मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर गावो वृषा वत्सतर्यः क्रंदमानाः सुदुःखिताः । कृष्णे न्यस्तेक्षणा भीता रुदत्य इव तस्थिरे ॥११॥थानतुटे कां अपेट गोर्हे । पाड्या काल्हवडी वासुरें । गाई वृषभ विविधें गुरें । लहानें थोरें टवकारलीं ॥४९॥डोहीं पाहोनि कृष्णाकडां । उठिला एक हंबरडा । आक्रंदती चहूं कडां । घालूनि वेढा ह्रदासी ॥१५०॥जेंवि एकुलतिया बाळा । देखोनि वरपडी होतां काळा । तये मातेपरी कळवळा । धेनु सकळा दुःखिता ॥५१॥कृष्णीं गुंतोनि गेलिया दृष्टि । चित्राकार अंगयष्टि । लोपली चेष्टांची रहाटी । अचेष्ट सृष्टीं तिष्ठती ॥५२॥मनुष्यें रुदती स्नेहसुभरें । तैशीं कृष्णासाठीं गुरें । जळ सांडिती नेत्रद्वारें । लहानें थोरें क्रंदती ॥५३॥ब्रह्मयाचे मोहनकाळीं । वत्सें होऊनि वनमाळी । पान्हा प्याला त्या धेनु सकळी । परम स्नेहाळी मातृत्वें ॥५४॥ऐसें झालें ह्रदातीरीं । आतां व्रजींची ऐका परी । डोहीं बुडाला श्रीहरि । हें नेणती घरीं व्रजवासी ॥१५५॥अथ व्रजे महोत्पातास्त्रिविधा ह्यतिदारुणाः । उत्पेतुर्भुवि दिव्यात्मन्यासन्नभयशंसिनः ॥१२॥या नंतरें व्रजाआंत । त्रिविध उद्भवले उत्पात । शारीर भौम दैवगत । भय अद्भुत सूचक ॥५६॥नरांचीं वामांगें वामनेत्र । दक्षिणभागींचें वनितागात्र । अशुभसूचक जें अपवित्र । सर्वीं सर्वत्र स्फुरती पैं ॥५७॥नेत्र बाहु स्तनमंडळ । पोटीं भडभडूनि उठती ज्वाळ । मानस वैरस्यें व्याकुळ । स्मृति शिथिल मूर्च्छित ॥५८॥आंगीं कडकडी संताप । कार्यावांचूनि उपजे कोप । अशुभचिह्नें एवंरूप । भय समीप सूचिती ॥५९॥भूमि कांपे थरथराटें । उगीच उघडे तडतडाटें । कारणें विण पडती गोठे । वृक्ष मोठे उन्मळती ॥१६०॥दीपमाळा वृंदावनें । डोलती जैशीं सचेतनें । कित्येक प्रतिमा करिती रुदनें । हास्यवदनें कितिएकी ॥६१॥वाहाटुळी फिरोनि गगनीं । त्यामाजी सैरा वर्षती वह्नि । भयाची प्राप्ति इत्यादि चिह्नीं । पार्थिवां विघ्नीं सूचिली ॥६२॥दिवसां नक्षत्रांचिया ज्योति । गगनींहूनि उलंडती । रुधिरवर्षें भिजे क्षिति । अद्भुत होती दिग्दाह ॥६३॥नसतां मेघांचें आभाळ । विद्युत्पात होतीं प्रबळ । दिवि उत्पात ऐसे बहळ । व्रजीं सकळ देखती ॥६४॥श्वानें रासभें मार्जारें । आक्रंदती आर्तस्वरें । रडती आक्रोशें लेंकुरें । तान्हीं वांसुरें ओरडती ॥१६५॥भालुवा भुंकती गांवखरीं । वृक जंबुकाद्यही दुपारीं । कोल्हाळ करितां पैं व्रजपुरीं । झालीं घाबिरीं गौळियें ॥६६॥म्हणती उत्पात हे दारुण । उठावया काय कारण । परस्परें करिती कथन । विघ्नदर्शन शंकेचें ॥६७॥सद्यचि महाभय संप्राप्त । ऐसें सूचिती हो उत्पात । अवघे विचार करा त्वरित । महा अनर्थ उदेला ॥६८॥तानालक्ष्य भयोद्विग्ना गोपा नंदपुरोगमाः । विना रामेण गाः कृष्णं ज्ञात्वा चारुयितुं गतम् ॥१३॥शारीर भौम आणि दैव । उत्पात देखोनि बल्लव । भयें उद्विग्न झाले सर्व । श्रेष्ठसमुदाव नंदादि ॥६९॥म्हणती आमुचा केवळ प्राण । सकळां जीवांचें जीवन । गाई चारावया तो कृष्ण । रामावांचून वना गेला ॥१७०॥तैर्दुर्निमित्तैर्निधनं मत्वा प्राप्तमतद्विदः । तत्प्राणास्तन्मनस्कास्ते दुःखशोकभयातुराः ॥१४॥मग त्या दुर्निमित्तांवरून । हेंचि जाणावें अशुभ चिह्न । म्हणती कृष्ण पावला निधन । हरिमहिमान नेणोनी ॥७१॥संगी असतां संकर्षण । कदा बाधूं न शके विघ्न । आजि एकला गेला कृष्ण । वनीं मरण पावला ॥७२॥ऐसा मनीं करूनि तर्क । बल्लव करिती दीर्घ शोक । कृष्णावेगळें जें आणिक । नेणती सुख संसारीं ॥७३॥कृष्णीं गुंतले ज्यांचे प्राण । कृष्णमयचि ज्यांचें मन । ते नंदादि बल्लवगण । दुःख दारुण पावले ॥७४॥कृष्णावेगळे आमुचे प्राण । न वांचती पैं दुःखेंकरून । अवघियांसि एक मरण । भय दारुण उदेलें ॥१७५॥हाहाकारें आक्रंदती । दीर्घशोकें मूर्च्छित पडती । हृदय मस्तकें ताडिती । शंख करिती निःशंक ॥७६॥तेणें झाला चंड शब्द । गोपी गोपाळ मुग्धामुग्ध । मिळाला व्रजौकसांचा वृंद । पुसती विशद परस्परें ॥७७॥कृष्णसंगें आपुलालीं । म्हणती लेंकुरें अवघी गेलीं । वनीं तितुकींही निमालीं । कृष्णावेगळीं न वांचती ॥७८॥ऐसे समदुःखी बल्लव । परी कृष्णाची अगाध माव । मोह ममतेचें न घेती नांव । वेधले जीव श्रीकृष्णीं ॥७९॥आबालवृद्धवनिताः सर्वेङ्ग पशुवृत्तयः । निर्जग्मुर्गोकुलाद्दीनाः कृष्णदर्शनलालसाः ॥१५॥नंदपुरोगम बल्लव । आबालवृद्ध स्त्रियादि सर्व । गृहसंग्रह गांव ठाव । देहभाव विसरोनी ॥१८०॥निघाले व्रजपुराबाहिर । सर्वही करिती हाहाकार । आंगीं स्नेहभुलीचा भर । तेणें विसर सर्वार्थीं ॥८१॥यास्तव म्हणिजे त्यां पशुवृत्ति । प्रजावात्सल्यीं प्रवृत्ति । आणिक नुमजे कांहीं चित्तीं । शोकावर्तीं निमग्न ॥८२॥दीनप्राय लहान थोर । कृष्णदर्शनालागीं आतुर । सांडोनि निघाले व्रजपुर । सर्व कांतार हुडकिती ॥८३॥कृष्णा म्हणोनि मारिती हांक । पाहती श्रीकृष्णाचें मुख । न देखतां मानूनि दुःख । करिती शोक सविलाप ॥८४॥कृष्णा माझिया पाडसा । मेघश्यामा ये डोळसा । नंदनंदना राजहंसा । जीव हा पिसा तुजलागीं ॥१८५॥नीलोत्पलदलविशालनेत्रा । कोतिकंदर्पकमनीयगात्रा । पदजलपूता पुण्यचरित्रा । दुःखसन्मात्रा चिन्मया ॥८६॥कलुषांतका कोमलनामा । कारुण्यपूर्णा कल्पद्रुमा । कमलाकांता निष्कामकामा । पुरुषोत्तमा परिपूर्णा ॥८७॥पुण्यश्लोका पुराणपुरुषा । पूतनाशोषण पशुपाधीशा । पवित्रचरणा पयोनिधिवासा । पूज्यपरेशा परमात्मा ॥८८॥कृष्ण भवभावभावना । कृष्णा भवगजपंचानना । कृष्णा भवभावअभावना । भवभंजना श्रीकृष्णा ॥८९॥ये रे कैवल्यदानी हरि । ये रे संसारगजकेसरी । कृष्णा तूं एक सचराचरीं । दैवीं आसुरीं एकत्वें ॥१९०॥मानससारसराजह्म्सा । मनसिजमथनालयनिवासा । मादकमन्मथमोहनवेशा । मुनिजनतोषा मधुपते ॥९१॥विगतविषय प्रियकरचरणा । विमुखविद्वत्स्मयभंजना । विपश्चिदात्मक विशुद्धज्ञाना । विवर्तविहीना विगतेच्छा ॥९२॥शरणशरण्या शर्मदा । शर्वशर्वाणीसंभवहृदा । शार्वरशर्वरीभेदच्छेदा । आनंदकंदा अगोचरा ॥९३॥अक्रिया अगुणा अगाधचरिता । अलक्ष्य अनंत सद्गुणभरिता । अरूपा अनामया अच्युता । आद्या अद्वैता अविनाशा ॥९४॥सत्त्वसंपन्न बल्लवगण । ऐसा स्मरोनियां श्रीकृष्ण । शोक करिती रानोरान । नंदनंदन गिंवसावया ॥१९५॥राजस म्हणती सर्वांपरी । तुझा भरंवसा धरिला हरि । तो तूं कोठें गेलासि दुरी । दुःखसागरीं लोटूनी ॥९६॥कृष्णा प्रौढत्वें वाढसी । अनेक संपदा जोडिसी । आम्हां वृद्धां गौरविसी । थोर मानसीं हे आशा ॥९७॥ते आजि विफळ जाहली वाटे । कृष्णा टाकूनि गेलासि कोठें । झालों अवघेचि करंटे । दुःख अदृष्टें ओढवलें ॥९८॥तामसदेहबुद्धीच्या भरीं । देहमात्रचि जाणोनि हरि । आंदोळती शोकलहरी । ते वैखरी वदवेना ॥९९॥कृष्णा तुझी मातापिता । पैल संकर्षण हा भ्राता । इष्टा मित्रां आम्हां समस्तां । सांडूनि केंउता गेलासी ॥२००॥आजि जेविला नाहींस घरीं । संगें नेली त्वां सिदोरी । कोठें गेलासि दुरिच्या दुरी । कैशी परी तुज झाली ॥१॥पादत्राणें न लेतां चरणीं । गाई नेल्या त्वां अनवाणी । कांटे खडे दर्भ रानीं । रुपती म्हणोनि जीव धाके ॥२॥कृष्णा तुझे अनंत गुण । हृदयीं आठवितां ये रुदन । कैसें आमुचें दैव हीन । हातींचें रत्न हारविलें ॥३॥येक देवदेव्हारे करिती । आणि जोशी एक प्रार्थिती । श्रीकृष्णाची कैशी गति । मोहभ्रांति उमजेना ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP