अध्याय ११ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मुक्तः कथंचिद्राक्षस्या बालघ्न्या बालको ह्यसौ । हरेरनुग्रहान्नूनमनश्चोपरि नापतत् ॥२१॥

जे बाळांचें करी हनन । ऐशी राक्षसी दारुण । दैवें सुटला तिजपासून । बाळकृष्ण हरिवरें ॥५२॥
श्रीहरीचे कृपेस्तव । गाड्या तळवटीं केशव । वरी न पडोनि वांचला सजीव । हे अपूर्व हरिकृपा ॥५३॥
शकट भंगोनि शकलें झालीं । बाळक निर्भय वांचलें तळीं । हें देखिलें तुम्हीं सकळीं । दैव बळी म्हणोनी ॥५४॥

चक्रवातेन नीतो‍ऽयं दैत्येन विपदं वियत् । शिलायां पतितस्तत्र परित्रातः सुरेश्वरैः ॥२२॥

चक्रवातें नेला गगनीं । पक्षियांचे विहारस्थानीं । शिलापृष्टीं पडिला तेथुनी । तेथ सुरगणीं रक्षिला हा ॥१५५॥

यन्न म्रियेत द्रुमयोरंतरं प्राप्य बालकः । असावन्यतमो वाऽपि तदप्यच्युतरक्षणम् ॥२३॥

द्रुमांमधूनि रिंगमाण । ते उन्मळले यमलार्जुन । तळीं कृष्णादि बालकगण । वांचला मरण न पावतां ॥५६॥
ज्या कारणास्तव जाण । वृक्षांतरां प्रवेशोन । बाळकगण आणि कृष्ण । कोणी न मरोन वांचला ॥५७॥
तरी तो अच्युत रक्षणास्तव । तेथही वांचला शिशुसमुदाव । झाला विघ्नपराभव । केवढें अभिनव वर्तलें ॥५८॥

यावदौत्पातिकोऽरिष्टो व्रजं नाभिभवेदितः । तावद्बालानुपादाय यास्यामोऽन्यत्र सानुगाः ॥२४॥

महोत्पाताचें अरिष्ट । जंव व्रजातें नेदी कष्ट । तंव एथूनि कुटुंबेंसकट । स्थान चोखट पावा हो ॥५९॥
एथूनि बाळकें घेऊनि आम्ही । जे व्रजाचे कल्याणकामी । जाऊं चला अन्यत्र धामीं । जरी हृत्पद्मीं मानेल ॥१६०॥

वनं वृंदावनं नाम पशव्यं नवकाननम् । गोपगोपीगवां सेव्यं पुण्याद्रितृणवीरुधम् ॥२५॥

कोठें जावें म्हणाल जरी । तरी वृंदावनाख्य कांतारीं । गुल्मलतातृणांकुरीं । जें सुखकारी पशूंतें ॥६१॥
कर्मसंस्कार जीर्णतृणें । जळोनि वैराग्यहुताशनें । वर्षतां भगवत्प्रेमजीवनें । नवविध वनें टवटविती ॥६२॥
गुल्मलता सकोमळ । नवीन काननें निर्मळ । ज्यामाजीं तृणें रसाळ बहळ । सुखसुकाळ सर्वार्थीं ॥६३॥
गोपी गोपाळ गोधनगण । सर्वां सुसेव्य वृंदावन । जेंवि मुनीचें विशुद्ध मन । मधुसूदनप्रियकारी ॥६४॥
व्याघ्रसर्पादि क्रूरजाति । विशेष वृंदावनीं नसती । भूत प्रेत पिशाचपंक्ति । रोगोपहति ज्या वासें ॥१६५॥
जेथ पुण्यादि गोवर्धन । सुसेव्य अमृतोपम जीवन । एवमादि गुणसंपन्न । वृंदावन सौकर्यें ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP