अध्याय ८ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कालेनाल्पेन राजर्षे रामः कृष्णश्च गोकुले । अघृष्टजानुभिः पद्भिर्विचक्रमतुरंजसा ॥२६॥
राजसत्तमा तपोधना । ऐकें परीक्षिते सज्ञाना । गोकुळीं क्रीडतां रामकृष्णा । भववेदना हारपली ॥९१॥
शुद्धभद्रेंचि चंद्रकळा । तैशी अभिवृद्धि तयां बाळां । नित्य नूतन दाविती खेळा । स्नेह आगळा उपजविती ॥९२॥
चालों शिकले अल्पकाळें । भूमी न लगती जानुमंडळें । वृषभक्रीडेचिये दाऊनि लीले । करपदकमळें चालती ॥९३॥
मुखें नर्दती वृषभाकार । दाऊनि युद्धाचा अनुकार । होती सवेग पलायनपर । शिरें शिर थडकिती ॥९४॥
करपद भूमीसि टेंकिती । मंडूकक्रीडे अनुकरती । मंडूकाकारें उड्या घेती । भेडसाविती प्रबुद्धां ॥२९५॥
रीस जंबुक वृक व्याघ्र । अजा अविक मृग सूकर । श्वान मार्जार वानर । सर्व अनुकार दाविती ॥९६॥
जळीं निमग्न झालों म्हणती । पोहोनि भूमीवरी दाविती । जलचरां ऐसे उल्लाळती । धरिलें म्हणती जलचरीं ॥९७॥
यशोदाप्रमुख गोपी सकळा । बैसोनि म्हणती नाचे बाळा । स्वयें नाचोनि ब्रह्मांडगोळा । मेघसांवळा नाचवी ॥९८॥
ऐसे अनेक क्रीडाविशेष । गोकुळामाजीं हृषीकेश । चालों शिकतां गोपिकांस । दावी परेश परमात्मा ॥९९॥
ततस्तु भगवान् कृष्णो वयस्यैर्व्रजबालकैः । सहरामो व्रजस्त्रीणां चिक्रीडे जनयन्मुदम् ॥२७॥
त्यानंतरें कांहीं काळ । क्रमिलियानंतर घननीळ । मिळवूनिया वयस्यमेळ । सवें वेल्हाळ बळभद्र ॥३००॥
झाले अत्यंत क्रीडापर । मातेपासूनि जाती दूर । गोकुळामाजीं घरोघर । फिरती सत्वर क्रीडतां ॥१॥
जाती ठाती पळती लपती । गोष्टी सांगती पुसती रुसती । गाती नाचती ऐकती । आणि हांसती गदगदां ॥२॥
एकमेकां लागती पाठीं । एकमेकां घालिती मिठी । एकमेकां धरिती कंठीं । पृष्ठीं मुष्टीं ताडिती ॥३॥
ऐसा श्रीकृष्ण लावण्यसिंधु । मिळवूनि अर्भकवृंदु । ओपी गोपींसी परमानंदु । क्रीडाविनोद प्रकटूनि ॥४॥
षड्गुणैश्वर्यें संपन्न । लीलाविग्रही श्रीभगवान । क्रीडेमाजीं पूर्णपण । प्रकटी कृष्ण नटनाट्यें ॥३०५॥
कृष्णस्य गोप्यो रुचिरं वीक्ष्य कौमारचापलम् । श्रृण्वत्याः किल तन्मातुरिति होचुः समागताः ॥२८॥
श्रीकृष्णाचीं बाळचरित्रें । चपळ चौर्याद पाहोनि नेत्रें । मातेपाशीं चित्रचिवित्रें । कथिती वक्त्रें गोपिका ॥६॥
परमप्रियकर श्रीकृष्णलीला । धन्य गोपी देखती डोळां । अद्यापि श्रवणीं पुण्यशीळा । प्रेमगळाळा रुचिकर ॥७॥
यशोदा सादर देखोनि श्रवणीं । श्रीकृष्णाची आश्चर्यकरणी । सांगती साक्षेपें येऊनि । व्रजकामिनी उल्हासें ॥८॥
घरोघरींचे बोभाट भारी । बाल्यचापल्या आणि चोरी । सांगोनिया हास्यगजरीं । यशोदासुंदरी तोषविती ॥९॥
एथूनि कृष्णाचीं गार्हाणीं । मिळोनि समस्त गौळणी । घालिती यशोदेचिये कर्णीं । अंतःकरणीं संतोषे ॥३१०॥
वत्सान्मुंचन्क्कचिदसमये क्रोशसंजातहासः स्तेयं स्वाद्वत्त्यथ दधि पयः कल्पितैः स्तेययोगैः ।
मर्कान् भोक्ष्यन्विभजति स चेन्नात्ति भांडं भिनत्ति द्रव्यालाभे स गृहकुपिते यात्युपक्रोश्य तोकान् ॥२९॥
गोपिका म्हणती यशोदेसी । कृष्णें त्रासिलें आम्हांसी । तें जरी सांगावें तुजपाशीं । झणें कोपशी अंतरीं ॥११॥
तूं यशोदे साबडी भोळी । कैसा व्यालीस हा वनमाळी । याचेनि तूंतें शिव्यागाळी । नवी नवाळी होतसे ॥१२॥
दोहनकाळ न होतां पाहीं । वत्सें सोडी रिघोनि गेहीं । एकत्र होतां वत्सें गाई । पळे लवलाही तेथूनि ॥१३॥
वत्सें प्यालीं म्हणोनि हाका । मारी भोंवतालिया लोकां । वत्सें सावरिती गोपिका । तंव अर्भकां चेतवी ॥१४॥
वत्सें नावरतीच नारी । आक्रोश करिती कुमार कुमारी । तें ऐकोनि श्रीमुरारि । हास्य करी आनंदें ॥३१५॥
वत्सांकडे गुंततां गोपी । तंव गृहीं प्रवेशे विश्वव्यापी । शिंकीं उतरूनि साक्षेपीं । गोरस ओपी वोपाळा ॥१६॥
चौर्यकर्मासि प्रबुद्ध । चोरूनि नवनीतादि दधिदुग्ध । चाखोनि भक्षिजे सुस्वाद । आम्ल विरुद्ध न सेवी ॥१७॥
न लगे कोणासी मागावें । किंवा पुसावें कोणीं द्यावें । गोड लागेल तें घ्यावें । सुखें भक्षावें यथेष्ट ॥१८॥
झणें म्हणसी हें बाळक । केवढी पैं ययाची भूक । तरी तूं कोपूनि नावेक । ( याचें ) कौतुक अवधारीं ॥१९॥
नकळत रिघोनियां घरीं । करी गोरसाची चोरी । शिकला चोरीच्या कुसरी । नानापरी अवघडा ॥३२०॥
किती खाईल एकल्या पोटें । परंतु याचें कर्म खोटें । सवें आणि धाटेमोठे । लंड कारटे गौळियांचे ॥२१॥
वडजा सुदामा वांकुडा । पेंधा दोंदील बोबडा । सामा धामा गोमा वेडा । आणि निजगडा बळराम ॥२२॥
ऐसे अनेक गोपाळ । आणि मर्कटांचा मेळ । दुश्चित देखोनि साधी वेळ । लागला काळ आम्हांसी ॥२३॥
आपण अल्प भक्षण करी । पुरत्या भरी त्यांच्या गारी । त्यांसही आलिया शिसारी । उरलें चारी मर्कटां ॥२४॥
जेव्हां न खाती माकडें । तेव्हां फोडोनि टांकी भांडें । दधिदुग्धांचे झाले सडे । ते तूं निवाडें अवलोकीं ॥३२५॥
म्हणती आपुलें जतन करा । तरी कांहीं न लगतां याचिया करा । अग्नि लावूं धांवे घरा । जाय लेंकुरां रडवूनि ॥२६॥
दधि दुग्ध न मिळे चोरांपोरां । आगी लागा ऐशिया घरा । बोलोनि सक्रोध उत्तरा । पळे लेंकुरां रडवोनि ॥२७॥
पालखीं मंचकीं भूमीं खाटे । निजेलीं लेंकुरें रडवी हट्टें । बोलोनि अन्योन्य ओखटें । जाय नेटें पळोनि ॥२८॥
म्हणसी ठेवावें अवघडीं । तरी हा नाना यत्नें काढी । कैशी करी कडोविकडी । ते थोडीसी परियेसीं ॥२९॥
हस्ताग्राह्ये रचयति विधि पीठकोलूखलाद्यैश्र्छिद्रं ह्यंतर्निहितवयुनः शिक्यभांडेषु तद्वित् ।
ध्वांतागारे धृतमणिगणं स्वांगमर्थप्रदिपं काले गोप्यो यदि हि गृहकृत्येषु सुव्यग्रचित्ताः ॥३०॥
हस्त न पावतिये ठायीं । उंच शिंकीं दुग्धदहीं । ठेविलें जाणें अपुलें हृदयीं । कोणी कांहीं न सांगतां ॥३३०॥
कोण्या पात्रामाजीं काय । ऐसेम यासि ठाऊकें होय । मग तें घ्यावया उपाय । करी लवलाहें तें ऐकें ॥३१॥
थोर थोर पाट बुडीं । रची घालोनि उतरडी । उभें उलूखल त्यावरी मांडी । भोंवते गडी त्या धरिती ॥३२॥
उखळी उभा करी पेंधा । आपण वळंघे त्याचिये खांदां । दंडें करूनि पात्रभेदा । पाडी विंधा तळवटीं ॥३३॥
गोरसाचिये पडतां धारें । अंजलिबद्ध दोहीं करें । मुखें प्राशितां कोंपरें । इतर पोरें प्राशिती ॥३४॥
छिद्र करावयाची कळा । कोणें शिकविली या गोपाळा । न चोजवती परम कुशळां । ते करतळामळ यासीं ॥३३५॥
परम अंधारीं निगूढ स्थळीं । निजांगींच्या तेजें उजळी । भूषणमणींच्या बंबाळीं । अंशुमाळी विसरवी ॥३६॥
ऐशी करील जैं रहाटी । तैं मज दावा नेऊनि दृष्टी । तुम्हां देखतां धरूनि मुष्टी । घेऊनि शिपुटी मारीन ॥३७॥
ऐसें म्हणसी जरी तूं माते । अगाध नेणसी याचीं मतें । आम्हीं गुंततां कार्यातें । मग हा तेथें प्रवेशे ॥३८॥
दळणें कांडणें शेण पाणी । डोई विंचरणें नहाणें धुणीं । जेवणीं खाणीं गुंततां शयनीं । तैं हा सदनीं प्रवेशे ॥३९॥
गृहा नाहीं एकीच वाट । माते राखावीं बळकट । अनेक मार्गें हा अलगट । होय प्रविष्ट अंतरीं ॥३४०॥
जोंवरी घरामाजीं वागे । तोंवरी कोणीच नोहे जागें । टाकूनि गेलिया लागवेगें । सांगो मागें तुजपाशीं ॥४१॥
झणें म्हणसी व्रजींच्या नारी । बाळकांवरी घालिती चोरी । जपोनि धरितां हा मुरारी । नवल करी तें ऐकें ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP