अध्याय ८ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - एवं संप्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितमेव तत् । चकार नामकरणं गूढो रहसि बालयोः ॥११॥
शुक म्हणे गा परीक्षिती । ऐशी दृढाविली नंदमति । एरव्हीं गर्गाची प्रवृत्ति । गोकुळाप्रति एतदर्थ ॥१३०॥
गर्ग संप्रार्थिला नंदें । ऐकोनि भरला परमानंदें । रुग्ण हर्षे प्रिय औषधें । तेंवि मोदें स्वीकारी ॥३१॥
मग गोप्याहूनि गोप्य स्थान । परम निगूढ एकांतस्थान । दोहीं कुमारांचें नामकरण । केलें नेउनि ते ठायीं ॥३२॥
नंद यशोदा रोहिणी । निजकुमरांतें घेऊनि । बैसलीं पुण्याहवाचनीं । विधिविधानीं गर्गाज्ञा ॥३३॥
गर्गें जाणोनि अभ्यंतर । नंदासि कळों नेदितां मंत्र । क्षात्रविधानें उभय कुमार । केले सत्वर संस्कृत ॥३४॥
नंदयशोदापुरस्कृत । गर्गेंचि सारिलें सर्वकृत्य । क्षात्रविधानें वृष्णिसुत । गुप्त संस्कृत करावया ॥१३५॥
शतपळात्मक तुळामान । दिव्यजांबूनदसुवर्ण । पात्र आणिलें भरून । वेधहीन सुमुक्तीं ॥३६॥
गर्गें हस्तें समान केलें । नामाष्टक वरी लिहिलें । नामकरणीं जें बोलिलें । तें श्रवण केलें पाहिजे ॥३७॥
प्रथम श्रीमन्मंगलमूर्ति । द्वितीय लिहिली सरस्वती । तृतीय गुरु तो गर्गमूर्ति । श्रीप्रकृति कुलदेवी ॥३८॥
वैकुंठ ऐसें मासनांव । नक्षत्रचरणें वासुदेव । गुप्त नाम श्रीकेशव । प्रकट स्वमेव श्रीकृष्ण ॥३९॥
प्रथम कुलदेवताभक्त । द्वितीय मासक्रमें प्राप्त । तृतीय नक्षत्र तेंचि गुप्त । प्रकट चतुर्थ एक म्हणती ॥१४०॥
सुवर्णशलाका घेऊनि हातीं । लेखन करी गर्ग सुमति । मुक्ताफळांवरी अक्षरपंक्ति । मुक्ताफळांचि सारिख्या ॥४१॥
ऐसें नामाष्टकलेखन । करूनि षोडशोपचारें पूजन । वर्णसंख्या निष्कसुवर्ण । तत्पूजनीं अर्पिलें ॥४२॥
नामचतुष्टयमंगलाचरण । प्रथम नंदें केलें पठण । त्यानंतरें नामकरण । उच्चारण आदरिलें ॥४३॥
जन्मलासी श्रावणमासीं । मधुक्रमेण वैकुंठोऽसि । नंद म्हणतां गर्गऋषि । दीर्घायुर्भव म्हणतसे ॥४४॥
नक्षत्रनामाचा अनुवाद । वासुदेवोऽसि म्हणे नंद । गर्गें दिधला आशीर्वाद । दीर्घायुर्भव म्हणोनि ॥१४५॥
मनाचि माजीं नाम गुप्त । त्वं केशवोऽसि नंद म्हणत । आशीर्वाद गर्ग देत । दीर्घायुर्भव म्हणोनि ॥४६॥
नंद पढे प्रकट नामासी । श्रीकृष्णवर्मा त्वमेवासि । दीर्घायुर्भव गर्गऋषि । मंत्राक्षतांसि ओपित ॥४७॥
मग वेदोक्त मंत्राक्षता । गर्गें ओपिल्या सकळां माथां । रामपूर्वक कृष्णनाथा । केलें तत्त्वतां नामकरण ॥४८॥
गंधाक्षता कुसुममाला । सुगंधचूर्णाचा वरी उधळा । वस्त्रें भूषणें सुवर्णतुळा । दक्षिणेसि ओपिल्या ॥४९॥
हस्तमात्रा कर्णमात्रा । कौशेयपट्कुलादिका वस्त्रां । सालंकृता धेनु पवित्रा । नंदें सत्पात्रा अर्पिल्या ॥१५०॥
अक्षवाणें गर्ग करी । अहेर वाहिला घरींचें घरीं । नामकरण ऐसे परी । गूढागारीं संपविलें ॥५१॥
भूत भविष्य वर्तमान । बाळकाचें गुणलक्षण । गर्ग नंदासे करील कथन । तें सर्वज्ञ परिसोत ॥५२॥
गर्ग उवाच - अयं हि रोहिणीपुत्रो रमयन्सुहृदो गुणैः । आख्यास्यते राम इति बलाधिक्याद्बलं विदुः । यदूनामपृथग्भावात्संकर्षणमुशंत्युत ॥१२॥
रमवील सुहृदां समस्तां । यालागीं नाम रोहिणीसुता । राम म्हणोनि ठेविलें आतां । ऐक संकेता दूसर्या ॥५३॥
पृथ्वीचाही घातल्या भार । याच्या बळाचा न कळे पार । यालागीं नाम हें बलभ्रम । ऐक उच्चार तिसरा ॥५४॥
कोणाएका निमित्तासाठीं । यादव लागती बारा वाटीं । ते हा स्वसत्ता एकवटी । बोधूनि गोठी निजगुह्य ॥१५५॥
सम्यक् म्हणजे बरवेपरी । यदुकुळाचें कर्षण करी । समस्त आणि एके हारीं । तें नाम निर्धारीं संकर्षण ॥५६॥
आतां तव पुत्राचें कथन । नंदा ऐकें सावधान । भूत भविष्य वर्तमान । बहु थोडें न सूचिजे ॥५७॥
आसन्वर्णास्त्रयो ह्यस्य गृह्णतोऽनुयुगं तनूः । शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतां गतः ॥१३॥
नंदा अपूर्व सांगों कायी । तुझिया पुत्राची नवाई । हा प्रतियुगाच्या ठायीं । देही विदेही होतसे ॥५८॥
युगीं युगीं तनु धरी । चहूं युगीं वर्ण चारी । तीन मागील अवधारीं । चौथा निर्धारीं हा कृष्ण ॥५९॥
कृतयुगीं शुक्लवर्ण । त्रेतायुगीं होय अरुण । द्वापरीं पीतप्रभापूर्ण । आतां श्रीकृष्ण कलिकाळीं ॥१६०॥
शुक्ल रक्त पीतवर्ण । तिहीं युगीं होऊनि पूर्ण । आतां कलीचा जाणोनि गुण । झाला श्रीकृष्ण तव सदनीं ॥६१॥
प्रागयं वसुदेवस्य क्कचिज्जातस्तवाऽऽत्मजः । वासुदेव इति श्रीमानभिज्ञाः संप्रचक्षते ॥१४॥
कोणे एके काळीं स्थळीं । पूर्वीं जन्मला यदुकुळीं । तुझा पुत्र हा महाबळी । भूमंडळीं विख्यात ॥६२॥
वसुदेवाचा झाला पूर्वीं । म्हणोनि वासुदेव बोलिजे सर्वीं । तुझा तनय हा बहुतां नांवीं । बहुकाळींचा बहुकाळा ॥६३॥
वासुदेव ऐसें अभिज्ञ म्हणती । श्रीमान् म्हणिजे हा श्रीपति । ज्ञात्यांमुखें याची ख्याति । सर्व त्रिजगतीं विस्तृत ॥६४॥
गर्गमुखें हें ऐकोनि नंद । मनीं पावला परमानंद । जन्मांतरार्थ कथिला विशद । म्हणे हा अगाध दैवज्ञ ॥१६५॥
प्रत्यक्ष हाचि वसुदेवतनय । नंद नेणे हा अभिप्राय । भावें ऋषीचे धरी पाय । पुन्हा काय बोलिला ॥६६॥
बहूनि सन्ति नामानि रूपाणि च सुतस्य ते । गुणकर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जनाः ॥१५॥
नंदा तुझिया कुमाराप्रति । नामें बहुसाल आसती । तीं समग्र कथनशक्ति । कुंठितमति होतसे ॥६७॥
जेथ माझी मति कुंठित । तेथ सामान्य जनाची कोण मात । तथापि सांगेन किंचित । शास्त्रसंकेतविचारें ॥६८॥
सर्वज्ञ आणि सर्वकर्ता । सर्वसाक्षी सर्वनियंता । सर्वव्यापक सर्ववेत्ता । सर्वात्मकता सर्वगत ॥६९॥
ऐशीं गुणनामें अपार । कर्मानुसारें जें जें अपर । ऐकें तयाचा विचार । सत्य साचार । मद्वाक्यें ॥१७०॥
गोपीमानसविमोहन । कृष्ण पूतनाशोषण । बालकृष्ण व्रजाभरण । शकटभंजन दैत्यारि ॥७१॥
तृणावर्तविध्वंसन । यमलार्जुनउन्मूलन । राधारमण बकदारण । अरिष्टघ्न गोपति ॥७२॥
अघमर्दन श्रीमुरारि । मेघश्याम ईश शौरि । गोरसतस्कर गिरिवरधारी । दुग्धापहारी विश्वदृक् ॥७३॥
ऐशी अनंत नामावळि । प्रकट होईल ते ते काळीं । भविष्यगोष्टि गुप्त कथिली । हे हृत्कमळीं असों दें ॥७४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP