अध्याय १६ वा - श्लोक ३२ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तास्तं सुविग्नमनसोऽथ पुरस्कृतार्भाः कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः ।
साध्व्यः कृतांजलिपुटाः शमलस्य भर्तुर्मोक्षेप्सवः शरणदं शरणं प्रपन्नाः ॥३२॥
मग त्या कृष्णातें समस्ता । भर्तृदुःखें व्याकुळचित्ता । शरण रिघाल्या होत्सात्या । नमिती तत्त्वतां तें ऐका ॥८९॥
सौभाग्यमानससरोजिनी । भर्तृवेक्लव्यवडवाग्नि । तेणें पावतां अहाळणी । विषण्णमानसा जालिया ॥३९०॥
अकारपूर्वकपतिव्रता । त्या नेणती ऐशी व्यथा । तैशा नव्हती नागवनिता । अतिसंतप्ता वरदुःखें ॥९१॥
धन्य साध्व्या नागपत्न्या । प्राप्तसंकटीं करिती यत्ना । पुढें करूनि पुत्रकन्या । पतिमोक्षणा प्रवर्तल्या ॥९२॥
भर्तृदुःखें ज्यां संकट । मुखम्लानता ग्लानि प्रकट । करूनि वंदिती वैकुंठ । अंजलिपुट जोडुनि ॥९३॥
मूर्च्छा दाटतां शरीरीं । प्रेता ऐसा उदकावरी । कालिय देखोनि सवेग तीरीं । सर्पसुंदरी पातल्या ॥९४॥
मग भूमीवरी दंडप्राय । नागिणी पसरूनि आपुले काय । नमस्कारिती भूतमय । भूताश्रय भूतात्मा ॥३९५॥
अनाश्रितां जो आश्रयप्रद । वंदकां वंद्य शरणां सुखद । दंडप्राय नागिणिवृंद । तो गोविंद अभिवंदिती ॥९६॥
निसर्गदुर्मतीपासून । होआवया पतीचें मोक्षण । दुरात्मयाचें दुष्टाचरण । तें क्षमापन करावया ॥९७॥
पापमतीस्तव जे जे सर्पें । अपराध केले जे जे दर्पें । ते ते क्षमूनि कंदर्पबापें । पति सुकृपें सोडावा ॥९८॥
ऐसें इच्छूनि अभ्यंतरीं । श्रीकृष्णातें सर्पनारी । नमित्या झाल्या दंडापरी । यमुनेबाहेरी येऊनी ॥९९॥
देखोनि सकोप श्रीपति । तत्तोषार्थ प्रथम स्तुति । कृतपराध आपुला पति । नागिणी म्हणती दंडार्ह ॥४००॥
नागपत्न्य ऊचु :- न्याय्यो हि दंडः कृतकिल्बिषेऽस्मिंस्तवावतारः खलनिग्रहाय ।
रिपोः सुतानामपि तुल्यदृष्टेर्धत्से दमं खलमेवानुशंसन् ॥३३॥
पक्षिपन्नगादि कित्येक योनि । सहज नैसर्गिक ज्ञानी । पुण्यात्मका या नागिणी । सिद्धयोगिनी निष्पाणा ॥१॥
ब्रह्मादिदेवां दुर्लभ हरि । त्या तोषविती स्तवनोत्तरीं । साम पंचविधा कुसरी । सर्पसुंदरी सभाग्या ॥२॥
हरीवरी न ठेवूनि शब्द । साहा श्लोकीं दंडानुमोद । त्यामाजीं साम पंचविध । करूनि विशद बोलती ॥३॥
तयापुढें श्लोकदशकें । स्तवित्या झाल्या नमनात्मकें । त्यानंतर पांचां श्लोकें । करिती स्वमुखें प्रार्थना ॥४॥
एवं अवघे एकवीस श्लोक । वदल्या नागिणी सम्यक । तोषवूनि यदुनायक । तिहीं पन्नग सोडविला ॥४०५॥
दंडानुमोद तेथ प्रथम । पंचलक्षण जें कां साम । तत्पूर्वक पुरुषोत्तम । स्तविती सप्रेम पद्मिनी ॥६॥
संबंध लाभ आणि उपकृति । चौथी अभेद स्नेहाभिव्यक्ति । पांचवी बोलिजे गुणकीर्ति । साम म्हणती पंचधा ॥७॥
प्रथम त्यामाजि संबंध । म्हणती कालिय सापराध । दंडा योग्य हा प्रसिद्ध । सहसा विरुद्ध न मानूं ॥८॥
खलनिग्रहणाचि कारणें । स्वामी तुझें अवतार धरणें । खलक्रियानिसर्गाचरणें । दंडाकारणें योग्य हा ॥९॥
दंड्य देखोनि दंड न करी । तरी तो कैसा दंडधारी । नैसर्गिक खलाचारी । म्हणोनि श्रीहरि हा दंड्य ॥४१०॥
न्याय्य संबंध दंड्यदंडक । परी तूं परम कारुणिक । खलत्व झाडूनि निष्टंक । सर्वात्मक सुखदानी ॥११॥
शत्रु अथवा औरस प्रजा । खलत्व दंडूनि गरुडध्वजा । समान ओपिसी निजगुजा । ऐसा तुझा निजमहिमा ॥१२॥
खलत्वाचेंचि प्रशंसन । करिसी करूनियां दंडन । तुल्यदृष्टि हें अभिधान । एरव्हीं जाण तुज साजे ॥१३॥
शत्रुपुत्रां समान पाहणें । खलत्व पाहोनि दंड धरणें । माउलीहूनि स्नेहाळपणें । संरक्षणें कारुण्यें ॥१४॥
तेथ विषम मानिती मूर्ख । खलत्व निरसूनि निःशेष । तुवां ओपिलें परम सुख । जें निर्दोष अक्षय्य ॥४१५॥
अनुग्रहोऽयं कृतो हि नो दंडोऽसतो ते खलु कल्मषापहः ।
यद्दंदशूकत्वममुष्य देहिनः क्रोधोऽपि तेऽनुग्रह एव संमतः ॥३४॥
दंड्यदंडकसंबंध कथिला । ना तो केवळ अनुग्रह केला । दैवें दुर्लभ लाभ झाला । क्रोध दाविला कृपेनें ॥१६॥
आतां निग्रह नव्हे हा सहसा । पूर्णानुग्रह श्रीपरेशा । म्हणसी प्राणांत मांडल्या कैसा । निग्रह ऐसा न मनावा ॥१७॥
तरी कां दंड न वटे आम्हां । तें तूं ऐकें मेघश्यामा । सर्पयोनि ते पापात्मा । परी पुण्यात्मा सर्प हा ॥१८॥
दुष्टांलागीं कल्मषनाशा । तूं दंडिसी हृषीकेशा । वरिवरी वाटे क्रोध ऐसा । परी संतोषा प्रापक ॥१९॥
तुवां सर्पासि केला दंड । तेणें झाला दुष्कृतखंड । दंदशूकत्व दिसे उघड । जे जड मूढ तमोयोनि ॥४२०॥
इतुकें मात्र कल्मषमूळ । चरणस्पर्शें तें निर्मळ । करूनि दिधला तोष बहळ । चरणकमलप्राप्तीचा ॥२१॥
ऐसा दुर्लभ लाभ झाला । आम्हां तामसां सर्पकुळां । सुकृतसंग्रह काय याला । पूर्वी घडला हें न कळे ॥२२॥
तपः सुतप्तं किमनेन पूर्वं निरस्तमानेन च मानदेन ।
धर्मोऽथवा सर्वजनानुकंपया यतो भवांस्तुष्यति सर्वजीवः ॥३५॥
प्राप्त असतां सर्पदेह । तेथ हा महदनुग्रह । कोण पूर्वपुण्याचा समूह । जेणें पुण्याह उगवला ॥२३॥
तें कालियाचें पूर्वपुण्य । अभिनंदिती प्रशंसून । दुष्करतपोमय गहन । कीं दुजें जाण धर्ममय ॥२४॥
पूर्वीं येणें निरभिमान । होऊनि केलें तपश्चरण । देऊनि सर्वांसि सन्मान । जगजीवन तोषविला ॥४२५॥
तपश्चरणीं अहंता उठे । तो तें करी मग उफराटें । सुकृत म्हणतां दुष्कृत भेटे । निःशेष आटे सुखलाभ ॥२६॥
होऊनि निरभिमान चित्तीं । मान देऊनि सर्वभूतीं । ऐसी तपश्चर्या जे जे करिती । ते ते होती हरिप्रिय ॥२७॥
तस्मात येणें निरभिमानें । सर्व भूतांच्या सन्मानें । संपादिलीं तपश्चरणें । हरितोषणें सुष्ठुत्वें ॥२८॥
तप्तकृच्छ्रें सांतपनें । विष्णुपंचकें चांद्रायणें । मासोपवासादि अनशनें । जलशीतोष्ण साहोनी ॥२९॥
अथवा धर्मामाजीं परम । अहिंसाधर्म उत्तमोत्तम । सर्वभूतीं आत्माराम । जाणोनि सौम्य वर्तनें ॥४३०॥
भूतमात्रीं सदयपणें । केवीं आचरों शकिजे कोणें । एथें गुंतती शहाणे । विहिताचरणें भ्रमोनी ॥३१॥
गाईसाठीं कापितां तृण । ब्राह्मणासाठीं कांडितां कण । शुद्ध्यर्थ करितां संमार्जन । सदयपण केविं राहे ॥३२॥
तरी येथींचें इतुकें वर्म । सांडूनि देहबुद्धीचा भ्रम । सर्वभूतीं आत्माराम । पाहतां सुगम अहिंसा ॥३३॥
देह नहोनि जें जें करणें । तें तें प्रारब्धें चेष्टणें । घडे केवळ निरभिमानें । सदयपणें सर्वत्र ॥३४॥
कृपा करूनि सर्वभूतीं । सोडिली तनूची अहंमति । जैसें प्रेषोच्चारीं यति । अभय ओपिती सर्वांतें ॥४३५॥
देहीं मरोनि ज्याचें जिणें । सर्वभूतीं आत्मपणें । भगवत्प्रेमें जें वर्तणें । तो धर्म म्हणे अहिंसक ॥३६॥
ऐसा मनोजयें श्रीहरि । तोषविला पैं जन्मांतरीं । तया पुण्याची सामग्री । होती पदरीं गमतसे ॥३७॥
असो ऐसें सुकृत काये । हें वितर्कें लक्षा नये । परंतु लाभला तुझे पाये । भाग्यें न माये ब्रह्मांडीं ॥३८॥
ऐशी लाभा करूनि व्यक्ति । यावरी तिसरी उपकृति । नागपत्न्या निरूपिती । तेही श्रोतीं परिसावी ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP