अध्याय ६० वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पर्यकादवरुह्याशु तामुत्थाप्य चतुर्भुजः । केशान्समुह्य तद्वक्त्रं प्रामृजत्पद्मपाणिना ॥२६॥

रुक्मिण्यवस्थेचा प्रकार । देखोनियां अभ्यंतर । द्रवलें तेणें अतिसत्वर । मंचकावरूनि उतरूनी ॥७७॥
द्विभुज सर्वत्र मुरारि । वर्तत असतां यादवभारीं । रुक्मिणीवैकल्य देखूनि नेत्रीं । बाहु चार्‍ही प्रकटिले ॥७८॥
चहूं भुजीं केलें काय । तो परियेसीं अभिप्राय । एक्या हस्तें रुक्मिणीकाय । सांवरूनियां बैसविला ॥७९॥
दुजिया हस्तें पुसिलें वदन । तिजेनें केशकलापरचन । चतुर्थहस्तें आलिंगन । देऊनि वदन चुंबिलें ॥१८०॥
जेंवि प्रियेच्या रतिरंगणीं । उद्योगवंत विलसती पाणि । त्याच पद्महस्तें रुक्मिणी । हृदयीं कवळूनि आलिङ्गिली ॥८१॥

प्रमृज्याश्रुकले नेत्रें स्तनौ चोपहतौ शुचा । आश्लिष्य बाहुना राजन्ननन्यविढयां सतीम् ॥२७॥

अश्रुकलायुक्त नयन । शंतम करें परिमार्जन । शोकें संतप्त हृदय स्तन । तेही स्पर्शोन निवविले ॥८२॥
आन विषय नेणे स्वप्नीं । आपणावांचोनि जे रुक्मिणी । हें जाणोनि चक्रपाणि । बाहु परसोनि आलिङ्गी ॥८३॥
जिच्यासतीपणाची सीमा । सन्मय व्रतें श्रीपरमात्मा । सेवी म्हणोनि अनन्य प्रेमा । परस्परें अनिवड ॥८४॥
विषमोत्तरीं भंगलें हृदय । जाणोनि कृपेनें द्रवला सदय । सान्त्वनाचा अभिप्राय । विवरी काय तो ऐका ॥१८५॥

सांत्वयामास सांत्वज्ञः कृपया कृपणां प्रभुः । हास्यप्रौढीभ्रमच्चित्तामतदर्हा सतां गतिः ॥२८॥

हास्यप्रौढीचीं उत्तरें । स्पर्शिलीं असतां अंभ्यंतरें । भ्रमनचक्रीं चित्त फिरे । धृति शरीरें सांडूनी ॥८६॥
हास्यप्रौढीच्या विलासा । योग्य रुक्मिणी नोहे सहसा । जाणोनि स्वजनाचा कुवासा । पुन्हा संतोषा उपजवी ॥८७॥
सान्त्वनकोविद असती जे जे । तयांच्या मुकुटीं जो विराजे । तया सान्त्वनज्ञें यादवराजें । रुक्मिणी ओजें सान्तविली ॥८८॥
सज्जनाचें प्राप्तिस्थान । सताङ्गति तो भगवान । प्रभु म्हणिजे समर्थ पूर्ण । अनुनयवचन बोलतसे ॥८९॥

श्रीभगवानुवाच - मा मा वैदर्भ्यसूयेथा जाने त्वां मत्परायणाम् । त्वद्वचः श्रोतुकामेन क्ष्वेल्याचरितमंगने ॥२९॥

अवो वैदर्भि गुणैकराशि । झणें मत्पर ईर्ष्या धरिसी । झणें माझी असूया करिसी । अभिप्रायासी नेणोनी ॥१९०॥
तूतें जाणें मी अनन्य । मन्निरता मत्परायण । उपहासमिषें तुझें वचन । करावें श्रवण हे इच्छा ॥९१॥
तुझिये मुखींचीं मधुर वचनें । स्मितापाङ्गें विलासपूर्णें । पीयूषप्राय घेतां श्रवणें । रसाळपणें सुख करिती ॥९२॥
तुझ्या वचनाचा श्रवणकाम । धरूनि विनोदें जें सम विषम । बोलिलों तें नेणोनि वर्म । तूं भय श्रम भजलीस ॥९३॥
विनोदें बोलिलों ज्या व्यंगोक्ती । त्या सत्यत्वें मानूनि चित्तीं । मूर्च्छा पावलीस अवचिती । हें मजप्रति जाणवलें ॥९४॥
जीं बोलिलों विषम वचनें । उपहासप्रौढीपरी तीं जाणें । सत्य न मनीं अंतःकरणें । चतुरे सुजाणे ममाङ्गने ॥१९५॥
तत्त्वता ऐसींच जरी तीं असतीं । तैं कें घडती सप्रेम रति । अनन्यप्रियतमा तुजपरौती । कोण ते चित्तीं विवरीं पां ॥९६॥
तुज न विसंबें मी क्षणभरी । तुजवेगळा न वचें दुरी । तुजवीण द्वैताची अवसरी । मज संसारीं सर्वस्वें ॥९७॥
मत्प्रेमसुखाचें दर्पण । तें एक तुझेंचि अंतःकरण । एर्‍हवीं अवघा मी परिपूर्ण । द्वैतविहीन एकात्मा ॥९८॥
तुज पहावया मी डोळस । तव प्रेमास्तव रूपस । तव जाणावया मानस । एर्‍हवीं निःशेष हृच्छून्य ॥९९॥
तव गुणश्रवणीं मी सश्रवण । तव रसार्थ रसनावान । तव सौरभ्या मी सघ्राण । तवालिङ्गना त्वग्वंत ॥२००॥
तूं मज अनन्य सर्वांपरी । मी तुज तैसाचि बाह्यान्तरीं । हें विसरोनि नर्मोत्तरीं । मूर्च्छा शरीरीं अनुभविली ॥१॥
आतां जाणोनि सप्रेमभावो । नर्मोक्तींचा न धरीं भेवो । ऐसें बोलतां यादवरावो । परतला जीव भीमकीचा ॥२॥
मग परिमार्जूनि सर्वावयव । हनुवटी धरूनियां स्वयमेव । वदन चुंबूनि वासुदेव । नर्मोक्तिभाव प्रकाशी ॥३॥
अवो सुंदरि नर्मोक्तिवचना । बोलोनि निरखितां दयितावदना । तये काळींच्या पाहोनि चिह्ना । आनंद नयनां रमणाच्या ॥४॥
प्रेमसंरंभीं चिह्नें कोण । जिहेंकरूनि मंडित वदन । तें मी कथितों तुजलागून । परिसें लावण्यरससरिते ॥२०५॥

मुखं च प्रेमसंरंभस्फुरिताधरमीक्षितुम् । कटाक्षेपारुणापांगं सुंदरभ्रृकुटीतटम् ॥३०॥

रमण करितां प्रेमोपहास । तेणें रमणीचें मानस । क्षोभें धरी ईर्ष्यावेश । चिह्नें उदास तैं येती ॥६॥
प्रेमसंरंभयुक्त मुख । प्रेमसंरंभ उक्ति देख । पहावयाकारणें मिष । नर्मोक्तीचें जाणिजे ॥७॥
मानसक्षोभें स्फुरिताधर । कटाक्षविक्षेप अपाङ्गरुचिर । सग्रंथि भ्रुकुटी किंचिद्वक्र । वदन सुंदर या चिह्नीं ॥८॥
इत्यादि चिह्नीं मंडित वदना । निरखावया नर्मोक्तिवचना । कामुक वदती ऐसी सूचना । रतिसंपन्ना विदित असे ॥९॥
जरी तूं म्हणसी विदर्भदुहिते । मंचकीं कान्ताप्रियतमचित्तें । रंगलीं असतां कलह तेथें । केंवि सुखातें उपपादी ॥२१०॥
तरी तूं ऐकें वो मम रमणी । दंपती मीनल्या रतिरंगणीं । लिंगसाङ्घट्यें अर्धक्षणीं । शुक्रस्खलनीं वैरस्य ॥११॥
मग घालूनि कंठीं हात । स्वपती दंपती तें निवांत । यालागीं कामशास्त्रनिर्णीत । प्रेमसंरंभ उपहासें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP