अध्याय १२ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीमद्गोविंदात्मने नमः ।
गुरुगौरवा गणना करूं । न शकती ब्रह्मादि ईश्वरु । म्हणतां एवधा जगदाकारु । तुजवीण अपरू असेना ॥१॥
जो जगाचा होणाजाणा । अचळ साद्यंतदेखणा । त्या गुरूची गौरवगणना । करवे कोणा कोठूनी ॥२॥
ईश्वरादिदृश्यवरी । ज्याची नेणिवाभा उभारी । त्या विपरीतबोधें गौरवथोरी । केंवी निर्धारीं अवगमे ॥३॥
माजीं ब्रह्मादि सज्ञान । सिद्ध सुरवर मुनींचे गण । त्यांचें तुजहूनि आरौतें ज्ञान । नेणती म्हणोन तव गरिमा ॥४॥
तें तूं स्वभासें भासविसी । सत्यसंकल्पें चेष्टविसी । स्वबोधें स्वरूपीं लीन करिसी । स्वयमेव क्रीडसी स्वच्छंदें ॥५॥
यालागीं सकळा साकल्यरहिता । विश्वातीता विश्वसहिता । अगुणा सगुणा उभयातीता । नमो अनंता गोपती ॥६॥
गोप्ता गोपन गोपनीय । एवमादि अभेदत्रय । एकानेक अद्वितीय । श्रीगुरुराय स्वतःसिद्ध ॥७॥
हृदयीं त्वत्पदप्रेमादर । प्रकटी तावक अभयकर । वरदकृपेचा भास्कर । अज्ञानतिमिर विध्वंसी ॥८॥
तवानुग्रहगजानन । शारदा तावकी कृपापूर्ण । तव श्रोते प्रेमळ सुज्ञ । अभेदनमन अवघेंची ॥९॥
एवं अवघियांमाजीं अवघेपणें । नमन माझें पृथक् नुरणें । वेगळा नसतां समरस । म्हणणें । हें बोलणें सवडीचें ॥१०॥
शुद्ध सन्मात्र सदोदित । गोविंद सद्गुरु स्वानंदभरित । तो दयार्णव अभीष्टार्थ । विनवी अंकित अनन्य ॥११॥
दशमामाजीं दशमावधि । गोकुळकथा कथिली आधीं । वृंदावनप्रवेशविधि । एकादशीं निरूपिली ॥१२॥
एवं एकादशिनी पहिली । आज्ञावरें वाखाणिली । ब्रह्मयासि जेथ भुली । ते ठाकली यापुढें ॥१३॥
वयस्येंशीं गिळितां कृष्ण । केलें अघाचें मोक्षण । पुढें परीक्षितीचा पावन प्रश्न । इतुकें व्याख्यान द्वादशीं ॥१४॥
करितां पुलिनीं वनभोजन । वत्सें वत्सप हरितां कृष्ण । करी विधीचें स्मयभंजन । इतुकें व्याख्यान त्रयोदशीं ॥१५॥
चतुर्दशीं ब्रह्मस्तुति । अगाध जेथींची व्युत्पत्ति । जेणें तोषोनि श्रीपति । विरंचीप्रति वर ओपी ॥१६॥
धेनुअवनें धेनुकार्दन । धेनु प्राशितां सगरवन । कालियकलुषें पावल्या मरण । जीववी कृष्ण पंचदशीं ॥१७॥
कालियासीं कृतनिग्रह । तत्पत्न्यांचा स्तवनोत्साह । पावोनि केला अनुग्रह । शुद्ध प्रवाह षोडशीं ॥१८॥
नागालया कालियगमन । दर्शनें तोषवूनि स्वजन । रात्रीं दावाग्निप्राशन । करी श्रीकृष्ण सप्तदशीं ॥१९॥
वसंतग्रीष्मगुणांचें कथन । प्रलंबदैत्य कपटेंकरून । गोपरूपें संकर्षण । नेतां मरण अष्टादशीं ॥२०॥
मुंजारण्यीं गोपाळ । भस्म करितां दावानळ । डोळें झांकवूनि गोपाळ । गिळी अनळ एकोणिसावीं ॥२१॥
विसावा वर्षाशरत्काल । उपमा त्यागा त्यागशीळ । देऊनि प्रबोध रसाल । रामगोपाळ वर्णिती ॥२२॥
शरत्काळीं वृंदावनीं । वेणू वहातां चक्रपाणि । गोपी वेधल्या ऐकोनि श्रवणीं । गाती वदनीं एकविसीं ॥२३॥
गोपिकांचीं हरूनि वसनें । वरदें तोषविल्या कृपाघनें । यज्ञपत्न्यांचीं याचिलीं अन्नें । हें निरूपण बाविसामाजीं ॥२४॥
इत्यादि अध्यायव्याख्यानीं । प्राप्त द्वितीय एकादशिनी । एथ धिवसा नुपजे मनीं । ते श्रीचरणीं विज्ञप्ति ॥२५॥
ब्रह्मस्तुतीचा अवघड घाट । पुढें व्याख्यान न चाले वाट । प्रज्ञा शंकोनि नुमली ओष्ठ । कथनीं संकट वैखरिये ॥२६॥
ब्रह्मादिकांची प्रज्ञा वेडी । कथनीं सरस्वती बोबडी । व्यासें गुरुवराचे प्रौढी । केली परवडी ग्रंथाची ॥२७॥
जेथ चांचरे चंडकिरण । तेथ खद्योता पुसे कोण । तेंवि मानव मतिहीन । केंवि व्याख्यान करूं शके ॥२८॥
हें ऐकोनि हास्यवदनें । सद्गुरु म्हणे हें बोलणें । तुवांचि बोलावें बाळपणें । येर शहाणे नादरती ॥२९॥
कांसे लागोनि निस्तरतां । कासया मानावी दुस्तरता । कीं कडिये बैसोनियां जातां । पथदुर्गमता कायशी ॥३०॥
तैसें तुझें अंतःकरण । आम्ही स्वसत्ता अधिष्ठून । जें जें प्रकाशू व्याख्यान । तें तव वदन वदेल ॥३१॥
आतां द्वितीय एकादशिनी । उपाइली ते वाखाणूनि । परमामृताची परगुणी । करी श्रवणीं बैसतया ॥३२॥
ऐशिया वरदआज्ञापूर्णिमा । प्रकटी पूर्णोत्साह पूर्णिमा तेणें दयार्णवींचा प्रेमा । सांडूनि सीमा उचंबळे ॥३३॥
मग सद्गुरूचें सदय ध्यान । हृदंबुजीं प्रतिष्ठून । द्वादशाध्यायाचें व्याख्यान । मागे अवधान परिसावया ॥३४॥
ज्ञानाज्ञान द्विप्रकार । वत्स बक द्विरूपधर । तो मारूनि दंभासुर । स्वभक्तनिकर तोषविला ॥३५॥
आतां महामोह अघासुर । तेणें गिळिले निगमानुचर । हें देखोनि मुरलीधर । करी संहार अघाचा ॥३६॥
महासर्पाचें शरीर । कपटें धरूनि अघासुर । गिळितां कृष्णेंशीं अनुचर । झाला असुर निर्मुक्त ॥३७॥
संवगडियांशीं नंदनंदन । अघापोटीं प्रवेशोन । अघासुराचें केलें हनन । हें व्याख्यान द्वादशीं ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP