अध्याय १२ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रतिस्पर्धेते सृक्किभ्यां सव्यासव्ये नगोदरे । तुंगशृंगालयोप्येतास्तद्दंष्ट्राबिश्च पश्यत ॥२१॥
पहा रे या नगोदरीं । सृक्किणी सारिख्या उभय दरीं - । माजि दंष्ट्राचिये परी । उभय हारी श्रृंगाच्या ॥६॥
आस्तृतायाममार्गोऽयं रसनां प्रति गर्जति । एषामंतर्गतं ध्वांतमेतदप्यंतराननम् ॥२२॥
विस्तीर्ण मार्गाचा तळवट । सोज्वळ चोपडा निघोंट । रसनेसारिखा सरळ नीट । आणी वीट रसनेतें ॥७॥
पर्वतगुहागर्भींचें ध्वांत मुखावकाशा लाजवीत । वणव्याचा उष्णवात । अहिनिश्वसित हें जैसें ॥८॥
दावोष्णखरवतोऽयं श्वासवद्भाति पश्यत । तद्दग्धसत्वदुर्गंधोऽप्यंतरामिषगंधवत् ॥२३॥
खरपुस झुळका वणव्यावरूनि । येतां होतसे आहळणीं । तेथ जळाल्या जीवश्रेणि । त्याची घाणी हे पहा रे ॥९॥
जैसा अजगरें घेतला आहार । तदुदरींचा आमिषोद्गार । तैसा दुर्गंध दावी समीर । भासे अपर की नारे ॥३१०॥
ऐशी विपरीत कल्पना । पर्वत मानूनि सर्पानना । उपमा सादृश्यें वल्गना । करूनि वदना प्रवेशती ॥११॥
अस्मान्किमत्र ग्रसिता निविष्टानयं तथा चेद्बकवद्विनंक्ष्यति ।
क्षणादनेनेति बकार्युशन्मुखं वीक्ष्योद्धसंतः करताडनैर्ययुः ॥२४॥
जैसें सर्पाचें जाभाडें । तैसें गव्हर दिसतें पुढें । आम्हा ग्रासावयाच्या चाडें । पहा रे केवढें पसरलें ॥१२॥
जरी साचची सर्पपणें । मुखीं प्रवेशतां गिळिलें येणें । तरी बकाचे ऐसा जाईल मरणें । निर्भयमन हांसती ॥१३॥
बका माझारी एकला । कृष्ण निःशंक प्रवेशला । तैसेचि आम्ही ही जाऊं चला । पैल पातला श्रीकृष्ण ॥१४॥
हा जरी भरील आमुचा घोंट । तरी कृष्ण याचा फोडील कंठ । बका सारिखी मृत्युवाट । यासि प्रकट दावील ॥३१५॥
श्रीकृष्णाच्या हस्तें करून । याचें होईल निर्दळण । बकारीचें सुंदर वदन । पहाती फिरोन वत्सप ॥१६॥
आमुचा पाठिराखा हरि । पूर्ण विश्वास हा अंतरीं । करताडणें परस्परीं । हास्य गजरीं प्रवेशती ॥१७॥
श्रीशुक उवाच - इत्थं मिथोऽतथ्यमतज्ज्ञमाषितं श्रुत्वा विचिंत्येत्यमृषा मृषायते ।
रक्षो विदित्वाऽखिलभूतहृत्स्थितः स्वानां निरोद्धुं भगवान्मनो दधे ॥२५॥
शुक म्हणे गा पार्थिवाग्रणी । ऐकोनि वत्सपांची अतज्ज्ञवाणी । काय विचारी चक्रपाणि । तें तूं श्रवणीं परियेसीं ॥१८॥
परस्परें ऐसें वत्सप । यथार्थ असतां अयथार्थ सर्प । भाविती करूनि पर्वतारोप । सर्परूप गिरि म्हणती ॥१९॥
सत्य मानूनि असत्य । असत्यासी म्हणती सत्य । विपरीत ज्ञानाचा संकेत । मृत्यु अमृत भाविती ॥३२०॥
दृश्य मानूनि साचार । आत्मा मानूनि स्वशरीर । ब्रह्मसुखेंशीं संसार । अतज्ञ चतुर उपमिती ॥२१॥
जगही अवघें ब्रह्म आहे । वृथा साधनीं करणें काय । ऐसें भाविते महामोहें । गिळिले पाहें बालिश ॥२२॥
ब्रह्म बाईल ब्रह्म लेक । ब्रह्म लेकी सुना देख । शत्रु मित्र राग द्वेष । भेद विवेक ब्रह्म हें ॥२३॥
ब्रह्म रडतें ब्रह्म हांसतें । ब्रह्म मरतें आणि मारितें । ऐसें विपरीत बोधें ज्ञाते । मृत्यु सेवते झाले ॥२४॥
सर्वांतरीं ज्याचा वास । तो हा श्रीकृष्ण आदिपुरुष । तेणें जाणोनि भवराक्षस । आणि मानस गडियांचें ॥३२५॥
पर्व मानूनि अघावदनीं । स्वकीय प्रवेशती नेणोनि । त्यांसी वर्जावयालागूनि । चक्रपाणि प्रवर्ते ॥२६॥
अमृत मानूनि मृत्युमुखीं । स्वजन भरतां विषयसुखीं । ते निषेधार्थ आत्मविवेकी । जगद्व्यापकी कळवळला ॥२७॥
ऐसा कळवळूनि श्रीहरि । वत्सप निषेधावे हें मनीं धरी । तंव ते प्रवेशले सत्वरीं । मुखाभीतरीं अघाच्या ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP