अध्याय ६० वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अस्त्वंबुजाक्ष मम ते चरणानुराग आत्मन्नतस्य मयि चानतिरिक्तदृष्टेः ।
यर्ह्यस्य वृद्धय उपात्तरजोऽतिमात्रो मामीक्षसे तदु ह नः परमाऽनुकंपा ॥४६॥

तरी तेंही सुखें असो स्वामी । औदासीन्य तुमचे तुम्ही । मिरवत असतां सर्व धर्मीं । आम्हां हृत्पद्मीं तें न वसो ॥८३॥
निरपेक्षत्वें तुमची प्रीति । कोठें न गुंतो श्रीपति । आम्हां तव पदकंजरति । असो निश्चिती अनुरागें ॥८४॥
माझ्या ठायीं बाह्यविषयें । म्हणाल माझी प्रीति नाहीं । आत्मनिरत सर्वदाही । वरिल्या कायी फळलाभ ॥३८५॥
तरी तव चरणींचा अनुराग । हें अनंतजन्मींचें सुकृतभाग्य । उत्कृष्ट लाभ हाचि चांग । याहूनि भाग्य नापेक्षूं ॥८६॥
जरी तूं विश्ववृद्धीकारणें । अल्प वेंठसी रजोगुणें । तैं या त्रिजगा सुखपारणें । अल्प कारुण्यें औत्कंठ्यें ॥८७॥
तैसा होत्साता जरी मातें । अवलोकिसी आपाङ्गपातें । याहूनि वरिष्ठ सुख कोणतें । माझे चित्तें न मनिजे ॥८८॥
तेचि तुझी परमानुकंपा । अत्युत्कृष्ट अनुग्रहरूपा । या वेगळें मम संकल्पा । मन्मथबापा न रुचों दे ॥८९॥
जरी तूं निरपेक्ष उदासीन । तथापि तव पदीं मम मन लेन । सप्रेम रंगें रंगो पूर्ण । इतुकें वरदान पुरे आम्हां ॥३९०॥
तूं सर्वदा आत्मनिरत । माझें तव पदीं मानस रत । असो अनन्य भ्रमरवत । अनुरागवंत जगदीशा ॥९१॥
ऐसीं भगवंताचीं वचनें । भगवंताच्या प्रेमसंमानें । वाखाणिलीं रुक्मिणीनें । तत्तोप श्रवणें उपजाव्या ॥९२॥
यानंतरें प्रसन्नचित्ता । संमत हरीच्या मनोगता । होवोनि वदली विदर्भदुहिता । तें कुरुनाथा अवधारीं ॥९३॥

नैवालीकमहं मन्ये वचस्ते मधुसूदन । अम्बाया इव हि प्रायः कन्यायाः स्याद्रतिः क्वचित् ॥४७॥

स्वामे बोलिले जियेपरी । लटकी नोहे ते वैखरी । कन्या असतां जनका घरीं । भूपा अंतरीं कामिती ॥९४॥
अंबा अंबिका अंबालिका । तिघी काशीस्वराच्या कन्यका । त्यांमाजी शाल्वाच्या अभिलाखा । अंबा करिती जाहले ॥३९५॥
तिये अंबेचिये परी । कन्या असंस्कृता जनकाघरीं । वर वांछी ते स्वयंवरीं । अभ्यंतरीं अनुरूप ॥९६॥
क्कचित् कोठें कोठें ऐसी । कन्या असंस्कृता जनकाघरीं । वर वांछी ते स्वयंवरीं । अभ्यंतरीं अनुरूप ॥९७॥
भगवद्वचना देऊनि मान । इतुकें केलें उपपादन । याहूनि कांहीं बोलिली आन । तें सर्वज्ञ परिस तूं ॥९८॥

व्यूढायाश्चापि पुंश्चल्या मनोऽभ्येति नवं नवम् । बुधोऽसतीं न बिभृयात्तां बिभ्रदुभयच्युत ॥४८॥

म्हणे स्वामी अद्यापिवरी । चैद्यमागधप्रमुखां वरीं । हेही स्वामींची वैखरी । जनव्यवहारीं वर्ततसे ॥९९॥
एकें पर्णून आणिली घरा । जे पुंश्चळी असती दारा । नव नव यूनां देखोनि नरां । विकार अंतरामाजी उठती ॥४००॥
पर्णित पुरुष असतां शेजे । मानसें नव नव तरुणां भजे । सज्ञान पुरुष तीतें उमजे । मानी ओझें भरणादि ॥१॥
भरण पोषण तीचें न करी । त्यागी जाणोनि दुराचारी । विषयसुखास्तव न टाकी दुरी । तो अधिकारी नरकाचा ॥२॥
सज्ञान जाणोनि तिची चर्या । तत्काळ त्यागी पुंश्चळी जाया । तदासक्त तो लोकद्वया । पासोनि पतन पावतसे ॥३॥
जनांमाजी क्कचित् वर्ते । म्हणोनि वोलिलें श्रीअनंतें । येर्‍हवीं मद्विषयीं अघडतें । सर्वज्ञातें विदित असे ॥४॥
माझें नव नव पुरुषांवरी । मानस धांवत असेल जरी । जाणोनि सर्वज्ञ अंतरीं । मग मज बाहेरी घालावें ॥४०५॥
अपराध नसतां प्रेमकलहें । स्वामी वदलां कठोर जें हें । तें भेदतां वज्रप्रायें । पुढती स्नेहें सान्तविलें ॥६॥
जाणोनि सान्तवनाचें प्रेम । मीही वदलें जें समविषम । त्या नर्मोक्ति कुसुमासम । दुरुक्ति अधम न मानाव्या ॥७॥
कामसंभ्रमामाझारी । दंपती वदतां नर्मोत्तरीं । आनंदभरित ते परस्परीं । रोष अंतरीं न स्पर्शे ॥८॥
यालागीं उच्चावचें वचनें । सर्व क्षमावीं जनार्दनें । इतुकी प्रार्थना करूनि मौनें । चरण लक्षूनि तिष्ठतसे ॥९॥
हें ऐकूनि जगदीश । भीमकीचें मनःसारस । निर्भय पावावया संतोष । बोले पीयूषमय वचनें ॥४१०॥

श्रीभगवानुवाच - साध्व्येतच्छ्रोतुकामैस्त्वं राजपुत्रि प्रलंभिता । मयोदितं यदन्वात्थ सर्व तत्सत्यमेव हि ॥४९॥

हरि म्हणे वो साधुशीले । पतिव्रते भीष्मकबाळे । विनोदवचनें तवमुखकमळें । उपहास केले परिसावया ॥११॥
तुवां बोलावें मृदुतर वचनीं । गुणलावण्यचातुर्यखाणी । तववाक्यश्रवणाची शिराणी । आमुचे मनीं बहुकाळ ॥१२॥
यालागीं आजि ये विलाससमयीं । नर्मोक्ति वदलों ज्या ज्या कांहीं । ते ते प्रेमसंरंभनवाई । नेणोनि हृदयीं भंगलीस ॥१३॥
मग म्यां केलें सान्तवन । तेणें होवोनि निर्भय पूर्ण । तुझें यथोचित भाषण । तें यथार्थ व्याख्यान मान्य आम्हां ॥१४॥
माझिया वचनामाजील अर्थ । तुवां वाखाणिला अन्वर्थ । तो तैसाचि होय हें यथार्थ । जाण निश्चित भीमकिये ॥४१५॥
राजपुत्रि या संबोधनें । भीमकी सम्मानिली बहुमानें । यावरी बोले प्रसन्नमनें । तीं हरिवचनें अवधारा ॥१६॥

यान्यान्कामयसे कामान्मय्यकामाय भामिनि । संति ह्येकांतभक्तायास्तव कल्याणि नित्यदा ॥५०॥

माझ्या ठायीं एकान्तभक्ता । भववैभवीं पूर्ण विरक्ता । जे जे काम कामिसी आतां । ते ते तत्त्वतां सफळचि ॥१७॥
कामकामी जे जे जीव । जन्ममरणें भोगिती भव । ते मोक्षाचें नेणती नांव । झणें हा भाव मनीं धरिसी ॥१७॥
एकान्तभक्ता माझे ठायीं । तुझे काम जे जे कांहीं । ते सफळचि सर्वदाही । हे नवाई मद्भजनीं ॥१८॥
कामनिवृत्तिकारणें । मज कामिलें कामचि जाण । मोक्षीं समरस करिती पूर्ण । हें महिमान मत्कामीं ॥१९॥
प्रेमसंंभें सकोपिनी । जाणोनि संबोधी भो भामिनी । कोपनिवृत्ति झालिये क्षणीं । म्हणे कल्याणि भीमकिये ॥४२०॥
तुझेनि त्रिजगाचें कल्याण । ते तूं ऐकोनि उपहासवचन । हृदयीं झालीस परमोद्विग्न । असमाधान मानूनी ॥२१॥
तुझिया उक्तिश्रवणासाठीं । आम्ही वदलों उपहासगोठी । जाणोनि विषाद न धरीं पोटीं । म्हणे जगजेठी तें ऐका ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP