अध्याय ५२ वा - श्लोक ४१ ते ४४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भाग्नुप्तः समेत्य पृतनापतिभिः परीतः ।
निर्मथ्य चैद्यमगधेशबलं प्रसह्य मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥४१॥
पत्रिका पहावी सावधान । विलंब न करावा व्यवधान । प्रातःकाळीं आहे लग्न । ऐसिये समयीं पावावें ॥६१०॥
देखोनि लिखिताची तांतडी । एकला येऊनि घालिसी उडी । तेव्हां मज म्हणसी कुडी । बुद्धि धडपुडी ऐकावी ॥११॥
तुझ्या निजबोधाची सेना । प्रत्यावृत्ति पाहूनि नयना । स्वानुभवाचेन भारें जाणा । सावधान होऊनि यावें ॥१२॥
स्वरूपतेच्या मदगजा । गुढार घालावें जी वोजा । प्राणापान जिणती पैजा । तैसे वारु पालाणीं ॥१३॥
जिणोनि जाती मनोरथ । तैसे संजोगावे रथ । चक्रवाटा तळीं पर्वत । पीठ होत कर्माचें ॥१४॥
तुझिया निजबोधाचे गाढे । द्वतदलनीं जे वेगाढे । तेचि यादव करूनि पुढें । सबळबळेंसीं तां यावें ॥६१५॥
बाह्यदृष्टी जरी तूं ऐसी । तर्क पडेल लौकिकासी । कळों नेदितां दुजयासी । गुप्तरूपेंसीं प्रकटावें ॥१६॥
कृष्णासि शिकवितेसि बुद्धि । म्हणाल चतुर तूं अनादि । हृदयशून्य कृष्ण त्रिशुद्धि । वर्त्तणें बुद्धी माझेनि ॥१७॥
प्रबळ बळेंसीं सबळ । म्हणाल कां बोलाविते बरळ । तरी मायामाहेरीं प्रबळ । स्थूळस्थूळ अरिवर्ग ॥१८॥
सखा बंधु जिवलग सबळ । मागध अष्टधा प्रबळ । मथूनि चैद्यादिकदळ । मज केवळ पर्णावें ॥१९॥
म्हणसी अढालढालांची मोठी । गोड बोलांची प्रकृति खोटी । एवढी कां सोसूं आटाटी । म्हणोनि गोष्टी नुपेक्षीं ॥६२०॥
तूं तंव अजित गा धडफुडा । तुझेनि नांवें वाढींव भेडां । मज पर्णावया आळस दवडा । होयीं गाढा वीरवृत्ति ॥२१॥
म्हणसी युद्ध मांडेल कडाडी । मी उठेन काढाकाढी । नाहीं लौकिकपावडी । कैंची घडि घडवट ॥२२॥
कैचा अंतःपट जाण । कवण म्हणेल सावधान । मीतूंपणा नाहीं व्यवधान । म्हणसी लग्न कैसेनि ॥२३॥
ऐसेन लग्न लागलिया पुढां । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परें पडतील ॥२४॥
म्हणसी विधि नव्हेल पैं लग्न । अविधि न करीं पाणिग्रहण । येही विषयींचें विधान । सावधान परिसावें ॥६२५॥
विवाह तंव बहुतापरी । पिशाच गंधर्व आसुरी । राजे वरिताति स्वयंवरीं । पणमहासुरी भेदूनी ॥२६॥
पाणिग्रहण ब्राह्मणासी । स्वर्गलग्न क्षत्रियांसी । रणीं जिंकोनि महाविरांसी । विधिरक्षासीं मज पर्णीं ॥२७॥
जागृतिस्वप्नसुषुप्तिकाळा । तुजवीण आन न देखें डोळां । ग्लानि लिहितां वेळोवेळां । उबग गोपाळा न मनावा ॥२८॥
आतां ऐकें एक बोल । तुझें वीर्य माझें मोल । अल्प वेंचूनि एक वेळ । दासी केवळ मज करावें ॥२९॥
अंतःपुरान्तरचरीमनिहत्य बंधून्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् ।
पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥४२॥
म्हणसी अंतःपुरामाजि तूम वधू । काढितां आडवे येती बंधु । त्यांचा मजकरितां वधू । दःखसंबंधु तुज होईल ॥६३०॥
येचि विषयीं जी उपाया । सांगेन ऐक यादवराया । वेगीं यावें अंबालया । यात्रासमया टाकूनी ॥३१॥
कुळींचा कुळधर्म भीमकराया । नगराबाहेरीं अंबालया । नववधू न्यावी पूजावया । जगदंबेसि कुळधर्मा ॥३२॥
तेचि संधी जिंका रण । परस्परें हेचि खूण । तेथें राहोनि सावधान । ॐपुण्या करावें ॥३३॥
यस्यांघ्रिपंकजरजस्नपनं महांतो वांछंत्युमापतिरिवास्ततमोऽपहत्यै ।
यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जहामसून्व्रतकृशाञ्छतजन्मभिः स्यात् ॥४३॥
म्हणसी ऐश्वर्यें थोर इंद्र । रूपें मदन का चंद्र । त्यांतें सांडूनि आग्रह थोर । माझाचि कां करितेसी ॥३४॥
ऐसें न म्हणावें यदुवीरा । कवण जाणे या विचारा । केवळ नव्हसी तूं नोवरा । जन्मोद्धारा मजलागीं ॥६३५॥
तुझिये चरणींची माती । ब्रह्मादिदेवां नव्हे प्राप्ति । आंगें येऊनि उमापति । स्नान वांछिती पदरजें ॥३६॥
महादेव तमोगुण । त्या तमासि उपशमन । तुझिये चरणींचे रज जाण । लागलें ध्यान शिवासीं ॥३७॥
चरणरजालागिं केवळ । ब्रह्मा जाला पोटींचें बाळ । तर्ही न पवेचि चरणकमळ । नाभिकमळीं स्थापिला ॥३८॥
याचिलागिं जी गोपाळा । चरणरजासि आला गोकुळा । तुवां ठकिला त्याही वेळा । वत्सें गोवळा जालासी ॥३९॥
ऐसें जाणोनि सदशिवें । ध्यान मांडिलें जीवें भावें । ऐसियाची प्राप्ति मी पवें । तैं थोर दैवें दैवाची ॥६४०॥
योगयागतपें तपती । तर्ही नव्हे तुझी प्रपति । मी तंव धीट मोठी चित्तीं । आहें वांछिती अर्धांग ॥४१॥
पत्रिका वाचितांचि देख । तुवां यावें आवश्यक । मज परणूनि नेदिसे सुख । तरी परम दुःख मग होईल ॥४२॥
तुझी कृपा नव्हतां फुडी । तरी काय या जिण्याची आवडी । देह हाडाची हे बेडी । कोण कोरडीं वोढील ॥४३॥
जरी कृपा न करवेल येथें । तरी मारूनि जायें आपुलेनि हातें । मग परलोकें तर्ही तूंटें । सावकाश भोगीन ॥४४॥
ऐसें घडतां जरी न घडे । तरी देह करीन कोरडें । व्रतें तपें जीं अवघडें । तुज उद्देशें करीन ॥६४५॥
प्राण सांडीन सर्वथा । म्हणसीं तरी काय येईल हाता । एके दों पांचा साता । जन्मशता वरीन ॥४६॥
पत्रिका वांचितांचि जाण । जाणवेल शहाणपण । म्यां तंव वाहिली असे आण । तुजवीण आन वरीना ॥४७॥
ब्राह्मण उवाच - इत्येते गुह्यसंदेशा यदुदेव मयाहृताः ।
विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनंतरम् ॥४४॥
द्विज म्हणे यदुनायका । सेवेस निवेदिली पत्रिका । ते विचारूनियां सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥४८॥
इतुके भीमकीचे गुह्य निरोप । म्यां निरूपिले पत्रिकारूप । ते विवरूनि करणीय कल्प । क्षिप्र ससाक्षेप साधावा ॥४९॥
पत्रिकारूप रुक्मिणीविनति । सर्व विवरूनि पाहिजे चित्तीं । तदनंतर करणीय कृत्यीं । सद्य प्रवृत्ति करावी ॥६५०॥
एका विनवी जनार्दना । कृष्ण चालिला पाणिग्रहणा । भक्तवचनाची अवगणना । देव सर्वथा न करीचि ॥५१॥
इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां पत्रिकापठनं नाम चतुर्थप्रसंगः ॥४॥
शुक म्हणे गा परीक्षिति । भीमकीलिखितार्थें श्रीपति । उत्सुक जाला तें तुजप्रति । पुढिले अध्यायें कथिजेल ॥५२॥
त्रेपान्नाविये अध्यायें । विदर्भा जाऊनि शेषशायी । चैद्यमागध मथूनि पाहीं । हरी लवलाहीं भीमकीतें ॥५३॥
तो सविस्तर वृत्तान्त । स्वमुखें वक्ता श्रीएकनाथ । श्रोतीं होऊनि दत्तचित्त । परमपुरुषार्थ साधावा ॥५४॥
तें हें श्रीमद्भागवत । श्रीशुक वक्ता मूळ व्यासोक्त । टीकाकार श्रीएकनाथ । दयार्णव तेथ अनुयायी ॥६५५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां मुचुकुंदतपोऽभिगमन - जरासंधप्रलंभमानर्तरैवताख्यानं रुक्मिणीपत्रिकार्पणं च नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥
श्लोक ॥४४॥ ओव्या ॥६५५॥ एवं संख्या ॥६९९॥ ( बावन्नावा अध्यय मिळून ओवी संख्या २४६१५ )
अध्याय बावन्नावा समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP