अध्याय ६० वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
वैदर्भ्येतदविज्ञाय त्वयाऽदीर्घसमीक्षया । वृता वयं गुणैर्हीना भिक्षुभिः श्लाघिता मुधा ॥१६॥
अवो वैदर्भिये चतुरे । तुवां नेणोनि या प्रकारें । आदि पश्चात् शास्त्राधारें । दीर्घ विचारें न शोधितां ॥२१॥
गुणविहीनां वरिलें आम्हां । भिक्षुकांचिये वचनीं प्रेमा । धरूनि भुललीस निष्कामकामा । राजसत्तमां सांडूनी ॥२२॥
त्यांचा उगाचि हा आग्रह । माझ्या ठायीं धरूनि स्नेह । कीर्तनमिसें परमोत्साह । करिती निःस्पृह सर्वत्र ॥२३॥
विरक्त निःस्पृह परमहंस । सदैव ऐक्य आम्हां त्यांस । ते मज स्तविती त्या वचनास । भाळलीस नृपतनये ॥२४॥
तिहीं श्लाघ्य केलों स्तवनें । तूं भुललीसी तयांच्या वचनें । आम्हां गुणहीनांकारणें । वरिलें विचार न करूनी ॥१२५॥
यानंतरें म्हणे हरि । आझूनि दीर्घ विचार करीं । आम्ही वदतों त्या प्रकारीं । स्वहिताचारीं प्रवर्तें ॥२६॥
अथाऽत्मनोऽनुरूपं वै भजस्व क्षत्रियर्षभम् । येन त्वमाशिषः सत्या इहामुत्र च लक्ष्यसे ॥१७॥
आपुल्या रूपें अनुरूप वर । क्षत्रियांमाजी श्रेष्ठतर । गुण लावण्य ऐश्वर्य सधर । त्यातें सत्वर भजावें ॥२७॥
आशिष म्हणिजे मनोरथ । तुझे संपूर्ण होती जेथ । इहलोकींचे सर्व अर्थ । जो समर्थ पुरवील ॥२८॥
आणि स्वर्गींचीही जे संपत्ति । होय जयाचेनि आपैती । ऐसा क्षत्रियश्रेष्ठ भूपति । भजें निश्चिती नृपतनये ॥२९॥
ऐसा म्हणसी आहे कोण । देतों तयाची आठवण । जेथें झळंबे अंतःकरण । त्यालागून त्वां भजिजे ॥१३०॥
चैद्यशाल्वजरासंधदंतवक्रादयो नृपाः । मम द्विषंति वामोरु रुक्मी चापि तवाग्रजः ॥१८॥
चैद्यदेशींचा भूपाळ । क्षत्रीं वरिष्ठ जो शिशुपाळ । आणि शाल्वनामा प्रबळ । तुंबळ दळ ज्याचें ॥३१॥
जरासंध मदोद्धत । ज्याच्या भयें समुद्राआंत । आम्ही राहिलों तो विख्यात । आणि वक्रदंत नृपवर ॥३२॥
हे मम द्वेष्टे रुक्मिणी । ऐसाचि द्वेष्ट्यां अग्रगणी । तुझा अग्रज रुक्मी न गणीं । आम्हांलागोनि स्वप्नींही ॥३३॥
हे म्यां कथिले वरिष्ठ वीर । यांवेगळे अनेक शूर । भूभुज श्रीमंत सुंदरतर । प्रेमें प्रियकर भज भावें ॥३४॥
जरी तूं म्हणसी ऐसें होतें । तरी कां पूर्वींच हरिलें मातें । ऐकें तयाही वृत्तातें । सावध चित्तें वामोरु ॥१३५॥
रंभः म्हणिजे कदलीतरु । तिच्या स्तंभासम मृदुल ऊरु । तियेसी रंभोरु वामोरु । वदती श्रृंगाररसवेत्ते ॥३६॥
तेषां वीर्यमदांधानां दृप्तानां स्मयनुत्तये । आनीताऽसि मया भद्रे तेजोऽपहरताऽसताम् ॥१९॥
ज्याचीं नामें तुज म्यां कथिलीं । ते ते मदान्ध प्रतापशाली । उन्मत्त उत्पथ महाबळी । द्वेष्टे सकळी पैं आमुचे ॥३७॥
ते मिनले तव स्वयंवरीं । आणितां निज ग्लानि लिहिली पत्रीं । यास्तव न पडूनि अव्हेरीं । दुर्मदां समरीं म्यां दमिलें ॥३८॥
त्यांचा दुर्मद झाडावया । प्रवर्तलों मी हरणा तुझिया । समरीं मथूनि दुर्मदां तयां । तुज निज जाया म्यां केली ॥३९॥
द्वेष्टे दुर्मद जे असंत । त्यांचा प्रताप गर्वोपहत । करूनि आणिलें तुज म्यां येथ । विजयस्वार्थ लक्षूनी ॥१४०॥
यावेगळा आमुचे ठायीं । कामलोभाचा स्पर्श नाहीं । हें तूं जाणसी आपुले हृदयीं । तथापि कांहीं बोलतसों ॥४१॥
उदासेना वयं नूनं स्त्र्यपत्यार्थकामुकाः । आत्मलब्ध्याऽऽस्महे पूर्ण गेहयोर्ज्योतिरक्रियाः ॥२०॥
आम्ही निश्चयें उदासीन । स्त्रीपुत्रादिकामनाशून्य । अर्थस्वार्थकामविहीन । काय म्हणोन तें ऐका ॥४२॥
निजात्मसुखाची उपलब्धि । तिणें पूर्णता मनोबुद्धी । अक्षुब्ध जैसा अमृतोदधि । तैसा समाधि सर्वत्र ॥४३॥
म्हणसी एवढा यदुसमुदाय । तुमच्या योगें चालता होय । यदर्थीं ऐकें विदर्भतनये । कोणा न्यायें वर्ततसों ॥४४॥
गृहामध्यें जैसा दीप - । प्रकाशें सर्व कार्यकलाप । चालवूनियां साक्षिरूप । क्रिया अल्प न स्पर्शे ॥१४५॥
आम्ही वर्तों ऐशिया परी । उदास देहगेहांवरी । वधूसुतधनकामांची उरी । आम्हांमाझारी न वसे पैं ॥४६॥
भ्रतारांची उदासीनता । दुःखें साहों न शकती वनिता । हें जाणोनि मन्मथजनिता । रुक्मिणीचित्ता क्षुब्ध करी ॥४७॥
आपुलें औदासीन्य प्रकट । स्वमुखें कथितां कंबुकंठ । तेणें दाटला रुक्मिणीकंठ । हृदयस्फोट होऊं पाहे ॥४८॥
शुक म्हणे गा कुरुनरपाळा । श्रोतयांमाजी पुण्यशीळा । श्रीकृष्णाची गुणगणमाळा । सप्रेमळा अवधारीं ॥४९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP