अध्याय ५४ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एवं भगवता तन्वी रामेण प्रतिबोधिता ।
वैमनस्यं परित्यज्य मनो बुद्ध्या समादधे ॥५१॥

होतां कृष्णरूपीं संलग्न । ऐकोनि बलरामाचें वचन । कृष्णमय झालें मन । तेणें स्फुंदन चालिलें ॥५६०॥
कृष्णभाव झाला चित्ता । गेली देहबुद्धि सर्वथा । कृष्णचरणीं ठेविला माथा । तीन्ही अवस्था सांडूनी ॥६१॥
वाचा झाली सद्गद । निःशेष खुंटला अनुवाद । सुखें कोंदला परमानंद । पूर्णबोध भीमकीसी ॥६२॥
नाठवती भावे देर । वृत्ति झाली कृष्णाकार । ब्रह्मरूप चराचर । देखे सुंदर निजबोधें ॥६३॥
देखोनि भीमकीची वृत्ति । हरिख न समाये रेवतीपती । उचलोनियां दोहीं हातीं । अतिप्रीतीं आळंगिली ॥६४॥
कृष्ण बलभद्र रुक्मिणी । तिघें मिनलीं पूर्ण कृष्णीं । परमानंद रणाङ्गणीं । भावें रुक्मिणी भोगित ॥५६५॥
कृष्ण भीमकी हलायुध । तिघां झाला एक बोध । एका जनार्दनीं अनुवाद । परमानंद प्रकटला ॥६६॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां रुक्मिणीप्रबोधरुक्मिबंधविमोचनं नाम त्रयोदशप्रसंगः ॥२३॥

यापरी कृष्णपत्नी । रामें प्रबोधिली वचनीं । बंधुवैरूप्यखेद सांडूनी । स्वस्थ श्रीकृष्णीं रंगली ॥६७॥
तेंविच बोधूनि चक्रपाणी । स्वस्थ केला विवेकवचनीं । रुक्मिया दिधला सोडूनी । विरूपपणीं सलज्ज ॥६८॥
रुक्मिणी बोधिली बलरामें । तो बोध ऐकिलियाही अधर्मे । विकल्प अज्ञान सहसा न शमे । विशेषें श्रमे अपमानें ॥६९॥

प्राणावशेष उत्सष्टो द्विड्भिर्हतबलप्रभः ।
स्मरन्विरूपकरणं वितथात्ममनोरथः ॥५२॥

अविशिष्ट प्राण उरले गांठीं । बोडूनि सोडियेलें यादवद्वेष्टीं । विरूप स्मरोनि होय कष्टी । कल्पना पोटीं बहु तर्की ॥५७०॥
हीन दीन केली कळा । वीर्य शौर्य मुकला बळा । केंवि मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ॥७१॥
पित्यानें म्हणितलें नपुंसक । त्या वचनाचें थोर दुःख । दावितां विरूपतेचें मुख । सकळ लोक हांसती ॥७२॥
निष्फळ झाला मनोरथ । नगरा न वचवे लज्जित । मग भोजकट निवासार्थ । वसवी उपहत ऐश्वर्यें ॥७३॥

चक्रे भोजकटं नाम विवासाय महत्पुरम् । अहत्वा दुर्मतिं कृष्णमप्रत्यूह्य यवीयसीम् ।
कुंडिनं न प्रवेक्ष्यामीतुक्त्वा तत्रावसद्रुषा ॥५३॥

प्रतिज्ञा करूनि वाहिली आण । रणीं विभांडोनि श्रीकृष्ण । भीमकी आणीन मी जाण । तोही पण नव्हेचि ॥७४॥
यालागीं न वचें कौण्डिन्यपुरा । लाजा राहिला तो बाहिरा । उभवूनि भोजकोटनगरा । वसतीसि थारा तो केला ॥५७५॥
रुक्मिया सोडिलिया उपरी । यादवांच्या दळभारीं । लागलिया निशाणभेरी । जयजयकारीं गर्जती ॥७६॥

भगवान्भीष्मकसुतामेवं निर्जित्य भूमिपान् ।
पुरमानीय विधिवदुपयेमे कुरूद्वह ॥५४॥

मागधप्रमुख जिणोनि राजे । भीमकी स्वपुरा आणोनि पैजे । विधिवत् वारिली हें व्याख्यान वोजें । कुरुध्वजें परिसावें ॥७७॥
विधिवत् पाणिग्रहणसिद्धि । इतुका आश्रय मुळींचे पदीं । प्रेक्षूनि वृद्धाचारप्रसिद्धि । विस्तार प्रबोधीं विवरावा ॥७८॥
यापरी रणाङ्गणीं । जिणोनि महावीरश्रेणी । कृष्णें आणिली रुक्मिणी । अतिविंदानीं लाघवीं ॥७९॥
कृष्ण निघाला वेगेंसी । आला पभासक्षेत्रासी । तेथें पूजोनि सोमनाथासी । दुसें चौंपासीं दीधलीं ॥५८०॥
पाहोनि सावकाश वाडी । कटक उतरलें निरवडी । हाट चोहटे परवडी । घडमोडी वस्तूंची ॥८१॥
राजे प्रजा देश देशिक । नगर नागरिक लोक । उपायनें जी अनेक । येती सम्मुख घेवोनी ॥८२॥
जिणोनि सकळीकां रायांसी । विरूप करूनि रुक्मियासी । कृष्णें नेलें भीमकीसी । हें भीमकासी श्रुत झालें ॥८३॥
ऐकोनि झाले अत्यंत सुख । जीवीं न समाये हरिख । मजवरी तुष्टला आदिपुरुष । भाग्य चोखट भीमकीचें ॥८४॥
मजपासूनि दोघां जन्म । परि दोहींचें भिन्न कर्म । भीमकी पावली पुरुषोत्तम । विरूपधर्म रुक्मिया ॥५८५॥
रुक्मिया निंदी श्रीकृष्णासी । तेणेंचि कर्में वैरूप्य त्यासी । भीमकी भावें कृष्णचरणांसी । अर्धाङ्गासी पावली ॥८६॥
आपुला भावार्थचि जाण । कृष्णप्राप्तीसी कारण । यावेगळें शहाणपण । केवळ जाण दंभार्थ ॥८७॥
यालागीं निजभावेंसी । शरण जावें श्रीकृष्णासी । भीमकी अर्पूनियां त्यासी । हृषीकेशी भजावें ॥८८॥
पाचारूनि शुद्धमतीसी । वृत्तान्त सांगितला तियेसी । येरी म्हणे राहवा श्रीकृष्णासी । कन्यादानासी विधि करूं ॥८९॥
कन्यादानाचेनि मिसें । कृष्णा पूजूं सावकाशें । पांच पंचकांचें फिटलें पिसें । अनायासें मन निवे ॥५९०॥
भीमक निघाला वेगेंसीं । टाकूनि आला प्रभासक्षेत्रासी । लोटाङ्गण श्रीकृष्णासी । निजभावेंसी घातलें ॥९१॥
त्राहि त्राहि जी दातारा । नेत्री अश्रूंचिया धारा । कृपा उपजली कृष्णवीरा । वेगीं सामोरा धाविन्नला ॥९२॥
जीवींच्या जीवा झाली भेटी । कांहीं केल्या न सुटे मिठी । बाप कृपाळु जगजेठी । पूर्ण दृष्टि पाहिला ॥९३॥
सच्चिदानंदें झाला तृप्त । सबाह्य देखे कृष्णनाथ । फिटला आर्तीचा मनोरथ । कृतकृत्यार्थ पैं झाला ॥९४॥
मग म्हणे जय जय जी चक्रपाणि । माझें भाग्य तें हें रुक्मिणी । लीन झाली तुमचे चरणीं । कुळतारणीं चिद्गंगा ॥५९५॥
शुद्ध करीत दोहीं कुळां । जेंवि प्रवाह गंगाजळा । तेंवि जन्मली हें बाळा । सकळ कुळां उद्धार ॥९६॥  
शुद्ध शान्ति निवृत्ति भक्ति । ते हे भीमकी निज मूर्ति । तुज वोपिली श्रीपति । परि एक विनति परिसावी ॥९७॥
वीर्य शौर्य भेमकीहरण । करितां न लगे अर्धक्षण । आतां विधानोक्त कन्यादान । पाणिग्रहण करावें ॥९८॥
हेंचि विनति गरुडध्वजा । चारी दिवसां माझी पूजा । अंगीकारवी अधोक्षजा । मी दास तुझा निजभवें ॥९९॥
ऐका श्रीकृष्णविंदान । भक्ताधीन होय आपण । भीमकीचें पाणिग्रहण । भावें जाण करितसे ॥६००॥
होतें श्रीकृष्णाचे मनीं । संभ्रमें पर्णाची रुक्मिणी । देवकी सुभद्रा आणोनी । महोत्सव करावा ॥१॥
हेंचि भीमकीच्याही चित्तीं । सोहळियानें वरावा श्रीपति । हळदी लावीन आपुल्या हातीं । बोहल्यापति बैसोनि ॥२॥
दोघांसही प्रीतिकर । भीमक बोलिला नृपवर । कृष्णासि मानलें उत्तर । हर्षनिर्भर भीमकी ॥३॥
कृष्ण म्हणे ज्येष्ठ माजा । दादोजींस विनति करा जा । रामासि नमस्कारी राजा । चरण वोजा धरियेले ॥४॥
कृष्णासि म्हणे बलभद्र । होसी कार्यार्थें चतुर । रामें उठवूनि नृपवर । सम्मान थोर त्या केला ॥६०५॥
राजा म्हणे श्रीहरि । माझा आश्रम पवित्र करीं । आपुलिया दासांतें उद्धरीं । कौण्डिन्यपुरीं त्वां यावें ॥६॥
भीमकी म्हणे ऐक ताता । भाग्यें पावलासि कृष्णनाथा । मागें सरों नये तत्वता । गृहममता सांडावी ॥७॥
सर्व सामग्री जीवेंभावेंसीं । आवडी आणीं कृष्णापासीं । भावें पूजावा हृषीकेशी । सकळ कुळासि उद्धरूं ॥८॥
वचना मानवला बलदेव । ऐकोनि हांसिला देवाधिदेव । पाणिग्रहणा मूळमाधव । मूळींचा ठाव लग्नासी ॥९॥
भीमक म्हणे कळलें बीज । कृष्णपूजेनें आमुचें काज । धन्य धन्य हे माझी आत्मज । कृष्ण निज पावली ॥६१०॥
इच्या वचनाचें महिमान । पाहतां बुडोनि ठेलें मन । वचनें पळविला अभिमान । मी तूं पण उडविलें ॥११॥
बाप माझें भाग्य थोर । कृष्ण परब्रह्म साचार । भीमकीयोगें चराचर । ब्रह्माकार पैं झालें ॥१२॥
अवचट श्रीकृष्णचरणीं । वंशींचा विनटल्या कोण्हे । तोचि सकलकुळातें तारूनी । परब्रह्मभुवनीं नांदवी ॥१३॥
ऐसे सुखाचेनि हरिखें । राजा बोलिल निजमुखें । वचन भीमकीचें कौतुकें । आवश्यकें मानिलें ॥१४॥
सेवक पाठविले नगरासी । वैभवसामग्रीवेगेंसीं । नगरनागरिकलोकांसीं । मूळमाधवासी आणावें ॥६१५॥
सवेंचि विनवी श्रीकृष्णासी । मूळ पाठवावें द्वारकेसी । देवकी आणि वसुदेवासी । सोहळियासी आणावीं ॥१६॥
भाव जाणोनि मानसीं । संतोषला हृषीकेशी । मूळ पाठविलें द्वारकेसी । सोहळीयासी सकळिकां ॥१७॥
द्वारेकेमाजि सिंहासनीं । उग्रसेन नृपाग्रणी । यादवशौरिप्रमुख वृष्णि । वार्तिकीं येऊनि जुहारिलें ॥१८॥
रुक्मिणीहरणविजयोत्सव । पाणिग्रहणा मूळमाधव । मूळपत्रिका पाहोनि सर्व । करिती जयरव आनंदें ॥१९॥
आज्ञा करूनि घरटीकारा । विजयोत्सवचा डांगोरा । नगरीं सर्वत्र श्रृंगारा । सहपरिवारा वाहनेंशीं ॥६२०॥

तदा महोत्सवो नॄणां यदुपुर्यां गृहे गृहे ।
अमूदनन्यभावानां कृष्णे यदुपतौ नृप ॥५५॥

नगरीं ऐकोनि विजयघोष । नरनारींसी परमोह्लास । कृष्णविवाह पहावयास । मुदित मानस सर्वांचें ॥२१॥
तेव्हां राजाज्ञेच्या गजरीं । उत्साह यदुपुरीमाझारी । यादव सन्नद्ध सहपरिवारीं । घरोघरीं हरिप्रेमें ॥२२॥
श्रीकृष्ण जो यादवपति । त्याच्या ठायीं अनन्य प्रीति । आस्तिक्यभावें सप्रेमभक्ति । उह्लास चित्तीं त्या झाला ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP