अध्याय ५४ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रहस्य भगवानाह मा स्म भैर्वामलोचने ।
विनंक्ष्यत्यधनुनैवैतत्तावकैः शात्रवं बलम् ॥६॥
तुझे देर भावे रणीं । शत्रूसी भेदितील बाणीं । धुंडमुंडांकित धरणी । अर्धक्शणीं करितील ॥५३॥
यादवदळीं थोर थोर । परतले जी महावीर । परिसा नांवें सादर । सविस्तर सांगेन ॥५४॥
तेषां तद्विक्रमं वीरा गदसंकर्षणादयः ।
अमृष्यमाणा नाराचैर्जघ्नुर्हयगजान्रथान् ॥७॥
अध्यात्मपरिभाषावर्णन । द्वंद्वयुद्धाभिव्यक्त कथन । वीररसाचें निरूपण । श्रोते सज्जन परिसतु ॥५५॥
वीरीं मुख्य हलायुध । अक्रूर कृतवर्मा आणि गद । सारण सात्यकि सन्नद्ध । चक्रदेव महावीर ॥५६॥
श्वफल्क अतिदंत सत्यक । महाबाहु वीरकंक । इतुके मुख्य करूनि देख । वीर अनेक यदुभारीं ॥५७॥
हरिवंशीं यादववीर । सांगितले जे अपार । तितुका न धरवे विस्तार । कथा फार वाढेल ॥५८॥
दोनी पंचकें आणि एक । इतुके येथें वीरनायक । येरयेरासिं साह्य देख । मुखचालक बलभद्र ॥५९॥
अवघियांसि श्रीकृष्णाचें बळ । कृष्णबळें अतिप्रबळ । यादव उठावले सबळ । सन्नद्ध दळ करूनियां ॥६०॥
दशेंद्रियें एक मन । मनोरूपी संकर्षण । ते हे वीर अकरा जण । आत्मा श्रीकृष्ण सर्वगत ॥६१॥
संमतिर्विष्णुप्राणोक्ता
ततश्च पौण्ड्रकः श्रीमान्दन्तवक्रो विदूरथः ।
शिशुपालजरासंधाशाल्वाद्याश्च महीभृतः ॥१॥
कुपितास्ते हरिं हन्तुं चक्रुरुद्योगमुतमम् ।
निर्जिताश्च समागम्य रामाद्यैर्यदुपुंगवैः ॥२॥
परदळीं अतिदारुण । वीर आले कोण कोण । ज्यांची गाढी आंगवण । ते राजे जाण सांगिजती ॥६२॥
जरेपासूनि जन्म मोहो । तैसा जरासंध पहा हो । वेगीं उठावला महाबाहो । सैन्यसमुदावो लोटला ॥६३॥
जरासंधासवें प्रबळ । राजे चालिले सबळ । कोण कोण आले भूपाळ । नांवें सकळ परियेसा ॥६४॥
शाल्व पौण्ड्रक विदूरथ । बळें सबळ वक्रदंत । या वीरांचा यावा अद्भुत । वेगें न धरत पातले ॥६५॥
गवेषण अंग वंग । केशिक कारुष कलिंग । हेही राजे जी अनेग । बळें चांग उठावले ॥६६॥
सकळमुख्य जरासंध । प्रबळबळेंसीं मागध । अवघे आले जी सन्नद्ध । दारुण युद्ध मांडिलें ॥६७॥
पंच विषय शत्रुषट्क । ते हे अकरा परसैन्यक । यां माजि मोह मागध मुख्य । विकार अनेक क्षोभविता ॥६८॥
चढला बलभद्रासि रणमद । देखोनि बोलिला वीर गद । वीर्य शौर्य अतिविनोद । गोत्रसंबंध युद्धाचा ॥६९॥
दैवें जोडले युद्धसंपत्तीसी । तूं एकलाचि नेऊं पाहसी । स्वार्थी ऐसा कैसा होसी । वांटा आम्हांसि पाहिजे ॥७०॥
वीरविभाग तंव प्रसिद्ध । माझा वांटा जरासंध । सात्यकि आमुचा धाकुटा बंधु । वक्रदंतु त्या दिधला ॥७१॥
पौण्ड्रक दिधला कृतवर्म्यासी । विदूरथ दिधला अक्रूरासी । येर अवघे दिधलें तुम्हांसे । गोत्रजांसि समजावा ॥७२॥
कोण्ही विकल्प धरील चित्तीं । संबंध नाहीं अर्थाअर्थीं । वांटा केला अतिनिगुती । वीरवृत्ति नांदावें ॥७३॥
दायाद एखादें आपुलें । रणीं देखाल खंगलें भंगलें । त्यासि पाहिजे सांभाळिलें । यश जोडलें या नांव ॥७४॥
हांसों आलें बलभद्रासी । टाळी पिटली टाळीसी । रणचतुर तूं योद्धा होसी । म्हणोनि पोटीसी धरियेला ॥७५॥
एकाजनार्दनीं सन्नद्ध । मिनले गदहलायुध । कोपें खवळला जरासंध । दारुण युद्ध मांडिलें ॥७६॥
इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां युद्ध वर्णनं नामाष्टमप्रसंगः ॥८॥
येऊनि जरासंधाप्रति । वीर प्रतिज्ञा बोलती । धनुष्यें वाऊनियां हातीं । रणीं ख्याति लावून ॥७७॥
आमुच्या बाणांचिये वोढी । केंवि साहतील बापुडीं । नेणती युद्धाची निरवडी । रणपरवडी माराची ॥७८॥
यादवांचें बळ तें किती । आम्हांसम्मुख केंवि राहाती । नोवरी सांडूनियां पळती । महारथी लोटलिया ॥७९॥
आचागळी अधिक शब्द । ऐकोनि उठला वीरगद । कोपें खवळला हलायुध । रणमद चालिला ॥८०॥
रागें पेटला प्रबळ । घेतलें नांगर मुसळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । देखोनि परदळ खळबळिलें ॥८१॥
सैन्य आटी हलायुध । देखोनि चालिला जरासंध । त्यावरी उठावला गद । द्वंद्वयुद्ध मांडिलें ॥८२॥
वीर महामारी बलबद्र । म्हणोनि धाविन्नला दंतवक्र । त्यावरी उठावला सात्यकिवीर । येरेंयेर पडखळिले ॥८३॥
दोघां झाली दृष्टादृष्टि । घडघडिल्या चक्रवाटी । वोढिल्या धनुष्याच्या मुष्टि । दोही हट्टी महावीर ॥८४॥
रागें पौण्ड्रक चालिला । त्यावरी कृतवर्मा लोटला । रथ रथेंसि तगटिला । गुण वाइला धनुष्याचा ॥८५॥
बाण वोढूनियां वोढी । कृतवर्मा वेगें सोडी । पौण्ड्रकाचा ध्वज तोडी । पताका पाडि महीतळीं ॥८६॥
ध्वज तोडिला देखोनि । वेगीं विंधिला सहा बाणीं । हातींचें धनुष्य तोडूनी । पाडिला धरणीं कृतवर्मा ॥८७॥
कृतवर्मा वीरआंगें । सवेंचि रथावरी चढला वेगें । धनुश्य वाहोनियां रागें । बाणीं अनेगें वर्षला ॥८८॥
पौण्ड्रक बाणांतें तोडित । येरु बाणामागें बाण सोडित । अलक्ष लक्षूनि विंधित । वीर विख्यात कृतवर्मा ॥८९॥
हातीं घेऊनि तीन बाण । धगधगित अतिदारुण । पौण्ड्रका तुझा घेईन प्राण । वेगीं विंदान पाहें माझें ॥९०॥
पौण्ड्रक जंव निवारण करी । परी ते अनिवार भारी । एकें सारथियातें मारी । दोन उरीं आदळले ॥९१॥
बाण भेदले सपिच्छीं । पौण्ड्रक पाडिला धरणीसी । मूर्च्छा दाटली त्या कैसी । देहभावासि विसरला ॥९२॥
पौण्ड्रक पाडिला मूर्च्छित । वेगीं धाविन्नला विदोरथ । त्यातें अक्रूर त्वरित । पाचारित रणभूमी ॥९३॥
अक्रूर वीर अतिगाधा । रथ आडवा रथापुढां । घालूनि उठिला वेगाढा । बळें मेढा वायिला ॥९४॥
तुझें नांव तंव अक्रूर । दारुण योद्धा नव्हसी क्रूर । तुज कोण गणील वीर । रणीं धीर न धरवे ॥९५॥
जयासि नाहीं वीरवृत्ति । तयासि अक्रूर म्हणती । तुजसीं युद्ध तें किती । बाण शितीं लाविला ॥९६॥
तुझिये हृदयींची क्रूरता । समूळ बाणीं मी छेदिता । पाहें माझी अक्रूरता । मदगर्विता झाडीन ॥९७॥
सुटले दोघांचेही बाण । अतिझणत्कारें वाजती गुण । बाणीं गगन झालें पूर्ण । सूर्यकिरण झांकोळले ॥९८॥
मेघांमाजी विजा तळपती । तैशा बाणभाली जी झळकती । बाण बाणांचें आदळती । तिकड्या उसळती आकाशीं ॥९९॥
षड्विकार साही बाण । अक्रूरावरी घाली दार्ण । निर्विकार लक्ष साधून । बाणीं बाण निवारिले ॥१००॥
तिखट ऊर्मीचिया भाली । सवेंचि विदूरथ घाली । घायें करूनि अवभुली । गर्जोनि बोलीं विंदित ॥१॥
येरें काढिला निजबोध कुर्हाडा । गुणीं लावूनि लोटला पुढां । भालीसहित तोडिला मेढा । गाढा धनुर्वाडा अक्रूर ॥२॥
घेऊनियां सक्रोध भाला । रथावरूनि उडाला । निश्चळ निजशांती विंधिला । भाला तोडिला माझारी ॥३॥
गुप्त होती वासना सुरी । घेऊनि धांविन्नला उरावरी । अनुभवाची भाली खरी । धीरें निर्धारीं विंधिला ॥४॥
भाली आदळली सत्राणें । विदूरथ झणाणिला तेणें । सुरी उडविली कवणें मानें । गेली गगनें दिसेना ॥१०५॥
बाण अव्यय काढिला । गुणीं अगुणाचे जोडिला । अक्रूरें कानाडी वोढिला । तेणें उडविला विदूरथ ॥६॥
बाप अक्रूर वीरराणा । कोणें नेटें सोडिलें बानां । रथासहित उडविलें गगना । रणप्रदक्षिणा करवित ॥७॥
बाण भेदला जिव्हारीं । विदूरथ पाडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेंवि खेचरा योगियां ॥८॥
श्वफल्क सत्यक चक्रदेव । कंकसारणादि यादव । यांवरी उठावले राजे सर्व । अंगवंगादि कलिंग ॥९॥
बाण सणसणा सूटती । खर्गें खणखणा वाजती । रथ रथा आदळती । वीर गर्जती सिंहनादें ॥११०॥
बाण बाणां आदळती । घायें तिडकिया उसळती । तेणें पिसारे पेटती । बाण जळती अंतराळीं ॥११॥
रणीं उठिला लोहधुळोरा । तेणें चालों न शके वारा । रणमद चढला वीरां । येर येरा हांकिती ॥१२॥
कारुषें घेऊनियां बाण नव । वेगीं विधिंला चक्रदेव । बाणासरिसी घेऊनि धांव । रथावरूनि आंसुडिला ॥१३॥
चक्रदेवें लवडसवडी । कारुषावरी घातली उडी । येरु सांपडला रथाबुडीं । बुद्धि गाढी तेणें केली ॥१४॥
अंग चुकवूनि वेगेंसीं । चक्रदेव धरिला केशीं । धडक हाणोनि उरेंसीं । कारुषासि पाडिलें ॥११५॥
गजारूढ पैं विख्यात । अंगरायें पेलिला हस्त । चक्रदेवाचा मोडिला रथ । वीरा खस्त करीतसे ॥१६॥
अंग योद्धा महाबळी । रथ रगडी गजातळीं । यादवसेनामंडळीं । रणरांगोळी करूं आता ॥१७॥
यादवांमाजि कंक बळी । रागें करीत उठिला होळी । अंग हाणोनियां कपाळीं । गजेंसहित मारिला ॥१८॥
कलिंगसैन्यावरी देख । रागें लोटला सत्यक । वीर मारिले अनेक । रणीं सैन्यक पाडिला ॥१९॥
कोप आला कलिंगासी । सत्यक विंधिला बाणें विशीं । एकेचि बाणें तोडिलें त्यासी । कलिंगासि पाचारी ॥१२०॥
गुणीं लावूनियां कुर्हाडा । मुकुट पाहूनि तोडिला मेढा । धनुष्य घेऊनि उठी वेगाढा । कलिंग गाढा कोपला ॥२१॥
रथ विंधला मकरतोंडी । सवेंचि दोन्ही चाकें फोडी । पाडिली सत्यकाची मुरकुंडी । बाणीं वितंडीं विंधिला ॥२२॥
सत्यक वीर जगजेठी । पडतपडतां सवेंचि उठी । गदा घेऊनियां मुष्टी । कलिंग दृष्टि लक्षिला ॥२३॥
सव्यापसव्य भवंडी गदा । न धरत पातला तो युद्धा । कलिंगें तोडिली पैं गदा । अत्यंत क्रोधा चढिन्नला ॥२४॥
घेऊनि रथाचा पैं आंख । वेगीं धाविन्नला सम्मुख । कोपें हाणे जी सत्यक । येरें मस्तक चुकविला ॥१२५॥
रथाखालती घातली उडी । अंग चुकविलें रथाबुडीं । कलिंगाचा रथ मोडी । चार्ही घोडीं मारिलीं ॥२६॥
वंगराजा रणप्रवीण । कोपें घेऊनि चालिला बाण । त्यावरी उठावला सारण । युद्ध दारुण तेथ झालें ॥२७॥
भोंवता बाणांचा पैं वळसा । सैन्य पाडिलें धारसा । बाण भेदले सपिसा । वंग त्रासा पावला ॥२८॥
सारणें थोर केला मारु । सारथि आणि मारिले वारु । वाणी भेदिला रहंवरु । दळभारु झोडिला ॥२९॥
विरथ केला वंगराजा । सवेंचि चढे पट्टगजा ।धनुष्य वावोनियां वोजा । बाण पैजा घेतले ॥१३०॥
शर विंधिले सारणावरी । सारण बाणांतें निवारी । गज रथ केला चुरी । दांत उरीं लाविले ॥३१॥
रथाखालीं घातली उडी । गजें धरिला शुंडादंडीं । सारण सोंडेतें मुरडी । गजाबुडीं रिघों आला ॥३२॥
गज मारावया सरे । वंग वर्षताहे शस्त्रें । सारण गजातळीं फिरे । वंग बाहेरी निघों नेदी ॥३३॥
सारण कोंडिला महावीर । यादवदळीं हाहाकार । ऐकोनि कोपला बलभद्र । वृक्ष थोर उपलिला ॥३४॥
राहें साहें म्हणे वंगातें । येरें विंधिला बाणें सातें । मुसळ घेऊनि डावें हातें । त्या बाणांतें तोडिलें ॥१३५॥
दक्षिणहस्तीं होता वृक्श । एकेचि घायें कपाळमोक्ष । गजेंसहित मारिला देख । अधोमुख पाडिला ॥३६॥
आडवा धाविन्नला केशिक । राजा उठिला मुख्य नायक । झाला बलभद्रा सम्मुख । दोघे देख खवळले ॥३७॥
केशिकावरी हलायुध । मारा पेटला सुबद्ध । येरीकडे राजे सन्नद्ध । यादवांवरी लोटले ॥३८॥
केशिक राजा आतुर्वळी । राम मारील निजहळीं । गवेषणराजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसीं ॥३९॥
तेथ राम माजवील रणनदी । चहूं पुरुषार्थ मोक्षसिद्धि । श्रीकृष्णदृष्टीच्या प्रबोधीं । सायुज्यपदीं निजयोद्धे ॥१४०॥
श्रीकृष्णदृष्टीपुढें । रणा येतां सायुज्या चढे । निधडिया वीरां भाग्य चोखडें । सायुज्य रोकडें साधिती ॥४१॥
तेथें द्वंद्वयुद्ध अति तुंबळ । रणीं माजेल रणकल्लोळ । एकाजनार्दनीं रसाळ । कथा कलिमलनाशिनी ॥४२॥
इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां द्वंद्वयुद्धवर्णनं नाम नवमप्रसंगः ॥९॥
राजे चालले मुकुटाचे । थोर बळ गवेषणाचें । सैन्य पातलें मागधांचें । युद्ध त्यांचें दारुण ॥४३॥
वेगें धनुष्याचा वाइला गुण । सितीं लावूनियां बाण । शस्त्रें सोडिती दारुण । रणकंदन करूं आले ॥४४॥
राजे चालिले प्रबळबळें । यादव उडावले सबळें । दुमदुमिलीं दोन्ही दळें । एकवेळे मिसळले ॥१४५॥
गगन कोंदलें तिहीं बाणीं । तळीं खिळियली चरणीं । मागें पाय न ठेविती कोण्हे । वीर रणीं खवळले ॥४६॥
पेतुः शिरांसि रथिनामश्विनां गजिनां भुवि ।
सकुंडलकिरीटानिसोष्णीवाणि च कोटिशः ॥८॥
हस्ताः सासिगदेष्वासाःकरमा ऊरर्वोऽघ्रयः ।
अश्वाश्वतरनागोष्ट्रखरमर्त्यशिरांसि न ॥९॥
वीर वीरतें हाणित । लोहधुळोरा उठत । वारिया वाट न चले तेथ । वीर अद्भुत मातले ॥४७॥
शस्त्रेंसहित तोडिती कर । मुकुटासहित पाडिती शिर । गजांसहित मारिती वीर । सर्पिच्छिं ती भेदिती ॥४८॥
चरण तोडिले गजांचे । राजे पाडिले बिरुदाचे । सुर छेदिले अश्वांचे । आंख रथांचे छेदिले ॥४९॥
राजे निवडले अनेक । त्यांवरी उठावला श्वफल्क । बाणीं त्रासूनियां देख । एकें एक खिळियले ॥१५०॥
वीर भिडिन्नले पडिपाडें । यादवांचें बळ गाढें । गवेषण चालिला पुढें । गुणीं कुर्हाडे लाविले ॥५१॥
श्वफल्क विंधिला पांच बाणीं । रथ छेदूनि पाडिला धरणी । कंक सत्यक हे दोन्ही । विसां बाणीं विंधिले ॥५२॥
बाण अनिवार निर्व्यंग । भेदिलें वीरांचें अष्टांग । गवेषण योद्धा चांग । न करी पांग आणिकांचा ॥५३॥
चक्रदेव चालिला रागें । एक बाणीं विंधिला वेगें । रथासहित घातला मागें । रणभूमि सांडविली ॥५४॥
देखूनि चालिला अतिदंत । कोपें खवळला अद्भुत । दहा वीस पांच सात । बाणशत वर्षला ॥१५५॥
बाणें निवारिले बाण । वेगें उठावला गवेषण । येरु कोपला दारुण । आठ बाण सोडिले ॥५६॥
दारुण शर आले आठ । अनिवार अतिउद्भट । रथ सारथी केला पीठ । शिरींचा मुकुट पाडिला ॥५७॥
एक कडतरला बाण । गगना गेला गवेषण । क्रमूनियां ग्रहगण । ध्रुवमंडला उडविला ॥५८॥
घायासरिसी आली भवंडी । पडतां आवरिली मुरकुंडी । रणाङ्गणीं घातली उडी । मूर्च्छा गाढी सांवरली ॥५९॥
गवेषण आणिका रथा । चढोनि पातलां अवचिता । पाचारूनि अतिदंता । होय विंधिता सा बाणीं ॥१६०॥
बाण सूटले कडाडी । पडिली डोळ्या झांपडी । काढूं विसरला वोढी । थोर हडबडी अतिदंता ॥६१॥
दोन भेदले भुजांवरी । एक उरीं एक शिरीं । दोन रुतले दोहीं करीं । धरणीवरी पाडिला ॥६२॥
घायें लोळविला महाबळी । अधोमुखे महीतळीं । झोंटी सुटली मोकळी । भाते तळीं रिचवले ॥६३॥
हाक देऊनि गवेषण । रणाङ्गणीं उभा आपण । त्यावरी उठावला सारण । बाण दारुण घेऊनी ॥६४॥
बाण विंधिले चपळ । धनुष्य तोडिलें तात्काळ । दुजें दनुष्य घे भूपाळ । तेंहि सबळ तोडिलें ॥१६५॥
तिज्या धनुष्या वाइला गुण । तेंहि तोडिलें विंधोनि बाण । जें जं धनुष्य घे गवेषण । तें तें सारण तोडित ॥६६॥
सारणें थोर लाविली ख्याति । धनुष्य घेऊं नेदी हातीं । देखोनि कोपला भूपति । मेढा निगुति वायिला ॥६७॥
सारणें विंधिला सारथि । ध्वजस्त्म्भ पाडिला क्षिती । येरें विंधिला बाणें सातीं । दोहीं हातीं खोंचिला ॥६८॥
सारण विकळ पडिला क्षिती । वीर मूर्च्छित पडिले रथी । गवेषणें लाविली ख्याति । भद्रजाति खवळला ॥६९॥
मग मिसळला दळभारीं । करितसे महामारी । वीर खिळिले जे शरीं । शरधारीं वर्षती ॥१७०॥
येरीकडे केशिकवीर । वर्षत बाणांचा महापूर । बाणीं त्रासिला बळभद्र । दळभार वेढिला ॥७१॥
खर्ग तोमर गदा परिघ । वीर हाणिताती सैंघ । साधक बलभद्र चांग । घाया आंग लागों नेदी ॥७२॥
हळ भोंवडिला चहूंकडा । वीर पाडिले धडधडा । नांगरें केला जी उवेढा । केशिक गाढा हांकिला ॥७३॥
बाणीं विंधिला प्रबळें । तिखट सोडिलीं शरजाळें । बाण तोडूनियां हळें । निजबळें लोटला ॥७४॥
नांगर उचलोनियां निवाढें । नेहटूनि पाय ठेविला पुढें । घायें चूर केलीं हाडें । अशुद्ध उडे आकाशीं ॥१७५॥
सैन्यावरी उठिला देख । ठायीं पाडिले सैन्यनायक । धरितां न धरवे थोर तवंक । वीर अनेक मारिले ॥७६॥
रथ भूमीसी आफळी । गज शुंडादंडीं पिळी । शिरें खेळत चेंडूफळी । रणखंडली मांडिली ॥७७॥
धाक घेतला जुंझारीं । केसिकसैन्य पळे दूरी । बळभद्रमहामारीं । युद्धें वीरीं सांडिलीं ॥७८॥
जरासंध देखिला दुरी । राम चढिला रथावरी । रथ पेलिला झडकरी । उपरापरी हांकिला ॥७९॥
वेगीं धनुष्या वायिला गुण । रामें काढिला निर्वाण बाण । गदें घातली आपुली आण । रणविंदान पाहें माझें ॥१८०॥
धीर धरीं अर्ध घडी । पाहें युद्धाची निरवडी । जरासंध बाणकोडी । गर्वझाडी करीन ॥८१॥
गद निजगडा महावीर । योद्धा रणरंगचतुर । बलभद्रासी केलें स्थिर । रहंवर पेलिला ॥८२॥
येरीकडे यादवभारा । गवेषण पेटला महामारा । बाणीं खिळिलें महावीरां । मुख्य धुरा खोंचल्या ॥८३॥
विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार । आठ भविन्नला थोर । हाहाकार ऊठिला ॥८४॥
निजसैन्यासि महामार । दुरूनि देखे बलभद्र । कोपें खवळला अतिदुर्धर । रहंवर पेलिला ॥१८५॥
परसैन्य निरखूनि दृष्टि । वेगें चालिला जगजेठी । घडघडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला ॥८६॥
देखूनि शत्रूचा खटाटोप । बलभद्रासि न धरे कोप । बाहुस्फुरणें आला कंप । वेगें साटोप ऊठिला ॥८७॥
रथाखालीं घातली उडी । शेष दडपला फडेबुडीं । वराहाची दाढ तडतडी । कूर्में गाढी पाठ केली ॥८८॥
वीर खिळूनियां बाणीं । गवेषण गर्जे रणाङ्गणीं । आला बलभद्र धांवोनी । निर्वाणबाणीं विंधिला ॥८९॥
बाण विंधित सबळ । येरें परिजलें मुसळ । साधक बलभद्र प्रबळ । बाणजाण तोडिलें ॥१९०॥
नांगर उचलूनियां बळें । न धरत पातला एक वेळे । रथ सांडूनि तत्काळें । वेगें पळे गवेषण ॥९१॥
सवेंचि परतावया पाहत । पायीं घातला नांगरदांत । गवेषण पाडिला तेथ । भोईं दांत आदळले ॥९२॥
राजा ऊठिला त्वरित । तंव बलभद्रें दिधली लात । येरु अशुद्धातें वमित । पडिला मूर्च्छित अचेतन ॥९३॥
सांडूनियां धनुष्य बाण । सैन्यक धाविन्नला आपण । रथीं घालूनि गवेषण । घेऊनि प्राण पळाला ॥९४॥
देखोनि बलभद्राचें बळ । राजे चालिले प्रबळ । पुढें करूनियां गजदळ । एक वेळ लोटले ॥१९५॥
आलें देखोनि परदळ । करीत हरिखाचा गोंधळ । झेलीत नांगर मुसळ । वेगें सबळ ऊठिला ॥९६॥
गज हाणीत मूसळें । विदारित कुंभस्थळें । घायें किलकिलिती एकवेळे । गजकलेवरें पाडिलीं ॥९७॥
नांगर घालूनि रथावरी । शतसहस्रां चूर करी । पळत गज पायीं धरी । किरीकिरी करिताती ॥९८॥
चपळ चौताळती घोडीं । नांगर घालूनि त्यांतें वोढी । घायें मुसळाचेनि पाडी । वीरझोडी मांडिली ॥९९॥
वीर वर्षताति शस्त्रां । जैशा मेरूसि पर्जन्यधारा । रणीं चालतां बलभद्रा । वीर थरथरा कांपती ॥२००॥
पायींचे रगडिले पायीं । कारुषराजा पाडिला ठायीं । रथें रथ मोडियेला पाहीं । सम्मुख घायीं कोण राहे ॥१॥
पृथ्वीतळ तेंचि उखळ जाण । नांगरें वीर घाली वैरण । मुसळघायीं करी चूर्ण । रणकंदन मांडिलें ॥२॥
सत्यका दंतवक्रा युद्ध । गदें गोंविला जरासंध । मोकळा पडिला हलायुध । वर्हाडी सुबद्ध कोंडिले ॥३॥
वीरीं घेतला रणकावो । देखोनि धाविन्नला शाल्वो । मिळोनि वीरांचा समुदावो । महाबाहो पडखळिला ॥४॥
धांवतां देखोनि शाल्ववीर । आडवा पावला अक्रूर । राहें साहें स्थिर स्थिर । धरीं धीर संग्रामीं ॥२०५॥
तंव बलभद्र पावला रागें । अक्रूरातें म्हणे उगें । मज पाचारितां आंगें । तूं कां वेगें आलासी ॥६॥
रणीं जुंझार विकळ जाय । तरी दुजेनि व्हावें साह्य । शाल्व बापुडें तें काय । कौतुक पाहें पैं माझें ॥७॥
मग चालिला शाल्वावरी । बलभद्र वेढिला महावीरीं । बहुत उठिले महामारीं । शरधारीं वर्षती ॥८॥
बाप बलराम जगजेठी । नांगरें बाण करीत पीठी । आंगा जाऊं नेदी चिरटी । शाल्व दृष्टी सूदला ॥९॥
बाणीं विंधिला अमित । राम बाणांतें न गणित । वेगें धाविन्नला त्वरित । आला नधरत वेगेंसी ॥२१०॥
रथ धरिला मकरतोंडीं । शाल्वें वेगें घातली उडी । येरु सांपडला रथाबुडीं । वोढा काढी निष्टला ॥११॥
रथ उपटिला भूतळीं । वीर सांपदला तळीं । घायें केली जी रांगोळी । निधा पाताळीं ऊठिला ॥१२॥
शाल्वें घेऊनियां गदा । हृदयीं हाणों आला हलायुधा । गगना उसळला तो योद्धा । घावो नुसधा तळीं गेला ॥१३॥
शलव रथीं वेगें चढे । तंव मुसळ वोपिलें रोकडें । वमीत अशुद्धाचे सडे । मूर्च्छित पडे धरणीये ॥१४॥
मग मिसळला मागधांत । घायें शतसहस्र मारित । अशुद्ध भडभडां वाहत । नांगरें अंत पुरविला ॥२१५॥
हातियेरां दुकाळ पडिला । मग यासि नांगर सांपदला । सैन्य नांगरावया आला । वीर कांसिया काढित ॥१६॥
नांगर घालूनियां बुडीं । थोर थ्रो उचटिल्या पेडी । रथ गज कासिया काढी । पालव्या तोडी वीरांच्या ॥१७॥
अतिरथी जे उद्भट । मुसळें फोडियेले खुंट । बलभद्र हा कुणबट । केली चोखट रणभूमि ॥१८॥
महावीरां घाले घावो । अशुद्धें डवरिला बलदेवो । तेणें शोभतसे महाबाहो । रणभैरवो डुल्लत ॥१९॥
रणमदें झाला मस्त । नांगर घेऊनि नाचत । वीर देखोनि धांवत । पुरला अंत सैन्याचा ॥२२०॥
घायें मारित महावीर । भडभडां वाहे रुधिर । लोटला अशुद्धाचा पूर । नदी दुस्तर उथळली ॥२१॥
नदी वाहत दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । वोडणें कमठपृष्ठि गाढी । गजकरवडी महाग्राह ॥२२॥
बाबरझोटिया केंसाळ । तेचि नदीमाजि शेवाळ । मगर सुसरी महाविशाळ । शिरें विकराळ वीरांचीं ॥२३॥
बाण तरती सपिच्छीं । तेचि मत्स्य रणनदीसी । धनुष्यें वाहती सितेंसीं । वक्रगतीसिं तेचि सर्प ॥२४॥
पडले गजांचे अलंकार । घंटा घागरिया नूपुर । तेचि नदीमाजि दर्दुर । लहान थोर किलकिलिती ॥२२५॥
रथ ध्वजेंसीं वाहत । तेंचि तारूं सिडेंसहित । वीरा मोक्ष भरिला भरित । तारूं तेथ श्रीकृष्ण ॥२६॥
एकेचि घायें शिर पडे । स्वर्गपर्यंत तें उडे । स्वर्गभोग त्या नावडे । कृष्णाकडे परतलें ॥२७॥
कृष्णदृष्टि देहत्याग । तुच्छ करूनि सांडिती स्वर्ग । जिंतिला जन्ममरणपांग । सुख अव्यंग पावले ॥२८॥
घायें उडालें शिरःकमळ । टाकोनि गेलें ध्रुवमंडळ । पद न मनेंचि अढळ । उतावेळ परतलें ॥२९॥
देह अर्पितां कृष्णासी । चार्ही मुक्ति होती दासे । म्हणोनि आले पायांपासीं । निजसुखासि पावलें ॥२३०॥
घायें उडालें शिर एक । टाकोनि गेलें सत्यलोक । ब्रह्मसदन पावलें देख । कृष्णासम्मुख परतलें ॥३१॥
देखोनि कृष्णाचें श्रीमुख । धिक्करिती सत्यलोक । ब्रह्मसदना वांछिती मूर्ख । परम सुख हरिचरणीं ॥३२॥
घायासरिसें शिर उडे । वैकुंठकैलासपर्यंत तें चढे । एकदेशीं गति नावडे । हरीकडे मुरडलें ॥३३॥
सांडूनियां कृष्णनाथा । आम्ही नेघों सलोकता । कृष्णचरणीं ठेविला माथा । नेघों सर्वथा वैकुंठ ॥३४॥
शिर उडालें अंतराळीं । अहंकारमुकुट पडला तळीं । शिर नुतरेचि भूतळीं । कृष्णाजवळी पातलें ॥२३५॥
जेथें अभिमान तूटला । तेथें त्यासी हरि भेटला । युद्धमिसें लाभ झाला । वीरां फावला निज मोक्ष ॥३६॥
अत्यंतप्रलयींचा चिद्घन । वर्षताहे संकर्षण । वीरांचा अभिमान मर्दून । लिंगदेह छेदिले ॥३७॥
अधिकारियां मोक्षभावो । द्यावयालागिं कृष्णदेवो । मिळे भीमकीचा विवाहो । रणनिर्वाहो मोक्षाचा ॥३८॥
निधडिया वीरा जाली मुक्ति । देहलोभियां कवण गति । युद्ध सांडूनि जे पळती । विमुख होती कृष्णासी ॥३९॥
अश्व गज रणा आले । तेही कृष्णें उद्धरिले । युद्ध सांडोनि पळाले । ते पावले अवगति ॥२४०॥
यापरी तो बलभद्र । कृपेनें कोपला अतिदुर्धर । ब्रह्मसायुज्य करूनि मार । वीरें वीर आटिले ॥४१॥
एका जनार्दना कौतुक । कथारहस्य सुखदायक । पुढील कथा अलोलिक । समाधिसुख संग्रामीं ॥४२॥
इति श्रीमद्गुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां तुमुलरणनदीवर्णनं नाम दशमप्रसंगः ॥१०॥
येरीकडे वक्रदंत । सात्यकीतें पाचारित । कोपें खवळला अद्भुत । नोकूनि बोलत येरयेरां ॥४३॥
केवळ सात्विक पैं तूं गा । तापसांमाजि होसी दाटुगा । न साहवे युद्धवेगा । पळोनि मागां जाशील ॥४४॥
केवळ सात्विकासि युद्ध घडे । हें तों बोलणेंचि कुडें । केवळ सात्विक बापुढें । युद्धापुढें केंवि राहील ॥२४५॥
अरे मी सात्विक न भेटतां । वक्रदंता कैंची श्लाघ्यता । तुझी सांडीन रे वक्रता । सात्त्विकता पाहें माझे ॥४६॥
सात्विका शरण न रिघतां साचे । तंववरी तुम्हांसि सत्व कैंचें । लेइलेत अभिमानाचीं कवचें । लक्ष साचें भेदीन ॥४७॥
लागल्या सात्विकाचा घावो । परतोनि जावया नाहीं ठावो । आली वाट भुलवीन पहा हो । महाबाहो खवळला ॥४८॥
घायेंविण घेईन प्राण । तुझी माता करील रुदन । तिचें न देखों शकसी वदन । देहबंधन छेदीन ॥४९॥
वक्रदंत कोपला गाढा । वायिला रजतमाचा मेढा । ममताभाली जी दडदडा । कोपें वेगाढा विंधित ॥२५०॥
बाप सात्यकि निजगडा । बोधवचनें झाला गाढा । निजबळें चालिला पुढां । भाली तडतडा तोडिल्या ॥५१॥
लक्ष आंतल्या परवडी । गुणधनुष्याचें सित तोडी । खुंटली विषयबाणवोढी । धनुष्य लडबडी नुसधेंचि ॥५२॥
धनुष्य तुटलिया पाठीं । कामकोंतेंसीं सवेंचि उठी । सत्व सात्यकि जगजेठी । लक्षदृष्टि साधिली ॥५३॥
काढिला कामान्तक बाण । धगधगीत अतिदारुण । कामकोतें केलें चूर्ण । बळें संपूर्ण सात्यकि ॥५४॥
घेऊनि क्रोधाचा परिघ । न विचारितां टाकिला आंग । शान्तिबाणें विंधिला चांग । घायें परिघ उडविला ॥२५५॥
घेऊनि लोभाची पैं गदा । भुलवोनि करितां हृदयभेदा । वैराग्यबाणें विंधिला सांदा । तोडूनि गदा पाडिली ॥५६॥
गदा तुटलियावरी । मोहवोडण आदळे उरीं । गुप्त शस्त्र घेऊनि करीं । हृदयावरी हाणों आला ॥५७॥
दृढ सात्यकाचें अनुसंधान । विवेकतेजें तिखट बाण । वोडण उडविलें विंधोन । वक्रदंत जाण सारिला ॥५८॥
घेऊनि वासनेचें वज्र । वेगें धाविन्नला दंतवक्र । भेदावया निज जिह्वार । अतिसत्वर सात्विकाचें ॥५९॥
सात्विकें थोर धरिला धीर । विवेकतेजें तिखट तीर । विंधोनि वज्र केलें चूर । घायें अंबर गर्जिन्नलें ॥२६०॥
वज्र छेदिलें वीरनायकें । वक्रदंत चालिला सुखें । चहूंमुक्तींचीं वाघनखें । हृदयीं तिखें हाणों आला ॥६१॥
मग सात्यकि उठिला आंगें । शस्त्रसाधना सांडिली वेगें । जातां हाणोनि घातला मागें । मोडिलीं रागें वाघनखें ॥६२॥
मग सात्विकें दिधली हाक । वक्रदंतें घेतला धाक । देहलोभाभेणें देख । अधोसुख पळाले ॥६३॥
पळतां भुलला तो वाट । पडिला अभिमानाचा मुकुट । सात्यकि जुंझार चोखट । पळतिया पाठीं न लागेचि ॥६४॥
जरासंध आणि गद । दोघां चढला रणमद । क्रोधें झाले अतिसक्रोध । वीर उन्नद्ध लोटले ॥२६५॥
मेरुमंदार झगटले । तैसे रथीं रथ तगटले । दोघे महामारीं पेटले । विरुद्धबोलें बोलती ॥६६॥
सम्मुख देखोनिया गद । हासिन्नला जरासंध । मजसीं युद्ध करूं न शके रे गोविंद । बुद्धिमंद तूं कैसा ॥६७॥
विपायें कहीं ऐसें घडे । जैं अंधारीं सूर्य बुडे । पांगुळ स्वयें भिंती चढे । तर्ही न घडे युद्ध तुजशीं ॥६८॥
मशकाचेनि चरणप्रहारें । महामेरु उभाचि चिरे । इंद्रासि भिडिजे उंदिरें । तैं तुज मज संग्राम ॥६९॥
घटामाजि सिंधु सांपडे । जांभईमाजी आकाश बुढे । वागुरेमाजी वारा आडे । तैं मज तुज घडे संग्राम ॥२७०॥
मृकुट सगळा समुद्र शोखी । गज गिळिजे मुंगीमुखीं । आकाशचडळे काढिजे टाकीं । तैं तुज मज सम्मुखीं संग्राम ॥७१॥
चित्रींचा देखोनिया सर्प । गरूडासी उपजे अहंकंप । तैंच तुझा साटोप । खटाटोप घडे युद्धीं ॥७२॥
सूर्यासि खद्योग रणाङ्गणीं । भिडों शकेल झोंटधरणी । तर्ही तुज मज लागोनी । पडिपाड रणीं घडेना ॥७३॥
नवग्रहींचें बळ घटासी । परी न भिडवे पाषाणासी । जरी तूं यादव योद्धा होसी । तरी मजसी न जुंझवे ॥७४॥
ससा चढोनि सिंहाचे माथां । जरी नाचवील निजसत्ता । तरी त्ज मजसीं समता । युद्धीं सर्वथा घडेना ॥२७५॥
वांझेचा पुत्र महारोगी । संध्याराग करोनि भुगी । कांसवघृतेंसीं अरोगी । निरुजा रोगी व्हावया ॥७६॥
तैसा प्रकार आजि घडला । जे यादवदळीं दुकाळ पडिला । यालागीं गद येथें पाडिला । नावाथिला पुरुषार्थी ॥७७॥
गदनांवाचे रे शब्दीं । तुझा संग्रह कीजे वैदीं । पोतडा घालूनि कांखेसांदी । दारोदारीं हिंडविती ॥७८॥
रोगियांमाजी तूं सबळ । तुज युद्धा कैंचेंबळ । धर्मवाट दिधली पळ । सांडी सळ युद्धाचें ॥७९॥
हासोनि बोलिला वीर गद । तुझा जरेनें सांधिला जो सांद । सांदा न बैसेचि निबद्ध । फार शुद्ध करूं आलों ॥२८०॥
शस्त्र घालीन मी गद । काढीन अभिमानाचा रेंद । तोडीन जरामरणकंद । हृदय शुद्ध करीन ॥८१॥
ऐकोनि कोपला मागध । झाला कवचेंसि सन्नद्ध । किती करिसी रे अनुवाद । होईं सावध चावटा ॥८२॥
वोढी काढूनि सत्राणें । गद विंधिला आठ बाणें । येरु धनुर्विद्या जाणे । बाण तत्क्षणें तोडिले ॥८३॥
गदें वोढोनि कानाडी । धगधगीत बाण सोडी । पडली जरासंधा झांपडी । काढूं वोढी विसरला ॥८४॥
जरेनें सांधिला जो सांद । तो सांधा पाहोनि विंधी गद । वर्मीं खोंचला जरासंध । रणमद उतरला ॥८५॥
बाण खोंचला अतिनिगुती । विकळ गेला दोहीं हातीं । गळोनि धनुष्य पडलें क्षिती । गदें ख्याति लाविली ॥८६॥
मागधासि पडलें ठक । तटस्थ ठेला मुहूर्त एक । पोटीं रिघाला जी धाक । तुटलें तुक युद्धाचें ॥८७॥
जरासंध मागें पाहें । रणीं कोण्ही न देखे साहे । बलभद्रें झोडिले राये । बहुत घायें पाडिले ॥८८॥
हन्यमानबलानीका वृष्णिभिर्जयकांक्षिभिः ।
राजानो विमुखा जग्मुर्जरासंधपुरःसराः ॥१०॥
मुळींच झाला अपशकुन । पडिलें हातींचें धनुष्य बाण । सिद्धी न पवे आंगवण । रणाङ्गण सोडिलें ॥८९॥
काळ साह्य श्रीकृष्णासी । यश आलें यादवांसी । पाठी देवोनि गदासी । निघे वेगेंसीं जरासंध ॥२९०॥
जरासंध मोडल्या पाठी । पळतां राजे देखती दृष्टी । तिहीं सांडूनि युद्धगोष्टी । उठाउठीं पळाले ॥९१॥
यादवां यश आलें गाढें । राजे पळतां पाहती मागें पुढें । रथ गज सांडोनियां घोडे । वीर वेगाढे पळाले ॥९२॥
पळतां पदती पायीं वेंगडी । योद्धे न हों आम्ही वर्हाडी । बलभद्रें निजपरवडी । रणलुगडीं वोपिलीं ॥९३॥
नवरीचा वडील भवो । तेणें दिधला रणगौरवो । पाडी तांबड्या करूनि पहा हो । रायें रावो बोळविले ॥९४॥
निजप्राप्तीसी विमुख । युद्धीं झाले पराड्मुख । राजे नरवीर अनेक । पळतां दुःख पावले ॥२९५॥
ऐसा पळय करितां देख । संकर्षणें दिधले हाक । पोटीं घेऊनियां धाक । एकीक पळाले ॥९६॥
देहलोभियें बापुडीं । पायीं ममतेच्या वेंगडी । विस्माणाची खरस तोंडीं । झड मुरकुंडी घातली ॥९७॥
सांडिली पुरुषार्थलुगडीं । केवळ नागवीं उघडीं । विमुख पडतीं बापुडीं । मेलीं मडीं होऊनियां ॥९८॥
चहूं पुरुषार्थीं नव्हे वाट । केवळ नरस्तुतीचे भाट । करिती युक्तीची वटवट । भिके पोट भरूं आलों ॥९९॥
एक लटिकेंचि करूनियां खत । म्हणोनि धरणीवरी लोळत । आम्हांसि विमुख जगन्नाथ । जीवघात करूं नका ॥३००॥
नवविध लुगडीं सांडूनि वेगीं । प्रपंचराख लाविती आंगीं । अलक्ष चुकोनि झाले जोगीं । भिकेलागीं हिंडावया ॥१॥
एक मरणाचेनि धाकें । कांखेसि लोभाचें चवंडकें । प्रपंचगोंदळाचेनि हरिखें । उदो म्हणोनियां नाचती ॥२॥
एकीं धाक घेतला भारी । धनलोभें कांपती टिरी । अधर्मटोले वाजती शिरीं । मुखीं उच्चारी नकारू ॥३॥
कामखंडेरायापुढें । एक कुतरे झाली गाडे । कोण्ही आलिया दारापुढें । वसवसूनिया ऊठती ॥४॥
एक जाले जी कापडी । सलोभरंगें रंगविलीं लुगडीं । धरूनि जीवित्वाची गोडी । तीर्थपरवडी सांगती ॥३०५॥
पलतां न पळवे निश्चित । म्हणोनि बैसले ध्यानस्थ । पूजा लोकांची वांछित । भोगीं चित्त ठेवूनी ॥६॥
दांतीं तन तोडिती पाहीं । एक म्हणती आम्ही गाई । पशु झाले मनुष्यदेहीं । अभक्ष्य पाहीं भक्षिती ॥७॥
केवळ देहलोभासाठीं । मोक्षश्रियेसि पडिली तुटी । युद्धीं पळालियापाठीं । आपदा मोठी वीरांची ॥८॥
यादववीर जगजेठी । न लागती पळतियापाठी । भेणें न पाहती दृष्टी । उठाउठीं पळालीं ॥९॥
रणीं जिंतलें महाशूर । तुरें वाजती अपार । विजयी झाले यादववीर । जयजयकार प्रवर्त्तला ॥३१०॥
वीर सांगती युद्धगोष्टी । सोडिल्या कवचांचिया गांठी । उह्लास भीमकीचे पोटीं । हरिख सृष्टीं न समाये ॥११॥
आपुले न पडतीच रणीं । बंधु आले नाहींत कोण्हे । राजे गेले जी पळोनी । भीमकी मनीं हरिखेली ॥१२॥
आतां कृष्ण रुक्मियासन्नद्ध । दोघां होईल द्वंद्वयुद्ध । मेहुणेपणाचा विनोद । अतिविरोध निकुराचा ॥१३॥
पुढील कथा अतिगहन । रसाळ आहे अनुसंधान । एका विनवी जनार्दन । साव्धान परिसावें ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP