तमब्रवीत् ॥१॥
एवं म्हणिजे पूर्वोक्त रीती । कृष्णयुधिष्ठिर उभयतांप्रती । सत्वावस्था बाणली होती । ते मागुती ओसरली ॥८॥
लब्धस्मृति धर्मराजा । जरासंधवध बरवे वोजा । आणि श्रीकृष्णैश्वर्यतेजा । ऐकूनि गुज बोलतसे ॥९॥
जरासंधाचिया वधातें । श्रीकृष्णाच्या अनुभावातें । ऐकूनि सप्रेमभरितचित्तें । बोलता झाला श्रीकृष्णा ॥१०॥
चकारार्थें आपल्या मनीं । निजाधिकारातें विवरूनी । तदनुसार मंजुळ वाणी । बोले वदनीं सप्रेमें ॥११॥
कैसा लक्षिला निजाधिकार । तोही ऐकावा विचार । कृष्ण केवळ जगदुद्धार । आपण पामर सामान्य ॥१२॥
त्या कृष्णातें आज्ञा करणें । पाहतां अयोग्य बहुतां गुणें । तथापि समर्थें पूर्णपणें । सिद्धी नेणें हें उचित ॥१३॥
ऐसा लक्षूनि अभिप्राव । बोलता झाला धर्मराव । श्रीकृष्णाचें ऐश्वर्यविभव । अयोग्यत्व आपुलेंही ॥१४॥
तया शब्दाची कडसणी । परिसें कौरवचूडामणी । जया शब्दें चक्रपाणी । अंतःकरणीं सुखावला ॥१५॥
युधिष्ठिर उवाच - ये स्युस्त्रैलोक्यगुरवः सर्वे लोकमहेश्वराः । वहंति दुर्लभं लब्ध्वा शिरसैवानुशासनम् ॥२॥
कुरुकुळवंशाचें मंडन । केवळ धर्माचा नंदन । तो युधिष्ठिर प्रस्तावेन । म्हणे वचन अवधारा ॥१६॥
जे कां त्रिजगामाजी थोर । प्रवृत्तिनिवॄत्तीचे ईश्वर । यालागीं ते सर्वेश्वर । श्रेष्ठ गुरुवर सुरासुरां ॥१७॥
निवृत्तीमाजी सनकादिक । जगद्वंद्य जे कां मुख्य । तेहे वोडविती मस्तक । अनुशासना जयाचिया ॥१८॥
प्रवृत्तीप्रतिपादक ईश्वर । विधि हर शक्र वैश्वानर । यम निरृति वरुण कुबेर । सहसमीर ईशान ॥१९॥
इत्यादि लोकपाळ पृथक । ईश्वरत्वें मिलती मुख्य । तेही अनुशासनें सम्यक । वाहती मस्तक वोडवुनी ॥२०॥
प्रजा राजाज्ञेतें शिरीं । वाहती म्हणाल जैसिया परी । हेही आज्ञा तैसिया परी । बळात्कारें न लंघिती ॥२१॥
तैसें येथींचें रहस्य नोहे । मर्त्यां अमृत जेणें भावें । दुर्लभ लाभतां तें आघवें । घेती जीवें अनुसरूनी ॥२२॥
कीं दरिद्रियाच्या कमलालया । प्रसन्न होऊनि येतां निलया । दुर्लभ जाणोनि तिचिया पाया । मस्तक बैसणें जेंवि करिती ॥२३॥
तैसा आज्ञेचा दुर्लभ । सर्वांहूनि मानिती लाभ । तो तूं प्रत्यक्ष पद्मनाभ । सगुण सुलभ ये काळीं ॥२४॥
स भवानरविंदाक्षो दीनानामीशमानिनाम् । धत्तेऽनुशासनं भूमंस्तदत्य्म्तविडंबनम् ॥३॥
पामर जीव अनाथ दीन । तथापि धरिती राज्याभिमान । वाहती त्यांचे आज्ञाप्रमाण । हें विडंबन तुज साजे ॥२५॥
भूमन् म्हणिजे अपरिच्छिन्ना । भो भगवंता अरविन्दनयना । मादृशांची वंदिसी आज्ञा । सुहृदानुकरणा दावूनी ॥२६॥
प्रभुत्वें नृपाची आज्ञा शिरीं । सामान्य वंदिती जयापरी । तयाकरूनि जाणिजे इतरीं । लघिष्ठगरिष्ठपण जैसें ॥२७॥
तेंवि मादृश जीव दीन । परि आंगीं नृपाभिमान । वाहसी त्यांचें अनुशासन । तेणें सामान्य तूं नव्हसी ॥२८॥
श्रेष्ठें कनिष्ठालागूनी । भजतां होय तेजोहानी । तें कां पां मजलागूनी । नोहे म्हणसी तरी ऐक ॥२९॥
न ह्येकस्याद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः । कर्मभिर्वर्धते तेजो ह्रसते च यथा रवेः ॥४॥
कर्मफळभोक्ते पृथक जीव । कर्मानुसार त्यांचें दैव । नृपासनारूढ राव । किङ्करसमुदाव वोळगणे ॥३०॥
कर्मसंस्कारें पृथक पृथक । तत्फळभोक्ते जीव अनेक । तारतम्य जाणती लोक । सेव्यसेवक म्हणोनियां ॥३१॥
जेंवि किटणाचीं कुशलपणें । शिल्पिक निर्मिती राजोपकरणें । चित्रिलीं लखलखिती सुवर्णें । होती तेणें मूल्याढ्यें ॥३२॥
तेंवि केवळ सुवर्णमय । निर्मिला उपकरसमुदाय । सबाह्य जेंवि तो अद्वितीय । किटनप्राय न म्हणावा ॥३३॥
भिजतां जळतां भंग होतां । किटणमूल्य होय वृथा । तैसी सुवर्णा न्यूनता । नोहे महत्त्व उणें पुरें ॥३४॥
सुवर्णाचा खंडेराव । श्वान सेवक म्हाळसा अश्व । एक्या मूल्यें तुकती सर्व । नोहे महत्त्व उणें पुरें ॥३५॥
तेंवि तूं अद्वितीय परब्रह्म । एक परमात्मा कैवल्यधाम । तुझें तेज न्यूनोदाम । न करवे कर्मश्रेणीतें ॥३६॥
उदयास्तादिकर्मेंकरून । भास्करतेजा क्षयवर्धन । नोहे जैसा तैसा पूर्ण । प्रकाशघन स्वस्वरूपें ॥३७॥
दृश्या जितुकी स्थळोपाधी । तच्छायेतें ह्रासवृद्धी । नयनीं देखूनि जन प्रतिपादी । चंडदीधितिवंतातें ॥३८॥
प्रभाते म्हणती कोंवळा सूर्य । मध्याह्रनकाळीं दाहक होय । सायाह्नीं तत्किरण निचय । क्षीण झाला जन म्हणती ॥३९॥
हाही अर्थ असो परता । तुज परिपूर्ण श्रीभगवंता । आज्ञापकता आणि धारकता । असो योग्यता द्विविधही ॥४०॥
दोहीं योगें तेजोहानि । तुझी न घडे चक्रपाणि । यास्तव कृपेच्या अवलंबनीं । स्वामिसेवकीं अभेद ॥४१॥
म्हणोनि अघटितघटनापटी । कृपेक्षणें पावे पुष्टी । लीलालास्यें दावी सृष्टी । तुज ते शेवटीं अस्पृष्ट ॥४२॥
मी परमेश्वर सर्ववंद्य । दास्यकर्म मज अयोग्य निन्द्य । ऐसा तुजमाजि न वसे भेद । तरी तें विशद अवधारीं ॥४३॥
न वै तेऽजित भक्तानां ममाहमिति माधव । त्वं तवेत च नानाधीः पशूनामिव वैकृता ॥५॥
तव भक्त जे सप्रेमळ । अनन्यबोधात्मक केवळ । अहंताममतामय जो मळ । त्यापें अळुमाळ न वसे पैं ॥४४॥
अहंता ममता त्वंता तवता । इत्यादिभेदबोधात्मकता । पशुत्वें यथार्थ जैसी भ्रान्ता । तेंवि भगवंता न तावकां ॥४५॥
तावकांप्रति हे भेदबुद्धि । तव सान्निध्यें जेथ न बधी । मा माधवा तूतें बाधी । हें न घडे कधीं पशुसाम्यें ॥४६॥
पशु हें नाम कोणाप्रति । ऐसें पुससी जरी श्रीपति । तेंही कथितों यथामति । प्रकृतिविकृतिसमुच्चयें ॥४७॥
भो भो अजिता अज अव्यया । अष्टधाप्रकृत स्थूळमाया । विकृता जीवरूपा जिया । आणिलें आया भवस्वप्न ॥४८॥
एकें अनेकता दावून । मी माझें हें दृढावून । तूं तुझें हें तत्प्रतिभान । केलें स्वप्न सुप्तातें ॥४९॥
अविद्यावरणात्मक जो देह । आत्मविसरें अप्रत्यय । ज्यातें म्हणती कारणदेह । जेथूनि उदय स्वप्नाचा ॥५०॥
स्वप्नभ्रमें भ्रमले भ्रान्त । देहात्मबोधें विषयग्रस्त । तुझें माझें करिती नित्य । केवळ प्राकृत पशू प्राणी ॥५१॥
देहाहंता ते तव भक्तां । नाकळी ममता त्वंता तवता । कारणदेहाचिया ध्वान्ता । लंघूनि तत्वता जे गेले ॥५२॥
प्रत्यगात्मत्वचित्प्रकाश । जेणें अवगमे विश्वाभास । आश्रय सर्वसाक्षी त्यास । तोही निःशेष जिंहीं केला ॥५३॥
तादात्म्यबोधें स्वरूपनिष्ठ । होऊनि झाले समरसाविष्ट । अनेकतेचे विसरून कष्ट । झाले भ्राजिष्ठ पूर्णत्वें ॥५४॥
त्या जे न शिवे अनेकता । तूं तो माधव मायानियंता । तुझ्या ठायीं अहंता ममता । पशुसाम्यता केंवि घडे ॥५५॥
इत्यादिवचनें गरुडध्वजा । सप्रेमभावें धर्मराजा । प्रार्थूनि यज्ञारंभकाजा । यज्ञ करिता जाहला ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP