अध्याय ५४ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अहत्वा समरे कृष्णमप्रत्यूह्य च रुक्मिणीम् ।
कुंडिनं न प्रवेक्ष्यामि सत्यमेतद्ब्रवीष्यहम् ॥२१॥

कृष्ण विभांडूनि वाणीं । हिरोनि नाणितां रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणीं । मजलागूनि तो दोष ॥७७॥
जे करिती साधुनिंदा । त्या पापाच्या मज आपदा । रणीं न जिंकितां गोविंदा । जरी मी नुसधा परतलों ॥७८॥
विद्या घेऊनि गर्वा येती । विकल्पोनि ते गुरूसि निंदिती । तीं तीं पापें मज होती । जरी मी श्रीपति न जिंकें ॥७९॥
केवळ पूज्य माता पिता । त्यांतें पुत्र हाणी लाता । तीं तीं पापें मज आतां । जरी कृष्णनाथा न जिंकें ॥३८०॥
देखोनि साधुसज्जनांसी । दोष आरोपिती त्यांसी । तीं तीं पापें येतु मजपासीं । जरी मी कृष्णासि न जिंकें ॥८१॥
कृष्ण न जिंकोनियां रणीं । घेऊनि न येतां रुक्मिणी । पुरीं न प्रवेशें कौण्डिन्यें । मुख परतोनि दाखवी ॥८२॥

इत्युक्त्वा रथमारुह्य सारथिं प्राह सत्वरः ।
चोदयाश्वान्यतः कृष्णस्तस्य मे संयुगं भवेत् ॥२२॥

ऐसी वाहूनियां आण । कवच लेयिला आपण । वेगीं घेऊनि धनुष्यबाण । आंगवण पहा माझी ॥८३॥
कृष्ण अज्ञानाची आदी । त्यासि हृदयीं नाहीं बुद्धि । परणूं पाहें राक्षसविधी । तो मी सिद्धी जावों नेदी ॥८४॥
कृष्ण गर्वित एकलेपणीं । दुजयातें हृदयीं नाणी । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बाणीं दंडीन ॥३८५॥
रागें कांपतसे थरथरा । दांत खातसे करकरा । धूम्र निघे नेत्रद्वारां । रहंवरा चडिन्नला ॥८६॥
रथीं बैसला मदगर्वित । वेगीं सारथियातें म्हणत । चपळ चौताळों दे रथ । कृष्णनाथ जेथ असे ॥८७॥
आजि कृष्णेंसिं सन्नध । करणें आहे द्वंद्वयुद्ध । अगर्वीं धरितो गर्वमद । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥८८॥

अद्याहं निशितैर्बाणैर्गोपालस्य सुदुर्मतेः ।
नेष्ये वीर्यमदं येन स्वसा मे प्रसभं हृता ॥२३॥

आजि माझ्या तिखट वाणीं । कृष्ण खिळीन रणांगणीं । चोरोनि नेली माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥८९॥
सैन्य अवलोकिलें दृष्टी । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थाटी । शत्रें मुष्टि झळकती ॥३९०॥
चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनियां प्रबळ । संख्या केवळ परियेसा ॥९१॥
दोन लक्ष अठरा सहस्र । अधिक सात शतें वीर । संख्या अक्षौहिणी प्रकार । केला निर्धार श्रीव्यासें ॥९२॥
किती गज किती रथ । अश्व पदाति समस्त । विभागसंख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥९३॥
एकवीस सहस्र आड शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्मत्त । सैन्या आंत चालती ॥९४॥
एक लक्ष सहस्र नव । तीन शत पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥३९५॥
एक लक्ष नव सहस्र । तीनशें पन्नास पदातिभार । अश्वसादी रथ कुंज्नर । संख्या समग्र अक्षौहिणी ॥९६॥
पांसष्टि सहस्र सा शतें । देक दशक अधिक तेथें । वीर पायांचे भीडते । युद्धीं पुरते निजगडे ॥९७॥
इतुकी सैन्याची मिळणी । तया नाम अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणीं । महामुनीं शीव्यासें ॥९८॥
ऐसें निज सैन्य अद्भुत । त्यामाजि रुक्मिया विराजत । साह्य आले राजे दक्षिणाइत । वीर गर्जत महाबळी ॥९९॥
रणीं जिंकोनि जरासंद्ध । मिनले गदहलायुध । अवघे करिती विनोद । थोर आह्लाद जैं त्यांचा ॥४००॥
यादव मिळोनि थोर थोर । करिती पातावयाचा विचार । येता देखोनि पारखे भार । मग समोर लोटले ॥१॥
दोन्ही सैन्या झाला मेळ । घायीं उठिला हलकल्लोळ । वाजंत्राचा ध्वनि प्रबळ । रणवेताळ खवळला ॥२॥
कोपें चालिला रुक्मिया वीर । ऐकोनि आला यादवभार । तेथें न देखे शार्ङ्गधर । रथ सत्वर पेलिला ॥३॥

विकत्थमानः कुमतिरीश्वरस्य प्रमानवित् ।
रथेनैकेन गोविंदं तिष्ठ तिष्ठेत्यथाहवयत् ॥२४॥

एकाकी एकला चक्रपाणि । दूरूनि देखिला नयनीं । एके रथीं कृष्णरुक्मिणी । देखोनि मनीं प्रज्वळला ॥४॥
सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेंवि वैरागी निघे योगासी । तेंवि सैन्य सांडूनि यादवांपाशीं । एकरथेंसीं धाविन्नला ॥४०५॥
वल्गना करूनि ऐशापरी । एक्या रथीं ठाकिला हरि । कुमति नेणोनि ऐश्वर्यथोरी । उभा रे उभा म्हणतसे ॥६॥

धनुर्विकृष्य सुदृढं जघ्ने कृष्णं त्रिभिः शरैः ।
आह चात्र क्षणं तिष्ठ यदूनां कुलपांसन ॥२५॥

धनुष्य मांडूनि मांडणी । गुण वाइला तत्क्षणीं । बाण लावूनियां गुणीं । वोढी काढूनि चालिला ॥७॥
कृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता हा नेणे प्रभावो । कुमति धरूनियां महागर्वो । काय पहा हो बोलत ॥८॥
क्रुष्णासि म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें । चोरी करूनि पळसी काये । कोण माये राखेल ॥९॥
यदुकुळासि तूं लांछनकर । क्षण एक समरीं राहें स्थिर । कामक्रोध सलोभ शर । कार्मुकीं दुर्धर सज्जिले ॥४१०॥


N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP