अध्याय ११ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
क्कचिद्वादयतो वेणुं क्षेपणैः क्षिपतः क्कचित् । क्कचित्पादैः किंकिणीभिः क्कचित्कृत्रिमगोवृषैः ॥३६॥
वृषायमाणौ नर्दंतौ युयुधाते परस्परम् । अनुकृत्य रुतैर्जंतूंश्चेरतुः प्राकृतौ यथा ॥३७॥
कोठें पाहूनि रम्य स्थळ । रामकृष्णादि गोपाळ । तन्मय करिती प्राणी सकळ । वेणू रसाळ वाजवूनि ॥१७॥
कोठें धात्र्यादि नाना फळें । चपळ झेलिती करतळें । मिथ्या दावूनि बाललीले । लक्षूनि स्थळें क्षेपिती ॥१८॥
कोठें हावभाव विक्षेपगति । पदविन्यासें नृत्य करिती । किंकिणीनादें अभिरंजिती । विराजती नटनाट्यें ॥१९॥
वांकी नूपुरें क्षुद्रघंटा । वेणू लावूनि ओष्ठपुटा । नृत्यगीतवाद्यचेष्टा । करिती मोठा उत्साह ॥२२०॥
दोनी दोनी एकत्र गडी । पांघरोनि एकेक घोंगडी । पुच्छें मुखें श्रृंगें जोडी । नटती आवडी गोरूपें ॥२१॥
त्यामाजीं रामकृष्ण हे गोर्हे । गर्जती अपेट वृषभाकारें । काममोहित परस्परें । त्या अनुकारें झुंजती ॥२२॥
पारावता ऐसे घुमती । कोकिळेहूनि मंजुळ गाती । भृंगा ऐसे रुंजी करिती । मयूराकृति प्लुतशब्द ॥२३॥
करी केसरी धेनु व्याघ्र । कपि जंबुक मृग सूकर । सर्व जंतूंचे अनुकार । क्रीडा विचित्र दाविती ॥२४॥
जैसे प्राकृत अज्ञान । बाळ । क्रीडती देखिला तैसा खेळ । तैसे सर्वज्ञ रामगोपाळ । क्रीडारोळे अनुकरती ॥२२५॥
तेचि सर्वज्ञतेची थोरी । शुक रायातें कथन करी । माया केली जे आसुरी । ते अंतरीं ज्या कळली ॥२६॥
कदाचिद्यमुनातीरे वत्सांश्चारयतोः स्वकैः । वयस्यैः कृष्णबलयोर्जिघांसुर्दैत्य आगमत् ॥३८॥
कोणे एके समयांतरीं । आपुलाले वत्सभारीं । गोपाळेंशीं राम मुरारि । यमुनातीरीं पातले ॥२७॥
चारीत होत्साते वत्सथाटी । पातले यमुनेचिये कांठीं । मृदुपुलिनें देखोनि दृष्टीं । सुखसंतुष्टीं क्रीडती ॥२८॥
तंव गोपाळेंशीं रामकृष्ण । मारावयाची धरूनि तृष्णा । दैत्य पातला यमुनापुलिना । मायानटना नटोनी ॥२९॥
तं वत्सरूपिणं वीक्ष्य वत्सयूथगतं हरिः । दर्शयन्बलदेवाय शनैर्मुग्ध इवाऽऽसदत् ॥३९॥
वत्सरूप दैत्य नटला । वत्सयूथीं मिळोनि गेला । कृष्णें दावूनि अग्रजाला । समीप गेला नेणवत ॥२३०॥
गृहीत्वाऽपरपादाभ्यां सह लांगूलमच्युतः । भ्रामयित्वा कपित्थाग्रे प्राहिणोद्गतजीवितम् ॥ सकपित्थैर्महाकायः पात्यमानैः पपात ह ॥४०॥
ज्याचें ऐश्वर्य अच्युत । तो हा श्रीकृष्ण भगवंत । जाऊनि हळूहळू न कळत । पायीं धरीत दैत्यातें ॥३१॥
पुच्छासहित मागल्या पायीं । धरूनि उचलिला दोहीं बाहीं । गरगरां भवंडोनि लवलाहीं । कपित्थाग्रीं झुगारिला ॥३२॥
भवंडीसरिसे गेले प्राण । कपट गेलें हारपोन । राक्षसदेह विशाळ गहन । पावला पतन कविठेंशीं ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP