अध्याय ११ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


उलूखलं विकर्षंतं दाम्ना बद्धं स्वमात्मजम् । विलोक्य नंदः प्रहसद्वदनो विमुमोच ह ॥६॥

भगवन्मायेचा नवलावो । तेणें नंदासि उपजला मोहो । कृष्णप्रेमें वाढला स्नेहो । करी लवलाहो मोक्षणीं ॥६५॥
दांवें न बांधिलें माजाडी । इतस्ततः तें उखळ ओढी । ऐसें देखोनि अति तांतडीं । नंद सोडी कुमारातें ॥६६॥
हास्य करूनियां नंद । दांवें सोडूनियां गोविंद । हृदयीं कवळी परमानंद । आनंदकंद जगदात्मा ॥६७॥
तंव तो वितर्क करी हरि । झणें नंदाचिये अंतरीं । कळल्या गोष्टी नव्हे बरी । मग बाळका परी नट दावी ॥६८॥
सजल करूनि नेत्रवाट । धांपा दाटलेंसें पोट । सद्गदित झाला कंठ । काढी ओष्ठ रुदनार्थ ॥६९॥
कांपे दचकोनि थरथरां । झणें बैसेल भेदरा । म्हणोनि गोपिका सुंदरा । दामोदरा बुझाविती ॥७०॥

गोपीभिः स्तोभितोऽनृत्यद्भगवान्बालवत्क्कचित् । उद्गायति क्कचिन्मुग्धस्तद्वशो दारुयंत्रवत् ॥७॥

कळवळूनि गोपी सकळी । तिहीं घेऊनि वनमाळी । हस्तीं वाहविती टाळी गल्लयुगळीं स्पर्शती ॥७१॥
हनुवटी धरूनि हालविती । बोबड्या शब्दें आळविती । कृष्ण म्हणवोनि खेळविती । संतोषविती उत्साहें ॥७२॥
दोहीं स्वहस्तीं दोहीं करां । करूनि बल्लवी सुंदरा । नाचविती कमलावरा । नाचे श्रीधर तदाज्ञा ॥७३॥
ज्याच्या यशाची धवलिमा । ब्रह्मांडगर्भित व्योमा । जो परणूनि पादपद्मा । स्थापी पद्मा सेवावया ॥७४॥
जाणोनि सर्वांचें जीवन । अभीष्ट ओपी वैभवदान । विश्वश्रियेसी उदासीन । विरक्त पूर्ण विवर्तीं ॥७५॥
सर्वनियंता सर्वात्मक । मायाचक्राचा चाळक । स्वयें होऊनि तो बाळक । करी कौतुक गोपाज्ञा ॥७६॥
ऐसा षड्गुणैश्वर्यराशि । क्रीडे क्रीडती बाळकें जैशीं । गोपी रंजविती विशेषीं । झाडावयासि भेदरा ॥७७॥
गायन करविती उच्चस्वरीं । तैसाचि गाय मुग्धापरी । पुतळी जेंवि सूत्रधारीं । तेंवि मुरारि तद्वश ॥७८॥
स्वाधीन जैसें दारुयंत्र । तैसा श्रीकृष्ण भक्ततंत्र । ये अवतारीं हें चरित्र । दावी विचित्र जगदात्मा ॥७९॥
कोठें गावविती गौळणी । गाय तैसाचि चक्रपाणि । कोठें नाचविती करीं धरूनी । नाचे लेवूनि बालत्व ॥८०॥
कोठें कोठें कोणी कोणी । जैसें जैसें भाविती मनीं । तेसतैसा आविष्करूनी । ते ते क्षणीं अनुकरे ॥८१॥
लेवूनि बाळकाची आवगणी । करी तैशीच संपादणी । ते या श्लोकीं शुक वर्णी । ऐकें कर्णीं कुरुवर्या ॥८२॥

बिभर्ति क्कचिदाज्ञसः पीठकोन्मानपादुकम् । बाहुक्षेपं च कुरुते स्वानां च प्रीतिमावहन् ॥८॥

कोठें स्वकीय आज्ञा करिती । त्यांची वाढवितां होय प्रीति । वर्ते आज्ञा धरूनि चित्तीं । ते व्युत्पत्ति अवधारा ॥८३॥
कृष्णा पैल तें आणीं पिढें । म्हणतां दुडदुडां धांवे पुढें । उचलूं जाता बदबदां पडे । दावी गाढें बळ तेव्हां ॥८४॥
कण्हे कुंथे बळें उचली । चांचरी जात चाले पाउलीं । बाळनाट्यें घालूनि भुली । सर्व गोंविलीं प्रीतीनें ॥८५॥
धान्यादि मापें जैं आणविती । तैं पादत्राणें धरी हातीं । जैशीं बाळकें नेणती । तैसा श्रीपति चांवके ॥८६॥
नानापरी हालवी कर । करी करविती ते अनुकार । बिंबानुरूप प्रकटी मुकुर । जेंवि विकार प्रतिबिंबीं ॥८७॥
आणविती तें धांवे आणूं । बाळा ऐसा होय नेणूं । निज ऐश्वर्या बल्लव गुण । नव्हे जाण ते करी ॥८८॥
ज्या चैतन्यें अखिल चळे । त्यासि पीठादि पदार्थ नुचले । ऐसें दावूनि बाललीळे । स्वेच्छा खेळे जगदात्मा ॥८९॥
करावया साधुसंरक्षण । भूभार दुष्टसंहरण । आणि धर्माचें संस्थापन । इतुकें कारण अवतारा ॥९०॥
एथ प्राकृता शिशुपरी । निजैश्वर्य लोपूनि हरि । कोणा कारणास्तव विस्तारी । लीला हे जरी म्हणसील ॥९१॥

दर्शयंस्तद्विदां लोक आत्मनो भृत्यवश्यताम् । व्रजस्योवाह वै हर्षं भगवान्बालचेष्टितैः ॥९॥

तरी ऐकें गा कुरुपालका । जो नियंता अखिल लोकां । तो मी भक्ताधीन देखा । ब्रह्मादिकां हें प्रकटी ॥९२॥
अचिंत्य ऐश्वर्य जाणते । शिवब्रह्मादि कर्ते हर्ते । जे म्हणविती मायानियंते । कौतुक त्यांतें दाखवी ॥९३॥
यया मृत्युलोकांच्या ठायीं । भक्ताधीन मी शेषशायी । हें दाखवी नंदालयीं । क्रीडानवाई प्रकटूनी ॥९४॥
आपण होऊनि भक्ताधीन । भक्तांसि करी धन्य मान्य । ब्रह्मादि जे पदाभिमान्य । करी सामान्य तद्योगें ॥९५॥
ब्रह्मादि वैभवां वरिष्ठां - । पासूनि वरिष्ठ बाल्यचेष्टा । दावूनि व्रजींच्या हरी कष्टा । तुष्टि अभीष्टा वाढवी ॥९६॥
कोणी एथ करिती शंका । भगवन्महिमा सनकादिकां । असे साकल्यें ठाउका । तेचि देखा तद्विद ॥९७॥
तरी सनकादि आत्मनिष्ठ । स्वात्मावबोधभजनें तुष्ट । तारतम्यें पद निर्दिष्ट । भेदविशिष्ट नेणती ॥९८॥
ब्रह्मादि जे जे पदाभिमानी । तारतम्यभेदज्ञानी । भगवदैश्वर्यही कळोनी । अभेदभजनीं वंचले ॥९९॥
यांचा गळावया अभिमान । ये अवतारीं भक्ताधीन । होऊनि भक्तीचें महिमान । दावी पूर्ण क्रीडोनी ॥१००॥
असो ब्रह्मादिकांची कथा । शुक म्हणे गा जगतीनाथा । ऐकें गोकुळींचिये वृत्तांता । सावध चित्ता करूनी ॥१॥

सरित्तीरगतं कृष्णं भग्नार्जुनमथाह्वयत् । जन्मर्क्षमद्य भवतो विप्रेभ्यो देहि गाः शुचिः ॥१०॥

उखळीं बांधोनि निजनंदन । यशोदा संपादी गृहविधान । तंव येरीकडे यमलार्जुन । केले भग्न श्रीकृष्णें ॥२॥
नंद देखोनि दामोदरा । कळवळोनि सोडी त्वरा । त्यासि रंजवूनि गोपी चतुरा । भयभेदरा विसरविला ॥३॥
सवेंचि बाळकांचिये मेळीं । क्रीडतां यमुनेचिये वाळीं । तंव ते यशोदा वेल्हाळी । स्नेहें वनमाळी पाचारी ॥४॥
आजि तुझें जन्मर्क्ष जाण । वेगें करूनि मंगल स्नान । ब्राह्मणाकारणें धेनुदान । देईं होऊनि शुचिष्मंत ॥१०५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP