अध्याय ५४ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


चैलेन बद्ध्वा तमसाधुकारिणं सश्मश्रुकेशं प्रवपन्व्यरूपयत् ॥३६॥ पूर्वार्धम् ॥

बळें धरूनि रुक्मिया वीर । वसनें पाठिमोरे कर । बांधोनि निंदित असाधुकर । विटंबी श्रीधर न मारोनी ॥७१॥
मस्तकवपना आणा पाणी । नाहीं आड ना विहीर वनीं । घाला वाटेचें वाटवणी । विनोद मेहुणपणीं मांडिला ॥७२॥
अर्धखांड अर्धमिसी । पांच पाट काढिले शिशीं । विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेंसीं बांधिला ॥७३॥
रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन । वेगें करी निंबलोण । सकळ जन हांसती ॥७४॥
रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बलराम घेऊनि आपण । बन्धमोचन करील ॥४७५॥
परिहारमिसें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एकाजनार्दनीं विनोद । परमानंद प्रकटेल ॥७६॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां युद्धवर्णनं रुक्मिविरूपवर्णनं नाम द्वादशप्रसंगः ॥१२॥

तावन्ममर्दुः परसैन्यमद्भुतं यदुप्रवीरा नलिनीं यथा गजाः ॥३६॥ उत्तरार्धम् ॥

येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर । लोटले येरयेरां समोर । घाय निष्ठुर हाणिती ॥७७॥
दाक्षिणात्य राजे निजभारीं । युद्ध पाहती राहोनि दुरी । रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी लोटले ॥७८॥
उरलें रुक्मियाचें दळ । यादवीं त्रासिलें प्रबळ । वर्षोनियां बाणजाळ । वीर सकळ भेदिले ॥७९॥
यादवांच्या तिखट बाणीं । निधडे वीर पडती रणीं । धडमुण्डाङ्कित धरणी । अर्धक्षणीं तिहीं केली ॥४८०॥
कृष्णें रुक्मिया बांधिला । उरल्या सैन्या पळ सुटला । जय यादवांसि आला । मग परतला बलभद्र ॥८१॥
सरोवरामाजी कमळीं । गज करी रवंदळी । तैसी मर्दूनि शत्रूची फळी । कृष्णाजवळी तो आला ॥८२॥

कृष्णांतिकमुपव्रज्य ददृशुस्तत्र रुक्मिणम् ।
तथाभूतं हतप्रायं दृष्ट्वा संकर्षणो विभुः ॥३७॥

रुक्मियाचें विरूपकरण । देखता झाला संकर्षण । कृपा द्रवलें अंतःकरण । दीन वदन देखोनी ॥८३॥

विमुच्य बद्धं करुणो भगवान्कृष्णमब्रवीत् । असाध्विदं त्वया कृष्ण कृतमस्मजुगुप्सितम् ।
वपनं श्मश्रुकेशानां वैरूप्यं सुहृदो वधः ॥३८॥

सोडूनियां गलबंधन । कृष्णासि म्हणे हे बुद्धि कोण । सोयरियासि विरूपकरण । निंद्य जाण आम्हांसी ॥८४॥
शरीरसंबंध्या विरूपबाधु । तंव हा वधाहूनि अधिक वधु । तुंवा केला थोर अपराधु । सुहृदसंबंधु लाजविला ॥४८५॥
याचा वध तूं करितासी । तरी हा पावता निजसुखासी । मान देऊनि सोडितासी । सोयरिकेसी श्लाघ्यता ॥८६॥
क्षत्रिय सांपडे रणसांकडीं । त्यासि द्यावीं लेणीं लुगडीं । युद्धीं खांड मिशा बोडी । हे अपरवडी तुवां केली ॥८७॥

मैवास्मान्साध्व्यसूयेशा भ्रातुर्वैरूप्यचिंतया ।
सुखदुःखदो न चान्योऽस्ति यतः स्वकृतभुक्पुमान् ॥३९॥

सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । दोष न ठेवीं कृष्णांसी । जो कर्में करी जैसी । फळें तैसीं तो पावे ॥८८॥
कृष्ण निजतत्वें तत्वता । कर्में करूनि अकर्ता । बंधुवैरूप्याचा दाता । नव्हे सर्वथा श्रीकृष्ण ॥८९॥
तुझिया बंधूचें वैरूप्य । तयाचें त्यास फळलें पाप । हेंचि जाणें भोगाचें निजरूप । सांडीं कोप सर्वथा ॥४९०॥
येथें कर्ता तोचि भोक्ता । ऐसी कर्ममर्यादा तत्वता । बोल न ठेवी कृष्णनाथा । हृदयीं व्यथा न धरावी ॥९१॥

बंधुर्वधार्हदोषोऽपि न बंधोर्वधमर्हति ।
त्याज्यः स्वेनैव दोषेण हतः किं हन्यते पुनः ॥४०॥

सवेंचि म्हणे श्रीकृष्णासी । रणीं विटंबूं नये शूरासी । बोल लागला क्षात्रधर्मासी । हृषीकेशी हे अनुचित ॥९२॥
दंडायोग्य जर्‍ही अपराधु । तर्‍ही दंडूं नये सोयरा बंधु । दंडापरीस अधिक बाधु । न मरूनि वधु त्वां केला ॥९३॥
इतरापासोनि अन्याय झाला । तो आपण पाहिजे क्षमा केला । शेखीं तुवां सोयरा दंडिला । बोल लागला निज धर्मा ॥९४॥
जो आवडीनें विष प्याला । तो आपणाआपण मारक झाला । त्या अन्याया दंड नाहीं बोलिला । घात केला निज कर्में ॥४९५॥
यालागीं जो प्रवर्ते अधर्मासी । तेणेंचि कर्में दंडिजे त्यासी । मेलियासीच कां मारूं पाहसी । रुक्मियासी जाऊं दे ॥९६॥
येलियासीच हो मारणें । हेंचि आम्हांसि लाजिरवाणें । विनोद न करावा मेहुणपणें । सोडोनि देणें सर्वथा ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP