अध्याय ५४ वा - श्लोक ६२ ते ६३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


रुक्मिण्या हरणं श्रुत्वा गीयमानं ततस्ततः ।
राजानो राजकन्याश्च बभूवुर्भृशविस्मिताः ॥६२॥

सूतमागधबंदिजन । गायक नर्तक कलाप्रवीण । सर्वत्र भूतळीं गाती जाण । पाणिग्रहण भीमकीचें ॥६९॥
गंधर्व गाती अमरभुवनीं । नारदप्रमुख ब्रह्मसदनीं । कम्बलाश्वतरुप्रमुख फणी । शेषायतनीं वाखाणिती ॥११७०॥
असो भूतळीं बहुधा नृपति । रजकन्या राजयुवति । रुक्मिणी हरणविवाहकीर्ति । विस्मित होती ऐकोनी ॥७१॥
राजाङ्गना म्हणती दैव । कन्यादानकृतगौरव । जामातृभावें वासुदेव । शुद्धमतीनें पूजिला ॥७२॥
ऐसें आम्हांस भाग्य कैचें । सान्निध्य लाहोनि श्रीकृष्णाचें । कन्यादानमिसें साचें । सार्थक जन्माचें घडेल ॥७३॥
राजकन्या इच्छिती मनीं । आम्हां तुष्टोनि भवभवानी । रुक्मिणीऐसा चक्रपाणि । पाणिग्रहणीं वर हो कां ॥७४॥
राजे म्हणती धन्य भाग्य । जामात जोडल्या श्रीरंग । वसुदेवप्रमुख पंक्तियोग्य । पूज्यता साङ्ग पावला ॥११७५॥
रुक्मी दुर्मति विमुख भजनीं । तत्पापें त्या विटंबणी । येर चौघे सहरुक्मिणी । श्रीकृष्णचरणीं अनुसरले ॥७६॥
ऐकोनि दुष्टासी खरखरा । मागधप्रमुख भंगल्या धुरा । शिशुपाळाची हरिली दारा । द्वारकापुरा जयलाभ ॥७७॥
यथाधिकारें भूमंडळीं । कीर्तिरूपें श्रीवनमाळी । सर्वांचिये हृदयकमळीं । तद्गुनशाळी स्फुरद्रूप ॥७८॥

द्वारकायामभूद्राजन्महामोदः पुरौकसाम् ।
रुक्मिण्या रमयोपेतं दृष्ट्वा कृष्णं जगत्पतिम् ॥६३॥

कुरुकुलक्षीरार्नवसंभवा । हृद्भूषण तूं वर वैष्णवां । रमा रुक्मिणी वासुदेवा । प्रभुदित पुरजन देखोनी ॥७९॥
स्वयें श्रीकृष्ण मंगलधाम । लोकत्रयाचा कल्याणकाम । रमारुक्मिणीरमणाराम । मेघश्याम मोदाब्धि ॥११८०॥
कृष्णमोदें प्रमुदित विश्व । विश्वाह्लादें वासुदेव । गृहस्थधर्माचें गौरव । त्रिजगीं स्वमेव प्रकाशी ॥८१॥
एवं द्वारकेमाझारी । परमानंद घरोघरीं । देव वर्षती कुसुमें अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥८२॥
यापरी गृहप्रवेश । करोनियां हृषीकेश । रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ॥८३॥
शुक म्हणे गा परीक्षिति । गृहस्थ झाला श्रीपति । भीमकीहरणाची हे ख्याति । म्यां तुजप्रति सांगितली ॥८४॥
एवं हरण पाणिग्रहण । तुज केलें गा श्रवण । त्याच्यानि श्रवणें जाण । दोष दारुण नासती ॥११८५॥
ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण । कळसा आलें निरूपण । प्रेम सज्जन जाणती ॥८६॥
रुक्मिणीहरणवार्ता । जुनाट होय सर्वथा । परी पाणिग्रहणव्यवस्था । नवी कथा कवित्याची ॥८७॥
ऐसा विकल्प मानाल झणी । जें बोलिले व्यासवाणी । तोचि ग्रंथ विस्तारोनि । प्रकट केला प्राकृत ॥८८॥
यथाविधि पाणिग्रहण । मुळींच आहे व्यासवचन । तें सूत्रप्राय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलों ॥८९॥
साच न मानी ज्याचें चित्त । तेणें पहावें श्रीभागवत । तेथील श्लोकींचा श्लोकार्थ । ऐसाचि आहे सर्वथा ॥११९०॥
राजे जिणोनि दारुण । भीमकी आणूनि आपण । कृष्णें केलें पाणिग्रहण । हें निरूपण मुळींचें ॥९१॥
येणेंचि पदें पदविस्तारीं । कथा चालिली पुढारीं । खोडी न ठेवावी चतुरीं । ग्रंथ निर्धारीं न पाहतां ॥९२॥
जैसें वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय । तैसीच हेहि कथा आहे । थोडेनि बहुत विस्तारें ॥९३॥
मूळ सांडूनि सर्वथा । नाहीं वाढविलें ग्रंथा । पाहतां मुळींच्या पदार्था । अर्थें कथा चालिली ॥९४॥
नाहीं ग्रंथारंभसंकल्प । न होतां श्रोत्यांचा साक्षेप । ग्रंथीं उजलिला कृष्णदीप । सुखस्वरूप हरिकथा ॥११९५॥
जेणें हा ग्रंथ करविला । तो आधींच उपरमला । पुढें ग्रंथ कैसा चालिला । बोलतां बोला न बोलवे ॥९६॥
नेणों काय कृष्णनाथा । हे आवडली ग्रंथकथा । तोचि होवोनि कर्ता वक्ता । अर्थ परमार्था आणिला ॥९७॥
ये ग्रंथींचें निरूपण । जीवशिवा होतसे लग्न । अर्थ पाहतां सावधान । समाधान सात्त्विकां ॥९८॥
येथ विवेकी व्हावा वक्ता । सावधान पाहिजे श्रोता । त्याचेनि संवादें हरिकथा । सुख समस्तां देईल ॥९९॥
घेवोनि अनुभवकसवटी । कथा चालिली मराठी । ओंवी न चले फुकासाठीं । श्रद्धा पोटीं धरिलिया ॥१२००॥
हें कृष्णकथा आलोलिक । महादोषांसि दाहक । भवरोगाची छेदक । अर्थमात्र सेविलिया ॥१॥
हे मुमुक्षाची कुलदेवता । मुक्तांची तरी हे नित्य मुक्तता । येरां संसारियां समस्तां । नवरसें निववीत ॥२॥
जरी कोणी स्वभावें पढे । तरी उघडती कानींचीं कवाडें । अर्थ एकतां निवाडें । पुढें पुढें अतिगोड ॥३॥
गोडपण पडतां मिठी । सुटती जीवशिवांच्या गांठी । कृष्णकृपा होय गोमटी । उठाउढीं निजलाभ ॥४॥
जेथें भीमकीचें पुरलें आर्त । तो हा आदरें वाचितां ग्रंथ । श्रोतयांचे मनोरथ । कृष्णसमर्थ पुरवील ॥१२०५॥
माझे पुरवावे मनोरथ । तें मनचि झाला कृष्णनाथ । एकाजनार्दनीं नित्य तृप्त । पारंगत हरिचरणीं ॥६॥
एकाजनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण । सहजीं खुंटलें निरूपण । महामौन मुद्रेचें ॥७॥
वाराणासीमहापुरीं । मणिकर्णिकेच्या तीरीं । रामजयंती माझारीं । ग्रंथ निर्धारीं संपविला ॥८॥
मुख्य जनार्दन वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता । जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ॥९॥
एका एकजनार्दनीं । जनार्दन एकपणीं । जैसें जाह्नवीचें पाणी । मणिकर्णी अतितीर्थ ॥१२१०॥
शके चौदाशें त्र्याण्णव । प्रजापति संवत्सराचें नांव । चैत्रमासाचें वैभव । पर्व अभिनव रामनवमी ॥११॥
तये दिवशीं सार्थक अर्थीं । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ति । एकादनार्दनकपास्थिति । वारानसीप्रति झाली ॥१२॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां गृहप्रवेशलक्ष्मीपूजनं नामाष्टादशप्रसंगः ॥१८॥

श्रीमदेकनाथ भगवान । तदुक्त रुक्मिणीपाणिग्रहण । टीकासंदर्भ श्लोकव्याख्यान । ग्रंथसंयोजन पैं केलें ॥१३॥
पुढें अध्यायीं पंचावन्नीं । समात्प पंचम एकादशिनी । तिये कथेच्या निरूपणीं । श्रोतयांलागोनि निमंत्रण ॥१४॥
तमांश म्हणोनि रुद्रावतार । महामायावी शंबरासुर । त्याचिये सदनीं स्मरकलत्र । रति निरंतर वसतसे ॥१२१५॥
मन्मथ जाळिला जैं शंकरें । तैं रति आक्रंदे आर्तस्वरें । अशरीरी गगनोच्चारें । तीस निर्जरीं गुज कथिलें ॥१६॥
मन्मथ जन्मेल रुक्मिण्युदरीं । तंववरी राहें शंबराघरीं । शंबरासुरातें जो मारी । तो निर्धारीं तव भर्ता ॥१७॥
ऐसा ऐकोनि गगनोच्चार । सशोक रतीचें अंतर । कांहीं न स्फुरे विचार । मग नारदें सविस्तर प्रबोधिलें ॥१८॥
पुढले अध्यायीं ते कथा । रुक्मिणी प्रसवेल मन्मथा । शंबरा वधूनि रतीची व्यथा । स्मर सर्वथा निवारील ॥१९॥
तिये कथेच्या व्याख्यानें । श्रवणें भेटती गतसंतानें । वैरियांचीं निःसंतानें । शंबरापरी हरि कर्ता ॥१२२०॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मपित ग्रंथ । वक्ता शुकाचार्य समर्थ । श्रोता भारत परीक्षिति ॥२१॥
त्यामाजील स्कंध दशम । कृष्णें केला गृहस्थाश्रम । तो हा अध्यय उत्तमोत्तम । चौपन्नावा संपला ॥२२॥
कृष्णदयार्णवाची विनति । श्लोकव्याख्यान शैशवमति । संयोजिलें तें विपश्चितीं । पाहोनि निगुतीं शोधावें ॥२३॥
न्यून पूर्ण असंलग्न । जेथ संदिग्ध संशयापन्न । भ्रामक भासेल जरी व्याख्यान । सरळ करून तें दीजे ॥२४॥
श्रोता एकाजनार्दन । वक्ता एकाजनार्दन । बुद्धिबोधक जनार्दन । कृतव्याख्यान एकत्वें ॥१२२५॥
तृतीय शक शालिवाहन । गताब्द सोळाशेंसत्तावन्न । राक्षस संवत्सराचें अभिधान । भृगुशुचिकृष्णचतुर्थी ॥२६॥
पिपीलिकानामक क्षेत्रीं । स्वतःसिद्ध टीका श्लोकार्थसूत्रीं । व्याख्यानयोजना दयार्नववक्त्रीं । श्रीएकनाथें केलीसे ॥१२२७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां श्लोकसंदर्भव्याख्यानसंयोजनश्रीमदेकनाथकृतरुक्मिणीस्वयंवरलेखनालंकारकथनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥५४॥
श्लोक ॥६३॥ ओव्या ॥१२२७॥ एवं संख्या ॥१२९०॥ ( चौपन्नावा अध्याय मिळून ओवी संख्या २६१६७ )

अध्याय चौपन्नावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP