मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| आरंभ अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविंदसद्गुरुमूर्तये नमः । सदयहृदया श्रीगोविंदा । आत्मनिरता पूर्णवरदा । अभेदबोधें नमितां पहा सच्चिदानंदा उपलब्धि ॥१॥स्वात्मगतावलंबमात्र । विशुद्धसत्त्व जो स्वतंत्र । सर्वनियंता मायासूत्र - । चालक ईश्वर सर्वज्ञ ॥२॥वामांगविलासवालभें । स्वाविष्कारें त्रिगुणक्षोभें । पांचभौतिक केलें उभें । आत्मप्रभे माजिवडें ॥३॥आपुलें आपणामाजीं स्वप्न । स्फुरोनि उपजलें भेदभान । तेणें गुंतोनि जीवचैतन्य । करी भ्रमण भवनाशें ॥४॥जन्ममरणाची घडामोडी । त्रिविध कर्माची परवडी । योनीमाजीं कोडीकोडी । न चुके भंवडी जीवाची ॥५॥अविद्याशक्तिअंधकारें । स्वविस्मृतिनिद्राभरें । भ्रमे ब्रह्मचि विश्वाकारें । स्वप्नीं झांसुरे सुखदुःखें ॥६॥त्या दुःखाचें निवारण । करावयासि करुणापूर्ण । विद्याशक्ति अवलंबून । स्वांगीं दक्षिणप्रदेशीं ॥७॥जैसा चिंतूनि काशीक्षेत्रा । तदुपयोगी घेऊनि मात्रा । पदोपदीं क्रमितां गोत्रा । अवघी यात्रा रूपा ये ॥८॥शुभसंकल्पें शुभाभिव्यक्त । अशुभें अशुभा व्यक्ति होत । इक्षु माधुर्यें वर्धत । कीं घेऊनि तैक्तगवाक्षा ॥९॥जेणेंशीं जें होय वाढे । तें त्यासह म्हणणें घडे । सरस जळाचें नाम पडे । सताप उघडें अग्नीचें ॥१०॥तेंवि भवीं बुडतयाचिये । जाकळोनि पूर्ण दये । तुझें रूपा येणें होये । म्हणोनि सदय अभिधान ॥११॥शोध करितां जलगारेचा । रस आठोळी मज्जा त्वचा । जळा वांचोनि भेद याचा । न वदे वाचा कोणाची ॥१२॥म्हणोनि दयेचीच तूं व्यक्ति । सर्वांवयवीं सदय मूर्ति । सदयहृदय ये व्युत्पत्ति । अभेदस्थिति स्फुट तुझी ॥१३॥शापानुग्रहसमर्थ म्हणणें । किमर्थ तोषरोषाविणें । ऐसें म्हणाल तरी ये खुणे । अंतःकरणें विवरावें ॥१४॥दुग्धप्राशन करी बाळ । तै मा धर्षण करी प्रबळ । बाऊ दावी त्या विकराल । परी नव्हे केवळ निर्दय ते ॥१५॥तैसें प्राणी नेणती स्वहित । विषयासक्त आज्ञेरहित । क्षोभे त्यांच्या अनुग्रहार्थ । सदय समर्थ सद्गुरु तो ॥१६॥लोभें क्षोभे हिताकारणें । परी ते निवृत्तीचें रूप नेणे । भवीं बुडवी सदयपणें । इतुकें उणें मातृत्वीं ॥१७॥स्वसामर्थ्यें विवर्तगोडी । साधनक्रमें जो न सोडी । शापशस्त्रें त्यासी झोडी । मोडी खोडी नाथिल्या ॥१८॥किंवा वर्णाश्रमाचारनिरत । सविश्वास ईश्वरभक्त । तत्प्रसादें जो विरक्त । इहामुत्रार्थफळभोगा ॥१९॥नित्यानित्यविचारणा । करूनि अनित्यीं रमेना । नित्य स्वयुक्ति आकळेना । म्हणोनि साधना प्रवर्ते ॥२०॥बाह्यइंद्रियप्रवृत्ति । विषयोन्मुख क्षोभे वृत्ति । तयेची करावया निवृत्ति । जोडी संपत्ति शमषट्क ॥२१॥ऐसा मुमुक्षु शरणागत । त्यासि अवगमावया वास्तव नित्य । कृपेनें बोधूनियां वाक्यार्थ । निजपरमार्थ उपदेशी ॥२२॥रोषें शापूनि अनधिकारी । दुर्गुण झाडूनि कृपेनें तारी । अनुग्रहचि दोही परी । रोषें तोषें सदयत्वें ॥२३॥सदयहृदयतेची शोभा । रूपा आणी विश्ववालभा । आत्मप्रत्यय कैवल्यगाभा । ते चित्प्रभा श्री तुझी ॥२४॥शर्करेचा केला द्रुम । फळें मूळें शाखा नाम । त्वचा कंटक भेद विषम । गोडी समसाम्यें अभेदें ॥२५॥तेंवि दयाचि हृदयाकारें । होऊनि पसरे इंद्रियद्वारें । भूतहितार्थ व्यवहारे । भ्रमापहारें गोव्यक्ति ॥२६॥भ्रमरहरणार्थ करणाकार । करूनि वृत्तीचा प्रकाश । सर्वज्ञ जाणता सर्वांतर । तूं सुखकर गोविंद ॥२७॥तुज भजती जे सकाम । पुरविता तें तूं कल्पद्रुम । स्वगतमात्र भेदभ्रम । निष्काम प्रेम नेणती ॥२८॥विमुख नेणतीच तुज कारणें । कां कीं दैवचि त्यांचें उणें । असो जे भजती आत्मैक्यखुणें । तूं पूर्णपणें त्यां वरद ॥२९॥तुजहूनि ब्रह्मप्राप्ति येर । हाचि भजनाचा व्यभिचार । जें कां साराचें निज सार । ते साचार निजमूर्ति ॥३०॥ब्रह्म सद्गुरु विश्व आपण । ऐसें चतुर्विध भेदभान । निरएस तैं तें अभेदभजन । त्रिपुटीविहीन आत्मैक्यें ॥३१॥भजता आणि उपदेशिता । भजनोपचार जे सांगतां । भजा सहित एकात्मता । अभेद भक्तां गुरुवरें ॥३२॥अहंक्रतुइत्यादि वचनीं । भगवद्गीतें चक्रपाणि । नवमाध्यायीं हे कहाणी । अर्जुनालागीं उपदेशी ॥३३॥ऐसा अभेद अवगमून । गुरुमर्यादा नुलंघून । सप्रेमभावें सद्गुरुभजन । सच्चित्सुखघन प्रकाशे ॥३४॥असद्विवर्ताध्यासलोप । अजड चिन्मात्र प्रकाशदीप । निर्विषयानंदस्वरूप । आपेंआप निवडे तै ॥३५॥ऐशिया अभेद सप्रेम भजनें । श्रीचरणाचय अभिवंदनें । तोषोनि आज्ञापिलें वचनें । करुणापूर्णें गुरुवर्यें ॥३६॥दशमाध्यायीं निरूपण । यमलार्जुनांचें उन्मूलन । धनदात्मजांचें उद्धरण । गुह्यकाख्यान संपलें ॥३७॥पुढें एकादशाध्यायीं । काय करी शेषशायी । काय वर्तलें नंदालयीं । ते नवाई निरूपीं ॥३८॥ऐशिये आज्ञेची दयांबुवृष्टि । तेणें दयाप्रचुर झाली सृष्टि । विश्वदयेची वाहवटी । झाली पैठी दयार्णवीं ॥३९॥तेचि सर्वत्र दयेचें भरतें । भरूनि केलें पात्रां पुरतें । पूर्णानंदें हेलावतें । गुरुचरणांतें क्षालूनी ॥४०॥आतां आज्ञापिलें जें काज । त्याची स्वामीस अवधी लाज । सालंकृत सलज्ज भाज । ते ऐश्वर्यवोज कांताची ॥४१॥आपण पढवूनि पांखरूं । पढे तैं ऐकोनि हर्ष थोरु । तोचि एथींचा प्रकारु । कीर्ती विस्तारूं मम मुखें ॥४२॥संत सज्जन श्रोतेजन । सद्गुरु जगदात्मा अभिन्न । शिकविलें तें करितां कथन । कीजे श्रवण संतोषें ॥४३॥एकादशाध्यायीं कथा । गोकुळीं देखोनि महोत्पाता । मंत्र उपनंदें सांगतां । तो समस्तां मानला ॥४४॥मग वसविलें वृंदावना । तेथें वत्सें चारितां कृष्णा । वधूं आले कंसआज्ञा । ते पावले मरणा वत्सबक ॥४५॥इतुकी कथा अध्यायांत । रायासि सांगे व्याससुत । श्रोतीं होऊनि दत्तचित्त । परमामृत सेवावें ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP