अध्याय ५२ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवं संपृष्टसंप्रश्नो ब्राह्मणः परमेष्ठिना ।
लीलागृहीतदेहेन तस्मै सर्वमवर्णयत् ॥३६॥
ऐकोनि कृष्णमुखींची गोठी । द्विजें बांधिली शकुनगांठी । हरिखें वोसंडला सृष्टी । आनंद पोटीं न समाये ॥५७५॥
विदर्भदेशीं राजा भीमक । जैसा वैराग्यामाजि विवेक । भागवतधर्मी अतिधार्मिक । शुद्धसात्विक सत्त्वाचा ॥७६॥
त्याची कन्या चिद्रत्न । लावण्यगुणी नवनिधान । सकळभूषणा भूषण । जें मंडन तिहीं श्लोकें ॥७७॥
उदार धीर गुणगंभीर । सज्ञान ज्ञानें अतिचतुर । तुझ्या ठायीं अतितत्पर । कलत्रभावें विनटली ॥७८॥
पित्यानें तुम्हांसि दिधली वधू । ऐकोनि हांसिला गोविंदु । हरिखें न सांभाळे स्वानंदु । द्विजासि क्षेम दीधलें ॥७९॥
जें कृष्णाच्या पोटीं । तेचि सांगीतली गुह्यगोठी । जीवीं जिवा पडली मिठी । पाठी थापटी द्विजाची ॥५८०॥
आणीक आहे संवादु । तीचा ज्येष्ठ बंधु विरुद्धु । तेणें शिशुपाळा दिधला शब्दु । लग्न परवां धरिलेसें ॥८१॥
येचिविषयीं यदुनायका । आहे भीमकीची पत्रिका । ते वाचूनियां सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥८२॥
मग काढिली पत्रिका । कुंकुममंडित सुरेखा । धीर न धरवेचि हरिखा । आवडी देखा चुंबिली ॥८३॥
पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणाथ आर्तभूत । एका जनार्दना विनवित । पत्रिकार्थ परिसावा ॥८४॥
इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां पत्रिकार्पणं नाम तृतीयप्रसंगः ॥३॥
ॐ नमो जी यदुवीरा । तूं निर्विकार नोवरा । मज न्यावें निजमंदिरा । क्रोधादि असुरां दमूनियां ॥५८५॥
मज वडील माझा बंधु । जेणें त्जसीं विमुख बोदु । ज्याचेनि नीचासिं संबंधु । न मरूनि वधु करावा ॥८६॥
ऐका भीमकीची व्युत्पत्ति । पत्र लिहिलें चौथें भक्ति । वाचितांचि भक्तपति । सहजस्थिती धांविन्नला ॥८७॥
रुक्मिण्युवाच - श्रुत्वा गुणान्भुवनसुंदर श्रृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोंऽगतापम् ।
रूपं दृशांदृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपं मे ॥३७॥
ऐकें त्रैलोक्यसुंदरा । सकळसौंदर्यवैरागरा । तुझेनि सौंदर्यें सुरनरां । सुंदरत्वें वर्णिजे ॥८८॥
तुझी सुधाकर कीर्ति । श्रवणें श्रवणा प्रकाशिती । त्रिविध ताप अस्त पावती । जेंवि गभस्ति खद्योतां ॥८९॥
ऐसियाची स्वरूपप्राप्ति । चार्ही शक्ति दासी होती । सकळ स्वार्थ पायां लागती । जें देखती त्यां निजलाभ ॥५९०॥
क्षयो नाहीं गा निश्चित । यालागीं नांवें तूं अच्युत । तुझ्या ठायीं निर्ल्लज्जचित्त । अतिसुरत कृष्णसुखा ॥९१॥
का त्वा मुकुंद महती कुलशीलरूपविद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ।
धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ॥३८॥
मनोविश्रान्तीचा निजबोधु । त्यालागीं नामें तूं मुकुंदु । सकळ सुखावा आनंदकंदु । तुज कोण वधू वरीना ॥९२॥
कुळ शील सधन रूप । विद्यावयसा अतिस्वरूप । शान्ति दान्ति तेज अमूप । करिती तप तुजलागीं ॥९३॥
ऐसी लावण्यगुणसंपत्ति । धीरावती आणि सती । त्याही वरा तुज न पवती । तेथ मी किती वराक ॥९४॥
ऐसें नरवीर पंचानना । प्राप्तकाळ पाणिग्रहणा । तुज कोण वरीना अंगना । मनमोहना श्रीकृष्णा ॥५९५॥
म्हणसी सोयरा मी अति काळा । कां बोलाविसी विवाहमेळा । पाणिग्रहण शिशुपाळा । तो काळ अति काळा मजलागीं ॥९६॥
ते काळीं तां नुपेक्षावें । हेंचि मागें जीवें भावें । मज दीनातें उद्धरावें । धांवें पावें लग्नासी ॥९७॥
तन्मे भवान्खलु वृतः पतिरंग जायामात्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि ।
मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद्गोमायुवन्मृगपतेर्बलिमंबुजाक्ष ॥३९॥
मनें वाचा काया । निर्धारेंसीं तुझी जाया । मी जालें असें यदुराया । विधिविवाहा तुवां कीजे ॥९८॥
तूं तंव परमात्माप्रकृति । नावडे स्त्रियांची संगति । उपेक्षिसी माझी विनति । थोर अपकीर्ति तुज होईल ॥९९॥
मी तंव तुझें अर्धांग । केंवि शिशुपाल शिवे माझें आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरविभाग यदुराया ॥६००॥
कृष्णकेसरीची संपत्ति । चैद्यजंबुक जैं गा नेती । कमलनयना कमलापति । थोर अपकीर्ति तुज तेव्हां ॥१॥
पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुर्वर्चनादिभिरलं भगवान्परेशः ।
आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्णातु मे न दमघोषसुतादयोऽन्ये ॥४०॥
तरीच साधेल हें लग्न । जरी म्यां केलें असेल भगवद्भजन । ब्रह्मभावें ब्राह्मणपूजन । देवतार्चन हरीचें ॥२॥
इष्ट जें कां यागादिक । बापी कूप आराम देख । गोभूरत्नदानादिक । त्याहूनि अधिक अन्नदान ॥३॥
व्रत जें कां एकादशी । पूजाविधान जागरणेंसीं । ब्राह्मणभोजन द्वादशीसी । भगवंतासि वालभ ॥४॥
सकळधर्माचाही धर्म । सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा केला असेल नेम । पुरुषोत्तम तरि पावो ॥६०५॥
व्रत तप यज्ञ दान । त्याहूनि अधिक हरीचें ध्यान । निमेषामाजि समाधान । अमन मन होऊनि ठाके ॥६॥
ऐसेनि साधनें साधिला बोधु । तरी गद जयाचा धाकुटा बंधु । वेगें येऊनियां गोविंदु । पाणिग्रहण मज करू ॥७॥
परादिवाचा नव्हे सौरस । यालागिं नांवें तूं परेश । भेमकीलिखितें हृषीकेश । तटस्थ होऊनियां ठाके ॥८॥
मज कृष्णें नेलियापाठीं । मागें शिशुपाळाच्या पाटीं । बैसेल अवकळा गोमटी । दोघां गांठी एकची ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP