अध्याय ११ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पश्य पश्य वयस्यांस्ते मातृमृष्टान्स्वलंकृतान् । त्वं च स्नातः कृताहारो विहरस्व स्वलंकृतः ॥११॥
पाहें पाहें हे सांगाती । मातृवचना सरिसे येती । स्नानें करूनि अतिप्रीति । पावले तृप्ति जेवूनि ॥६॥
त्यांतें देखोनि तूंही हरि । स्नान करोनि भोजन सारीं । शुचिष्मंत सालंकारीं । क्रीडा करीं स्वइच्छा ॥७॥
जेणें विधीसि केला बोध । त्यासि यशोदा बुद्धिवाद । स्नेहें शिकवी एवंविध । दावी क्रोध नायकतां ॥८॥
निर्मळासि उद्वर्तन । नित्यतृप्तासि भोजन । स्वप्रकाशा अलंकरण । रत्नसुवर्णभूषणीं ॥९॥
विशुद्धासि शुचिष्मंत । निर्विकारा क्रीडवित । काळातीतासि झडपीत भूत । म्हणोनि करित रक्षादि ॥११०॥
असो हा भक्तिप्रेमभाव । देखोनि लाजिले ब्रह्मादि देव । दावी भक्तीचें लाघव । तें अपूर्व परियेसा ॥११॥
क्रीडेमाजी गुंतले सुत । पाचारितां न येती त्वरित । मग यशोदेतें प्रेरित । स्नेहाळ बहुत रोहिणी ॥१२॥
नोपेयातां यदाहूतौ क्रीडासंगेन पुत्रकौ । यशोदां प्रेषयामास रोहिणी पुत्रवत्सला ॥१२॥
अवो यशोदे चातुर्यखाणी । रामेसहित चक्रपाणि । सवेग हस्तीं धरूनि आणीं । तापले उष्णीं क्रीडतां ॥१३॥
क्रीडंतं सा सुतं बालैरतिवेलं सहाग्रजम् । यशोदाऽजोहवीत्कृष्णं पुत्रस्नेहस्नुतस्तनी ॥१३॥
ऐकोनि रोहिणीचें वचन । यशोदा मोहें कळवळून । पुत्रस्नेहें दोन्ही स्तन । पान्हा दाटोन पाझरती ॥१४॥
चकोरनेत्रांच्या नीहारें । जेंवि चंद्रामृत पाझरे । नानासमुद्रीं भरतें भरे । सुधाकरें उदैजतां ॥११५॥
तैशी ते पुत्रवत्सला । पुत्रमोहें उताविळा । बलभद्रेंशीं मेघनीळा । तये वेळां आळवी ॥१६॥
बाळकेंशीं खेळतां खेळ । खेळीं गुंतला वाढवेळ । तयातं यशोदा वेल्हाळ । परम कृपाळ आळवी ॥१७॥
कृष्ण कृष्णारविंदाक्ष तात एहि स्तनं पिब । अलं विहारैः क्षुत्क्षांतः क्रीडाश्रांतोऽसि पुत्रक ॥१४॥
अरे कृष्णा कमलनयना । येईं बापा जगज्जीवना । विश्वीं डोळस तूं देखणा । ये स्तनमान करावया ॥१८॥
खेळतां बहुसाळ श्रमलासी । पुरे खेळणें श्रीहृषीकेशी । क्षुधाक्रांत कोमाइलासी । स्तनपानासी स्वीकारीं ॥१९॥
हे रामागच्छ ताताऽऽशु सानुजः कुलनंदन । प्रातरेव कृताहारस्तद्भवोन्भोक्तुमर्हति ॥१५॥
अरे बापा संकर्षणा । तुझा धाकुटा बंधु कान्हा । सवें घेऊणि मनमोहना । येई पवनासारिखा ॥१२०॥
सकळ गोकुळा आनंदन । म्हणोनि म्हणिजे कुलनंदन । विश्वानंद अभिवर्धन । ये जनार्दनासमवेत ॥२१॥
अल्प जेवूनि प्रातःकाळीं । वाढवेळ गुंतलां खेळीं आला मध्यान्हीं अंशुमाळी । क्षुधा लागली बहुसाल ॥२२॥
भोजना योग्य समय झाला । आतां सत्वर सदना चला । म्हणोनि यशोदा कुमारांला । नानापरी आळवी ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP