अध्याय ६० वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - कर्हिचित्सुखमासीनं स्वतल्पस्थं जगद्गुरुम् । पतिं पर्यचरद्भैष्मी व्यजनेन सखीजनैः ॥१॥

राया कुरुकुळप्रवरमाळा - । मंडनमेरो गुणगणशीळा । मौळावतंस भूभुजपाळा । प्रतापतेजें भासुर तूं ॥१०॥
भूतभविष्यवर्तमानीं । सुशीळ धार्मिक नृपांच्या श्रेणी । त्यां शोभविसी हरिगुणश्रवणीं । जैसा तरणि तामरसां ॥११॥
राया कोणे एके समयीं । निजमंचकीं शेषशायी उपविष्ट असतां सेवाविषयीं । तनुमनें तन्मय तन्वंगी ॥१२॥
भीष्मकरायाची नंदिनी । हरिपदनिरता अनन्यपणीं । त्रैलोक्यजनक चक्रपाणि । स्वकान्त लक्षूनि सेवीतसे ॥१३॥
शतानुशता सद्गुणराशि । सेवनीं सादर असतां दासी । तथापि रुक्मिणी उपचारेंसीं । सखीजनेंसीं ओळंगे ॥१४॥
व्यजनहस्तें वीजी मंद । व्यंकटापाङ्गें श्रीमुकुन्द । पाहोनि मानी परमानंद । हृदयपद्मीं पद्माक्षी ॥१५॥
जगद्गुरु जो चक्रपाणि । म्हणाल किमर्थ द्वारकाभुवनीं । अवतरोनियां मनुष्यपणीं । लीलाचरणीं अनुकरे ॥१६॥
तरी ते ऐका शुकवैखरी । सूत्रप्राय सूचना करी । झणें कुरुवर संशय धरी । म्हणोनि परिहरी शंकेतें ॥१७॥

यस्त्वेतल्लीलया विश्वं सृजत्यत्त्यवतीश्वरः । स हि जातः स्वसेतूनां गोपीथाय यदुष्वजः ॥२॥

व्यंकटापाङ्गें सीतापाङ्गीं । जगद्गुरुत्व कान्ताआंगीं । पूर्ण ऐश्वर्य अंतरंगीं । स्मरोनि भोगी स्वानंदा ॥१८॥
म्हणे जो निर्गुण कैवल्यधाम । पूर्ण ऐश्वर्यें पुरुषोत्तम । तोचि हा सगुण मेघश्याम । अज अव्यय यदुवंशीं ॥१९॥
ऐशिया अनेक अवतारलीला । करूनि प्रकटी गुणगणमाळा । अनंतब्रह्माण्डांचिया खेळा । सृजी पाळि संहारी ॥२०॥
तोचि हा ईश्वर मम प्रियतम । स्वप्रणीत जो निगमक्रम । स्वसेतुसंरक्षणसकाम । नरवरवर्ष्म अवगोनी ॥२१॥
ऐशिया कान्ताचा एकान्त । लाहोनि धन्य मी त्रिजगांत । मानूनि भैष्मी आनंदभरित । सादर स्वकान्त उपासी ॥२२॥
जिये मंदिरीं मंचकारूढ । स्वभक्तां प्रकट अभक्तां गूढ । तिये मंदिरींचा सुरवाड । रचना अपाड त्वष्ट्याची ॥२३॥
तिहीं श्लोकीं तें शुक वर्णी । सादर कुरुवर परिसे कर्णीं । सुकृतबहळीं श्रोतीं श्रवणीं । अंतःकरणीं कवळावें ॥२४॥

तस्मिन्नंतर्गृहे भ्राजन्मुक्तादामविलंबिना । विराजिते वितानेन दीपैर्मणिमयैरपि ॥३॥

जेव्हां द्वारका निर्मिली । तैं हरिभुवनाची शोभा कथिली । येथ प्रसंगें उपायली । ते स्वल्प बोलिली जातसे ॥२५॥
पुरटघटिता उच्चतरा । प्राकारभित्ति गगनोदरा । चुंबिती तदग्रीं सुंदरा । दर्वीकरासम चरया ॥२६॥
विविध रत्नीं खचित चित्रें । त्वाष्ट्रनिर्मितें कौशल्यसूत्रें । अनेकावतारचरित्रें । सविस्तरें विराजितें ॥२७॥
तयांमाजी सुविस्तीर्ण । रुक्मिणीचें राजभुवन । त्याहीमाजे विलाससदन । क्रीडास्थान कृष्णाचें ॥२८॥
तस्मिन् म्हणिजे तिये ठायीं । प्रसिद्ध शोभा अंतर्गृहीं । त्यामाजी कथिलीं कांहीं कांहीं । ते नवाई अवधारा ॥२९॥
भ्राजत् म्हणिजे शोभायमानें । मुक्ताफळें जेंवि उडुगणें । देखिलीं नसतीच सहस्रनयनें । शतमखपुण्यें सुरलोकें ॥३०॥
तयांचे समान सरळ हार । वितानीं ग्रथित जे चतुरस्र । चतुर्दिक्षु श्रेणीकार । तेणें मंदिर विराजित ॥३१॥
जैसे उगवले कोटि तरणि । तैसे अनर्घ्य भासुर मणि । विराजमान तिहींकरोनी । दीपस्थानीं प्रतिभाती ॥३२॥
वितान रंगाढ्य परिकर । चित्रविचित्ररंगप्रचुर । मणिमुक्तादिगुच्छनिकर । कनकसूत्रीं विलंबित ॥३३॥

मल्लिकादामभिः पुष्पैर्द्विरेफकुलनादिते । जालरंध्रप्रविष्टैश्च गोभिश्चंद्रमसोऽमलैः ॥४॥

ऐशिया वितानें विराजित । विशेष पुष्पजाति अनंत । अनंतलोकींच्या मघमघित । तद्दामयुक्त गंधाढ्य ॥३४॥
तया सुमनांचिया वेधें । अनेक द्विरेफ जाती मोदें । रुंजी करिती परमानंदें । तेणें नादें सुनादित ॥३५॥
भ्रमरीं भावोनि सुमनोद्यान । गुंजारवती आनंदोन । तेणें मुखरित विलासभुवन । क्रीडास्थान कृष्णाचें ॥३६॥
चंद्रकान्ताच्या जालंधरीं । प्रविष्टा चंद्रकिरणहारी । निर्मळ मुक्तादामावरी । पीयूषतुषारीं द्रव भासे ॥३७॥
चांदिवा भावूनि चंद्रस्थानीं । चकोरेंण चंद्रज्योत्स्नापानीं । निर्मळ सुधा प्राशिती नयनीं । क्रीडती भुवनीं स्वानंदें ॥३८॥

पारिजातवनामोदवायुनोद्यानशालिना । धूपैरगुरुजै राजञ्चालरंध्रविनिर्गतैः ॥५॥

याहूनि आया आश्चर्यकर । भगवद्भवन मनोहर । पार्यातवन संभवसमीर । अतिसुखतर सर्व जीवां ॥३९॥
दशाङ्ग मलयागुरुसंभव । जवादि कस्तूरी चंद्रोद्भव । परिमळबहळ भुवन सर्व । लीलालाघव रसरुचिर ॥४०॥
सौरभ्य धूपाची पिंजरी । जाळरंध्रें गगनोदरीं । भरतां भावूनि मेघापरी । ककी केकारीं नाचती ॥४१॥
घनश्याम भासुर घन । लक्षूनि नाचती मयूरगण । चकोरें प्राशूनि चंद्रवदन । अमृतपान अनुभविती ॥४२॥
भ्रमर लोधती उद्दाम दामा । मुमुक्षु जैसे कैवल्यकामा । ललनालावण्य नरललामा । धरिती प्रेमा रतिरंगीं ॥४३॥
एवं विश्ववेधक हरि । ऐशिये विराजिते मंदिरीं । सुखोपविष्ट मंचकावरी । तें अवधारीं कुरुभूपा ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP