अध्याय १२ वा - श्लोक १२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यत्पादपांसुर्बहुजन्मकृच्छ्रतो धृतात्मभिर्योगिभिरप्यगम्यः ।
स एव यादृग्विषयः स्वयं स्थितः किं वर्ण्यते दिष्टमहो व्रजौकसाम् ॥१२॥

ज्याचा पादपांसु पावावया । बहुजन्म करिती तपश्चर्या । सांतपनादि कर्कशक्रिया । करूनि काया शोधिती ॥२१०॥
कृच्छ्रें चांद्रायण पंचाग्नि । तीव्र व्रताची जाचणी । वर्षाहंमेतीं मेघ पाणी । धैर्यें करूनि सोसिती ॥११॥
क्षुधा तृषा वात घर्म । साहती चिंतोनि पुरुषोत्तम । त्यांसी धृतात्में हें नाम । मन निःसीम जे धरिती ॥१२॥
जें चपळांहूनि अत्यंत चपळ । जें बलिष्ठाहूनि महाप्रबळ । खळाहूनि जें अत्यंत खळ । प्रपंचखेळ हा ज्याचा ॥१३॥
ऐशिया मनातें धरूनि मुष्टि । धैर्य मेरू जे साधनसृष्टि । होऊनि लोटिल्या जन्मकोटि । त्यांसीही शेवटीं अगम्य ॥१४॥
आणि योगियांसही अगम्य । श्रीकृष्णाचें सहचर प्रेम । योगाभ्यासें मनोधर्म । जिहीं निःसीम सांडविला ॥२१५॥
मूलबंध उड्याण । जालंधर तिसरा जाण । आधार नाभिकंठस्थान । तनु समान इहिं तिहीं ॥१६॥
बंधत्रये समान तनु । वज्रासनें ऊर्ध्व पवनु । जागवी कुंडलणी क्षोभवून । हें लक्षण हठाचें ॥१७॥
गोरजाग्नि जैसा कठिण । चरणीं लाऊनि हुताशन । मुखें किजे नामस्मरण । मन उद्विग्न न होतां ॥१८॥
त्याहूनि कठिण कोटिगुणें । हठयोगाचें अभ्यासनें । ऐसें दुर्घट मनाचें धरणें । प्राप्तीकारणें पदरज ॥१९॥
सपाद लक्ष्य लयावधानें । कथिलीं गौरीसि ईशानें । मनोनिग्रहाचीं कारणें । तीं सर्व साधनें जिहीं केलीं ॥२२०॥
ऐशिया धृतात्मयाप्रति । ज्याच्या पदरजाची ही प्राप्ति । अगम्य म्हणोनि महामति । नृपातें कथी शुकयोगी ॥२१॥
तो हा स्वयें श्रीभगवान । इंद्रियांचा विषय होऊन । प्रत्यक्ष गोचर क्रीडे जाण । भाग्य कोण गौळियांचें ॥२२॥
मृगजळ पिऊनि अमरत्वप्राप्ति । कीं स्वप्ननिधानें कुबेर होती । नाते त्रिदोष भ्रमभारती । सायुज्य मुक्ति महावाक्य ॥२३॥
वागुल संततीची सेना । कृतांता आणी रणांगणा । सत्यत्व आलें ऐशिया वचना । आश्चर्य मना हें वाटे ॥२४॥
मिथ्याभ्रम हा जगदाकार । विपरीत ज्ञानाचा प्रकार । जागृदवस्था करी गोचर । असाचार दृग्विषयां ॥२२५॥
वाचा परतल्या नेणोनि सोय । मनासि ज्याची प्राप्ति नोहे । तो अत्मा गौळियां गोचर होय । हें आश्चर्य नृपवर्या ॥२६॥
लटिक्यामाजि साचार जोडे । या लागीं भाग्य हें म्हणणें घडे । या कारणास्तव एवढें । नव्हे कीं थोडें आश्चर्य ॥२७॥
तंव कुरुपति म्हणे जी सर्वज्ञा । हें नुमजे माझिया मना । मिथ्या अवघी भवकल्पना । साचपणा केविं पावे ॥२८॥
ऐकोनि हांसिला वय्यासकी । एवढी श्रवणामाजी चुकी । हे गोष्टी पूर्वींच ठाउकी । केली स्वमुखीं तुज आम्हीं ॥२९॥
करूनि मृत्तिकेचीं अन्नें । लटकींच जेविती अज्ञानें । तैशीं गुळाचीं केलिया मिष्टान्नें । कां पां रसने न फावती ॥२३०॥
अयोनिसंभव चैतन्यघन । करावया धर्मसंस्थापन । लीलाविग्रही कळल्या कृष्ण । कां पां प्रश्न स्फुरला हा ॥३१॥
म्हणसी प्राकृत व्रजनिवासी । चैतन्य कैसें गोचर त्यांसी । तरी भक्तियोगाची महिमा ऐशी । जे निर्गुणासी भुलवी ॥३२॥
विषयप्रेमा होऊनि रामा । द्वैत नसतां प्रवर्ते कामा । उमजूं न देतां स्वप्नभ्रमा । माजि आत्मा द्विधा करी ॥३३॥
प्रेमोत्कर्षें वीर्य क्षरे । मैथुनानंद ही अवतरे । आपुल्या सत्यत्वें अनुभव उरे । परी तीसि लेंकुरें न होती ॥३४॥
विषयप्रेमामाजी हे शक्ति । मोहे तो केवळनिजात्मरति । चैतन्य आणूनि अव्यक्त व्यक्तीं । निजविश्रांति अवतरे ॥२३५॥
जे शुद्धसत्त्वाची माया । जींमाजि भेदा नाहीं ठाय । स्वगत ऐसें नाम लाहे । परी जें अद्वय चित्सुख ॥३६॥
तिच्या अवलंबें ये व्यक्ति । स्वभक्तप्रेमाची लेऊनि बुंथी । अभेदभेदें क्रीडा करिती । ते व्युत्पत्ति हे केली ॥३७॥
प्रेमोत्कर्षाचेनि क्षोभें । वालभ नटोनि राहिलें उभें । देवभक्त ऐसिये शोभे । ज्या चित्प्रभे पात्रत्व ॥३८॥
जेंवि रविभा नभाक्षिती - । माजि असतां नलगे हातीं । तेचि सांपडे सूर्यकांतीं । तदनुयुक्ति ग्राहका ॥३९॥
तो तो मग पावे शुष्केंधना । प्रकटी प्रकाशा दीपनपचना । नफवे आर्द्रा मृत्पाषाणा । तेंवीं दुर्जना जगदात्मा ॥२४०॥
गौळी म्हणसी सामान्य जन । तरी यांचें ब्रह्मादिकां न गणे पुण्य । अनंत जन्मांचें सेवाऋण । एथ उत्तीर्ण हरि होय ॥४१॥
ते पुण्यपुंज हे संवगडे । निःशंक क्रीडती न धरूनि भिडे । ब्रह्मादि देव जेथें वेडे । तेही पुढें ऐकसी ॥४२॥
हें ऐकोनि कुरुश्रेष्ठ । म्हणे यावरी कथा स्पष्ट । कथावी हा परमोत्कृष्ट । हेतु वरिष्ठ मम मनीं ॥४३॥
आणिक एक आशंका । चिदात्मया सर्वात्मका । शत्रुमित्र कां भासे लोकां । हा विचार ठाउका मज करा ॥४४॥
हें ऐकोनि बादरायणि । कृतप्रश्नाचे निरूपणीं । प्रवर्तला चरित्रकथनीं । सावध श्रवणीं म्हणोनियां ॥२४५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP