अध्याय ८ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कालेन व्रजताऽल्पेन गोकुले रामकेशवौ । जानुभ्यां सह पाणिभ्यां रिंगमाणौ विजहृतुः ॥२१॥
ऐसा क्रमिल्या कांहें काळ । राम कृष्ण उभय बाळ । दिवसेंदिवस परम चपळ । क्रीडाशीळ जाहले ॥२०५॥
गोकुळामाजी रामकृष्ण । मनुष्यनाट्यें रिंगमाण । क्रमिती अंगण प्रांगण । जानुघर्षण सहपाणि ॥६॥
उजवें पदतळ डावा जानु । उभय करतळें टेंकून । बृहद्वनीं रिंगमाण । श्रीभगवान शिशुनाट्यें ॥७॥
रांगत रांगत चौताळती । धरितां कोणा नाटोपती । माता कौतुकें पाहती । लोण उतरिती दृग्दोषें ॥८॥
तावंघ्रियुग्ममनुकृष्य सरीसृपन्तौ घोषप्रघोषरुचिरं व्रजकर्दमेषु ।
तन्नादह्रुष्टमनसावनुस्रुत्य लोकं मुग्धप्रभीतवदुपेय तुरन्ति मात्रोः ॥२२॥
सरसरां सरकोनि जानुकर । व्रजकर्दमीं अतिसत्वर । रांगतां वाजती पदनूपुर । करिती गजरा क्षुद्रघंटा ॥९॥
मेखळेचिया क्षुद्रघंटा । वांक्या किंकिणी बाहेवटां । गजरें बिंदुली मणगटां । नाद मोठा पैंजणा ॥२१०॥
पिंपळवाणें चूडामणि । पदकें मुक्तें कंठाभरणीं । करमुद्रिका रत्नकिरणीं । लोपे तरणि नभोगर्भीं ॥११॥
रुचिर भूषणांचा ध्वनि । विस्मय पावती अंतःकरणीं । .................... तोषती ॥१२॥
जातां देखोनि व्रजींचा लोक । मागें धावती नावेक । चारी अथवा पदपंचक । मग फिरती धाक मानूनि ॥१३॥
चारी पांच पांड जाती । भीतापरी मागें पळती । माता कवळोनि मागें पाहती । दचकोनि ठाती घाबिरे ॥१४॥
तन्मातरौ निजसुतौ घृणया स्नुवन्त्यौ पंकांगरागरुचिरावुपगुह्य दोर्भ्याम् ।
दत्त्वा स्तनं प्रपिबतोः स्म मुखं निरीक्ष्य मुग्धस्मिताल्पदशनं ययतुः प्रमोदम् ॥२३॥
तेव्हां यशोदारोहिणी । निजकुमरांची क्रीडा नयनीं । देखतां स्नेहें कळवळूनि । पान्हा स्तनीं लोटला ॥२१५॥
आले कर्दमीं रांगोनि । अंगें मांखली तेणेंकरूनि । तैसेंचि हृदयीं आलिंगूनि । निर्भर मनीं स्वानंदें ॥१६॥
हर्षें उत्संगीं घेऊन । पान्हाइले पाजिती स्तन । स्तन प्राशितां संतोषोन । पाहती आनन कुमारांचें ॥१७॥
बाळकें मातृमुखाकडे । पाहती स्तनींचीं काढूनि तोंडें । हास्य करितां बाहेर सांडें । दुग्ध रोकडें वदनींचें ॥१८॥
फुल्लारविंदासारिखीं वदनें । शोभती कोमळ नूतन दशनें । तोष पावती देखोनि मनें । देती चुंबन सकृपा ॥१९॥
नेणतीं बाळें हांसती जैसीं । नेत्र मुद्रा चंचल तैसी । दाऊनि वदनातें विकासी । जो हृषीकेशी जगदात्मा ॥२२०॥
यर्ह्यंगनादर्शनेयकुमारलीलावंतर्व्रजे तदबलाः प्रगृहीतपुच्छैः ।
वत्सैरितस्तत उभावनुकृष्यमाणौ प्रेक्ष्यन्त्य उज्झितगृहा जहृषुर्हसंत्यः ॥२४॥
रिंगणक्रीडा बहुतां परी । बोलिला अन्यग्रंथांतरीं । येथ शुकाची वैखरी । बहुविस्तारें न पडेचि ॥२१॥
वदों ग्रंथांतरींचा अर्थ । तरी टीका म्हणणें होईल व्यर्थ । ग्रंथसंग्रह म्हणती संत । म्हणोनि श्लोकार्थ बोलिलों ॥२२॥
रिंगणक्रीडा झालियावरी । कांहीं स्वल्पकाळांतरीं । उभा राहों शिकला हरी । तें अवधारीं परीक्षिति ॥२३॥
मातेचिया धरूनि जानु । उभे राहती कंपायतानु । भिंती धरूनि अणुप्रमाणु । करिती चळण पदांचें ॥२४॥
द्वारें देहली लंघिती । उंबरियांचे ठेंके घेती । उभे राहतां बदबदां पडती । गोपी हांसती खदखदां ॥२२५॥
पळोनि जाति मातेपासीं । मारिलें म्हणोनि सांगती तिसी । बोटें दाविती गोपिकांसी । त्या चौपासीं हांसती ॥२६॥
कर पसरूनि भवंती भवरीं । भोंवडी येतां जाती चांचरीं । पडोनि भूमि धरिती करीं । हांसती नारी विस्मितां ॥२७॥
लागती एकमेकां पाठीं । मिठी घालिती जननीकंठीं । स्तन मागती रिगोनि पोटीं । न देतां हठीं न सोडिती ॥२८॥
वाऊ म्हणोनि दाविती माते । पाय दाऊनि सांगती व्यथे । काऊ चिऊ करिती हातें । नृत्यगीतें अनुकरिती ॥२९॥
रत्नखचित सर्व लेणें । अंग्या टोप्या पिंपळवाणें । पायीं चढविलीं पादत्राणें । रूपलावण्यें भुलविती ॥२३०॥
कलभाषणें सांगती गोठी । ऐकतां मानस मागुतें नुठी । ब्रह्मानंद लाळ घोटी । ते संतुष्टीकारणें ॥३१॥
अंगनावर्गासि दर्शनीय । कुमारलीलेचा अतिशय । जिचेनि वेधें लोकत्रय । निजव्यवसाय विसरले ॥३२॥
योगियां दुर्लभ ध्यानसुख । तो हा गोपिकां सन्मुख । धांवे प्रेम पसरूनि मुख । दावी कौतुक क्रीडेचें ॥३३॥
ऐशी दर्शनीय कुमारलीला । जैं हे अपूर्व देखती डोळां । तेथ तटस्थ बल्लवबाळा । गृहें वेल्हाळा नाठविती ॥३४॥
क्रीडतां देखोनि रामकृष्णां । झालियां संसारीं वितृष्णा । क्षुधा तृषा शीत उष्णा । देवभावना विसरती ॥२३५॥
वत्सपुच्छें धरूनि हातीं । इतस्ततः आकर्षिती । वत्सएं धांवतां झोंके खाती । ओढत जाती त्यांमागें ॥३६॥
ज्याचे दाऊनि अनुकार । मानव खेळती दशावतार । तेथ गुंतल्या जनाचे नेत्र । अन्य व्यापार विसरती ॥३७॥
ते हे बाळक्रीडा प्रत्यक्ष । सभाग्य गोपींचे देखती अक्ष । योगमुद्रेचा केतुला पक्ष । कैचें लयलक्ष यापुढे ॥३८॥
गोपी लिखितचित्राकार । पातीं हालवूं विसरले नेत्र । पाहतां पाहतां बाळचरित्र । लागल्या एकाग्र समाधि ॥३९॥
नेत्र गुंतले श्रीकृष्णरूपीं । मनें गुंतलीं क्रीडाकल्पीं । जैसीं स्वप्नाचे आरोपीं । जागृति लोपी सुषुप्ति ॥२४०॥
तैशा गोपिका तटस्थ झाल्या । प्रपंचभानातें विसरल्या । कृष्णाकार होऊनि ठेल्या । सहज लागल्या समाधि ॥४१॥
मुख्यचैतन्यवियोगें । प्रत्यक्चैतन्यभ्रांतिजोगें । ज्ञानाभ्यासें योगमार्गें । साधनप्रसंगें समरसें ॥४२॥
जीवात्म्यांचें ऐक्य घडे । तोंवरी साधन अवघडें । ऐक्य झालिया वियोग न घडे । मागें पुढें तेंचि तें ॥४३॥
राजयोगें ज्ञानावबोध । अष्टांगयोगें समाधि सिद्ध । कर्मयोगें चित्त शुद्ध । मोक्षप्रद वैराग्य ॥४४॥
नेत्रामाजील लक्षूनि काळें । लक्ष योगिश्वरूपीं मिळे । लयस्थधारणेचेनि बळें । मन आकळे तंव राहे ॥२४५॥
कल्पनेचा करितां जय । सहजेंचि होय मनाचा लय । र्सक्योगां जो प्रमेयं । तो अप्रमेय श्रीकृष्ण ॥४६॥
सर्वयोगां मुकुटमणि । भक्तियोग म्हणती मुनि । तो प्रत्यक्ष चक्रपाणि । व्रजभुवनीं दाखवी ॥४७॥
बह्मविश्वासें भावना । उपरमें वेध लाविजे मना । तें ब्रह्म फावलिया नयना । समाधि जना कां न लगे ॥४८॥
निर्दैवां करितां नानायत्न । प्राप्त नोहे अल्प सुवर्ण । स्वयें श्री जैं वसवी सदन । तैं सिद्धि अंगण झाडिती ॥४९॥
कृष्णप्रकाशें मनादि करणें । अवघीं स्वविषयीं सज्ञानें । तेथ विषयरूप झालेनि कृष्णें । चैतन्यघनें वेधिलीं ॥२५०॥
यालागीं विसरल्या गृहकृत्यें । पाहतां श्रीकृष्णक्रीडेतें । समाधिस्ध झालिय चित्तें । प्रपंचद्वैतें मूकल्या ॥५१॥
कृष्ण नतनाट्य लाघवी । मायानियंता गोसांवी । तो स्ववेधें समाधि लावी । पुन्हा जागवी प्रकृतीतें ॥५२॥
येरव्हीं कृष्णीं वेधल्या नारी । पुन्हा वर्तती संसारीं । हे ना भक्तियोगाची थोरी । एक प्रकट करी परमात्मा ॥५३॥
एरव्हीं भिंगुरटी धरी किडे । ते पक्ष फुटोनि गगनीं उडे । पुन्हा कीटकत्व तयां न घडे । जेंवि कां लांकडें चंदनें ॥५४॥
तो महा पूर्णब्रह्म । लीलाविग्रही पुरुषोत्तम । प्रकट भक्तियोगाचें वर्म । जें अगम्य विधिहरां ॥२५५॥
प्रपंच किंवा हा परमार्थ । द्वैत किम्वा हा अद्वैतार्थ । यदर्थीं सुरवर झाले भ्रांत । केउती मात इतरांची ॥५६॥
पुढें सुरवरांचिये मति । क्रीडामिसें प्रकट होती । तेथ सावध होऊनि श्रोतीं । सप्रेम भक्ति विवरावी ॥५७॥
असो ऐसिये बाळलीळे । गुंतले व्रजवधूंचे डोळे । ठेलें गृहकृत्य त्यांतें नकळे । ऐशा गोपाळें वेधिल्या ॥५८॥
ऐशी व्रजांगनांची मात । तेथ जननीचा कोण वृत्तांत । ऐशी आशंका अभिमन्युसुत । करितां समर्थ शुक बोधी ॥५९॥
शृंग्यग्निदंष्ट्र्यसिजलद्विजकंटकेभ्यः क्रीडापरावतिचलौ स्वसुतौ निषेद्धुम् ।
गृह्याणि कर्तुमणि यत्र न तज्जनन्यौ शेकात आपतुरलं मनसोऽनवस्थाम् ॥२५॥
नावरती परम चपळ । सैराट धांवती उभय बाळ । रक्षणार्थ सर्वकाळ । माता स्नेहाळ धांवती ॥२६०॥
अजा अविकें गाई म्हशी । मृगें चितळें क्रूर आवेशीं । झणें खोंचिती बाळकांसी । चिंता मानसीं जननीच्या ॥६१॥
जागलीच्या अग्निष्टिका । तापावया करिती शेका । द्रव्यविशेष कोलत्या उल्का । खेळतां बाळकां रक्षिती ॥६२॥
कुत्रीं मांजरें डुकरें कोल्हीं । विंचू सर्प गांधिलें पाली । नकुळ क्रमेल आस्वलमेळीं । गोळांगुळीं रक्षिती ॥६३॥
परम हिम्स्र व्याघ्र वृक । गजसिंहादि भयानक । रासभ अश्व मूषक शशक । सरड बेडूक रक्षिती ॥६४॥
गोमक्षिका भ्रमर डांस । सापसुरळीया गोंबी सविष । गणें गोंचिड विसपत्रास । पिपीलिका संरक्षिती ॥२६५॥
दंष्ट्री आणि दंशकर । योनि अनेक प्रकार । त्यांपासूनि रक्षिती कुमार । माता सादर हौनि ॥६६॥
सुरी कातरी सुई दाभणें । विळी पायविळी नाचकणें । खङ्गादिकें शस्त्रें तीक्ष्णें । त्यांचीं स्पर्शनें वर्जिती ॥६७॥
रांजणीं पाहतां आपुलीं मुखें । उड्या घालूं पाहती तवकें । वापी कूप आणि तडाकें । रिघतां बाळकें रक्षिती ॥६८॥
गारी दोबाडें थिल्लरें । डोहो भरले यमुनातीरें । अनेक जातीचीं जलचरें । तेथें लेंकुरें रक्षिती ॥६९॥
उघडें झांकलें प्राशितां जळ । क्रूर उष्ण कीं शीतळ । जंतुदूषित अमंगळ । घेतां बाळ वर्जिती ॥२७०॥
झणें झडपिती कावळे घारी । श्येन ससाणे नानापरी । कुक्कुटें पिल्यांच्या कैवारीं । बाळें घाबिरीं करितील ॥७१॥
म्हणूनि स्नेहाळ उभय माता । पाहती सादर अतंद्रिता । पक्षियातीच्या आघाता - । पासूनि सुतां रक्षिती ॥७२॥
कांटे खडे आणि सरांते । अपामार्गादि ओषधी कांते । चोहट्या काटकें ताटें काष्ठें । वेध अरिष्टें रक्षिती ॥७३॥
तृणतुषादि सिकता धुळि । जंतु रिघतां नेत्रकमळीं । उन्मत्तादि पुष्पफळीं । स्पर्शकाळीं वर्जिती ॥७४॥
धांवती सैराट अरडिं दरडीं । उड्या टाकिती अवघडीं । भित्तिप्रदेशीं झाडीं खोडीं । चढतां तांतडी वर्जिती ॥२७५॥
ऐसे क्रीडापर चपळ । देखोनि अनावर बाळ । रक्षणी जननिया स्नेहाळ । सर्वकाळ तत्पर ॥७६॥
तेणें विसरल्या गृहकृत्यें । बाळक्रीडेतें वेधलीं चित्तें । ताटस्थ्य पडिलें इंद्रियांतें । पहाती कृष्णातें जगन्मय ॥७७॥
जैसा ध्यानयोगी सगुणमूर्ति । आणूनिया ध्यानाप्रति । तदाकार करी वृत्ति । बाह्यप्रवृत्ति विसरोनि ॥७८॥
मनचि होय सगुण देव । मनोमयाचि उपचार सर्व । मानसनिष्ठेचें लाघव । देहभव विसरवी ॥७९॥
कल्पनामूर्तींचें इतुकें बळ । कृष्णचिन्मात्रचि केवळ । माता सप्रेम स्नेहाळ । न लगे प्रबळ धारणा ॥२८०॥
गाडा धांवे उतरवटां । आपणा जाणें तेचि वाटा । तैं श्रमावांचूनि पेण पैठा । तेंवि निष्ठा हे झाली ॥८१॥
तृषार्त ग्रीष्मीं शोधी जळें । त्यासि अवचटें अमृत मिळे । अमर करूनि तृषा ओळे । तेंवि गोपाळें सुतमोहें ॥८२॥
पशुपक्ष्यादि सर्व जाति । पुत्र मोहें झळंबती । तैसा प्रेमा भगवद्भक्तीं । तरी सायुज्यमुक्ति कामारि ॥८३॥
तें यशोदेसी भाग्यें घडलें । पुत्रमोहें स्नेह जडलें । त्यामाजीं कैवल्य सांपडलें । हातां चढलें चित्सुख ॥८४॥
सप्रेमें एकांतिकी भक्ति । प्रेमासाठीं सकाम चित्तीं । शिवविरंच्यादि तपें करिती । ते यशोदेप्रति लाधली ॥२८५॥
भक्तीं भजिजे विधिविधानें । एथ भज्यचि धांवे रानें । लालनें ताडनें स्तन्यपानें । गालिप्रदानें संतोषे ॥८६॥
उभय जननींची हे निष्ठा । तेणें लागली पराकाष्ठा । ठेल्या प्रापंचिक चेष्टा । मुकल्या कष्टा हरिप्रेमें ॥८७॥
ज्यांचें विसरतां वास्तव ज्ञान । असाच साच प्रपंचभान । तोचि इंद्रियां गम्यमान । तें समाधि आन ते कैशी ॥८८॥
योगाभ्यासें सेऊनि इंदु । अल्प प्राशिजे सुधाबिंदु । तेथ प्रत्यक्ष जोडल्या अमृतसिंधु । मग आनंदु कोणता ॥८९॥
असो जननीची हे दशा । कथितां ओहट न पडे तोषा । पुढें ऐकें कुरुनरेशा । कीर्ति परेशाकृष्णाची ॥२९०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP