अध्याय १६ वा - श्लोक ३९ ते ४३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने । भूतावासाय भूताय पराय परमात्मने ॥३९॥
तुभ्यं नमः श्रीभगवते । भगवच्छब्दें ऐश्वर्यवंतातें । अचिम्त्यगुणपरिपूर्णातें । हेतुसंकेतें वंदिती ॥१२॥
नमो भगवंता तुजकारणें । भगवत्पदेंचीं विशेषणें । दाहा श्लोकीं वाखाणणें । निरूपण विशदार्थ ॥१३॥
अचिंत्य अनंत ऐश्वर्यवंत । आदिपुरुष तोचि तूं एथ । तुजकारणें प्रणिपात । शरणागत करितसों ॥१४॥
अंतर्यामिरूपेंकरून । पुर्यष्टकीं वर्तमान । तो तूं आदिपुरुष भगवान । तुजकारणें नमीतसों ॥५१५॥
पूर्यष्टकाअंतर्यामी । असोनि अपरिच्छीन्न तूं स्वामी । यालागीं महात्मने या नामीं । पादपद्मीं लागतसों ॥१६॥
आकाशप्रमुख महाभूतें । संतत निवास तुजमाजीं यांतें । भूतावासाय म्हणोनि तूंतें । येणेंकारणें वंदितसों ॥१७॥
जो तूं भूतां आश्रयस्थान । यास्तव भूतीं अपरिच्छिन्न । भूताय हें विशेषण । अर्थ गहन प्रतिपादी ॥१८॥
भूतांपूर्वींच आहेसी । काय प्रमाण एथ म्हणसी । पराय विशेषणें हृषीकेशी । तूं विश्वासी कारण ॥१९॥
म्हणसी कारण मूळप्रकृति । कारणातीत तूं विश्वपति । परमात्मने या विशेषणोक्ती । आम्ही तुजप्रति वंदितसों ॥५२०॥
कारण आणि कारणातीत । दोहीं विशेषणांचा अर्थ । विशद वाखाणूनि नमित । गण समस्त नागिणींचा ॥२१॥
ज्ञानविज्ञाननिधये ब्रह्मणेऽनंतरशक्तये । अगुणायाविकाराय नमस्ते प्राकृताय च ॥४०॥
ज्ञानविज्ञाननिधि तूं देवा । देवा अनंतशक्तिवास्तवा । अगुणा अविकारा वासुदेवा । प्रकृतिसद्भावा तुज नमो ॥२२॥
ज्ञान म्हणजे ज्ञप्तिमात्र । विज्ञान चिच्छक्ति चिन्मात्र । या दोहिंकरूनि पूर्णतर । निधि स्वतंत्र तूं यांचा ॥२३॥
दोहींची मी साठवण । दोंहूनि तिसरा म्हणसी भिन्न । तरी अनंतशक्ति ब्रह्म निर्गुण । तें अधिष्ठान तूं स्वामी ॥२४॥
ब्रह्म म्हणिजे किंलक्षणीं । अगुणअविकारविशेषणीं । विशिष्ट तो तूं चक्रपाणि । जाणोनि मनीं नमीतसों ॥५२५॥
अनंतशक्ति तो तूं कैसा । प्रकृतिप्रवर्तका जी ईशा । अथवा नेणसी प्रकृतिलेशा । श्रीपरेशा अभिन्ना ॥२६॥
अचिंत्यानंतशक्तिमंत । तूं अखंड अप्राकृत । अप्राकृतीं कें गुणांची मात । अगुण निश्चित याहेतू ॥२७॥
जेथ गुणांची वार्ता नाहीं । तेथ विकार कैंचे कांहीं । प्राणेंवीण नुमटे देहीं । जेंवि इंद्रियीं चळवळ ॥२८॥
निद्रा स्वप्न ना जानणें । ना तूं वेंठसी साक्षीपणें । कर्तृचेष्टा ज्ञानकरणें । अवलंबणें तुज नाहीं ॥२९॥
नसतां दृश्य विषयभुली । क्रियाकरणा कैंची चाली । यालागीं विकारांची बोली । मिथ्या समूळीं तुजमाजीं ॥५३०॥
तस्माद्ब्रह्म ज्ञप्तिमात्र । कारणातीत जें स्वतंत्र । तें तूं अविनाश शुद्ध सन्मार । कारणप्रकार तो ऐक ॥३१॥
अनंतशक्तिप्रद्योतक । तो तूं प्रवृत्तिप्रवर्तक । ज्ञानविज्ञानप्रकाशक । तो तूं निष्टंक ईश्वर ॥३२॥
ब्रह्मत्वें तूं अकारण । ईश्वरत्वें जगत्कारण । उभयात्मका तुज नमन । अचिंत्यगुणपरिपूर्णा ॥३३॥
अनंत अचिंत्य गुणैकशक्ति । यालागीं काळशक्तिरूपें व्यक्ति । विशद करूनि अभिवंदिती । नागयुवती तें ऐका ॥३४॥
कालाय कालनाभाय कालावयवसाक्षिणे । विश्वाय तदुपद्रष्ट्रे तत्कर्त्रे विश्वहेतवे ॥४१॥
ऊर्णनाभितंतुप्रमाण । सूर्यरथाचें होतां चलन । इतुकें सूक्ष्म कालमान । तें स्वरूप जाण काळाचें ॥५३५॥
ईश्वरादि प्रकृत्यंत । कालविस्तार हा समस्त । कालाय म्हणोनि दंडवत । करिती तेथ नागपत्न्या ॥३६॥
कालशक्तीसि तूं आश्रय । त्या तुज नमो कालनाभाय । विश्वोद्भवस्थितिप्रलय । हा अवयवसमुच्चय काळाचा ॥३७॥
त्या काळाचा अवयवसाक्षी । अंतर्बाह्य उभय पक्षीं । तुज लक्षूनि ज्ञानचक्षीं । विश्वाध्यक्षीं समरसों ॥३८॥
इतुके काळाचे अवयव । चिदात्मक तूं वासुदेव । त्या तुजकारणें स्वयमेव । नमूं सद्भावपूर्वक ॥३९॥
कालावयवांचें जें रूप । तेंचि विश्वाचें स्वरूप । त्या तुजकारणें भेदलोप । करूनि सद्रूप नमीतसों ॥५४०॥
म्हणसी जड हें विश्वपटल । त्याचा द्रष्टा तूं केवळ । तुझेनि भासें विश्व सकळ । तूं निर्मळ विश्वात्मा ॥४१॥
यास्तव विश्वाचा तूं कर्ता । तूंचि उपादान तत्त्वतां । कारकरूपें नागवनिता । नमिती अनंता तें ऐक ॥४२॥
भूतमात्रेंद्रियप्राणमनोबुद्ध्याशयात्मने । त्रिगुणोनाभिमानेन गूढस्वात्मानुभूतये ॥४२॥
दृश्य तितुकें कार्य जाण । भूतें दृश्याचें कारण । भूतयोनि तन्मात्रगण । तमोगुण हा अवघा ॥४३॥
तन्मात्रग्राहक इंद्रियें । तत्कारणें म्हणिजती इयें । तीं चळती प्राणसमुच्चयें । म्हणोनि कारण होय प्राणगण ॥४४॥
मन संकल्पीं प्रवर्तमान । तेणें प्राणांसि चळणवळण । यालागीं प्राणांचें कारण । म्हणती सर्वज्ञ मनासी ॥५४५॥
मन संकल्प विकल्प करी । तेणें पडे संशयपुरीं । निश्चयाचिये पैलपारीं । बुद्धि झडकरी काढी त्या ॥४६॥
यालागीं मनाचें कारण । बुद्धि म्हणती विचक्षण । आशयशब्दें अंतःकरण । चित्ताभिमानसमवेत ॥४७॥
कर्मज्ञानचेष्टाकरणें । अधिष्ठिलीं रजोगुणें । आशयरूपें कर्तृकरणें । सत्त्वगुणें अभियुक्त ॥४८॥
अभिमान म्हणिजे त्रिगुणात्मक । तामस राजस आणि सात्त्विक । प्रळयोत्पत्तिस्थिति देख । हे अवयव सम्यक् काळाचे ॥४९॥
यांहीं करूनि स्वात्मानुभूति । त्रिगुणाभिमानें गूढ म्हणती । स्वांशभूतांची ज्ञानशक्ति । लोपी त्या तुजप्रति नमीतसों ॥५५०॥
म्हणसी अहंकारावच्छिन्न । होऊनि आवरीं निजात्मज्ञान । तैं मी झालों परिच्छिन्न । ऐसें न म्हण जगदीशा ॥५१॥
नमोऽनंताय सूक्ष्माय कूटस्थाय विपश्चिते । नानावादानुरोधाय वाच्यवाचकशक्तये ॥४३॥
जितुकें अहंकारें आवरिलें । तें परिच्छिन्नत्व पावलें । व्यष्टिसमष्टिनामाथिलें । पिंडब्रह्मांड जीवशिव पैं ॥५२॥
तूं अपरिच्छिन्न अनंत । अहंप्रत्ययविवर्जित । अदृश्यपणें सर्वगत । सर्वातीत सूक्ष्मत्वें ॥५३॥
म्हणोनि कूटस्थविशेषण । उपाधिकृतविकारविहीन । अतएव विपश्चित सर्वज्ञ । ब्रह्म निर्गुण स्वतःसिद्ध ॥५४॥
तुजकारणें नमो म्हणती । मौळें भूमीतें स्पर्शिती । ऐशी करूनि वास्तव स्तुति । यावरी स्तविती ऐश्वर्य ॥५५५॥
अचिंत्यमायाऐश्वर्यबळ । संपन्न तूंचि तो गोपाळ । म्हणोनि नागिणींचा मेळ । करी रोळ स्तवनाचा ॥५६॥
नानावादानुरोधक । तो तूं वादीत्मा अभिन्न एक । अस्ति नास्ति एकानेक । प्रतिपादक सर्वांचा ॥५७॥
अल्पज्ञ सर्वज्ञ बद्ध मुक्त । गूढ मूढ व्यक्ताव्यक्त । सर्वां सर्वत्र संमत । शक्तिमंत ऐश्वर्यें ॥५८॥
आणि वाच्यवाचकशक्ति । यांची ऐशी ऐका व्यक्ति । अभिधा अभिधेय पदार्थ होती । अभिन्नगति परस्परें ॥५९॥
शर्करा अभिधा वर्णत्रय । पदार्थ मिष्ट जिह्वाविषय । अनेकपदार्थसमुच्चय । अभिधा अभिधेय अभेदें ॥५६०॥
ऐसा वाच्यवाचकशब्दरूप । विश्वात्मक तूं प्रकाशदीप । जाणोनि आत्मत्वें समीप । नमूं सकृप सद्भावें ॥६१॥
अनेक हेतुविशेषणीं । अनावृतत्व प्रतिपादुनी । स्तवनें संतुष्ट चक्रपाणि । करिती नागिणी अतिचतुरा ॥६२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP