अध्याय ८ वा - श्लोक ३१

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं धार्ष्ट्यान्युशति कुरुते मेहनादीनि वास्तौ स्तेयोपायैर्विरचितकृतिः सुप्रतीतो यथाऽऽस्ते ।
इत्थं स्त्रीभिस्सभयनयनश्रीमुखालोकिनीभिर्व्याख्यातार्था प्रहसितमुखी नह्युपालब्धुमैच्छत् ॥३१॥

चोर म्हणूनि धरितां धीट । फिरोनि उभा ठाके नीट । म्हणे लटकीच कटकट । कां गे बोभाट करितसां ॥४३॥
चोर ऐसें म्हणो जातां । म्हणे मी गृहस्वामी तत्त्वतां । तुम्ही चोरटीं विचारें पाहतां । फिरोनि म्हणतां मज चोर ॥४४॥
प्रत्यक्ष्य घरींचा मी घरधणी । चोरट्या मिळाल्या गौळणी । पुसतां नाहीं यांसी कोणी । झालां म्हणोनि चावटा ॥३४५॥
घरधणी म्हणविसी आपणा । तरी तूं सांग घरींच्या खुणा । ऐसें म्हणतां करी वल्गना । त्या तुझियां मना येऊं दे ॥४६॥
म्हणे मीं आधारी केली मही । रस ठेविला जळाच्या ठायीं । गृहाभोंवत्या दिशा दाही । नभ सबाह्य म्यां भरिलें ॥४७॥
गृहा सबाह्य खेळे वारें । रहाटीं ठेविलीं नवही द्वारें । दहावें गुप्त केलें धारें । तेणें अंधारें कोंदलें ॥४८॥
गृहीं बुद्धि लावूनि दीप । तेजीं प्रकट केलें रूप । खुणा माझिया अमूप । लटिका जल्प तूमचा ॥४९॥
चुलीमाजी आहे वन्हि । माथणीमाजी आहे पाणी । ऐशा खुणा सांगेल कोणी । जाणें धणी मी एक ॥३५०॥
पाणि ठेविलें पृथ्वीपोटीं । अग्नि सांठविला म्यां काष्ठीं । खणोनि मथोनि पहा दृष्टी । माना गोष्टी मग साच ॥५१॥
नेत्रामाजील देखणेपण । काळें काजळ माझी खूण । मी सर्वस्वीं अधिष्ठान । रूपलावण्यगुणांचें ॥५२॥
कांहीं खुणा वदलों अल्प । मी एकचि सत्यसंकल्प । लटिका गोपिकांचा जल्प । नाना विकल्प कल्पना ॥५३॥
अवो सुंदरि यशोदे सति । ऐशी कुमाराची वदंती । आणिक आश्चर्यें सांगों किती । लिहितां क्षिति पुरेना ॥५४॥
रंगवल्ली संमार्जनें । अभ्यर्चित निर्मळ सदनें । तेथ मलोत्सर्ग करणें । हें तुज माने यशोदे ॥३५५॥
आमुचिये स्वर्चित सदनीं । रागें हागे चक्रपाणि । ऐशी याची विचित्र करणी । किती म्हणोनि सांगावी ॥५६॥
ऐसे अनेक स्तेयोपाय । करूनि गोरस चोरूनि खाय । तुज समीप यशोदे माय । साधुप्राय दीसतो ॥५७॥
सभय हालती नेत्रपातीं । ऐसें श्रीमुख गोपी पाहती । तिहीं वाखाणिल्या रचना युक्ति । ते क्रिया कथिती कृष्णाची ॥५८॥
ऐशीं ऐकोनि गार्‍हाणीं । क्षोभ नुपजे यशोदे मनीं । हास्य करूनि पाहे नयनीं । अंतःकरणीं सुखावे ॥५९॥
हर्षयुक्त अंतःकरण । न करी कुमरासी घर्षण । करोनि गोपींचें समाधान । दिधलें चुंबन कृष्णातें ॥३६०॥
जारकर्मांचीं गार्‍हाणीं । कित्येक वर्णिती गोरसहरणीं । परी हे नाहीं व्यासवाणी । कोणे पुराणीं बोलिली ॥६१॥
शुक नारद पराशर । वैखानसादि पंचरात्र । विष्णुरहस्य सनत्कुमार । हा प्रकार न वदले ॥६२॥
अथवा गोपाळतापिनी । उपनिष द्भागीं अथर्वणीं । नाहीं दीपिकाव्याख्यानीं । केली कथनीं भाष्यकारीं ॥६३॥
कात्यायनीव्रता पूर्वीं । जारलांछन कोणी न लावी । देशभाषा वदले कवि । भक्तिभावीं गौरवतो ॥६४॥
कात्यायनीव्रताचरणीं । तोषविला जो चक्रपाणि । रासक्रीडा तद्वरदानीं । उत्तीर्ण ऋणी जाहला ॥३६५॥
सुतपापृश्नितपोभारें । त्रिजन्म घेतले विर्विकारें । विरहें ध्यानें चमत्कारें । करी उद्धार गोपींचा ॥६६॥
सैरंध्री जे कंसदासी । गंधलेपनें ऋषीकेशी । तोषोनि मागे अंगसंगासी । झाला तयेसी वरदानी ॥६७॥
तियेचे प्रेमभक्तीस्तव । अंगसंगाचा गौरव । देऊनि अलिप्त वासुदेव । भक्तिलाघव संपादी ॥६८॥
मागें पुढें निर्विकार । म्हणाल गोपींशीं सविकार । तरी ते त्याचे प्रेमविकार । ते अनुकार दाविले ॥६९॥
जळीं जंतु कीं पाहती मुखें । तितुकीं सालंकृतें त्या सन्मुखें । जल नवटे एकही वेखें । कर्में अशेखें हीं तैशीं ॥३७०॥
करितां धर्मसंस्थापन । अविधिमार्गाचें लांछन । लागों नेदी आचरोन । श्रीभगवान् सर्वथा ॥७१॥
याचि लागीं वैश्यसदनीं । व्रतापूर्वीं शुद्धपणीं । जारचौर्यादि अश्लाघ्यकरणी । दावी करूनि कलिरूप ॥७२॥
म्हणाल जन्मला क्षात्रवर्णीं । लपोनि राहिल वैश्यसदनीं । तरी तो अजन्मा वसुदेवभुवनीं । नाहीं योनि स्पर्शला ॥७३॥
रासक्रीडे पुढें आधीं । जारक्रीडा न शिवे कधीं । संस्कारिलिया जो व्रतबंधीं । दावी विधि अनुल्लंघ्य ॥७४॥
कुमारपणीं कुब्जेसि वर । देऊनि वधिला कंसासुर । तो मग व्रतबंधनानंतर । केला साचार पूर्वोक्त ॥३७५॥
पूर्वींल फेडिलें वरऋण । तें न म्हणावें विधिलंघन । भक्तिप्रेमें श्रीजनार्दन । भक्ताधीन सर्वस्वें ॥७६॥
जारचौर्यादि अनुकरन । धर्मासि अनृत प्रमोदन । म्लेच्छयुद्धीं पलायन । हें विधिलंघन म्हणावें ॥७७॥
पुढील कळीचे अनुकार । स्वयें दावी जगदीश्वर । या आचरणीं कुळसंहार । फळप्रकार सूचिला ॥७८॥
यालागीं विषमक्रियाचरणीं । कलिविडंब संपादणी । घेऊनि कृष्णत्वअवगणी । चक्रपाणि संपादी ॥७९॥
पूतनाशोषणादि अत्यद्भुत । अमानुषकर्में समस्त । दावी पूर्णत्व संकेत । बाळक्रीडेंत श्रीपति ॥३८०॥
ते हे अपार कृष्णलीला । लिहितां न समाये भूगोळा । परंतु धर्माचा कळवळा । स्वधर्मशीळा संरक्षी ॥८१॥
संहारूनि अधर्मकर । करणें धर्माचा जीर्णोद्धार । त्याचि साठीं घे अवतार । निर्विकार युगींयुगीं ॥८२॥
ऐशी गार्‍हाणियांची कथा । शुकें निवेदिली भारता । त्यामाजी एकी अपूर्वता । जगतीनाथा निवेदी ॥८३॥
उदंड कुमाराचे अन्याय । देखतां ऐकतां कोपे माय । ते यशोदा सकोप होय । कोणी समय ऐसाही ॥८४॥
तंव परीक्षिती म्हणे मुनि । जेणें कोपली सदय जननी । ऐशी काय केली करणी । माझें कर्णीं ते घालीं ॥३८५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP