अध्याय ८ वा - श्लोक ३६ ते ३९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यद्येवं तर्हि व्यादेहीत्युक्तः स भगवान् हरिः । व्यादत्ताव्याहतैश्वर्यः क्रीडामनुजबालकः ॥३६॥

प्रत्यक्ष पाहें म्हणसी वदनीं । तरी मग दावीं मुख पसरोनी । ऐसें ऐकोनि चक्रपाणि । दावी पसरूनि वदनातें ॥११॥
पूर्णप्रतापें विजयवंत । विश्वश्रियेशीं श्रीमंत । चित्प्रकाशें सदोदित । सर्वस्व देत औदार्यं ॥१२॥
ज्याचेनि ज्ञानें इंद्रियवृत्ति । स्वस्वविषयीं सज्ञान होती । ऐशी जयाची ज्ञानशक्ति । आब्रह्मभूतीं भौतिकीं ॥१३॥
अनंतब्रह्मांडविभववंत । ते मायेसी जो अनासक्त । निःसंग निस्पृह विरक्त । जो अनंत अपार ॥१४॥
ज्याच्या ऐश्वर्याची थोरी । सत्ता जागे चराचरीं । तो हा प्रत्यक्ष श्रीहरि । बाळकापरी क्रीडतो ॥४१५॥
घेऊनि मानवी बाळनट । करी मनुष्यनोकींचें नाट्य । तरी विरिंचिश्रीकंठ । नेणती प्रकट ऐश्वर्य ॥१६॥
अव्याहत ऐश्वर्यसिंधु । भक्तवत्सल दीनबंधु । क्रीडामिसें आनंदकंदु । लीलाविनोद प्रकटवी ॥१७॥

सा तत्र ददृशे विश्वं जगत्स्थास्नु च खं दिशः । साद्रिद्वीपाब्धिभूगोलं सवाय्वग्नींदुतारकम् ॥३७॥

मुख पसरोनि दावितां हरि । यशोदा पाहे जंव अंतरीं । ब्रह्मांड देखे वदनकुहरीं । तें अवधारीं नृपनाथा ॥१८॥
तंव ते यशोदा तये वदनीं । देखती झाली विश्व नयनीं । स्थावर जंगम गगन धरणी । दिशाकंकणी अंतरिक्ष ॥१९॥
देखे अवघेचि सागर । माजी द्वीपें सविस्तर । सहित अटव्य गिरिवर । लहान थोर अवघेचि ॥४२०॥
वृक्ष वल्ली गुल्मलता । श्वापदजाति ही समस्ता । जलां जलचरां भौतिकां भूतां । सहित पर्वता देखिलें ॥२१॥
समुद्र द्वीपें सपर्वत । भूगोल देखोनि वदनाआंत । झाली यशोदा विस्मित । देखे वदनांत भूर्लोक ॥२२॥
आणि वायूचा प्रवाह । मेघज्योति हव्यवाह । तारापतीशीं तारकासमूह । ज्योतिश्चक्र स्वर्लोक ॥२३॥
 
ज्योतिश्चक्रं जलं तेजो नभस्वान्वियदेव च । वैकारिकाणींद्रियाणि मनो मात्रागुणास्त्रयः ॥३८॥

भूगोल म्हणोनि कथिली धरा । आप तेज आणि वारा । व्योमादि महाभूतपसारा । देखे सुंदरा सुतवदनीं ॥२४॥
वैकारिक तो देवतागण । विष्णु चंद्रमा चतुरानन । श्रीनारायण गौरीरमण । नभस्वान् बहुविध ॥४२५॥
मरुत्समूह प्राणस्थानीं । दिशा पवन आणि तरणि । वरुण अश्विनीकुमार दोन्ही । देखे वदनीं कुमाराचे ॥२६॥
पावक आणि निर्जरपति । उपेंद्रसहित प्रजापति । कोणपही त्यांचे पंक्ती । देखे सुमति यशोदा ॥२७॥
वैकारिकांमाजीं मन । ग्राह्य असतां कथिलें भिन्न । तरी हें दुरुक्तीचें कारण । सावधान परियेसा ॥२८॥
तीन्ही अवस्था प्रकाशी मन । प्रकट दोन्ही एकीं लपोन । यालागीं केलें विलक्षण । द्विरुक्तिकथन या हेतू ॥२९॥
इत्यादि स्पष्ट सत्त्वगुण । रजें तैजस इंद्रियगुण । तमें तामस विषय जाण । मात्रा अभिधान तयासी ॥४३०॥
मना आणि वैकारिकां । इंद्रियां आणि तन्मातृकां । गुणत्रयासि देखोनि शंका । पावे गोपिका हृतकमळीं ॥३१॥
म्हणे हें केवढें विचित्र । बाळकाचें कोमळ वक्त्र । त्यामाजीं अवघें चराचर । सविस्तर मी देखें ॥३२॥

एतद्विचित्रं सह जीवकालस्वहावकर्माशयलिंगभेदम् ।
सूनोस्तनौ वीक्ष्य विदारितास्ये व्रजं सहात्मानमवाप शंकाम् ॥३९॥

एकेचि समयीं अवघें विश्व । मुखीं देखोनि सावयव । तेणें निर्बुजोनियां जीव । अष्टभाव उपजले ॥३३॥
तेंचि सावयव विश्व कैसें । लिंगशरीर भेदवशें । चराचरात्मक आभासे । जैसें तैसें अवधारा ॥३४॥
जीव काल आणि स्वभाव । कर्म आणि आशय सर्व । लिंगभेदेशीं सावयव । देखे स्वयमेव यशोदा ॥४३५॥
जीव म्हणिजे गुणक्षोभक । कैसा तयाचा विवेक । हें पुसाल तरी नावेक । श्रवणोन्मुख मन करा ॥३६॥
त्रिगुण पाहतां मायाजनित । माया मिथ्या जड अचेत । तिसी चेतवी जो अनंत । अनुस्यूत चिन्मात्र ॥३७॥
अविद्याबिंबित जें चैतन्य । जीव ऐसें त्या अभिधान । तेणें प्रकाशितां गुण । काळ क्षोभोन प्रकटवी ॥३८॥
कनकबीजीं असे भ्रांति । परी ते जडत्वें नये व्यक्ती । सचेतन मानव जें भक्षिती । तैं प्रकटवी विकार ॥३९॥
नातरी पत्रीं लिहिले मंत्र । परी तें अचेतन पुस्तकमात्र । सचेतन पुरुषें प्रेरितां अस्त्र । दावी विचित्र सामर्थ्य ॥४४०॥
तेंवि जीवचैतन्य प्रकाशी गुणा । ते काळें क्षोभोनि दाविती । खुणा । प्रकाश प्रवृत्ति मोह जाणा । व्यक्ति त्रिगुणा पैं ऐशीं ॥४१॥
गुणक्षोभक जीव तो ऐसा । परिणामहेतु काळ तो कैसा । तोहीं सांगों उमजे तैसा । सावध परिसा क्षण एक ॥४२॥
भूमिगर्भीं धान्य पडे । कालमात्रेंचि तें विरूढे । काळें परिणाम त्याचा घडे । पुढें निवडे धान्यत्वें ॥४३॥
व्यवायें ऐक्य शुक्रशोणिता । काळ परिणमे गर्भ पुरता । साङ्ग बालक प्रसवे माता । हा परिणामकर्ता काळची ॥४४॥
मातृजठरीं शरीर जन्मे । यथाकाळें तें परिणमे । बाल तरुण वृद्ध निमे । यें परिणामकर्में काळाचीं ॥४४५॥
तेथ पिता अथवा माता । अथवा बहुतां बुद्धिमंतां । द्रव्य वेंचूनि यत्न करितां । अकाळीं वृद्धता नाणवे ॥४६॥
मातृयोनीपासून जनन । नग्न पुत्रेंशीं करी शयन । बळेंचि मुखीं घाली स्तन । स्नानभोजन एकत्र ॥४७॥
काळें पुत्रासी प्रौढता । देऊनि लाजविली माता । ऐशी काळाची परिणामकथा । जाणिजे श्रोतां तो काळ ॥४८॥
आतां स्वभाव म्हणिजे कोण । जो या जन्माचें कारण । देहात्मभावें आविष्करण । अहंस्फुरण स्वीकरी ॥४९॥
अहं देह ऐसें जाण । तें जाणणेंचि व्यापिलें गुणें । गुणानुसार क्रियाचरणें । जन्ममरण तन्मूल ॥४५०॥
नास्तिक्यशून्यता तो अभाव । वास्तव आस्तिक्य तो सद्भाव । देहात्मकत्व तो स्वभाव । योनिसंभव अध्यात्म ॥५१॥
आत्मत्वें अधिकारूनि वर्ते । म्हणोनि अध्यात्मा बोलिजे त्यातें । स्वभावोऽध्यात्म हें रमाकांतें । भगवद्गीते बोलिलें ॥५२॥
जितुके देह देह तितुके स्वभाव । अविद्यागुणकर्मधर्मसंभव । जन्महेतु सप्रभव । यथासावेव निरूपिला ॥५३॥
कर्म म्हणिजे संस्कारजनित । त्या संस्काराचा जो वृत्तांत । तो परिसावा दत्तचित्त । सदृष्टांत विवरितां ॥५४॥
हिंग वेचलिया वास । शत्रु जिंकिलिया यश । भोजन सरलिया संतोष । उरे दोष जारत्वें ॥४५५॥
तेंवि पूर्वकर्म भोगें सरे । तज्जनित जो संस्कार उरे । तदनुसार जन्मांतरें । क्रियाविस्तारें तें कर्म ॥५६॥
संस्काराचे वसते ठाय । तयासीच बोलिजे आशय । अंतःकरणचतुष्टय । गुणत्रयप्रभेदीं ॥५७॥
मनादि तुल्य सर्व शरीरीं । परी संस्काराची अनेक परी । यालागीं भेद लिंगशरीरीं । पृथगाकारीं अनेक ॥५८॥
लिंग म्हणिजे खुणेचें चिन्ह । तें देहमात्रीं भिन्नभिन्न । ऐसें लिंगभेदलक्षण । विचक्षण जाणती ॥५९॥
गोगजउष्ट्रवानरनर । व्याघ्रसर्पश्वानसूकर । अनेक योनि सविस्तर । भेदप्रकार परियेसा ॥४६०॥
सर्वां एक रसनेंद्रि । परंतु धेनु तृणातें खाय । वटपिंपळें हस्ती धाय । उष्ट्रा प्रिय कंटकी ॥६१॥
सदा मस्त वज्रार्क । इत्यादि क्रूरफळविशेष । वानर भक्षूनि पावे सुख । येरां विष तें होय ॥६२॥
लिंगशरीर सर्वत्र एक । परी लिंगभेद ऐसे अनेक । सर्वेंद्रियांचा विवेक । पृथक् पृथक् ऐसाची ॥६३॥
जीव काळ स्वभावेंशीं । कर्म आशय लिंगभेदेंशीं । बाळशरीरीं मुखावकाशीं । आश्चर्यासि या देखे ॥६४॥
बाळकाचें शरीर अल्प । विकसितवदनीं अवकाश स्वल्प । तेथ देखोनि ब्रह्मांडकल्प । धरी विकल्प साशंक ॥४६५॥
ब्रह्मांड सगळें देखे वदनीं । सहित व्रज गोपगौळणी । आपणा देखे नंदपत्री । उभी धरूनि हरि करीं ॥६६॥
तदात्मदृष्टि करूनि तेथें । पाहे यशोदा जंव निरुतें । तंव तेथहि कृष्णामुखा आतौतें । ब्रह्मांडांतें दाखवी ॥६७॥
त्याही माजीं चराचर । आणि आपणेंशीं ब्रह्मपुर । करीं धरिला तैसाचि कुमार । देखे सुंदर तद्वदनीं ॥६८॥
पुन्हा तादात्म्य तेही ठायीं । करूनि पाहातां वदनडोहीं । ब्रह्मांड सपुत्र आपणाही । देखोनि देहीं सकंप ॥६९॥
तदंतरीं तदंतरीं । ऐशीं देखोनि सहस्रवरी । झाली अत्यंत घाबिरी । शंका अंतरीं उपजली ॥४७०॥
ऐसें ऐकोनि निरूपण । दूषिती अनवस्था म्हणून । शास्त्रयुक्तीचे अल्पज्ञ । ते सर्वज्ञ नादरिती ॥७१॥
तरी अघटितघटनापटीं माया । ऐशीच दाविली मार्कंडेया । पुरजनादि परिसोनियां । कोणी संशया न धरिजे ॥७२॥
तथापि प्रचित पाहणें जरी । तरी दोन्ही दर्पणें परस्परीं । धरूनि पाहतां त्यामाझारीं । गणना चतुरीं करावी ॥७३॥
असो थरथरां कांपे शरीर । नेत्रीं जळाचे पाझर कंठ दाटूनि रोमांकुर । अतिसत्वर थरकले ॥७४॥
आंगीं डवडवी स्वेदोदक । तेणें टवटवीत दिसती पुलक । झालें शब्दासी अटक । श्वास क्षणैक वितुळला ॥४७५॥
मावळली देहस्मृति । लाधली स्वसुखाची विश्रांति । जे कां दुर्लभ योगस्थिति । ते संप्राप्त अनायासें ॥७६॥
लवण वितुळे जळसन्निधि । तैसी विराली देहबुद्धि । नाठवे मीतूंपणाची शुद्धि । सुखसमाधि लागली ॥७७॥
परी ते यशोदा साबडी । नेणे स्वात्मप्रत्यय गोडी । म्हणोनि वळली मुरकुंडी । मूर्च्छा गाढी मानिली ॥७८॥
ब्रह्मसुखाची अनुभूति । सद्गुरुवरें संपादिती । अपूर्व सच्छिष्यासि प्राप्ति । त्यासी म्हणती शक्तिपात ॥७९॥
देहात्मजीवात्मभाव विरे । विपरीत बोधाचें आयुष्य पुरे । अपरोक्षचिन्मात्र केवळ उरें । तो जाणिजे चतुरें शक्तिपात ॥४८०॥
अविद्याशक्तीचा निपात । पहिली स्वात्मस्थिति संप्राप्त । अपूर्व म्हणोनि साशंकित । शक्तिपात या नांव ॥८१॥
यशोदेसी ते अवस्था । झाली विश्वरूप पाहतां । पुन्हा देहस्मृति लाहतां । पडिला चित्ता चाकाट ॥८२॥
मग विस्मयें भोंवतें पाहे । म्हणें मजला झालें काय । जागृतीं किंवा स्वप्नीं आहें । ऐसें मोहें न लक्षे ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP