अध्याय ८ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - गर्गः पुरोहितो राजन् यदूनां सुमहातपाः । व्रजं जगाम नंदस्य वसुदेवप्रचोदितः ॥१॥

शुक म्हणे गा परीक्षिती । सकळ इंद्रियांचिया वृत्ति । आणूनियां श्रवणाप्रति । बैसवी पंक्ती रसपाना ॥३९॥
जिव्हा सेवी जो जो रस । सर्वां विभागीं तो संतोष । श्रवण सदनींचें पीयूष । समस्तांस हें पाजी ॥४०॥
पुत्र आपुले व्रजभुवनीं । संस्कार वर्जित वैश्यसदनीं । म्हणूनि वसुदेवाचे मनीं । शंका अनुदिनीं हे वर्ते ॥४१॥
जातकर्माचा संस्कार । मनोमयचि केला मात्र । आतां नामकरणप्रकार । कोण विचार करावा ॥४२॥
ऐसा वसुदेव सचिंत । यादवांचा पुरोहित । तपावतार मूर्तिमंत । आणी गुप्त स्वसदना ॥४३॥
महा तपस्वी गर्गाचार्य । सृष्टि प्रकाशी जैसा सूर्य । तेंवि प्रकटी कालत्रय । तो मुनिवर दैवज्ञ ॥४४॥
जितुका यदूचा अन्वय । गर्गचि त्यांचा उपाध्याय । म्हणोनि त्याचे धरोनि पाय । अभिप्राय निवेदिला ॥४५॥
गुप्त जाऊनि महावनीं । प्रवेशावें नंदसदनीं । तेथ माझ्या प्रजा दोन्ही । तुम्हीही ज्ञानी जाणतसां ॥४६॥
रोहिणीतनय सर्वां विदित । द्वितीय असे परमगुप्त । नंदयशोदेचा सुत । ऐसा विख्यात ते ठायीं ॥४७॥
ते दोघेही माझे सुत । तुम्हीं करावे सुसंस्कृत । परी म्यां कथिला हा वृत्तांत । नंदासी श्रुत न करावा ॥४८॥
जाऊनि परमरहस्यगति । कार्य संपादा एकांतीं । ऐशी सेवेसि करूनि विनति । गोकुळाप्रति पाठविला ॥४९॥
ऐशी करूनि सूचना । वसुदेव प्रेरी तपोधना । जाता झाला बृहद्वना । नंदसदना तत्काळ ॥५०॥

तं दृष्ट्वा परमप्रीतः प्रत्युत्थाय कृतांजलिः । आनर्चाऽधोक्षजधिया प्रणिपातपुरःसरम् ॥२॥

नंदें देखोनि महामुनि । आनंदोनि अंतःकरणीं । आला सामोरा धांवोनि माथा चरणीं ठेविला ॥५१॥
करूनि पादप्रक्षालन । अर्घ्यादि उपचार संपूर्ण । बळीनें केलें वामनार्चन । तैसा ब्राह्मण पूजिला ॥५२॥
अमृततुल्य दिव्य भोजन । तांबुलादि स्रक्चंदन । रत्नें वसनें भूरि सुवर्ण । आणि गोदान अर्पिलें ॥५३॥
जैसा क्षीराब्धिशायी हरि । निर्जर पूजिती दिव्योपचारीं । नंदें गर्ग तयापरी । प्रेमादरीं गौरविला ॥५४॥
नंद यशोदा रोहिणी । बाळकांसहित लागती चरणी । अमृतस्रावी केला तरणि । निजदर्शनीं स्वामीनें ॥५५॥
मग बैसवूनि रम्यासनीं । सुप्रसन्न देखोनि मुनी । नंदें केली जे विनवणी । ते नृपकर्णीं शुक घाली ॥५६॥

सूपविष्टं कृतातिथ्यं गिरा सूनृतया मुनिम् । नंदयित्वाऽब्रवीद् ब्रह्मन्पूर्नस्य करवाम किम् ॥३॥

सुखें उपविष्ट रम्यासनीं । साङ्ग सर्वातिथ्य करूनि । संतुष्ट सद्भावें देखोनि । महामुनि तपोधन ॥५७॥
मग अमृतापरिस मधुर । चंद्राहूनि तापहर । तैशा उत्तरीं अभ्यंतर । आनंदातें पावविलें ॥५८॥
केवळ परब्रह्म तूं सद्गुण । सर्वात्मक चैतन्यघन । द्विभुज वेदोनारायण । विश्वपावन दयाळु ॥५९॥
तृष्णारहित पूर्णकाम । भूमंडळींचा कल्पद्रुम । विश्वपालनीं पुरुषोत्तम । विश्रामधाम सर्वांचा ॥६०॥
आजि माझा भाग्योदय । म्हणोनि देखिले स्वामीचे पाय । आज्ञापिजें करूं काय । जेणें सफळ होय ममाश्रम ॥६१॥
अमृता काशेनें गोड करणें । क्षीराब्धीसी काय पाजणें । कल्पतरूसी काय देणें । काशेनें उटणें सूर्यातें ॥६२॥
तैसे सर्वदा संपूर्ण तुम्ही । सकळजगाचे कल्याणकामी । कांहीं आज्ञा कीजे स्वामी । जेणें आश्रमीं सफलता ॥६३॥

महद्विचलनं नॄणां गृहिणां दीनचेतसाम् । निःश्रेयसाय भगवन् कल्पते नान्यथा क्कचित् ॥४॥

पूर्ण म्हणोनि केली स्तुति । तरी कां धनिकसदना येती । ऐशी शंका कोणी करिती । ते व्युत्पत्ति अवधारा ॥६४॥
महानुभाव जे तपोधन । त्यांचें स्वाश्रमींहूनि विचलन । नव्हे स्वार्थालागीं जाण । तें कारण ऐकावें ॥६५॥
गृहासक्त जे मानव । जेव्हां सफळ त्यांचें दैव । तेव्हां येऊनि महानुभाव । देती वैभव दर्शनें ॥६६॥
म्हणाल वैभव नाशवंत । तरी तैसें नेदिती ते महंत । जें कां अक्षय्य परमामृत । तें संप्राप्त त्यांचेनी ॥६७॥
श्रेष्ठतपोधनांच्या दर्शनीं । प्राप्त होती कल्याणश्रेणी । तरी स्वयें गृहस्थचि कां जाऊनि । तयांलागोनि न भजती ॥६८॥
ऐशी न करावी आशंका । ये अर्थींचा विवेक ऐका । प्रपंचीं बद्ध झालिया लोकां । काय ठाउका सन्मार्ग ॥६९॥
त्यामाजीं जे विवेकनिधि । सत्त्वसंपन्न ज्यांची बुद्धि । ते आपुलिये कार्यसिद्धि । भजती त्रिशुद्धि साधूंतें ॥७०॥
सद्वैद्य साधी दिव्यौषधि । कीं मांत्रिक साधी मंत्रसिद्धि । चतुर तैसा जो विशाळबुद्धि । प्रयत्नें शोधी साधूंतें ॥७१॥
राजसात्म ज्यांची स्थिति । ते लौकिकार्थ मात्र भजती । कीं क्षुद्र चमत्कार जेथ देखती । निष्ठा धरिती ते तेथें ॥७२॥
केवळ जे कां मूढमति । भोळी भाबडी ज्यांची रीति । स्वार्थ परमार्थ नेणती । भवावर्तीं निमग्न ॥७३॥
कुटुंबभरण पोषणासाठीं । बांधलीं विषयांच्या चर्‍हाटीं । गृहासक्तीची देऊनि गांठी । प्रपंचखुंटीं गोंविलीं ॥७४॥
प्रपंचकर्मीं दीनचित्तें । केवळ कृपणें जीं अनाथें । टाकूं न शकती गृहातें । वियोगातें न सहाती ॥७५॥
ज्यांसि श्रवणीं नाहीं रति । घडली नाहीं सत्संगति । ऐशियां अनाथां दीनांप्रति । कृपामूर्ति तारक ॥७६॥
पूर्णकाम जे तपोधन । स्वाश्रमींहूनि करिती चलन । तें अनाथाच्याचि भाग्यें जाण । अन्य कारण त्यां नाहीं ॥७७॥
ऐसें कल्पी माझें मन । स्वामी कृपाळु सर्वज्ञ । नंदें ऐसें करूनि स्तवन । पुढें प्रयोजन सूचिलें ॥७८॥
गर्गप्रणीत ज्योतिःशास्त्र । तेणें भूतभविष्यमात्र । प्रत्यक्ष देखती जनाचे नेत्र । तो हा सत्पात्र तपोधन ॥७९॥
भाग्यें पातला माझिया घरा । तरी यासि दाऊनि दोहीं कुमारां । नामकरणादि संस्कारा । एतद्द्वारा करवावें ॥८०॥
ऐसा कार्यार्थ चिंतूनि पोटीं । तये स्तुतीचिये परिपाटीं । पुन्हा आदरी प्रस्तावगोठी । मुनिसंतुष्टीकारणें ॥८१॥

ज्योतिषामयनं साक्षाद्यत्तज्ज्ञानमतींद्रियम् । प्रणीतं भवता येन पुमान्वेद परावरम् ॥५॥

नक्षत्रें आणि जे ग्रहगण । यांसि ज्योतिष हें अभिधान । भूत भविष्य वर्तमान । तें यावरून लक्षिजे ॥८२॥
निमेषापासून कल्पवरी । कालगणनेचि एवढी थोरी । ते यामाजि या खेचरीं । स्वसंचारीं सूचिजे ॥८३॥
तिथि वार नक्षत्र योग । करण राशि लग्न भोग । यांचे संयोग वियोग । भविष्यमार्ग सूचिती ॥८४॥
रविहस्तयोग अमृतसिद्ध । शनिहस्त तो मृत्युप्रद । कीं शनिगुरु तो त्रिजगासि दुःखद । सिंहीं विशद संयोगें ॥८५॥
जेंवि तक्रसंयोगीं पय । मधुर तेंचि अम्ल होय । कीं क्षारें हरिद्रा लोहीव लाहे । पीतत्व जाय हरपोनी ॥८६॥
तैसाचि सुभिक्षदुर्भिक्षकाळ । भूतभविष्यादि सकळ । उत्तम मध्यम कनिष्ठ फळ । कळे सकळ ज्यावरूनि ॥८७॥
तें प्रत्यक्ष ज्योतिषायन । तुवां ज्योतिःशास्त्र केलें निर्मान । भूत भविष्य वर्तमान । कथिती दैवज्ञ ज्या ज्ञानें ॥८८॥
त्वत्प्रणीतशास्त्रबळें । जन्मांतरींचें कर्म कळे । पुढील भवितव्य आकळे । भोग्य मोकळें प्रांजल ॥८९॥
जेवीं अंधारीं दिव्य ज्योति । प्रकाशी नसतांचि गभस्ति । पदार्थज्ञान नेत्रांप्रति । तेवीं शास्त्रोक्ति त्वत्कृत ॥९०॥
ज्याचिया शास्त्राचा हा महिमा । तो तूं प्रत्यक्ष आजि आम्हां । भेटलासि तरी मनोधर्मा । सफळ करीं माझिया ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP