श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥
जय जय जनार्दन जगदाभरण । जगदखिलाद्वयकल्याण । जगदात्मकत्वें विराजमान । भिन्नाभिन्न गोगोप्ता ॥१॥
एवं गोविंद चिन्मात्रैक । चिद्विलासप्रकाशक । अभेदबोध नमनात्मक । पूर्णशशाङ्क दयार्णवीं ॥२॥
गगनीं जीवनीं सबाह्य शुध । एकात्मतेचा अभेदबोध । धवलौनि उथळे भजनानंद । अभेदीं भेदरोचक जो ॥३॥
शब्दश्रवण गगन एक । किंवा वायु स्पर्शत्वक । चक्षु रूपा प्रकाशक । अभेद अचूक तेजचि ॥४॥
रसरसज्ञा द्विधा जळ । कीं गंधघ्राण भू केवळ । भेदें परस्परां सापेक्ष मेळ । प्रेमकल्लोळ उपजवी ॥५॥
तेंवि अभेदीं भावूनि भेद । भजतां गुरुवरपादारविंद । प्रेमळा फावे चिन्मकरंद । जाणती स्वाद तद्रसिक ॥६॥
तया सप्रेमरसेंकरोन । गुर्वाज्ञेचें अनुशासन । वंदूनि यथामति व्याख्यान । आदरिलें तें अवधारा ॥७॥
एकावन्नव्या अध्यायीं यवन । मुचुकुंदक्षोभें भस्म करून । दिधलें मुचुकुंदा वरदान । पबोधून तप्श्चर्या ॥८॥
जन्मान्तरीं द्विजाग्रणी । सर्वात्मकत्वें समदर्शनी । होऊनि मदैक्यता निर्वाणीं । लाहसी म्हणोनि हरि वदला ॥९॥
पुढें मुचुकुंदाची कथा । पुसावयाची नृपासि आस्था । जाणोनि सर्वज्ञ श्रीशुकवक्ता । म्हणे कुरुनाथा अवधारीं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP