अध्याय १२ वा - श्लोक ३६ ते ४४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजन्नाजगरं चर्म शुष्कं  वृंदावनेऽद्भुतम ॥ व्रजौकसां बहुतिथं बभूवाक्रीडगह्वरम् ॥३६॥
 
राया मग तें अजगरचर्म । जयामाजी पुरुशोत्तम । रोघोनि आघातें सायुज्यधाम । ओपी सुगम प्रकारें ॥९२॥
तें अघासुराचें कलेवर । शुष्क झालें पाथराकार । अद्भुत पर्वताचें विवर । महाथोर राहिलें ॥९३॥
तें बहुकाळ वृंदावनीं । समस्त व्रजौकसांलागुनी । क्रीडास्थान झालें अवनीं । जेवीं लेणीं पर्वतांचीं ॥९४॥
योजनायत लांबरुंद । उच्च जैसे कां अंबुद । माजीं रिघोनि बल्लववृंद । क्रीडा आनंदें भोगिती ॥३९५॥
मग हांसोनि म्हणे श्रीशुकमुनि । परमाश्चर्ये वृदावनीं । वर्तलें तें ऐकें श्रवणीं । अगा फाल्गुनिऔरसा ॥९६॥

एतत्कौमारजं कर्म हरेरामाहिमोक्षणम् । मृत्योः पौगंडके बाला दृष्ट्वोचुरिविस्मिता व्रजे ॥३७॥

कृष्णें केलें कुमारपणीं । तें हें आजि वर्तलें म्हणोनि । पौगंडवयीं वत्सपगणीं । कथिलें येऊनि व्रजभुवनीं ॥९७॥
कौमार पौगंड वयसा भेद । ते तूं राया ऐसें विशद । कौमार तें प्रथम पंचाब्द । द्वितीय पंचाब्द पौगंड ॥९८॥
तृतीय पंचाब्ध तें कैशोर । यौवन म्हणिजी तदुचर । ऐसा वयसेचा विचार । शास्त्रज्ञ चतुर बोलती ॥९९॥
पांचवे वर्षीं पुरुषोत्तम । करिता झाला अघवधकर्म । तें आमुचें वर्षीं पाहोनि चर्म । विस्मित परम वत्सप ॥४००॥
विस्मित होऊनि सांगती व्रजीं । कृष्णें आमुचें मोक्षण आजि । केलें आणि सहजेंसहजीं । अधोक्षजीं अघ मिनला ॥१॥
अजगरापासोनि आमुचें मोक्षण । संसारापासूनि अजगरोद्धरण । आजि करिता झाला कृष्ण । करिसी कथन वत्सप हें ॥२॥

नैतद्विचित्रं मनुजार्भमाविनः परावराणां परमस्य वेधसः ।
अधोऽपि यत्स्पर्शनधौतपातकः प्रपाऽऽत्मसाम्यं त्यसतां सुद्र्लभम् ॥३८॥

जो निर्जरांसि हृदयशल्य । ज्याचें दैत्यपक्षीं प्राबल्य । जेणें विश्वातं । केला स्वतुल्य तो कृष्णें ॥३॥
गिळिले वत्स वत्सपगण । काळानळें जैसें तृण । तें अमृतदृष्टी करूनि कृष्ण । काडी सप्राण मागुते ॥४॥
मायेंकरूनि मनुजबाळ । जरी झाला त्रैलोक्यपाळ । परात्पर श्रीगोपाळ । नव्हे कीं केवळ मानवि ॥४०५॥
जो परम पुरुष परात्पर । तयासी आघासुराचें गात्र । भेदणें नोहे कीं विचित्र । पशुकुमार झालिया ॥६॥
परंतु अघाचेंहि भाग्य थोर । योनि पावूनि असुर । कर्म करूनि द्वेषपर । आत्माकार जाहला ॥७॥
जो ब्रह्म्यातें उपजविता । म्हणूनि परमवेधा हें नाम अच्युता । त्याचा अघातें स्पर्श होतां । निष्पापता पावला ॥८॥
ज्याच्या स्पर्शें धौतपाप । होऊनि पावला निजात्मरूप । न लभे करितां उत्कृष्ट तप । जें दुष्प्राप असज्जनां ॥९॥
आत्मसाम्य म्हणजे स्वरूपता । दिधली म्हणों जरी तत्त्वतां । तरी ज्योति ज्योतीसीं समरसतां । सायुज्यता नव्हे कांहीं ॥४१०॥

सकृद्यदंगप्रतिमांऽतराहिता मनोमयी भागवतीं ददौ गतिम् ।
स एव नित्यात्मसुखानुभूत्यभिव्युदस्तमायोंऽतर्गतो हि किं पुनः ॥३९॥

ज्याचे अंगमूर्तीची प्रतिमा । माजीं प्रतिष्ठिता हृदयपद्मा । एकवारही मानसीं प्रेमा । ओपी अनुत्तमा भागवती गति ॥११॥
ज्या श्रीकृष्णाचें मूर्तिध्यान । काल्पनिक मनश्चिंतन । अंतरीं धरितां यत्नेंकरून । पावती स्थान वैष्णव ॥१२॥
बलात्कारें चिंतितां मूर्ति, । स्तिर न राहे चित्तवृत्ति । एकादि वेळ रंगल्या रति । गति भागवती संप्राप्ता ॥१३॥
प्रल्हादादि भक्तगणीं । ध्यानमूर्ति हृदयीं धरूनि । कैवल्यसुखीं समरसोनि । शांतिनिर्वाणीं विराजले ॥१४॥
लटिकी मनोमय प्रतिमा । अंतरीं धरिता एवढा मह्मा । अपा उदरीं त्या पुरुषोत्तमा । रिघतां कामा श्नुद्धरे ॥४१५॥
स्वयें जो कां कैवल्यपति । देहीं प्रवेशे चिन्मयमूर्ति । अरिबलमायेची करूनि शांति । सायुज्यमुक्ति नेदी कां ॥१६॥
जो कां इत्यात्मसुखानुभव । जेणें मायेचा पराभव । देहीं रिघतां तो केशव । कोण वैभव मग नलभे ॥१७॥
ज्याच्या स्मरणें माया निरसे । ज्याच्या ध्यानें विवर्त नाशे । ज्याच्या कृपेच्या कटाक्षलेशें । निःश्रेयसें वोळगती ॥१८॥
तेणें प्रवेशोनि अंतरीं । अखिल मायेचा नाश करी । तो स्वसुखानुभव ओपी हें नवल परी । काय म्हणोनि वाणावी ॥१९॥
सूर्योदयीं निरसे तम । सन्निधिमात्रें ओसरे हिम । उष्मा प्रकाश होय सुगम । हे सहजधर्म सूर्याचे ॥४२०॥
तैसा हरि भरतां अभ्यंतरीं । होय मायेची बाहेरी । आत्मसुखानुभूतीची उजरी । हे कय नवलपरी बोलावी ॥२१॥
ऐसें नैमिषारण्यदेशीं । श्रोते शौनकादि प्रमुखऋषि । सूतें सांगूनि हें त्यांपाशीं । वत्सहरणासी आरंभी ॥२२॥

सूत उवाच - इत्थं द्विजा यादवदेवदत्तः श्रुत्वा स्वरातुश्चरितं विचित्रम् ।
पप्रच्छ भूयोऽपि तदेव पुण्यं वैयासकिं यन्निगृहतिचेताः ॥४०॥

द्विजवर्यातें म्हणे सूत । परीक्षिति यादवदत्त । तो स्वरक्षाचें ऐकोनी चरित । प्रश्न करीत पुनरपि ॥२३॥
जेणें श्रवणीं वेधलें मन । त्या वैयासकीतें पुढती प्रश्न । करूनि तेंची पुण्यकीर्तन । ऐकों आपण इच्छितसें ॥२४॥
यादवदेव तो कृष्णनाथ । तेणें द्रौण्यस्त्र करूनि शांत । उत्तरेसी केला दत्त । तो देवरात परीक्षिति ॥४२५॥
पूतनादि अघमोक्षण । ऐसें विचित्र कृष्णाचरण । ऐकोनि करी पुढती प्रश्न । चमत्कारून शुकातें ॥२६॥

राजोवाच - ब्रह्मन्कालान्तरकृतं तत्कालीनं कथं भवेत् । यत्कौमारे हरिकृतं जगुः पौगंडकेऽर्भकाः ॥४१॥

राजा म्हणे गा ब्राह्मणोत्तमा । कालांतरीं केलिया कर्मा । आजि केलें ऐशिया नामा । झाली कां या योग्यता ॥२७॥
कुमारवयसेंमाजी केलें । तें पौगंडकीं अर्भकीं कथिलें । एक वत्सर गुप्त ठेविले । कैसें झालें विस्मरण ॥२८॥

तद्ब्रूहि मे परं योगिन्परं कौतूहलं गुरो । नूनमेतद्धरेरेव माया भवति नान्यथा ॥४२॥

तें तूं आतां योगनयनीं । पाहोनि निवीएं माझिये कर्णीं । परमयोगियां शिरोमणि । त्रिकाळज्ञानी मुनिवर्या ॥२९॥
भूत भविष्य वर्तमान । तिहींचें तुजला प्रत्यक्ष ज्ञान । परमयोगसिद्धी करून । तूं सर्वज्ञ मुनींद्रा ॥४३०॥
जो विश्वाचा आदिगुरु । कृष्ण परमात्मा परमेश्वरू । परम  कौतूहल चरित्र । तेणें मच्छ्रोत्र तोषवीं ॥३१॥
निश्चयेशीं आमुचे मनीं । हे हरिमाया विश्वमोहिनी । अन्यथा नाहींच म्हणोनि । विश्वासोनि राहिलों ॥३२॥

वयं धन्यतमा लोके गुरोऽपि क्षत्त्रबंधवः । यत्पिबामो मुहुस्त्वत्तः पुण्यं कृष्नकथाऽमृतम् ॥४३॥

तें सविस्तर तुम्ही स्वमुखें । माझे श्रवणीं घाला निकें । येणें आमुचेनि भाग्यें तुके । ऐसें न देखें त्रिलोकीं ॥३३॥
तूं उपदेष्टा गुरुस्वामी । तेणें सर्व लोकीं धन्य आम्ही । जरी झालों राजन्यधर्मीं । तरी उत्तमोत्तमीं श्लाघ्यता ॥३४॥
एथ इतुकेंचि कारण । कृष्णकथामृताचें पान । पुण्यरूप तुजपासून । करूं प्राशन पुनः पुनः ॥४३५॥
कृष्णस्मरणमात्र वाचें । करितां पर्वत पातकाचे । भस्म होऊनि सुकृताचे । होती साचे शतश्रृंगी ॥३६॥
अनेक यज्ञें शक्रपदा । पावोनि चुकती पुन्हा आपदा । जे झळके त्या पुण्यपदा । होईल कदा त्या मोक्ष ॥३७॥
आब्रह्मभुवनाल्लोकां । पुनरावृत्ति न चुके देखा । आचरतां सुकृता अनेका । यज्ञप्रमुखा आदिकरूनि ॥३८॥
तैसें नोहे कृष्णस्मरण । स्मरणें जन्ममरणासी ये मरण । पावती अक्षय्य सायुज्यसदन । पुनरावर्तनवर्जित ॥३९॥
वाल्मीकीचें अपार पाप । स्मरणें झालें भस्मरूप । अद्यापि त्याचा रहस्यजप । जपे गरप गौरीशीं ॥४४०॥
गणिकां गजेंद्र गौतमसती । व्यास वाल्मीक बल्लवयुवती । अजामिळादि सांगों किती । भगवत्स्मृती उद्धरले ॥४१॥
परी तूं त्यांसी पुनरावृत्ति । कोठें नाहीं ऐकिली पुढती । ऐशी अगाध कृष्णकीर्ति । श्रवणीं रति बहुभाग्यें ॥४२॥
तरी तें सांगा स्वामी आम्हां । म्हणोनि मौळें पादपद्मा । स्पर्शोनि पाहे मुखचंद्रमा । नेत्रचकोरें करूनियां ॥४३॥

सूत उवाच :- इत्थं स्म पृष्टः स तु बादरायणिस्तत्स्मारितानंतहृताखिलेंद्रियः ।
कृच्छ्रात्पुनर्लब्धबहिर्दृशिः शनैः प्रत्याहतं भागवतोत्तमोत्तम ॥४४॥

सूत म्हणे गा शौनकाचार्या । भागवतोत्तमामाजीं धर्मा । ऐसा प्रश्न ऐकोनियां । योगिवर्या सुख झालें ॥४४॥
प्रश्नचंद्रें शुकसमुद्र । झाला आनंदें निर्भर । इंद्रियग्रामींचे व्यापार । तेणें सत्पर बुजाले ॥४४५॥
कीं प्रश्नभास्कराच्या किरणीं । लोपतां इंद्रियतारांगणीं । संपली दृश्यावबोधरजनीं । विपरीत स्वप्नीं उपरमतां ॥४६॥
मुख्य बिंबाच्या अवलोकनें । आनंदबाष्पें ढळती नयनें । हृत्पद्माचें प्रफुल्ल होणें । पुलक तेणें टवटविले ॥४७॥
आनंद समुद्रींचा लोट । तेणें बुजोनि गेला कंठ । चंद्रसूर्य एकवट । तेणें लोटती पाट श्वेदाचे ॥४८॥
विश्रांतिजीवनें अंतर बिंबें । तेणें रोमांच राहिले उभे । सद्गदप्रेमाचेनि वालभें । ज्ञप्ति नुलभे स्फुंदनें ॥४९॥
ऐसें सुखसमुद्राचें भरतें । स्वमानें स्थिरावोनि मागुतें । साठवितां जेथिंच्या तेथें । पडिलें रितें स्मृतितट ॥४५०॥
विश्रांतीपासूनि ओहटणें । बाह्यप्रपंचा भेटणें । यास्तव कृच्छ्रात् ऐसें पठण । घडलें वदनें सूतातें ॥५१॥
श्वास घालूनि उघडी दृष्टि । लब्ध अवस्था जिरवूनि पोटीं । नेत्र पुसूनि अंगयष्टि । सकंप नेटीं स्थिरावी ॥५२॥
ऐसा बादरायणि प्रश्नोत्साहीं । अनंत स्मरविला जो हृदयगेहीं । तेणें इंद्रियवृत्ति सर्वही । अति लवलाहीं विरतिल्या ॥५३॥
तें इंद्रियां नेणतां चिन्मात्रसुख । अनुभवूनि सत्त्वात्मक । पुन्हां परिमार्जूनी नेत्रोदक । कृच्छ्रें श्रीशुक स्मृतिलब्ध ॥५४॥
मग बाहेर पाहें उघडूनि दृष्टि । उत्तमोत्तम प्रश्नपरिपाठी । जाणोनि परीक्षितीप्रति गोष्टि । बोले ओष्ठीं हळूहळू ॥४५५॥
प्रमेय पुसिलें उत्तमोत्तम । तें सांगावया शुकासि प्रेम । ऐसें एथिचें जाणोनि वर्म । श्रवणकामसभाग्या ॥५६॥
सूत म्हणे शौनकाप्रति । हे कथा श्रीमद्भागवतीं । महापुराण संहिता म्हणती । परमहंसी इयेतें ॥५७॥
अठरासहस्र संख्या विशद । त्यामाजी हा दशम स्कंध । शुकपरीक्षित्संवाद । अध्याय प्रसिद्ध द्वादश ॥५८॥
श्रीएकनाथवंशमाळे - । माजि गोविंदसद्गुरूचीं श्रीपादकमळें । प्रक्षाळणाच्या पावनजळें । प्रेमें उचंबळे दयार्णव ॥५९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणें अष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां अघवधो नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
श्लोक ॥४४॥ टीकाओंव्या ॥४५९॥ एवं संख्या ॥५०३॥ ( बारावा अध्याय मिळून ओवीसंख्या ६८०९ )

बारावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP