अध्याय ११ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


प्रतीक्षते त्वां दाशार्ह भोक्ष्यमाणो व्रजाधिपः । एह्यावयोः प्रियं धेहि स्वगृहान् यात बालकाः ॥१६॥

अरे वृष्णिकुळमंडना । वेगीं येईं संकर्षणा । नंद बैसला भोजना । घेऊनि कृष्णा ये वेगीं ॥२४॥
प्रतीक्षा करीतसे व्रजपति । कृष्णेंसहित जेवा पंक्ती । जननीजनकाचिये आर्ति । अतिप्रीति पुरविजे ॥१२५॥
खेळतां झाला मध्याह्नकाळ । भुकेला संवगड्यांचा मेळ । आपुलालिया गृहा सकळ । बल्लवबाळ जाऊं दे ॥२६॥

श्रीशुक उवाच - इत्थं यशोदा तमशेषशेखरं मत्वा सुतं स्नेहनिबद्धधीर्नृप ।
हस्तें गृहीत्वा सहराममच्युतं नीत्वा स्ववाटं कृतवत्यथोदयम् ॥१७॥

ऐशी रोहिणीवाक्यावरून । यशोदाजननी स्नेहाळ पूर्ण । पाचारितां रामकृष्ण । खेळ सांडून न येती ॥२७॥
मग ते यशोदा जननी सकृप । सवेग जाऊनियां समीप । हस्तीं धरिला कंदर्पबाप । जो चिद्रूप जगदात्मा ॥२८॥
भक्तिप्रेमाच्या बालभें । कुड्मलीकरूनि चैतन्यप्रभे । शिशुत्वनाट्य नतला लोभें । त्या त्या क्षोभें उल्हासे ॥२९॥
निर्जरमणीचा मुकुटमणि । जो त्याचिये हृदयभुवनीं । नांदे म्हणोनि चिंतवणी । करी निर्वाणीं जयाची ॥१३०॥
तो हा अच्युत नंदनारी । पुत्र भावूनि धरिला करीं । सुतस्नेहाची ममता भारी । नेणें सुंदरी हरिमाया ॥३१॥
पुत्रस्नेहें जडली बुद्धि । तेचि सहजें सुखसमाधि । शुकाचार्य जो विवेकनिधि । तो प्रबोधी कुरुपाळा ॥३२॥
रामेंसहित अचुत हातीं । सवेग यशोदासती । नेऊनि आपुल्या वाडियाप्रति । करी निगुती अभ्युदयों ॥३३॥
आणूनि सुवासिनी ब्राह्मण । सर्व बल्लवी बल्लवगण । वेदमंत्रीं नहाविला कृष्ण । स्वस्तिवाचनविधियुक्त ॥३४॥
गौरवूनि वस्त्राभरणीं । पूजिल्या ब्राह्मणसुवासिनी । उत्तम अन्नें समर्पूनी । रत्नीं सुवर्णीं तोषविले ॥१३५॥
सालंकृतें धेनुदानें । देऊनि घेतलीं आशीर्वचनें । पुरंध्री करिती निरंजनें । निर्जर सुमनें वर्षिती ॥३६॥
तया समाजीं बल्लवथाटीं । परस्परें करिती गोठी । उपडोनि पडिलीं झाडें मोठीं । बाळ तळवटीं वांचलें ॥३७॥
उदरीं बांधिलेंसे उखळ । पळों न शके केवळ बाळ । भोंवता लेंकुरांचा मेळ । झाडें विशाळ उन्मळलीं ॥३८॥
ब्राह्मणांचे आशेर्वाद । तेणें रक्षिला गोविंद । म्हणती दैवाथिला नंद । लोकापवाद चूकला ॥३९॥
आपुलें बाळ आपुल्या हातें । बांधोनि काळा ओपिलें होतें । एवढें निमित्त श्रीअनंतें । कृपावंतें चुकविलें ॥१४०॥
पुत्रनाशासारिखी हानि । आणी उघड रडों नल्हातां जनीं । दैवें पावली निर्वाणीं । कुळस्वामिनी जगदंवा ॥४१॥
सप्रेमक्रीडेच्या उद्देशें । वृंदावना जावया हर्षें । अंतर्यामीं कृष्णपरेशें । गोप उल्हासें प्रेरिले ॥४२॥

गोपवृद्धा महोत्पाताननुभूय बृहद्वने । नंदादयः समागम्य व्रजकार्यममंत्रयन् ॥१८॥

तो नेणोनि हरिसंकल्प । समस्त मिळोनि वृद्ध गोप । उत्पातभयाचे विकल्प । करिती जल्प अनुभविले ॥४३॥
गोकुळीं झले महोत्पात । ते अनुभवूनि समस्त । पुढें व्रजाच्या कल्याणार्थ । कर्तव्यार्थ विचारिती ॥४४॥
नंदप्रमुख गोपवृद्ध । जे गौळियांमाजि प्रसिद्ध । समस्त मिळोनि एवंविध । बुद्धिवाद विवरिती ॥१४५॥

तत्रोपनंदनामाऽऽ ह गोपो ज्ञानवयोऽधिकः । देशकालाऽर्थतत्त्वज्ञः । प्रियकृदामकृष्णयोः ॥१९॥

ऐसा विचार करितां सकळीं । त्यांमाजीं उपनंदनामा गौळी । वयोवृद्ध बुद्धि आगळी । जो हृतकमळीं स्नेहाळ ॥४६॥
देशकालार्थतत्त्वज्ञ । आणि रामकृष्णांचें कल्याण । करूं इच्छितां स्नेहाळ पूर्ण । जो विचक्षण सर्वार्थीं ॥४७॥
पर्जन्यकाळीं निर्मळ देश । आश्रयूनि पाविजे तोष । कीं अग्निभयाचा न बाधी लेश । निरिंधन स्थानास वसवितां ॥४८॥
तेंवि महोत्पात कां महामारी । काळक्षोभाचिये अवसरीं । स्थान त्यागूनि स्थलांतरीं । सहपरिवारीं नांदावें ॥४९॥

उत्थातव्यमितोऽस्माभिर्गोकुलस्य हितैषिभिः । आयांत्यत्र महोत्पाता बालानां नाशहेतवः ॥२०॥

गोकुळाचा कल्याणार्थ । करूं इच्छिते आम्ही समस्त । तिहीं एथूनि आजि त्वरित । परिवारयुक्त उठावें ॥१५०॥
एथ बाळांचीं नाशकरणें । येती उत्पात महाविघ्नें । आजिपर्यंत नारायणें । महादारुणें वारिलीं ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP